चंकुच्या नाटकांची रेंज बघितली तर हे सर्व सहज पटते. त्याने बसवलेली सर्व नाटके एकदा डोळ्याखालून घातली तर भला मोठा अभ्यासपूर्ण ग्रंथ चाळल्याचा भास होतो. यात ‘वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, युगांत, ही महेश एलकुंचवारांच्या नाटकांची त्रिनाट्यधारा आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत सलग चालणारी ही नाटके, एलकुंचवारांची अभेद्य लेखणी, सळसळून टाकणारा अभिनय, उच्च निर्मितीमूल्ये, यामुळे असं काही घडू शकतं असे प्रश्न निर्माण होतात.
– – –
स्थळ : शिवाजी मंदिर, वर्ष साधारण ऑगस्ट १९८६- ८७च्या आसपास, ‘टुरटुर’चा प्रयोग, मध्यंतर, शिवाजी मंदिरच्या मेकपरूमच्या बाहेरची गच्ची, मध्यंतरात भेटायला खूप गर्दी, त्यात अचानक विनय आपटेची एंट्री, तो मला आणि लक्ष्याला भेटायला आला होता. मी, लक्ष्या, सुधीर जोशी आणि टुरटुरची गँग चहागप्पा करीत होतो, विनय सिगरेट फुंकत आमच्याशी बोलत होता. तेवढ्यात विनयला काहीतरी आठवले. त्याने त्याच्या बाजूला थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या चारपाच जणांना जवळ बोलावले आणि म्हटले, ‘लक्ष्या, पुरू, तुमची ओळख करून देतो, ही औरंगाबादची मुलं आहेत, सगळेच्या सगळे नाटकवाले आहेत, लेटेस्ट टीम आहे, जबरदस्त टॅलेंटेड मुलं आहेत ही,’ असं म्हणून त्याने त्यातल्या दोन शिडशिडीत मुलांना जवळ बोलावले, एका शिडशिडीत मुलाकडे बोट दाखवून म्हटले, ‘हा प्रशांत दळवी, लेखक आहे’, दुसर्या शिडशिडीत मुलाकडे बोट दाखवून, ‘आणि हा चंद्रकांत कुलकर्णी… सध्या औरंगाबाद गाजवून मुंबईत आलेत, प्रायोगिक चळवळीत आहेत, पण चॅलेंजिंग आहेत,’ मी विनयकडे बघत राहिलो, त्याचं ऐकत राहिलो. विनयला दहा बारा वर्षे ओळखत होतो. त्याने एखाद्याची एवढी स्तुती करणे, म्हणजे एखाद्याने रस्त्यावरच्या डांबरात फिट्ट बसलेल्या रुपयाचे नाणे सहजासहजी काढून देण्याइतके कठीण. ती दोन शिडशिडीत मुले आणि त्यांच्याबरोबर आलेली ती टीम, पुढे ‘जिगीषा’ नावाची संस्था बनून, न पेलवणारी आव्हाने पेलवून, मुंबई जिंकतील असे वाटलेही नव्हते.
त्यानंतर..
स्थळ : लक्ष्मीकांत बेर्डेचे घर, वर्ष १९८८-८९ असेल. मी विजय केंकरे, लक्ष्या.. ‘हमाल दे धमाल’ चित्रपटाच्या रिलीजच्या आधी भेटलो होतो. व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांचा विषय निघाला. विजू केंकेरेने आम्हाला दोघांना उद्देशून म्हटले, ‘अलीकडे एक नवीन दिग्दर्शक आलाय मराठी रंगभूमीवर, प्रायोगिक आणि व्यावसायिक दोन्हीकडे सॉलिड गाजतोय. आमच्या पिढीतला बेस्ट आहे.’ मी विजयला म्हटले, ‘अरे, इतक्यात घाई नको करूस कोणालाही ग्रेट म्हणण्याची. अजून दोन चार नाटके होऊ देत.. तोपर्यंत टिकला तर ग्रेट.’ विजय केंकरे आमच्या अगदी जवळचा, त्यामुळे त्याचं कौतुक सर्वत्र व्हावं असं आम्हाला वाटत असताना तोच दुसर्याचं कौतुक करतोय, हे ऐकावेना..
पण विजयचं बोलणं पुढे खरं ठरलं… चंद्रकांत कुलकर्णीची एकएक नाटके येत गेली, हिट्ट होत गेली, पुरस्कार मिळवत गेली आणि ‘चंकु’ त्याच्या सावलीपेक्षा मोठा होत गेला..
त्यानंतर…
स्थळ : रंगभवन, महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा, आमच्या चित्रपट निर्माता संघाच्या मदतीने सांस्कृतिक संचालयाने प्रथमच ऑस्कर पद्धतीने पुरस्कार द्यायचे ठरवले. त्यासाठी तत्कालीन सांस्कृतिक सचिव गोविंद स्वरूप यांनी खास नावाजलेल्या नाट्यदिग्दर्शकांना बोलावून घेतले. त्यात माझ्याकडे चित्रपट क्लिपिंग्जची जबाबदारी दिली. रंगमंच दिग्दर्शनासाठी चंद्रकांत कुलकर्णीला बोलावले. प्रकाशयोजनेसाठी कुमार सोहोनी आणि प्रोमोसाठी स्मिता तळवलकर. शिवाय एकूण पुरस्कार सोहोळयांच्या आयोजनाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. त्यावेळी चंद्रकांत कुलकर्णीचे काम जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्याच्यातला एक अत्यंत विचारी असा रंगकर्मी त्या सोहोळयातही दिसून आला. सोहोळा संपल्यानंतर प्रथम मी काय केले असेन, तर त्याने दिग्दर्शित केलेलं ‘चारचौघी’ हे नाटक मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात पाहिले आणि लेखक प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी खर्या अर्थाने मला झपाटलं… मला विनय आपटेचे ते शब्द आठवले… ही मुलं पुढे नाट्यसृष्टी गाजवतील आणि विजय केंकरेने म्हटलेलं ‘आमच्या पिढीतला बेस्ट दिग्दर्शक’… हे तेव्हा पटलं आणि पुढेही पटत गेलं.
त्यानंतर…काही वर्षांनी, म्हणजे २०१० साली अमेरिकेत नाट्य संमेलन झाले आणि मोहन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दीड-दोनशे रंगकर्मी त्यात सहभागी होण्यासाठी अमेरिकेला गेले. त्यात मीही होतो.
स्थळ : मुंबई सहार आंतरराष्ट्रीय एयरपोर्ट, अमेरिकेला जाण्यासाठी विमानभर माणसं एयरपोर्टवर तयारीत उभी, आत जाण्याची वाट बघत होती. अचानक तिथे एक खणखणीत आवाज त्या सर्वांना दिग्दर्शन करू लागला. ‘चला चला, या साइडला या… मग पुढे तिकडून बॅगेज घेऊन तिकडे जा, तिथू पुढे इथे… मग पुढे…’ वगैरे सूचनांचा भडिमार सुरू झाला. विशेष म्हणजे सगळे त्याचं ऐकत होते, कारण तो दुसरा तिसरा कोणी नव्हता तो, चंकु होता, म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी.
चारपेक्षा जास्त लोक एकत्र आले की ‘चंकु’मधला लीडर जागा होतो. आणि मग तो नुकत्याच रिचार्ज झालेल्या मोबाइल टायमरप्रमाणे सूचना देऊन गर्दी शिस्तीत आणि काबूत आणण्याचा प्रयत्न करीत असतो. ही त्याची लीडरशिप अत्यंत गोड आवाजात प्रेमळ आणि समजूतदारपणे सुरू असते. आणि काही वेळातच या लीडरने सर्वांना जिंकून घेऊन काबूत ठेवलेले असते. हा ‘चंकु’चा गुण त्याच्या दिग्दर्शन कारकीर्दीला पूरक ठरला असावा म्हणूनच ती शिस्त त्याच्या एकूण नाटकांतही दिसून आली असावी. अमेरिकेतल्या त्या वास्तव्यात मी, कुमार सोहोनी, राजन ताम्हाणे, चंकु आणि मंगेश कदम अशा पाच दिग्दर्शकांनी दोन रात्री गप्पांचे फंड रंगवून जागवून काढल्या. जेट लॅगमुळे झोपेचं गणित विस्कटलं होतं.. पण नंतर संमेलनात आम्ही पाचही जणांनी एकमेकांच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन तो यशस्वी केला. चंकुने बसवलेला सर्व नाटकांचा आढावा घेणारा नाट्यप्रयोग आम्ही त्यातल्या विविध जबाबदार्या घेऊन पार पाडला.
आमच्या टीमला आपोआपच फाइव्ह डी (म्हणजे पाच दिग्दर्शक) असे नाव पडले. चंकुच्या नाट्यविषयक विचारांचे एक सुंदर दर्शन या अमेरिका दौर्यात झाले.
मुंबईत करियर करायला अनेक लोक येतात. केवळ नाटक-सिनेमा नव्हे, वाट्टेल ते काम करून पोट भरायला इथे भारतभरातून माणसं येतात. अनेक स्वप्ने पाहत येतात. अत्यंत कठीण काळ त्यांच्या वाट्याला येतो. पण मुंबई कोणाला नाराज करीत नाही. ज्याला जसं हवं तसं त्याचं भलं होतं. हिन्दी चित्रपटसृष्टीत तर अनेक उदाहरणे आहेत. मराठी नाट्यसृष्टीतही एके काळी मुंबई-पुण्याची मक्तेदारी होती. दारव्हेकर मास्टर नागपूरहून आले आणि त्यांनी मराठी नाट्यसृष्टीत ठसा उमटवला. पुढच्या पिढीत अनेक अभिनेते महाराष्ट्राच्या विविध भागातून मुंबईत आले. अगदी चंदू पारखीपासून ते सयाजी शिंदेपर्यंत. कुठून कुठून खेड्यापड्यातून मुलं मुंबईत आली आणि त्यांनी बस्तान बसवले. यात लेखक-दिग्दर्शकांची संख्या तशी माफक होती. वसंत कानेटकर, मधुकर तोरडमल, सदाशिव अमरापूरकर ही त्यातली प्रमुख नावे. मराठी व्यावसायिक रंगभूमी अशा अनेक नावांनी बहरली. पुढे प्रायोगिक रंगभूमीवर दिल्लीहुन एनएसडी या नाट्यसंस्थेतून प्रशिक्षित होऊन मुलं आली, जयदेव हट्टंगडी पासून ते वामन केंद्रे यांच्यापर्यन्त तर अगदी शशिकांत निकतेपासून ते सुहास जोशी, रोहिणी हट्टंगडी या अभिनेत्रींपर्यंत वैविध्यपूर्ण कलावंतानी रंगभूमी नटली. पण आपले कार्यक्षेत्र प्रथम आपल्याच जन्मगावात किंवा शहरामध्ये विकसित करून नंतर मुंबईत आलेले प्रशांत दळवी, चंद्रकांत कुलकर्णी यांजसारखे क्वचित असतील. कारण राज्य नाट्य स्पर्धेत नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, ते अगदी इंदूरपर्यंत अनेक ठिकाणच्या स्थानिक संस्थानी प्रायोगिक नाटके करून नाव कमावले. कित्येक नावे तिथे मोठी झाली आणि अखेर तिथेच राहिली. पण औरंगाबादमध्ये आपली नाटके आणि नाटकांमध्ये विविध प्रयोग करून नंतर एका विशिष्ट विचाराने प्रेरित होऊन एक अख्खी नाट्यसंस्था मुंबईत येते, हा ऐतिहासिक प्रकार केवळ ‘जिगीषा’ या नाट्यसंस्थेने केला.
हे सर्व एका दिवसात नाही झाले. औरंगाबादमध्ये कॉलेजात शिकता शिकता एक ग्रुप तयार झाला, ज्यात प्रशांत दळवी, चंद्रकांत कुलकर्णी आणि इतर अनेक रंगकर्मी विद्यार्थी कार्यरत होते. ज्येष्ठ-कनिष्ठ अशा कलावंतांचा तो ग्रुप होत गेला. हौशी, प्रायोगिक अशा एकांकिका, नाटके त्या ग्रुपतर्फे होऊ लागली. हा ग्रुप सतत एकत्र असायचा, भरपूर चर्चा, वादविवाद चालायचे. पण सर्जनशील कामही तेवढेच व्हायचे. प्रायोगिक नाटके आणि अनेक स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळवून पुढे ‘जिगीषा’ हा ग्रुप नावारूपाला आला. ह्या ग्रुपची लीडरशिप वैचारिक प्रगल्भता असलेल्या आणि ज्येष्ठ असलेल्या प्रशांत दळवीकडे आपोआप आली. त्यांच्यातला असूनही प्रशांत सर्वांनाच मार्गदर्शक होता. भरपूर प्रॅक्टिकल अनुभव घेऊनसुद्धा सर्वांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्राच्या विभागात प्रवेश घेऊन रीतसर अभ्यास केला. म्हणजे आधी प्रॅक्टिकल आणि नंतर शिक्षण असा विचित्र प्रकार झाला. तरी वैचारिक समृद्धी आलीच. पुढे साताठ वर्षे झाल्यावर मात्र या ग्रुपला साचलेपण आलं आणि मुंबईचे वेध लागले. पण चंद्रकातसारख्या कित्येक लोकांना हे शक्य नव्हते. चंकुची घरची परिस्थितीही बेताचीच, त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यावर आता आपला मुलगा कमवायला लागेल अशी सर्व पालकांची अपेक्षा असते; त्याला चंकुचे पालक पण अपवाद नव्हते. पण इथेही फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड प्रशांत दळवीचे विचार पाठ सोडत नव्हते. त्यावर चंकु म्हणतो, ‘अतिशय कठीण निर्णय समोर होता, पालकांच्या अपेक्षा पूर्ण न करता केवळ ध्येयाच्या मागे लागून मुंबईला जाणे शक्य नव्हते. पण प्रशांतने जवळ जवळ सर्वांच्याच पालकांना व्यवस्थित समजावून सांगितले की आम्ही ग्लॅमरच्या मागे लागून केवळ पैसे कमावायला मुंबईला जात नाही आहोत, तर या नाट्यक्षेत्रात भरपूर काही वेगळं करण्याची संधी आता इथून पुढे मुंबईतच आहे. जे आणि जेवढे शक्य होते तेवढे इथे सगळे करून झाले आहे. आपल्या औरंगाबादमध्ये आणि इतर शहरांतही अनेक ज्येष्ठ रंगकर्मीनी भरपूर कर्तृत्व करून ठेवले आहे. पुढे काही कारणामुळे किंवा कौटुंबिक जबाबदार्यांमुळे ती मंडळी स्थानिक पातळीवरच राहिली. आपणही तसेच व्हायचे का? म्हणजे नंतरच्या पिढयांना फक्त गोष्टीच सांगायच्या का- की आम्ही एकेकाळी खूप गाजवले नाट्यक्षेत्र, पण नंतर इथेच अडकलो, मुंबईला गेलो असतो तर खूप काही केले असते. आणि हेच वय आणि वेळ आहे मुंबईत काही करण्यासाठी स्थलांतरित व्हायचे. एकदा का कौटुंबिक जबाबदार्या वाढल्या, तर मात्र आपण इथून हलू शकणार नाही. प्रशांतचे मार्गदर्शन सर्वच पालकांना पटले. विशेष म्हणजे, प्रशांतवर सर्वांचाच प्रचंड विश्वास, त्यामुळे सर्वच पालकांनी औरंगाबादहून मुंबईकडे स्थलांतर करायला परवानगी दिली’… आणि प्रशांत दळवी, चंद्रकांत कुलकर्णी, अभय जोशी, प्रतीक्षा लोणकर, प्रतिमा लोणकर, श्रीपाद पद्माकर, जितेंद्र कुलकर्णी, मिलिंद जोशी आणि काही सहकारी एक विशिष्ट ध्येयाने मुंबईला स्थलांतरित झाले… म्हणजे अख्खी ‘जिगीषा’ ही नाट्यसंस्थांच औरंगाबादहून मुंबईला शिफ्ट झाली. तरी अजित दळवी, दासू वैद्य आदी प्राध्यापक मंडळी तिकडेच राहिली.
पहिला ब्रेक
ही मंडळी मुंबईत आली आणि झपाटल्यासारखी कामाला लागली. ज्याला त्याला आपल्या वकुबाप्रमाणे कामे, नोकर्या मिळत गेल्या. औरंगाबादला असताना ‘जिगीषा’तर्फे केलेल्या ‘पौगंड’ हे प्रशांत दळवी लिखित नाटकाचे मुंबईत अनेक प्रयोग केले. अजित दळवींचे ‘समिधार हे नाटक केले. संगीत नाटक अकादमीच्या स्कॉलरशिपमुळे प्रशांत दळवीचे ‘दगड का माती‘ हे नाटक चंद्रकांतने मुंबईत ‘इप्टा’ या संस्थेतर्फे बसवले. या धडाक्यामुळे पहिल्याच ओव्हरमध्ये षटकार-चौकार लगावत चंद्रकांत कुलकर्णी मराठी प्रायोगिक नाट्यसृष्टीत चर्चेचा विषय झाला.
तशात, मोहन वाघ या प्रतिष्ठित व्यावसायिक निर्मात्याने ‘चंद्रलेखा’ या आपल्या नाट्यसंस्थेतर्फे प्र. ल. मयेकर लिखित ‘रमले मी’ हे नाटक बसवायला चंकुला बोलावले आणि ते चंद्रकांतने सराईतपणे बसवले. त्यामुळे मोहन वाघ यांना एक समर्थ दिग्दर्शक मिळाला आणि त्यांनी वसंत कानेटकरांचे ‘रंग उमलत्या मनाचे’ हे नाटक दिग्दर्शनासाठी चंद्रकांतवर सोपवले. तिथून पुढे चंद्रकांत कुलकर्णी हे नांव व्यावसायिक रंगभूमीवर सातत्याने झळकू लागले.
अर्थात या पहिल्या धडाकेबाज ओव्हरच्या मागे चंद्रकांतवर झालेले नाट्यसंस्कार तोपर्यंत खोलवर रुजले होते. ते कुठून आले?
‘आईवडिलांचे संस्कार… मी केवळ अडीच वर्षांचा असताना माझ्या शिक्षणासाठी आईने ते खेडे गांव सोडायचा निर्णय घेतला आणि औरंगाबादसारख्या शहरात पहिले स्थलांतर केले. त्यामुळे माझ्यावर चांगल्या शिक्षणाचे, चांगल्या शिक्षकांचे संस्कार होत गेले. औरंगाबाद हे शहर सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या जागृत. तिथले संस्कार अत्यंत धगधगीत होते, ते सर्व संस्कार टिपून घेण्याचे माझे वय होते आणि मी ते घेत गेलो. शाळेतल्या स्नेहसंमेलनापासून ते वक्तृत्व स्पर्धापर्यंत सर्वात भाग घेत मी स्वत:चे उन्नयन करीत गेलो. नंतर महाविद्यालयात एकांकिका, मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन ती संस्कारांची मशाल तेवत ठेवली. औरंगाबाद शहराचे रसरसलेपण शोषून घ्यायला या संस्कारांची मदत झाली. तशात कॉलेजमध्ये प्रशांत दळवी आणि नाटकाचा ग्रुप भेटला. प्रशांत हा सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि समाजवादी विचारांचे विद्वान संपादक बाबा दळवी यांचा मुलगा. त्यामुळे अजित दळवी या आणखी एका समाजवादी विचारसरणीच्या मित्राच्या सहवासात आलो. अजितदादा युक्रांदचा कार्यकर्ता, त्यामुळे पुढे डॉ. कानगो, रजिया पटेल आदींची भेट झाली. शिवाय औरंगाबाद हे शहर राज्य नाट्य स्पर्धेचे प्रमुख केंद्र होते, त्यामुळे दरवर्षी सर्जनशील वातावरण तापून निघे. औरंगाबादमध्ये अनेक प्रायोगिक नाट्यसंस्था कार्यरत होत्या, नावाजलेल्या होत्या, त्यात परिवर्तन, पारिजात, दिशांतर, नांदीकार यांच्यासारख्या नाट्यसंस्था होत्या. ज्यांनी अनेक वर्षे सकस नाट्यनिर्मिती केली होती. त्याचवेळी मुंबईहून सत्यदेव दुबेजींचे एक सेमिनार औरंगाबादमध्ये झाले आणि त्यात त्यांच्या नाटकांचा महोत्सव आणि त्यातली नाटके बघून स्तिमित झालो. असेही नाटक असते, हे तेव्हा कळले. अक्षरश: आम्ही सगळेच झपाटून गेलो. मुंबई-पुण्याची नाटके पाहण्याचा योग नंतर आला. पण हे सर्व संस्कार आधी घडले, त्याने समृद्ध झालो. त्यानंतर प्रशांत दळवीने आणखी एक विचार मांडला, दर शनिवार-रविवार मुंबईला जाऊन नाटके बघायची आणि आम्ही ते सुरू केलं. तेव्हा मी पत्रकार म्हणून नोकरी करीत होतो. सुट्टी घेऊन शुक्रवारी रात्री मी आणि प्रशांत मुंबईला निघायचो, शनिवारी दोन आणि रविवारी तीन नाटकं बघायचो. दिवसाला तीनतीन नाटकं मुंबईच्या सहा थेटरांत व्हायची, हा आमच्यासाठी मोठा धक्का होता. त्याच मोहिमेत ‘टुरटुर’, ‘मुंबई मुंबई’सारखी नाटके पहिली. विनय आपटे, प्रकाश बुद्धिसागर यांची नाटके पहिली. आविष्कारची प्रायोगिक नाटके पहिली. हे सर्व आमच्यावर झालेले संस्कारच होते.’
चंकु बोलायला लागला की ऐकत बसावेसे वाटते… त्याने वक्तृत्व स्पर्धा कशा जिंकल्या असतील याचा पुरवाच असतो तो. सुरुवातीला पोरगेलासा वाटणारा चंकु पाहिल्यावर आधी ‘हा काय बोलणार?’ असे वाटते… बोलायला लागला की मोहून टाकतो. त्याच्याबरोबर त्याची नाटके आठवली की, ‘आयला, हा सॉलिड आहे रे,’ असे आपोआप वाटू लागते. वक्तृत्वामुळे कर्तृत्वही बहरते, हे चंकुचे श्रेष्ठत्व आहे.
दुसरा ब्रेक
त्यानंतर चंद्रकांतची सातत्याने नाटके येऊ लागली. तीही मोठमोठ्या नावाजलेल्या प्रायोगिक संस्थांसाठी आणि व्यावसायिक निर्मात्यांसाठी. अजित दळवींचं ‘डॉक्टर तुम्ही सुद्धा’, ‘गांधी विरुद्ध गांधी’ आणि प्रशांत दळवीचं ‘चार चौघी’…
‘चार चौघी’ हे नाटक अत्यंत नाजुक विषयावर पण अतिशय परिणामकारक बांधणी आणि संवाद असलेलं. या नाटकाने इतिहास घडवला. कारण असं चर्चात्मक नाटक एवढ्या मोठ्या गर्दीने बघायची तोपर्यंत मराठी नाट्यरसिकांना फारशी सवय नव्हती. खरे तर चर्चेपेक्षा यातल्या प्रत्येकीची लग्न आणि विवाहसंस्था यावर एक भूमिका आहे, धारणा आहे, त्या सर्व भूमिका लेखकाने सामाजिक भान ठेवून लिहिल्या आहेत आणि सादरकर्त्या अभिनेत्रींनी अतिशय समरसतेने सादर करून रसिकांचे या नाटकाकडे मोठ्या प्रमाणात लक्ष वेधले. दीपा श्रीराम, वंदना गुप्ते, आसावरी जोशी आणि प्रतीक्षा लोणकर (होय, ‘जिगीषा’ची) या चारचौघींनी अख्खे नाटक पेलवले. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णीच्या तोपर्यंतच्या दिग्दर्शकीय कारकीर्दीचा हे नाटक म्हणजे उच्चांक होता. आणि हा त्याच्या कारकीर्दीला मिळालेला खर्या अर्थाने दुसरा ब्रेक होता.
ब्रेक के बाद
विषयातील वैविध्य आणि सादरीकरणातील सच्चेपणा चंद्रकांतच्या नाटकांना प्रचंड यश देऊन गेला. अनेक वर्षांचा अनुभव सोबत जोडला जात होता, नाट्यजाणीवा तीव्र होत होत्या. सखोल संस्कारांच्या मुशीत वाढलेल्या चंद्रकांतच्या समोर आलेलं नवीन नाटक हे त्याच्यासाठी आव्हान असतं. तो म्हणतोही, ‘हे नाटक मी का करावं, मला ते नवीन काय देणार आहे? मी त्या नाटकातून लोकांना काय देणार आहे? ते सकस आहे का? नाटकाची निवड करताना अनेक व्यवधाने मी सांभाळतो, ज्या मुशीत मी तयार झालो त्यातलं सगळं मिळून वर काही वेगळं असं हे नाटक मला काही शिकवणार आहे का? इथपर्यंत तो विचार असतो. विज्ञानाने मला बुद्धीप्रामाण्य आणि तर्कशास्त्र शिकवले. सामाजिक चळवळीने मला काम करण्यासाठी आपले कसून परिश्रम पाहिजेत हे शिकवलं. नाटकाच्या रूपाने ही एक ‘डेमोक्रसी सिस्टिम’ आहे हे शिकवले. नाटक हे एक प्रभावी माध्यम आहे यावर तुमचा एकदा विश्वास बसला की तुमच्या कामात एक ठामपणा येऊ लागतो आणि तो ठामपणा मी नाटक बसवताना जराही ढळू देत नाही. त्यामुळे आपण थोडे अहंकारी, अॅडमंट वाटू शकतो, आधीच्या अनुभवातून कधी कधी आक्रमकही होतो, पण त्यातूनच उगवणारी नाटकाची एक ‘होल्डिंग कपॅसिटी’ येते, ती मला महत्वाची वाटते. नुसत्या आकर्षक हालचाली बसवणे, तात्पुरते मोहून टाकणे, वगैरे क्लृप्त्या त्यामुळेच माझ्या नाटकात सहसा नव्हे, कधीच दिसणार नाहीत.’
चंकुच्या नाटकांची रेंज बघितली तर हे सर्व सहज पटते. त्याने बसवलेली सर्व नाटके एकदा डोळ्याखालून घातली तर भला मोठा अभ्यासपूर्ण ग्रंथ चाळल्याचा भास होतो. यात ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगांत’ ही महेश एलकुंचवारांच्या नाटकांची त्रिनाट्यधारा आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत सलग चालणारी ही नाटके, एलकुंचवारांची अभेद्य लेखणी, सळसळून टाकणारा अभिनय, उच्च निर्मितीमूल्ये, यामुळे असं काही घडू शकतं असे प्रश्न निर्माण होतात. अजित दळवी, प्रशांत दळवींची नाटके करता करता चंकु, डॉ. आनंद नाडकर्णी (रंग माझा वेगळा, आम्ही जगतो बेफाम), अभिराम भडकमकर (ज्याचा त्याचा प्रश्न) यांच्यासारखी नाटके करून अलीकडच्या काळात शेक्सपियरला हात लावतो आणि हॅम्लेटसारखी भव्यदिव्य निर्मिती ‘जिगीषा’ आणि ‘अष्टविनायक’ या संस्थांबरोबर सादर करतो हे एक शिवधनुष्य तो सहजच उचलतो.
त्याचवेळी प्रायोगिक रंगभूमीवर आविष्कार निर्मित ‘मौनराग’ हा सचिन खेडेकरसह महेश एलकुंचवारांच्या ललित लेखांवर आधारित अनोखा नाट्यप्रकार केला…
नाटकांच्या समांतर रेषेत हा दिग्दर्शक ‘पिंपळपान’, ‘टिकल ते पोलिटिकल’सारख्या मालिका ही त्याच ताकदीने करतो आणि ‘बिनधास्त’, ‘काय द्याचं बोला’, ‘भेट’, ‘तुकाराम’ यांच्यासारखे चित्रपट करून ‘आजचा दिवस माझा’ या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कारही महाराष्ट्रात आणतो.
स्थळ : मुंबई, चंकु त्याच्या घरी, मी माझ्या घरी.. वेळ सकाळची.. मोबाइल वाजतो, त्यावर नाव झळकते, ‘चंकु’.. होय, असेच सेव्ह केले आहे. समोर तोच आत्मविश्वासपूर्ण आवाज.. ‘पुरूदादा, बोलू दोन मिंटं?’.. ‘हो बोल ना!’.. मी.. ’अरे मी प्रशांत दळवीचं नवीन नाटक बसवतोय… त्याचं पार्श्वसंगीत तू करावंस अशी इच्छा आहे, करशील का?… नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता… मी हो म्हणून गेलो… कारण त्या निमित्ताने चंद्रकांत कुलकर्णीबरोबर काम करायला मिळणार होते, जे माझ्या तीस वर्षांपूर्वीच्या भूमिकेत जमले नव्हते. १९८९नंतर, म्हणजे मी चित्रपट करायला लागल्यापासून दुसर्या दिग्दर्शकांसाठी संगीत दिग्दर्शन सोडले होते.. तेही ६० नाटकांचे संगीत केल्यानंतर. त्यात मराठी रंगभूमीवरील प्रत्येक दिग्दर्शकासाठी मी त्याच्या नाटकाला संगीत दिले होते. आता ३० वर्षांनी ही विचारणा मला गंमतीशीर आणि आनंददायी वाटली, कारण अष्टविनायक-जिगीषाची निर्मिती आणि प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी या जोडीचे नाटक. निर्मिती सावंत, वैभव मांगले यांच्यासारखे कलावंत. दुसर्या दिवशी वाचनाला बोलावले.
स्थळ : दीनानाथ नाट्यगृह. व्हीआयपी रूम नाटक स्वत: चंकु वाचत होता. त्याच्या वाचनातली जादू मी माझ्या ‘क्लोज एन्काऊंटर’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात त्याने वाचलेल्या ‘पुंजाताई’ या कथेच्या वेळी अनुभवली होती. अप्रतिम वाचली ती कथा. आणि आता हे नाटक… जसंच्या तसं त्याने ते उभं केलं आणि माझी संकल्पना तयार झाली. नाटकाचा गाभा आणि चंकुला हवा असलेला परिणाम कुठे त्याच्या दिग्दर्शकीय संकल्पनेला हलवणारा नसावा हे तत्व मी पाळले आणि तसेच संगीत झाले. या सर्व प्रोसेसमध्ये त्याची शैली, त्याचा ठामपणा मला जवळून दिसला. या नाटकात शेवटी एक गाणे हवे होते, ते त्याने अशोक पत्कींकडून करून घेण्यासाठी चक्क माझी परवानगी घेतली आणि मी एका क्षणात त्याला ती दिली. कारण दिग्दर्शक हा त्या नाटकाचा सर्वेसर्वा असतो, त्याचा शब्द अखेरचा, हे मीही मानतो.
‘संज्या छाया’ या नाटकाचे शतक महोत्सवाकडे प्रयाण सुरू आहे. या नाटकाने एक संगीतकार म्हणून अनेक दिवसांनी खूप समाधान दिले.
कधी काळी शिवाजी मंदिराच्या त्या गच्चीवर विनय आपटेने पहिली ओळख करून दिलेल्या त्या एका छोट्या, शिडशिडीत मुलात एवढी धमक असेल असे त्या क्षणी वाटले नव्हते. ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी..’ या काव्यपंक्तीत सांगितलेला मथितार्थ या रंगकर्मीशी जोडताना मला कसलाच संकोच वाटत नाही. ‘चंकु’ हा मोबाइलमध्ये सेव्ह करण्याचा आणि हाक मारण्याचा शॉर्ट फॉर्म असला तरी, ‘चंद्रकांत कुलकर्णी’ या संपूर्ण नावात मराठी रंगभूमीचा एक दिव्य कालखंड ग्रंथरूपात सामावला आहे… हे पूर्णसत्य आहे.