महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याबाबत जनमानसात एक मोठी नाराजी निश्चितच निर्माण झाली आहे. पुणे महापालिका क्षेत्रातील विकास प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले, त्यावेळच्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिचा उच्चार जाहीरपणे केला. काही जबाबदार पदावर असलेले लोक वादग्रस्त आणि अशोभनीय वक्तव्य करीत असल्याची टीका त्यांनी केली.
राज्यपाल कोशियारी यांनी अलीकडेच महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांच्या विवाहाविषयी आणि औरंगाबाद येथील भाषणात शिवाजी महाराजांचे तथाकथित गुरु समर्थ रामदास अशी काहीतरी मांडणी करत जे वक्तव्य केले ते कोणालाही पटलेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झालेली नसताना त्यांना गुरू-शिष्याच्या नात्यात अडकवण्याचा अनैतिहासिक प्रयत्न इतिहासातील हितसंबंध जपणार्या अनेक विद्वानांनी यापूर्वी केलेला आहे. यासंदर्भात आता तर उच्च न्यायालयाने देखील काही भाष्य केले आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात यापेक्षाही धक्कादायक आणि अशोभनीय अशी राज्यपालांची भाषा प्रसारमाध्यमातून आपण सर्वांनी पाहिली.इतिहासाचे व्यापक भान नसलेले, विद्वत्तेचा संबंध नसलेले असे लोक जेव्हा घटनात्मकदृष्ट्या अशा प्रमुख पदावर येतात तेव्हा त्यांना रोखायचे कोणी किंवा त्या पदावरून दूर करायचे कुणी हा घटनातज्ज्ञांचा विषय आहे, त्यामुळे त्याबाबत जास्त बोलायची गरज नाही.
यानिमित्ताने महाराष्ट्राच्या राज्यपालांचा गेल्या साठ वर्षातील इतिहास पाहताना असे लक्षात येते की, महाराष्ट्राला शोभणारे आणि इथल्या मराठी भाषा-संस्कृतीची महत्ता समजून घेणारे, तिचा सुयोग्य आदर ठेवणारे असेच बहुतेक राज्यपाल आपल्या राज्याला लाभले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून जेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी सूत्रे हाती घेतली तेव्हा श्रीप्रकाश नावाचे अतिशय सुजन असे सद्गृहस्थ महाराष्ट्राचे राज्यपाल होते. ते स्वातंत्र्यसैनिक तर होतेच, पण पाकिस्तानचे भारतातील पहिले राजदूत म्हणूनही नेहरूंनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती.
त्यांच्यानंतरच्या काळात डॉ. विजयालक्ष्मी पंडित, नवाब अलीयावर जंग, एअर मार्शल ओ. पी. मेहरा, डॉ. चेरियन, सादिक अली, डॉ. शंकर दयाळ शर्मा, डॉ. सी. सुब्रमण्यम, डॉ. पी. सी. अलेक्झांडर, एअर मार्शल आय. एच. लतीफ, शंकर नारायणन, डॉ. विद्याधर राव, असे अनेक राज्यपाल आपल्याला दिसतात. यातील अनेक राज्यपाल पुढे देशपातळीवर अधिक मोठे नेतृत्व करण्यासाठी निवडले गेले. सी.सुब्रमण्यम केंद्रात मंत्री झाले. डॉ. शर्मा हे देशाचे राष्ट्रपती झाले. एअर मार्शल लतीफ यांना केंद्र सरकारने प्रâान्समधील भारताचे राजदूत म्हणून नियुक्त केले होते. डॉ.अलेक्झांडर हे राष्ट्रपतीपदासाठीचे एक उमेदवार जवळपास नक्की झाले होते. हे सगळे राज्यपालपदावर असलेले लोक नम्र, कायद्याचा आदर करणारे, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारचा सन्मान ठेवणारे असेच होते.
मी विद्यार्थी असताना १९७४मध्ये पुण्यातील राजभवनात तत्कालीन राज्यपाल अलियावर जंग यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभाला गेलो होतो. राज्यपाल आम्हा विद्यार्थ्यांशी आपुलकीने बोलत होते, ते क्षण मी विसरू शकत नाही. डॉ. शर्मा हे तर संस्कृतचे अतिशय मोठे विद्वान होते आणि विलक्षण सौजन्यशील असा हा पुढे भारताचा राष्ट्रपती झालेला मोठा माणूस, ते महाराष्ट्राच्या राज्यपालपदी असताना किती साधेपणाने आणि नम्रपणाने वावरत असत, हे आम्ही अनेक पत्रकारांनी विविध समारंभात पाहिले आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या एका समारंभात एका संस्कृत ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते आले होते.
डॉ. शर्मा आणि त्यांच्या पत्नी विमलाताई या दोघांचेही अत्यंत सौजन्यशील असे वावरणे हे अगदी पाहण्यासारखे होते. राज्यपालपदी असताना आय. एच. लतीफ आणि त्यांच्या पत्नी बिल्किस लतीफ या दोघांचे मराठी भाषा, संस्कृतीशी चांगले नाते निर्माण झाले होते. पुण्यातील मराठीचे प्राध्यापक शुक्ल यांच्याकडे त्यांनी मराठीची शिकवणी लावली होती. त्याच्या बातम्या, आम्ही त्या वेळी दिल्या होत्या.
आपण ज्या राज्यात जातो, त्या राज्यातील विविध प्रश्न आणि विविध जनसमूह यांना भेटणे हा राज्यपालांचा कामातील मोठा भाग असतो. लतीफ आणि श्रीमती बिल्कीस या दोघांनी पुण्यात विद्यापीठासमोर राजभवनच्या जागेत बाल कल्याण केंद्र सुरू केले. आज या केंद्रामध्ये विविध अपंग श्रेणीतील मुलांचे प्रशिक्षण आणि त्यासंबंधातील शिक्षकांचेही प्रशिक्षण होत असते. याचे श्रेय राज्यपाल आणि त्यांच्या पत्नी बिल्किस यांना दिले पाहिजे.
डॉ. सी. सुब्रमण्यम हे राज्यपाल असताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याशी संवाद करून महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची एक परिषद आयोजित केली होती. या परिषदेतून राज्यातील शेती आणि विविध पिकांच्या संदर्भात फार मोलाचे मार्गदर्शन मिळाले होते. स्वतः सुब्रमण्यम हे मोठे जाणकार तज्ज्ञ होते. राष्ट्रीय पातळीवरही त्यांचे मार्गदर्शन घेतले जात होते. डॉ. अलेक्झांडर हे एक विद्वान असे राज्यपाल होते. भारतीय विद्या भवनने परदेशात काही ठिकाणी त्यांची व्याख्याने ठेवली होती. गांधीजी, नेहरू हे त्यांच्या अभ्यासाचे विषय होते. विशेष म्हणजे कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होताना ती संस्था, ती व्यक्ती यांचा इतिहास व संदर्भ अत्यंत बारकाईने पाहून अलेक्झांडर भाषण करत असत. पंतप्रधानपदी पी. व्ही. नरसिंहराव असताना त्यांचे मोठे व्याख्यान १९९४मध्ये आयुकामध्ये झाले होते. त्या कार्यक्रमातही डॉ. अलेक्झांडर यांचे उत्तम भाषण झाले होते.
महाराष्ट्राच्या अनेक राज्यपालांनी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राला नवी दिशा कोणती देता येईल, यादृष्टीने काही शैक्षणिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला होता. याबरोबरच सामाजिक काम करणार्या संस्थांना सरकारने पाठबळ दिले पाहिजे, यासाठी अनेक राज्यपाल हे मार्गदर्शनपर भूमिका घेत असत. या सर्व राज्यपालांच्या नामावळीत विद्यमान राज्यपाल यांचे नाव सन्मानाने आणि आग्रहाने समाविष्ट करणे धाडसाचे ठरेल! महाराष्ट्राचा बौद्धिक आणि वैचारिक क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवर असलेल्या दबदबा ज्याला माहित नाही, अशा व्यक्तीला राज्यपालपदी बसल्यानंतर दुसरे काय होणार?
याला आणखी एक संदर्भ जोडू इच्छितो. महाराष्ट्रातून अनेक मान्यवर देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालपदी नियुक्त केले गेले. त्यांनी त्या पदाची प्रतिष्ठा वाढवली, हेही नोंदले गेले आहे. आंध्र प्रदेशाच्या राज्यपालपदी गेलेले सुशीलकुमार शिंदे, त्रिपुराचे राज्यपाल झालेले डॉ. डी. वाय. पाटील, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, उत्तर प्रदेशाचे राज्यपाल म्हणून काम केलेले राम नाईक, या सर्वांनीच राज्यपालपदाला एक प्रतिष्ठा मिळवून दिली आणि या राज्यातील जनमानसात स्वतःचे स्थान निर्माण केले. राजभवन हे एका विशिष्ट पक्षाच्या हालचालींचे केंद्र न बनवता अनेकांनी राजभवनचे रूपांतर व्यापक अर्थाने प्रजाभवनात केले आणि ही त्याची उदाहरणे आहेत.
आज महाराष्ट्रात राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात संघर्ष सुरू आहे. तो कायद्याच्या आणि घटनात्मक आधारावर संपुष्टात येईलही; पण राज्याच्या घटनात्मक प्रमुखाच्या खुर्चीतील व्यक्ती असे बेजबाबदार आणि अशोभनीय वक्तव्य करीत असेल तर लोकशाहीत ही चिंता वाढवणारी बाब ठरेल!