“हे रक्त ताजं दिसतंय, जाधव. ह्याचे नमुने आपल्याला खर्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतील,“ त्यांनी सांगितलं. महादूवर ज्या हत्यारानं वार झाले, तेही सापडलं नव्हतं. पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आला, त्यात हे वार कोयत्यानंच केल्याचं स्पष्ट झालं. सकाळी पाच ते सातच्या दरम्यान हा खून झाला होता. म्हणजे महादू शेतात आला तेव्हा. दिग्रजकरांना सगळ्यात जास्त उत्सुकता होती, ती त्या रक्ताच्या नमुन्यांची.
– – –
गावातल्या शेतातल्या बांधावर महादू जंगमचं प्रेत रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याची बातमी कोळवण गावात वार्यासारखी पसरली. जो तो आपापली कामंधामं सोडून महादूला बघायला गर्दी करू लागला. बांधाच्या मध्यावरच हातपाय पसरून महादू पडला होता. कुणीतरी त्याच्या गळ्यावर, छातीवर वार केले होते. पहिल्या काही घावांमध्ये जागीच मृत्यू झाला होता. महादू तब्येतीने जेमतेमच होता. स्वतःचं छोटंसं शेत सांभाळून इतरांच्या शेतामध्येही काही कामं करायचा. गावात त्याची बर्यापैकी ओळख होती. पंचावन्न वय पार करून आता गाडी साठीकडे झुकली होती. महादूवर एवढा जीवघेणा हल्ला कुणी केला असेल, याचीच गावात चर्चा होती.
तालुक्याच्या पोलीस स्टेशनला वर्दी पोहोचली आणि इन्स्पेक्टर दिग्रजकर चौकशीसाठी गावात पोहोचले, तोपर्यंत तिथे तोबा गर्दी जमली होती. पोलिसांनी सगळ्यात आधी गर्दी हटवली आणि जागेची पाहणी करून प्रेत पोस्टमार्टेमसाठी पाठवून दिलं. हा महादू कोण, कुठला, अशा चौकशा सुरू झाल्या.
“जंगम वस्तीमध्ये त्याचं घर आहे साहेब. तसा गरीब होता स्वभावानं. त्याचा मुलगा शहरात शिकतो. आत्ता गेल्या महिन्यातच शिकून परत आलाय. तो बघा, तिकडे पलीकडच्या बांधावर बसलाय,“ कुणीतरी गावकर्याने माहिती दिली. प्रेत हलवल्यावर मग एकेक जण आपापल्या घरी परतू लागले. दिग्रजकरांनी काही पोलिसांना तिथे पंचनामा करण्याच्या सूचना केल्या आणि स्वतः महादूच्या मुलाला भेटायला दुसर्या शेताकडे वळले.
“काय नाव तुझं?“ त्यांनी पोलिसी सवाल केला.
“विशाल,“ त्यानं रडत रडत उत्तर दिलं. वडिलांच्या अशा भीषण पद्धतीनं झालेल्या मृत्यूचा त्याला धक्का बसलेला जाणवत होता.
“हल्ला झाला, तेव्हा तुमच्यापैकी कुणी इथे होतं का? कुणाला इथे बघितलं होतं का?“
“नाही साहेब. महादू एकटाच शेतात आला होता,“ दुसर्याच कुणीतरी उत्तर दिलं.
“मी एकेकाला प्रश्न विचारेन. मध्येच कुणी गरज नसताना बोलू नका,“ दिग्रजकरांनी दम दिला, तशी विशालच्या आजूबाजूला बसलेली एकदोन माणसं गपगार झाली.
“साहेब, मला काहीतरी सांगायचंय,“ विशाल धीर करून बोलल्यासारखा म्हणाला.
“हां, बोल.“
“साहेब, बाबा…“
तेवढ्यात विशालला बोलू न देता, एक चुणचुणीत वाटणारी तरुण मुलगी पुढे येऊन म्हणाली, “सावकार साहेबांचाच ह्यात हात असणार, साहेब. आम्हाला तर त्यांच्यावरच संशय आहे!“
“तुझं नाव काय? तू कोण आहेस?“ दिग्रजकरांनी तिला विचारलं.
तिनं तिचं नाव सांगितलं. संध्या नावाची ही मुलगी महादू जंगमच्या घरीच राहत होती. विशालची लांबची बहीण असल्याचं तिनं सांगितलं. विशालच्या आईनं तिला काही वर्षांपूर्वी आपल्या घरी राहायला आणलं होतं. तेव्हापासून या गावात राहणं, शेतीत आणि घरात लागेल ती मदत करणं, हे काम तिच्याकडे होतं. बारावीपर्यंत तिचं शिक्षणही झालं होतं. बोलायला ती हुशार वाटली. ती बोलायला लागल्यावर विशाल एकदम गप्प झाला, हेही दिग्रजकरांनी हेरलं होतं. तिनं थेट गावातल्या सावकारांबद्दल आरोप केल्यावर पोलिसांनी इतरही काही लोकांकडे चौकशी केली. गावात सावकारीचा धंदा करणारा यशवंत माने हा एक नंबरचा बनेल आणि पोचलेला माणूस होता. लोकांना पैसे उधार देणं, त्यांच्या जमिनी हडप करणं, जमिनीच्या व्यवहारात पैसे उकळणं, हाच त्याचा मुख्य धंदा होता. कुठल्यातरी पैशांच्या उधारीवरून त्याने महादूला दोनच दिवसांपूर्वी धमकी दिली होती. दोघांची शेतात सगळ्यांच्या देखत भांडणं झाली होती आणि गावकर्यांनी ती ऐकली होती. संध्या जे सांगत होती, त्यात तथ्य होतं.
दिग्रजकरांनी थेट मानेचं घर गाठलं. मानेनं अपेक्षेप्रमाणेच त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली.
“साहेब, आत्तापर्यंत किती साहेब आले आणि गेले. माझ्या घरापर्यंत असं कुणी विचारायला आलेलं नाही,“ त्यानं तोरा दाखवला.
“किती साहेब आले गेले, मला माहीत नाही. पण मी आत्ता आलोय आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय कुठे जाणार नाहीये. विचारतोय तेवढी उत्तरं द्या नाहीतर आधी काय काय झालंय, तेही उकरून काढायला लागेल आणि त्याची उत्तरं द्यायला तुम्हाला तालुक्याला यावं लागेल,“ असा दम दिल्यावर माने सरळ आला. इथे काही आपली दादागिरी चालणार नाही, याचा अंदाज त्याला आला असावा.
महादूशी वादावादी झाल्याचं मानेने कबूल करून टाकलं, पण त्याचा सूड म्हणून आपण असं काही करणं शक्यच नाही, असं स्पष्ट सांगितलं.
“गावातल्या कुणालाही विचारा साहेब, असल्या भानगडीत पडतच नाही आपण. एकही चुकीचं काम केलं नाही आजपर्यंत,“ माने नरमाईच्या भाषेत म्हणाला.
“गावातल्या लोकांनी सांगितल्यावरूनच इथे तुमच्यापर्यंत यायची वेळ आलेय, माने. चुकीचं खरंच काही केलं असेल आणि आम्हाला ते नंतर सापडलं, तर तुम्हाला जड जाईल,“ दिग्रजकरांनी त्याला सज्जड दम भरला. आणखी काही प्रश्नांची सरबत्ती केली, पण महादूच्या बाबतीत तो कुठे गोंधळलेला दिसला नाही. जी काही उत्तरं देत होता, त्यात खोट काढण्यासारखी परिस्थिती नव्हती. दोन दिवस तो दुसर्या गावाला जमिनीच्या कामासाठी गेला होता, असं त्यानं सांगितलं. दिग्रजकरांनी त्याबद्दलही माहिती काढली, तर खरंच तो त्या गावात होता. तरीही त्याच्यावरचा संशय त्यांनी मनातून पूर्ण काढून टाकला नव्हता. एवढ्या क्रूर पद्धतीनं महादूला कोण मारू शकतं आणि का, याचा शोध आता त्यांनी घ्यायला सुरुवात केली.
“साहेब, पहाटेच्या वेळी वार झालेले दिसतायत. आता एवढ्या लवकर शेतात बघायला कोण असणार? गावात चौकशी केली मी. शेतीची कामंही सकाळी आठच्या दरम्यान सुरू होतात. महादू घरातून खूप लवकर बाहेर पडला होता, त्यावेळी अंधार होता, असं शेजारच्या काही माणसांनी सांगितलं,“ हवालदार जाधवांनी माहिती दिली.
“त्याच्या घरी कोण कोण असतं?“
“तसा तो, त्याची बायको विमला आणि ही मुलगी संध्या, असे तिघंच असतात. पण सध्या हा विशाल पण आला होता. म्हणजे चौघं होते.“
“आणि महादू एकटाच बाहेर पडला होता?“
“होय, साहेब.“
“त्याचं प्रेत सापडलं, ते शेत त्याचंच आहे का?“
“नाही, त्याचं शेत थोडं पलीकडे आहे.“
“मग हा त्या शेतात काय करायला आला होता?“
“चोरीमारी करायला, काहीतरी उचलायला आला असेल, साहेब.“
“नाही, तसं नाही वाटत. शेतातून चोरण्यासारखं काही नाहीये. आणि तेवढ्यासाठी त्याला जिवानिशी कुणीही मारणार नाही. चला, पुन्हा एकदा शेताकडे जाऊया.“ दिग्रजकरांनी बाकीच्यांना सूचना केली आणि शेताकडे मोर्चा वळला. सकाळची माणसं आता आपापल्या कामाला गेली होती. दिग्रजकरांनी सभोवार नजर टाकली. ज्या शेताच्या बांधावर महादूचं प्रेत सापडलं, तिथे रक्त होतंच, पण त्याची चप्पल थोडी अलीकडे पडलेली मिळाली, असं पंचनामा करणार्यांनी सांगितलं. तिथेच बाजूला एका झाडाखाली एक झोपडीसारखा आडोसा दिसत होता. दिग्रजकरांचं तिकडे लक्ष गेलं आणि तिथे पाहणीसाठी ते आत शिरले. एक छोट्याशा झोपडीसारखी रचना होती. दुपारच्या वेळेला टेकायला, घटकाभर विश्रांती घ्यायला एका माणसाला पुरेल, एवढीच जागा होती. आत फार काही वस्तू नव्हत्या. कोपर्यात एक फुटका माठ होता. त्या शेतात काम करणारी सगळीच माणसं आपापला जेवणाचा, न्याहरीचा डबा, इतर काही वस्तू इथे ठेवून जात असावेत, हे चटकन लक्षात येत होतं.
दिग्रजकरांनी आणखी बारकाईनं पाहणी केली, तर त्यांना तिथे कोपर्यात फुटलेल्या दोन बांगड्या दिसून आल्या. पंचनाम्यात या ठिकाणाची, इथल्या साहित्याची नोंद नव्हती. इथे कोण आलं होतं, किती वाजेपर्यंत होतं, हे तपासण्यासाठी बाकी कुठलंच माध्यम नसल्यामुळे, तिथे काय काय सापडतं आणि त्याचा कसा माग लागतो, यावरच पुढच्या तपासाची दिशा ठरणार होती. झोपडीला छोटंसं मोडकंतोडकं दार होतं. दिग्रजकरांचं तिकडे लक्ष गेलं. वाळलेल्या काटक्यांपासून तयार केलेल्या या दाराच्या टोकाला रक्त लागलेलं त्यांना लक्षात आलं. त्यांनी त्याचे नमुने घेण्यासाठी सूचना केल्या.
“हे रक्त ताजं दिसतंय, जाधव. ह्याचे नमुने आपल्याला खर्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतील,“ त्यांनी सांगितलं. महादूवर ज्या हत्यारानं वार झाले, तेही सापडलं नव्हतं. पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आला, त्यात हे वार कोयत्यानंच केल्याचं स्पष्ट झालं. सकाळी पाच ते सातच्या दरम्यान हा खून झाला होता. म्हणजे महादू शेतात आला तेव्हा. दिग्रजकरांना सगळ्यात जास्त उत्सुकता होती, ती त्या रक्ताच्या नमुन्यांची. ते नमुने महादूच्या रक्ताशी जुळले नाहीत. याचा अर्थ तिथे त्याच्याबरोबर आणखी कुणीतरी होतं आणि त्याच व्यक्तीने महादूचा खून केला होता.
विशालकडे चौकशी केल्यावर त्यानं आणि संध्याने सावकारांवरच संशय व्यक्त केला होता. बाकी कुणाला महादूबद्दल ठोस असं काही सांगता येत नव्हतं. तरीही, असं काहीतरी असावं, जे आपल्यापर्यंत अजून आलं नाहीये. कदाचित गावकरी मुद्दाम सांगत नाहीयेत, असं दिग्रजकरांना वाटून गेलं. त्यांनी आता पोलिसी चातुर्याचा वापर करून गावातल्या एका कामाच्या माणसाला हाताशी धरलं. गावात काय चर्चा आहे, महादूबद्दल काय बोललं जातं, ते त्याला विश्वासात घेऊन समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि महादूचा एकेकाळचा मित्र असलेला राजाराम बनसोडे याच्याशी त्याचं दोन महिन्यापूर्वीच जोरदार भांडण झालं होतं, असं त्यांना समजलं. त्यावेळी राजारामने महादूला बेदम मारहाण केली होती. आठ दिवस महादू घरीच बसून होता, नंतर कसाबसा बरा झाला, अशी नवीन माहिती मिळाली. मुख्य म्हणजे, ह्या प्रकरणाची पोलिसांकडे नोंद करण्यात आलेली नव्हती. महादूच्या जवळच्या सगळ्याच माणसांच्या रक्ताचे नमुने घेण्याची सूचना दिग्रजकरांनी पोलिसांना केली आणि त्यांनी राजारामला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं.
महादूच्या मृत्यूशी आपला काही संबंध असल्याचं राजारामने सरळच नाकारून टाकलं. कित्येक दिवसांत महादू समोरही आला नव्हता, हे त्यानं पुन्हा पुन्हा सांगितलं. त्याच्याशी एवढी मारामारी नेमकी कशावरून झाली होती, हे मात्र तो सांगायला तयार नव्हता. अखेर दिग्रजकरांनी त्याला संशयावरून आत टाकू असा दम दिला, तेव्हा त्यानं नाईलाजानं सगळी हकीकत सांगितली.
दिग्रजकरांना आत्तापर्यंत माहीत नसलेल्या अनेक गोष्टी कानावर पडत होत्या. दुसर्याच दिवशी रक्ताच्या नमुन्यांचाही रिपोर्ट हाताशी आला आणि त्यांच्या मनातला संशय पक्का झाला. पोलिसांना घेऊन ते गावात दाखल झाले. महादूच्या घरी पोहोचले, तेव्हा विशाल कुठेतरी कामासाठी बाहेर गेला होता. संध्या घराच्या मागेच काही काम करत होती. एका महिला पोलिसाला तिच्याबरोबरच ठेवून दिग्रजकर स्वतः विमलाशी बोलण्यासाठी आत गेले. तिला विश्वासात घेऊन काही गोष्टी सांगितल्या. एवढ्यात विशाल घरी आला आणि दिग्रजकरांना समोर बघून चपापला.
“विशाल, आम्हाला गुन्हेगार सापडलाय,“ ते म्हणाले. विशालची थोडी चलबिचल झाली. तो काहीच बोलला नाही. एवढ्यात कसलातरी अंदाज आल्यामुळे संध्याही तीरासारखी घरात घुसली, “शेताजवळच्या झोपडीच्या दाराला लागलेलं रक्त संध्याचं होतं.“ दिग्रजकरांनी सांगितलं.
“होय साहेब, माझंच होतं. मीच मारलंय आबाला. तुम्ही मला घेऊन चला…!“ ती एकदम अस्वस्थ होऊन ओरडायला लागली, “माझं ऐका साहेब, मला पकडा. मीच मारलंय… मीच खुनी आहे…!“
दिग्रजकर मात्र शांत होते. त्यांनी विशालकडे नजर टाकली. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
“संध्या, बास झालं अगं. किती दिवस मला वाचवत राहणारेस? पोलिसांपासून आपण काय लपवणार?“ तो तिला म्हणाला आणि ती आणखी जोरात रडायला लागली. विशालने दिग्रजकरांपाशी गुन्ह्याची कबुली दिली. महादू बाकी सगळ्यांशी चांगला असला, आपलं शेत राखून असला, तरी बायकांवर त्याची वाईट नजर होती. विशालला गावात आल्यावर लगेचच तो अंदाज आला होता. एक दोन बायकांना त्रास द्यायचा त्यानं प्रयत्न केला होता. या वयात हे चाळे केल्याबद्दल विशालने त्याला दमही दिला होता. गावातल्या राजारामच्या मेव्हणीशी चाळे करायचा प्रयत्न केल्यावर राजारामने महादूला तुडवलं होतं. तरीही त्याची सवय काही मोडत नव्हती. विशाल मात्र त्याच्यावर कायम नजर ठेवून असायचा. संध्याही महादूच्या नजरेतून सुटली नव्हती. त्या दिवशी पहाटे ती शेतात कामावर गेली, तेव्हा त्याने मुद्दाम तिच्या मागे जाऊन तिच्यावर हात टाकायचा प्रयत्न केला. शेतातल्या झोपडीत तिच्यावर जबरदस्ती करण्यासाठी झटापट केली, तेव्हा विशाल मागोमाग तिथे पोहोचला आणि रागाच्या भरात कोयत्याने त्याने महादूचा अवतारच संपवून टाकला.
एवढ्या कमी वयात, तेही आपल्यामुळे आपल्या लांबच्या भावाला शिक्षा भोगायला लागू नये, अशी संध्याची इच्छा होती. त्यासाठीच ती त्याला पाठीशी घालायचा प्रयत्न करत होती. पण पोलिसांसमोर शेवटी सत्य उघडकीस आले. रागाच्या भरात आणि चुकीची शिक्षा देण्यासाठी का झालेला असेना, गुन्हा हा शेवटी गुन्हाच असतो. विशालचीही त्यातून सुटका नव्हती.