हिंदीत बीए फर्स्ट क्लास फस्ट आलेल्या नायकाला गाजर का हलवा देणारी माँ आणि झुडपाभोवती फिरणारी प्रेयसी यापेक्षा वेगळ्या महत्त्वाच्या भूमिकेतून मराठी अभिनेत्रींनी अभिनयाची चुणूक दाखवली. ‘माहेरची साडी’, ‘लेक चालली सासरला’, ‘बाईपण भारी देवा’ या मराठी महिलापटांनी बॉक्स ऑफिसवर यशाची शिखरे पादाक्रांत करत पुरुष कलाकारांच्या तुलनेत हम भी कुछ कम नहीं दाखवून दिलं.
– – –
या रविवारी सिनेमाला जाऊ या? रणबीरचा किंवा शाहरुखचा नवा सिनेमा आलाय… हे वाक्य आपल्या बोलण्यात खूप कॉमन
आहे. काही वर्षांपूर्वी रणबीर, शाहरुखऐवजी गोविंदा, अमिताभ किंवा त्याआधी राज कपूर, देव आनंदचा, दिलीपकुमारचा पिक्चर असं सांगितलं गेलं असेल. पण अगदी सुरुवातीपासून आजतागायत वैजयंती, नर्गिस, जया, हेमा, दीपिका, रश्मिका यांचा सिनेमा पाहायला जाऊ असं कुणी बोलल्याचं ऐकिवात नाही. कोणत्याही सिनेरसिकाला तिकीट काढून सिनेमाला जायचं झालं तर हीरोइन कुणी का असेना पण हिरो कोण आहे हे जास्त महत्त्वाचं वाटतं, हे खरंच. पण केवळ पडद्यावर दिसणारे सुपरस्टार हिरो म्हणजेच सिनेमा असं म्हणता येणार नाही, पडद्यासमोर आणि पडद्यामागेही स्त्री कलावंतांनी भारतीय सिनेसृष्टीला भरीव योगदान दिलं आहे. आठ मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘पहिल्यापासून ते पाहिल्यापर्यंत’च्या सिनेमातील स्त्रियांच्या योगदानाचा हा संक्षिप्त आढावा…
अगदी सिनेमाच्या श्रीगणेशापासून सिनेमानिर्मितीत स्त्रियांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. पहिल्या भारतीय सिनेमाचे दिग्दर्शक होते दादासाहेब फाळके आणि एडिटर होत्या त्यांच्या पत्नी सरस्वती फाळके. इतकचं नव्हे तर त्या आपले दागिने विकून सिनेमाच्या फायनान्सर झाल्या, सिनेमाची रील्स तयार करण्यासाठी लागणारी केमिकल प्रोसेस शिकल्या, पहिल्या वहिल्या सिनेमाच्या सेटवर रिफ्लेक्टर म्हणून पांढरी चादर मनासारखा शॉट मिळेपर्यंत हातात धरून कडकडीत उन्हात उभ्या असत. पुन्हा सगळ्या युनिटच्या उदरभरणाची जबाबदारी त्यांच्याकडे होती, सरस्वतीबाई आणि दादासाहेबांत सिनेमाबाबत अखंड चर्चा सुरू असतं. तारामतीची भूमिका सरस्वतीबाईंनी करावी या दादासाहेबांच्या प्रस्तावास त्यांनी मान्यता दिली नाही. जर मी मुख्य पात्राचं काम केलं तर माझी बाकी सगळी कामे कोण करणार, म्हणून त्यांनी ती भूमिका नाकारली. आणि अशा प्रकारे पहिली स्त्री अभिनेत्री होण्याचा गौरव दुर्गाबाई कामत यांना प्राप्त झाला, मोहिनी भस्मासुर या दादासाहेबांच्या आणि भारतातल्या दुसर्या सिनेमात दुर्गाबाईंनी, देवी पार्वतीची भूमिका साकारली तर त्यांची कन्या लहानग्या कमल कामत यांनी मोहिनीची मुख्य भूमिका साकारली. अशा प्रकारे सिनेमात स्त्री कलाकारांची एन्ट्री झाली, तरी त्यात बालकलाकार म्हणून सुरुवात करणार्या मुलींची संख्या अधिक होती. चांगल्या घरातल्या स्त्रिया नाटकातून किंवा सिनेमातून काम करत नाहीत असा रिवाज होता. बालकलाकारांची भूमिका तुलनेने कमी लांबीची, एखाददुसर्या दृष्यापुरती असायची, यातूनच बेबी झुबेदा ही बालकलाकार सिनेजगतात आली, स्थिरावली आणि पुढे ‘आलम आरा’ (१९३१) या पहिल्या बोलपटात नायिका म्हणून समोर आली. पण लेडी ऑफ इंडियन सिनेमा किंवा फर्स्ट अॅक्ट्रेस ऑफ इंडियन सिनेमा म्हणून ओळख मिळाली ती देविका राणी यांना. ‘कर्मा’ (१९३७) चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं, भारतीय सिनेमातील पहिलं इंग्रजी गाणं, पहिलं चुंबन (देविका राणी व सिनेमाचे नायक, दिग्दर्शक व देविका यांचे पती हिमांशू राय) याच सिनेमातील.
देविका राणी, झुबेदा या राजवंशातील स्त्रिया सिनेमात आल्यामुळे स्त्रियांची सिनेमॅटिक वाटचाल काहीशी सुकर झाली. त्यानंतर रतन बाई, शोभना समर्थ, शांता आपटे, लीला चिटणीस, सितारा देवी, नलिनी जयवंत, सुरैय्या, नूरजहाँ, मीना कुमारी, मधुबाला, निरुपा रॉय, नूतन, नर्गिस, वहिदा रहमान, माला सिन्हा, हेमा मालिनी, जया, श्रीदेवी, रेखा, उर्मिला मातोंडकर, माधुरी दीक्षित, जुही चावला, काजोल, राणी मुखर्जी, विद्या बालन, दीपिका पडुकोन, अनुष्का शर्मा, आलिया भट, जान्हवी कपूर, सुहाना खान, मेधा शंकर यांच्यापर्यंत शेकडो अभिनेत्रींनी सिनेमात अभिनयरंग भरला. ‘मदर इंडिया’सारख्या काही महिलापटांनी प्रेक्षकांच्या मनात आणि बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी बजावली. तरीही भारतीय सिनेमा खर्या अर्थाने कधी महिलांचा सिनेमा झाला नाही. १९५०-६०च्या दशकात असंख्य नायिकांनी अप्रतिम अभिनय केला, क्वचित एखाद्या मीनाकुमारीला (साहिब, बिवी और गुलाम), मधुबालेला (मुघल ए आझम), वहिदा रहमान (गाइड) एखाद दुसरा तिच्याभोवती फिरणारा सिनेमा मिळाला; पण शीर्षकांपासूनच नायिकाप्रधान असलेले सिनेमे त्यातल्या त्यात नूतनलाच लाभले, तेही बिमल रॉय यांचे. सर्वसामान्य पारंपरिक प्रेक्षकांना नायिकाप्रधान सिनेमे आवडत नसावेत, असं सोपं गणित मांडलं तर देमार बी ग्रेड सिनेमे नादियाच्या नावावर चालत होतेच. हंटरवाली, लुटारू ललना, मिस फ्रंटियर मेल, हंटरवाली की बेटी ही सिनेमांची नावंच पाहा! मुख्य प्रवाहात हेमामालिनी (सीता और गीता), रेखा (खूबसूरत), जया भादुरी (गुड्डी, मिली), श्रीदेवी (‘चालबाज’, ‘इंग्लिश विंग्लिश’) माधुरी (‘राजा’), विद्या बालन (‘डर्टी पिक्चर’, ‘कहानी’), कंगना राणावत (‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनू’), आलिया भट (‘राजी’), तब्बू (‘चांदनी बार’) असे नायिकाप्रधान सिनेमे अधून मधून हिट झालेले दिसतात. पण तरीही अद्वितीय अभिनय असूनही ग्लॅमर आणि स्टारडमच्या संदर्भात पुरुष स्टार्सच्या तुलनेत महिला द्वितीय स्थानी भासतात.
मराठी सिनेमा मात्र खूप आधीपासून सशक्त स्त्री भूमिकांसाठी ओळखला जातो. तो प्रामुख्याने स्त्रीप्रधान राहिलेला आहे, अधले मधले काही कालखंड वगळता. अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपटात दुर्गा खोटे यांनी तारामतीची भूमिका साकारली. हंसा वाडकर, लीला चिटणीस, मीनाक्षी वाडकर, सुलोचना, जयश्री गडकर, आशा काळे, रीमा लागू, स्मिता पाटील, स्मिता तळवलकर, अलका कुबल, अश्विनी भावे, रंजना, सुहास जोशी, किशोरी शहाणे, निवेदिता सराफ, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, अमृता सुभाष, विभावरी देशपांडे, सई ताम्हणकर, स्मिता तांबे अशा गुणी अभिनेत्री मराठी सिनेमातून झळकल्या. हिंदीत बीए फर्स्ट क्लास फस्ट आलेल्या नायकाला गाजर का हलवा देणारी माँ आणि झुडपाभोवती फिरणारी प्रेयसी यापेक्षा वेगळ्या महत्त्वाच्या भूमिकेतून मराठी अभिनेत्रींनी अभिनयाची चुणूक दाखवली. ‘माहेरची साडी’, ‘लेक चालली सासरला’, ‘बाईपण भारी देवा’ या मराठी महिलापटांनी बॉक्स ऑफिसवर यशाची शिखरे पादाक्रांत करत पुरुष कलाकारांच्या तुलनेत हम भी कुछ कम नहीं दाखवून दिलं.
पण सिनेमा म्हणजे केवळ मुख्य कलाकार नव्हेत, दिग्दर्शक, गायक, कॅमेरापर्सन, कोरिओग्राफर, वेशभूषा, रंगभूषा, लाइट्स अशा अनेक मुशीत घालून एक सिनेमा तयार होतो. सिनेक्षेत्रात काम करायला सुरुवात केल्यावर सिनेनिर्मितीतील इतर क्षेत्रातही स्त्रिया काम करायला लागल्या. उर्दू नाटकासाठी लेखन आणि अभिनय करणार्या फातिमा बेगम यांनी सिनेमात अभिनेत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि अवघ्या चार वर्षानंतर स्वत: लिहिलेल्या पटकथेवर ‘बुलबुल-ए-परिस्तान’ या चित्रपटापासून दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. ट्रिक फोटोग्राफी वापरून परीराज्याच्या सेटद्वारे हा कृष्णधवल सायलेंट सिनेमा तयार करण्यात आला होता. या सिनेमाने भारतीय सिनेजगताला, पहिलीवहिली स्त्री दिग्दर्शक तसेच पहिली स्त्री पटकथा लेखक दिली. तामिळ सिनेमातील पहिल्या स्त्री सुपरस्टार असलेल्या भानुमती रामकृष्ण यांनी १९५३ मध्ये दिग्दर्शित केलेला ‘चंदिराणी’ हा सिनेमा, तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झालेला पहिला सिनेमा होता.
बंगाली सिनेमातल्या अरुंधती देवी या दिग्दर्शिकेने रवींद्रनाथांच्या कथेवर आधारित ‘छुट्टी’ या सिनेमासाठी १९६८ सालचा बेस्ट डायरेक्टरचा नॅशनल अवॉर्ड पटकावला. सुप्रसिद्ध लेखिका अपर्णा सेन यांनी १९८१ साली दिग्दर्शकीय पदार्पणात ‘३६ चौरंगी लेन’ या सिनेमासाठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय सन्मान मिळवला. मनमोहक मधुबालापासून दीपिका, आलियापर्यंतच्या अभिनेत्रींचे अलौकिक सौंदर्य जपणार्या लक्स साबणाच्या पहिल्या सेलिब्रेटी अॅम्बेसिडर लीला चिटणीस होत्या. त्यांनी ‘आज की बात’ (१९५५) हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. त्यानंतर बराच काळ हिंदी सिनेमा हा पुरुष दिग्दर्शकांचा बालेकिल्ला बनून राहिला, मात्र प्रादेशिक सिनेमात दिग्दर्शिका येऊ लागल्या होत्या.
मराठीत सुषमा शिरोमणी यांनी अभिनयासोबत दिग्दर्शनाचा विडा उचलला. ‘चौकट राजा’, ‘सवत माझी लाडकी’, ‘सातच्या आत घरात’ असे सुपरहिट सिनेमे स्मिता तळवलकर यांच्या निर्मितीत तयार झाले. मुख्यत: डॉक्युड्रामाच्या शैलीतल्या समांतर सिनेमाची बाजू सांभाळणार्या सुमित्रा भावे यांनी सुनील सुकथनकर यांच्यासह ‘अस्तू’, ‘दिठी’, ‘नितळ’, ‘देवराई’, ‘कासव’, ‘दोघी’, ‘बाधा’ अशा सिनेमांचं दिग्दर्शन केलं. मीरा नायर, झोया अख्तर यांनी सिनेमातून संवेदनशील विषयांवर कालसुसंगत भाष्य केलं. स्त्री दिग्दर्शकांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चालत नाहीत, असं म्हणणार्यांना फराह खान (‘ओम शांती ओम’, ‘हॅपी न्यू इयर’), झोया अख्तर (‘जिंदगी ना मिलेगी दोबारा,’ ‘दिल धडकने दो,’ ‘गली बॉय’), गौरी शिंदे (‘इंग्लीश विंग्लिश), मेघना गुलजार (‘राजी’, ‘तलवार’) यांनी सिनेमातून उत्तर दिलं आहे.
महिलांनी गायन, कोरिओग्राफी, सिनेमॅटोग्राफी, वेशभूषा, प्रॉडक्शन, स्टंट या क्षेत्रातही स्त्रियांनी मुसंडी मारली. पहिल्या बोलपटापासूनच चित्रपटात गाणी आली. चित्रपट ही खरं तर आपण पाश्चात्यांकडून शिकलेली कला. त्यांचे बहुतांश चित्रपट गाणीविरहित असले तरी संगीत नाटकांवर अलोट प्रेम करणार्या भारतीय प्रेक्षकांना चित्रपटाकडे वळवायचं असेल तर चित्रपटात गाणी हवीतच हे ओळखून सिनेमा बोलण्यासोबतच गाऊ देखील लागला. चित्रपटांच्या आधी गाण्यांच्या सिलिंडर (पोकळ रोल असलेल्या कॅसेट, ज्या पुढे रेकॉर्डसमध्ये आणल्या गेल्या) आणि त्यानंतर ग्रामोफोन रेकॉर्डसचा (तबकड्या) दौर होता, त्यात गौहरजान यांनी जोगिया रागातील ख्याल गायनाने ग्रामोफोन रेकॉर्ड्सचे जग महिलांसाठी खुले केले. ग्रामोफोन रेकॉर्ड कंपनीने १९०२मध्ये सुरुवातीच्या अवघ्या सहा आठवड्यात पाचशे रेकॉर्डिंग पूर्ण केल्या होत्या. पहिला बोलपट संगीतमय ‘आलम आरा’ मुंबईत लागला तेव्हा जमलेल्या तोबा गर्दीला आवरण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागत होता. सिनेमा आणि त्यातली गाणी गाजत होती.
प्लेबॅक सिंगिंग (पार्श्वगायन) अस्तित्वात येईपर्यंत सिनेमात नायक नायिकाच गाणी म्हणत असत, त्यामुळे सिनेमात काम करणार्या मुख्य नट-नटीस गाता येणं आवश्यक होतं. काही सिनेमात मात्र लिपसिंक करून प्लेबॅक सिंगिग सुरू झालं, पण तेही चित्रपटाच्या सेटवर गायलं जात असे. झाडांच्या मागे पडद्याआड लपून वादक साथसंगत करत. स्टुडिओबाहेरील शूटिंगमध्ये पाऊस आला तर वाद्यं घेऊन आडोसा गाठताना वादकांची कसोटी लागत असे. १९३५पासून मात्र प्लेबॅक साँग रेकॉर्डिंग सुरू झालं आणि पार्श्वगायकांची फळी तयार झाली. सेटवर गायली जाणारी गाणी आणि रेकॉर्डिंग रूममध्ये गायली जाणारी गायकी यात टेक्निकल फरक आला. शमशाद बेगम, राजकुमारी दुबे, सुरैय्या यांच्यानंतर १९४९मध्ये महलच्या ‘आयेगा आनेवाला’ हे गीत गात लता मंगेशकर यांनी पार्श्वगायनात प्रवेश केला आणि पुढची सहा दशके त्यांच्या सुरांनी सगळ्यांवर मोहिनी घातली. यासोबतच जुथिका रॉय यांनी गायलेली भजने भारतभर आळवली जात होती. एकाच वेळी शास्त्रीय, रेकॉर्ड्स, फिल्मी संगीत, भजन सगळ्या आघाड्यांवर स्त्रिया यशस्वी होत होत्या. गीता दत्त, सुमन कल्याणपूर या गोड आवाजाच्या गायिकांनी मंत्रमुग्ध केले. पुढे अनुराधा पौडवाल, साधना सरगम, कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, शिल्पा राव, मोनाली ठाकूर यांनी संगीतातील सुरेल वाटचाल सुरू ठेवली.
केवळ संगीतातील तरल जागा, पडद्यावरील सोशिक, हळुवार भूमिका हेच स्त्रियांचं बलस्थान नव्हतं, तर हिरो मंडळींप्रमाणे पडद्यावर हाणामारीही त्या करायला लागल्या. आपण आधी स्त्रीप्रधान सिनेमांच्या अंगाने जिच्याबद्दल बोललो फियरलेस नादिया ही भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली स्टंटवुमन होती. नादियाचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला. मेरी इव्हान्स हे तिचं मूळ नाव. १९१३मध्ये ती वडिलांसोबत मुंबईत आली. १९३५मध्ये ‘हंटरवाली’ या सिनेमात तिने केलेल्या स्टंट्सवरून फियरलेस हे बिरूद तिला चिकटलं.
पुढे मुख्य अभिनेत्यांचा चेहरा जपण्यासाठी निर्माते दिग्दर्शक त्यांना साहसदृश्यांमध्ये घेणं टाळू लागले, त्यातून बॉडी डबलचा उपयोग सुरू झाला. नायिकेच्या वाट्याला अॅळक्शन सीन्स तसे कमी असायचे. हिरो अँग्री यंग मॅन बनत गेला, तसतसे नायिकांसाठीही अॅक्शन सीन्स लिहिले जाऊ लागले. पण ते पडद्यावर साकारणार करणार कोण? आणि तेव्हा इंडस्ट्रीला मिळाली ‘शोले’ गर्ल रेश्मा पठाण. १९७२ साली १४ वर्षांची जिगरबाज रेश्मा ‘एक खिलाडी बावन पत्ते’मधून लक्ष्मी छाया या अभिनेत्रीची बॉडी डबल म्हणून आली. पुढे तिने तब्बल ४०० सिनेमातून हजारपेक्षा अधिक स्टंट सीन्स केले. ‘शोले’मधील बसंती टांग्यावरून खाली पडते हा सीन करताना झालेला अपघात रेशमाच्या जिवावर बेतला होता, पण तरीही शुद्धीवर आल्यावर तिने शूटिंग पूर्ण केले आणि त्यानंतर उपचार घेतले. आता सेफ्टी टेक्निक्समुळे स्टंट्स करणं जीवघेणं राहिलेलं नाही. अर्थात रिस्क आहेच. आज कतरिना, दीपिका, तापसी पन्नू या अभिनेत्री स्वत: स्टंट सीन करतात. मुक्ता बर्वे या मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्रीने ‘बंदिशाळा’, ‘वाय’ या चित्रपटात बॉडी डबल न वापरता स्टंट सीन्स केलेत. एकूणच वेळ आल्यावर स्त्रिया स्वतःला वाचवण्यासाठी ‘बचाव बचाव’ करून हिरोची वाट न बघता, विलनला चारीमुंड्या चीत करण्याचं धाडस दाखवताना पडद्यावर बघणे आशादायक वाटतं.
वेशभूषा, रंगभूषा याशिवाय सिनेमातील पात्रं अधुरी आहेत. ब्लॅक अॅण्ड व्हाइटच्या जमान्यात वेशभूषेतील रंगांना दोनच छटा होत्या. १९३७ला पहिला रंगीत सिनेमा ‘किसान कन्या’ प्रदर्शित झाला. नायिका स्वत:इतकंच पोषाखांकडेही लक्ष देऊ लागल्या. सुरुवातीला स्वत:चे कपडे शूटिंगसाठी वापरले जात असल्याने, नायक नायिकांकडे साड्या, दागिने, घड्याळे यांचं कलेक्शन तयार होऊ लागलं. भूमिकेचा आलेख काय हे बघून अभिनेत्री दिग्दर्शक कपडेपट ठरवत असत. हळुहळू एक नूर आदमी दस नूर कपडा ही म्हण शिनिमावाल्यांच्या अंगवळणी पडली आणि भूमिकेला साजेशे खास कपडे शूटिंगच्या आधी शिवले जाऊ लागले.
ऑस्कर पुरस्कारविजेत्या वेशभूषाकार भानू अथय्या यांचं मूळ नाव भानुमती अण्णासाहेब राजोपाध्ये. राहणार कोल्हापूर. त्यांनी १९४७पासून भारतीय सिनेमात कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम सुरू केलं, १९८२ला ५५व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘गांधी’ चित्रपटासाठी त्यांना जॉन मॉलोसह बेस्ट कॉस्च्युम डिझाइन गटात पुरस्कृत करण्यात आलं. आज कितीतरी स्त्रिया कॉस्च्युम डिझायनर म्हणून सिनेमा क्षेत्रात आहेत, ऋतु कुमार, अनिता डोंगरे, नीता लुल्ला यासोबतच मराठीत प्रतिमा जोशी, पौर्णिमा ओक, दीप्ती तळपदे या कॉस्च्युम डिपार्टमेंटच्या माध्यमातून भूमिकेचा बाज राखतात.
या भूमिकांना साज चढवण्याचं तितकंच महत्वाचं काम करतात ते मेकअप आर्टिस्ट. स्वत:चा मेकअप स्वत: करण्यापासून ते अभिनेत्रींची हेअरस्टाईल, मेकअप, नेल आर्टिस्ट अशी भली मोठी टीम असण्यापर्यंत इंडस्ट्रीने मजल गाठली आहे. शूटिंगच्या अवेळा, आऊटडोअर हे सांभाळून लोकेशनला पूर्णवेळ हजर राहावं लागतं, शूटिंग दरम्यान टचअप करायला मेकअप आर्टिस्ट तयार असणं ही शूटिंगची गरज असते. ‘हिरॉईन का मेकअप चल रहा है’ या कारणासाठी अख्खा क्रू ताटकळत थांबला आहे हे दृश्य इंडस्ट्रीत प्रचलित आहे. महिला या क्षेत्रातही काम करत होत्याच, पण त्यांना अधिकृत मान्यता मिळाली नव्हती. भारतातील पहिली ‘रजिस्टर्ड’ महिला मेकअप आर्टिस्ट चारुल खुराना २०१४ साली मिळाल्या. तोवर असोसिएशनने कधीही महिलांना मेकअप आर्टिस्टच लायसन्स दिलं नव्हतं. लायसन्स नसेल तर तुम्ही अधिकार सुविधांपासून वंचित राहतात. सिनेमा इंडस्ट्रीने शतक गाठेपर्यंत केवळ पुरुषांनाच लायसन्स मिळालं होतं. चारुल खुराना यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत दाद मागण्याचं धाडस दाखवलं आणि पहिल्या रजिस्टर्ड महिला मेकअप आर्टिस्ट होऊन अनेकींना इंडस्ट्रीत स्किल्ड वर्कर होण्याचा मार्ग खुला केला. ‘बाहुबली’ चित्रपटात केलेल्या कामानंतर त्यांच्यासाठी इंडस्ट्रीची कवाडं खुली झाली.
या इंडस्ट्रीला ज्या पदन्यासाने थक्क केलं त्या होत्या भारताच्या प्रथम फिमेल कोरिओग्राफर होत्या सरोज खान. १९७४ साली अभिनेत्री साधना यांच्या ‘गीता मेरा नाम’ चित्रपटातून सरोज खान यांच्या कोरिओग्राफीस सुरुवात झाली. प्रसिद्धी मिळाली ती १९८७च्या ‘मि. इंडिया’ सिनेमातील श्रीदेवीसोबतच्या ‘हवा हवाई’ या गाण्याने. चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी तीन हजारहून अधिक गाण्यांसाठी नृत्यदिग्दर्शन केले. त्यांच्या आयकॉनिक स्टेप्सने ती गाणी दीर्घकाळ स्मरणात राहतील. त्यानंतर कला, फराह खान, वैभवी मर्चंट, गीता कपूर या स्त्रियांनी इंडस्ट्री आणि प्रेक्षकांनाही ठेक्यावर लयीत नाचायला शिकवलं. मराठीत फुलवा खामकर यांनी ‘नटरंग’ चित्रपटातील गाण्यांसाठी दिग्दर्शित नृत्यं कोण बरं विसरू शकेल?
अभिनय, दिग्दर्शन, नृत्य, वेशभूषा, मेकअप हे सगळं ज्या कॅमेराच्या लेन्सने चित्रित होऊन आपल्यापर्यंत पोहोचतं तो कॅमेरादेखील बराच काळ पुरुषांच्या हाती होता. बी. आर. विजयालक्ष्मी या तमीळ मुलीने भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली स्त्री डीओपी (डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी) होण्याचा मान मिळवला. चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. १९८५मध्ये चिन्ना विडू हा त्यांचा पहिला तमीळ सिनेमा. कॅमेरा वर्क करणार्या त्या भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिल्या महिला सिनेमॅटोग्राफर बनल्या. आज फौजिया फातिमा (‘मित्र : माय फ्रेंड’), प्रिया सेठ (‘शेफ’, ‘एअरलिफ्ट’) या नावाजलेल्या सिनेमॅटोग्राफर आहेत. ‘कुट्टी स्रँक’ या सिनेमासाठी सिनेमॅटोग्राफर अंजली शुक्ला या ‘नॅशनल अवॉर्ड फॉर बेस्ट सिनेमॅटोग्राफी’ पुरस्कार मिळवणार्या पहिल्या महिला ठरल्या. मराठीतील ‘व्हेंटिलेटर’ सिनेमासाठी सविता सिंग यांनी उत्कृष्ट काम केले होते.
पहिल्या एडिटर सरस्वतीबाई फाळके यांचेपासून सुरुवात होऊन संकलनात आता रेणू सलुजा (‘जाने भी दो यारो’, ‘परिंदा’), बिना पॉल (‘मित्र माय फ्रेंड’), आरती बजाज (‘जब वी मेट’), दीपा भाटिया (‘स्टॅन्ली का डब्बा’, ‘काय पो चे’, ‘रॉक ऑन’), नम्रता राव (‘ओये लकी लकी काय’, ‘कहानी’, ‘बँड बाजा बारात’, ‘जब तक है जान’) ही आघाडीची नावे आहेत.
या लेखात सगळीच नावे नाहीत, ती लिहिणे शक्यही नाही. पुरेशा दस्तावेजीकरणाअभावी बरीच व्यक्तिमत्वे केवळ त्या काळापुरती राहिली. कोणत्याही क्षेत्रात पहिल्या महिलेसाठी परिस्थिती बिकट असते, पण ज्या टिकतात, मार्ग काढतात त्यांच्या मागून येणार्यांसाठी एक छोटीशी का होईना पाऊलवाट तयार करतात. आणि एकदा का पाऊलवाट दिसली की महिलाशक्ती त्या पाऊलवाटेचा यशाचा राजमार्ग बनवतेच. भारतीय सिनेमातही अशा अज्ञात आणि ज्ञात स्त्रियांनी भारतीय सिनेमाचा पाया भक्कम केला. कधी कुटुंबाची निकड म्हणून तर कधी आवड म्हणून स्त्रियांनी सिनेमा इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली. त्यांच्या जगाशी झगडून त्या सिनेजगतात आल्यात. इथे कुणी पायघड्या घालून त्यांचं स्वागत केलं नाही. कामाच्या अवेळा, कमी मानधन, अपुरे अधिकार व सुविधा असूनही त्या खंबीर राहिल्या, कधी वाट काढत, तर कधी स्वत:च्या मतांवर ठाम राहत मार्ग काढला. शिकता शिकता चुकल्या, चुकत चुकत शिकल्या पण तुम्ही टिकून राहिलात, प्रयत्न केले तर यशस्वी व्हाल असं सांगणारी परंपरा तयार करून गेल्या. सावित्रीच्या (सावित्री ज्योतिबा फुले) लेकी सरस्वतीच्या (सरस्वती दादासाहेब फाळके) मुली बनूनही सक्षम राहिल्या. त्या सगळ्यांना मानाचा मुजरा आणि हॅपी विमेन्स डे!