वाचकहो,
‘मार्मिक’चा दिवाळी अंक प्रकाशित झाल्यानंतर चार आठवड्यांनी आता नियमित साप्ताहिक स्वरूपाच्या अंकात पुन्हा आपली भेट होते आहे. निखळ मनोरंजनाला वाहिलेला, विनोदी साहित्याने आणि भरपूर व्यंगचित्रांनी नटलेला दिवाळी अंक आपल्या पसंतीस उतरला, याचा आनंद आहे.
षष्ट्यब्दीपूर्तीनंतरची तीन वर्षे आता सरली आहेत. मार्मिकचा शुभारंभ करताना १९६० साली तेव्हा संपादक आणि व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामुळे थकलेल्या मराठीजनांना विरंगुळा देण्यासाठी ‘मार्मिक’ काढत आहोत, असं म्हटलं होतं. पण, प्रत्यक्षात तेव्हाची परिस्थिती आणि त्यांचा बेडर पिंड यांचा एक स्फोटक संयोग होत गेला आणि ‘मार्मिक’च्या माध्यमातून मराठी माणसांची अभेद्य एकजूट उभी राहात गेली. तिचं नाव शिवसेना. षष्ट्यब्दीपूर्तीनंतरही मार्मिकने काही काळ विरंगुळ्याचाच वसा चालवला. तिखट राजकीय भाष्य करणारे मुखपृष्ठावरील व्यंगचित्र, देशकालाचा वेध घेणारे राजकीय-सामाजिक सदर आणि विविध समाजमाध्यमांमध्ये उमटणारे पडसाद यांना अंकात मुख्य स्थान होतेच, पण राजकारणापलीकडील अनेक विषय ‘मार्मिक’ने हाताळले. वेगळ्या प्रकारचे उद्योग-व्यवसाय करून यशस्वी झालेल्या मराठीजनांच्या सविस्तर मुलाखतींमधून ‘मार्मिक’ने त्या व्यक्तीबरोबर त्या व्यवसायाचाही परिचय करून दिला. शिक्षणाची कोणती वाट धरावी, या विचाराने भांबावलेल्या विद्यार्थ्यांना हसत खेळत गोष्टीरूप मार्गदर्शन केले. टेन्शनयुक्त काळात टेन्शनमुक्त जगण्याचा मंत्र दिला. सिनेमा, नाटक यांच्या मनोरंजन विश्वालाही योग्य ते स्थान ‘मार्मिक’ने कायम दिले आहे. त्याशिवाय गेल्या तीन वर्षांत अनेक नव्याजुन्या व्यंगचित्रकारांनी ‘मार्मिक’साठी व्यंगचित्रे तर काढलीच पण, कुंचल्याच्या लेखणी हाती घेऊन व्यंगचित्रांमागच्या रंजक कथाही सांगितल्या.
दर वर्षी दिवाळी अंकानंतर ‘मार्मिक’चे स्वरूप बदलते, काही सदरे बंद होतात, काही नवी सुरू होतात, काही नव्या कल्पना राबवल्या जातात. त्यानुसार या वर्षीही ‘मार्मिक’मध्ये काही बदल होणार आहेत. पण, या संपादकीय सदरात दखल घ्यावी, असे काय बदल असणार आहेत?
हा अंक तुमच्या हातात असेल तेव्हा सगळ्यांनाच उत्सुकता असेल ती ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार्या पाच राज्यांतल्या निवडणुकीच्या निकालांची. हे निकाल देशाची पुढची दिशा आणि दशा ठरवणार आहेत. मतदार अनेकदा लोकसभेसाठी वेगळे आणि विधानसभेसाठी वेगळे मतदान करतात. तरीही या निवडणुकांतून २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात काहीएक अंदाज बांधता येतीलच.
हे निकाल लागण्याच्याही आधी एक महत्त्वाचा अंदाज राजकारणाचं बारकाईने निरीक्षण करणार्या कोणालाही येईल. २०२४ची निवडणूक विरोधकांसाठी सोपी नसेल. याआधी या देशाने अनेक सरकारे पाहिली, अनेक अहंमन्य नेते पाहिले, इंदिरा गांधी यांच्यासारख्या रणरागिणीने अधिकृतपणे जाहीर केलेली आणि जनता आपल्या विरोधात जाणार आहे, हे माहिती असताना उठवलेली आणीबाणीही पाहिली आहे. पण, आजवर कोणत्याही सरकारने, पक्षाने, संघटनेने देशाचा संविधानात्मक पायाच उखडून टाकणारा सत्तेचा बुलडोझर चालवला नव्हता. कोणत्याही नेता इतका पराकोटीचा आत्मकेंद्री नव्हता, कोणाचेही पराकोटीचे व्यक्तिस्तोम पद्धतशीरपणे माजवले गेले नव्हते, कोणतेही वरिष्ठ पदांवरचे नेते इतके सत्तालोलूप नव्हते आणि कोणताही सत्ताधारी पक्ष कोणत्याही थराला जाऊन निवडणुकीत विजय मिळवण्याचे यंत्र बनला नव्हता. शिवसेना ज्या भारतीय जनता पक्षाशी २५ वर्षे मैत्री राखून होती, तो आजचा भाजप आहे का, या प्रश्नाचे नि:संदिग्ध शब्दांतील उत्तर ‘नाही’ असेच असू शकते.
राजकारणाला गजकर्ण मानणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा पक्षीय राजकारणात उतरले तेव्हा त्यांनी सत्ता प्राप्त करून ती मराठी जनतेच्या हितासाठी राबवण्याकरता सर्व राजकीय मांडण्या केल्या, राजकारण खेळले; पण त्यात एक सम्यक भान होते. त्यामुळे दिवसभर एकमेकांवर खरपूस टीका केलेले नेते संध्याकाळी श्रमपरिहाराला एकमेकांच्या घरी जात, स्नेहभोजनाचा आस्वाद घेत. तेव्हाचे राजकारण दुसर्याचे घर फोडून बाप पळवण्याइतक्या नीच स्तराला गेले नव्हते.
दुर्दैवाने सत्ताधार्यांच्या हुकूमशाही आकांक्षांमुळे आज राजकारणाने हा नीचतम स्तर गाठला आहे. प्रतिकार करणारा कोणी शिल्लकच ठेवायचा नाही, सर्वसामान्य जनतेला भ्रमजाळ्यात आणि रोजच्या रोजीरोटीच्या प्रश्नांत गुंगवून ठेवायचे, कधी जाग आलीच तर बनावट हिंदुत्वाची, अस्मिताबाजीची अफू पाजायची आणि सत्तेच्या उद्योगी मित्रांचे भले करायचे, असा खाक्या आहे. बहुतेक सर्व संविधानिक संस्थांनी सत्ताधीशांपुढे नांग्या टाकल्या आहेत. प्रसारमाध्यमांचे रूपांतर गोदी मीडियामध्ये झालेले आहे. पाच राज्यांतील निवडणुकांचा निकाल विपरीत लागला की २०२४ला सत्ता राखण्याची धडपड सुरू होईल. विरोधात ब्र उच्चारणार्या प्रत्येकाला येनकेनप्रकारेण गप्प केले जाईल.
या काळात खर्या शिवसेनेची आणि बाळासाहेबांच्या सच्च्या शिवसैनिकांची कसोटी लागणार आहे. त्यामुळेच, ‘मार्मिक’मध्येही आता राज्याचे, देशाचे आणि आंतरराष्ट्रीय राजकारण कोणत्या दिशेला, कसे चालले आहे, याचे दर्शन घडवणारी नवी सदरे वाचायला मिळणार आहेत. दिवाळी संपली, दिवाळीचा विरंगुळा बस्स झाला. आता नऊ वर्षांची काजळी पुसून काढायची असेल, तर त्या कामात ऊर्जावान शिवसैनिकांना सगळ्यात पुढे राहावे लागणार आहे. ‘मार्मिक’ सदैव सोबत असेलच.