मी आणि माझा मानलेला परममित्र पोक्या राजकारणातल्या एकेका व्यक्तीवर, त्याच्या गुण-अवगुणांवर, त्याच्या कार्यकर्तृत्वावर, व्यक्तिमत्वावर अगदी खोलात डुबून चर्चा करत होतो. कारण वेळ सातनंतरची होती. तो कायमच मीडियाच्या खात्रीलायक गोटातच असतो. पेपरातील कोणत्याही बाबतीत `खात्रीलायक गोटातून समजते’ असा उल्लेख असला की समजून जायचे ही पोक्याने पुरवलेलीच बातमी आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वच राजकीय नेते, खासदार, आमदार, राज्यपाल, नगरसेवक, गावगन्ना पुढारी आणि सामान्य कार्यकर्ते यांच्याशी त्याचा कायम संपर्क असतो. अमेरिकेत बायडेन आणि त्याच्या बायडेचे म्हणजे बायकोचे भांडण झाले तरी त्याची पहिली खबर पोक्याला लागते. सार्या जगभर त्याचे संपर्कक्षेत्र आहे. त्यामुळे तो याबाबतीत भारतातल्या पत्रकारितेचा बाप आहे, असे तोच अभिमानाने सांगतो. कदाचित ते खरेही असेल.
मागे एकदा मी त्याच्याकडे भारतीय राजकारणातल्या विक्षिप्त लोकांची यादी मागितली तर त्याने एक-दीड सेकंदात एकाच पक्षातील वीस नेत्यांची नावे सांगितली. त्या पक्षाचे नाव घेण्याची जरुरीच नव्हती. तो म्हणाला, हा अक्षरश: चिखलातल्या गाळात डुबत चाललेला पक्ष आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत इतके विक्षिप्त नेते या पक्षात आहेत की, त्यांना घेऊन एक विनोदी चित्रपट काढण्याचा माझा विचार आहे आणि त्यातून झालेल्या करोडोंच्या कमाईवर एक वेड्यांचे हॉस्पिटल उभारण्याचा माझा संकल्प आहे. या शुभकार्याला मुळीच वेळ लावू नकोस असा पोक्त सल्ला मी त्याला दिला. एकवेळ चित्रपट नाही काढलास तरी चालेल पण वेड्यांचे इस्पितळ नक्कीच काढ. या कामी मी तुला हवी ती मदत करीन, असे आश्वासनही मी त्याला दिले. सुरुवातीला एकही नेता या इस्पितळात वेडा पेशंट म्हणून यायला तयार होणार नाही, हे सत्य असले तरी सिंधुदुर्गापासून सुरुवात कर आणि नंतर वाळकेश्वरला ये. बाकी अनेक तुला आमदार भवनात सापडतील.
जागेची चिंता तू करू नकोस. आपल्या इतके बिल्डर ओळखीचे आहेत की ही कल्पना त्यांना खूप आवडेल आणि तुला जागेपासून इमारत बांधण्यापर्यंत आणि शॉकट्रीटमेंटची तोरणे पुरवण्यापर्यंत हवी ती मदत करतील. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, हॉस्पिटलला थेट वेड्यांचे हॉस्पिटल असे नाव द्यायचे नाही. राजकीय नेत्यांचे मनोरुग्णालय किंवा राजकीय मानसोपचार केंद्र असे नाव देऊ. मात्र तुला तिथे पेशंटचे ब्रेनवॉशिंग करण्यासाठी एक जायंट वॉशिंग मशीन आणावे लागेल. ते आपण वाटल्यास अफगाणिस्तानातून मागवूया. मी संजय दत्तबरोबर डॉक्टर मुन्ना एमबीबीएसच्या काळात ती परीक्षा पास झाल्यावर मनोचिकित्सा या विषयात खोटी डिग्रीही मिळवली होती. त्यात वेडाच्या विविध प्रकारांचा अभ्यास होता. एका वेडाच्या प्रकारात एक माणूस सतत मी पुन्हा येईन असे बडबडगीत सारखे म्हणत असतो. तर दुसर्या प्रकारात एक माणूस सतत दादागिरीच्या आणि थोबाडात वाजवण्याच्या वार्ता करत असतो.
तिसर्या प्रकारात एक माणूस सतत तीन दिवसात एक चमत्कार घडणार असल्याचे भविष्य वर्तवत असतो. चौथा माणूस सतत आपल्या पांढर्याशुभ्र दाढीचे आरशात केस मोजत असतो. पाचवा माणूस वजन कमी करण्यासाठी सतत धावण्याची मशीन समजून सायकलला पायडल मारत असतो. सहावा माणूस सतत गळ्यात नोटांच्या माळा घालून हाताच्या मुठीला माइक समजून कायम प्रतिक्रिया देत असतो. ही काही उदाहरणे झाली. एका मोठ्या पदावरील माणूस तर स्वत:चे प्रतिबिंब आरशात पाहिले की पाल, पाल म्हणून ओरडत सैरभर होतो. त्याचे कारण काय असावे असे विचारताच पोक्या म्हणाला, तो पंचामधून धोतरात जाईपर्यंत त्याला प्राणीसंग्रहालयातील प्राणी खूप आवडायचे. मात्र वाघसिंहाच्या डरकाळ्यांना तो घाबरायचा. आजूबाजूला लबाड कोल्हे आणि लांडगे त्याला दिसायचे. काही माकडे दिसायची. त्यांना चणे-फुटाणे देण्याचे आमिष दाखवून कागद पुढे करून ते पिंजर्याच्या सळ्यांपाशी आले की हा कागद मागे घ्यायचा.
तसा तो सौंदर्यप्रेमी होता. मोर की लांडोर अशी पैज तो त्याला भेटायला आलेल्या पाहुण्यांबरोबर लावायचा. जिंकेल त्याला एक काळी टोपी भेट म्हणून द्यायचा. एकदा त्याने एका मोराला पाल खाताना पाहिले आणि त्याचा थरकाप झाला. तो लालबुंद झाला. पांढर्या पालीसारखा पांढराफटक पडला. घाबरून बाहेर बगीच्यामध्ये मोराच्या मागे पळू लागला. त्याचे कशातच लक्ष लागेना. रात्री-अपरात्री उठून कुणाच्या तरी शपथविधीची तयारी करायची आहे, असे बडबडू लागला. तेव्हापासून त्याच्या विचित्र वागण्याने पक्षश्रेष्ठीही हैराण झाले. फक्त त्यांच्या पूर्वीच्या पक्षातील लोकांना तो ओळखत असे. ते आले की त्यांच्या गप्पांना रंग येई. मात्र त्याच्या बोलण्यात कशाला कशाचा मेळ नसे. त्यात बारा आकडा कोणी उच्चारला की त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाई. सध्या तो नॉर्मलवर येत असून कसल्या तरी जालीम काढ्याच्या डोसचा हा परिणाम असल्याच्या बातम्या आहेत. मात्र तू गाफील राहू नकोस.
आणखी एक स्वत:ला खूप शहाणे समजणारे त्याच पक्षातले एक पात्र वेड पांघरून पेडगावला जाण्याचा बहाणा करत मुठीत धरून विडी ओढण्याची स्टाईल मारत फिरत असते. त्याच्या एका हातात एक गुलाबी रंगाची फाइल असते. दुसर्या हातात कागदपत्रे खच्चून भरलेली चामड्याची पिशवी असते. गळ्यात एक ब्रीफकेस बांधलेली असते आणि तो सैन्यात परेड केल्यासारखा रस्त्याच्या सर्व बाजूने चालत असतो. तोंडाने काहीतरी कुणाला न समजणारे बोलत असतो. मध्येच तलवारीसारखी कमरेला लावलेली २४ इंची फूटपट्टी काढून आकडेमोड करत भ्रष्टाचार किती उंचीवर गेला हे मोजत असतो. त्याला पाहायला रस्त्यावर लोकांची गर्दी होते. मग त्याला आणखीनच चेव येतो आणि तो भाषण करू लागतो. पोक्या म्हणाला, तू काही काळजी करू नकोस. हॉस्पिटल तयार झाले की सर्वांना भरती करू. तोपर्यंत कळ सोस!