फक्त डीएनए बघून युती करायची आणि टिकवायची असती तर ते भाजपाला स्वतःला तरी कधीच अशक्य नव्हते. पंचवीस वर्ष स्व. बाळासाहेब ठाकरेंमुळे महाराष्ट्र नव्हे, तर देशभरात भाजपा समर्थपणे वाढला टिकला. २०१४ला परत भाजपा सत्तेत आला, त्यावेळी भाजपाने स्वतःहून फडणवीस ह्यांच्याएवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या डीएनएची म्हणजेच मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निवड केली असती तर ती बाळासाहेबांच्या उपकारांची अंशतः परतफेड ठरली असती.
—-
महाविकास आघाडीविरोधात सातत्याने बिनबुडाचे आरोप करण्याच्या एक कलमी कामात हल्ली भाजपावाले व्यस्त असतात. आजकाल कोणीही सोम्या येतो आणि बालिश आरोप करत सुटतो. भाजपाच्या आरोपात फक्त सनसनाटी निर्माण करणे इतकाच हेतू असतो. आरोपांमध्ये तथ्य आणि सुस्पष्टता नसल्याने एक तोतरेपणा जाणवतो. आकाशपाताळ एक करूनदेखील महाराष्ट्रातील सुज्ञ जनता ह्या तोतर्या आरोपांना बळी पडत नाही हे पाहून हताश झालेल्या भाजपानेत्यांच्या घशाला आता कोरड सुटली आहे. कोरोनाकाळात केलेल्या कामांमुळे जनता उद्धवजींच्या नेतृत्वावर पूर्ण समाधानी आहे. देशभरातील सगळे सर्व्हे उद्धवजींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करताना आढळतात. एकीकडे मोदी सरकारने भडकवलेला महागाईचा वणवा देशभरातील गरीबांच्या पोटचा घास काढून घेत आहे, तर दुसर्या बाजूला महाराष्ट्रातील जनता मात्र शिवभोजन थाळीची तृप्तीची ढेकर देत आहे. उत्तर प्रदेश येथे कोरोनाच्या दुसर्या लाटेत गंगा नदीच्या किनारी प्रेतांचा खच पडला होता. त्यावेळी महाराष्ट्रात मात्र प्रत्येक कोरोना रूग्णाच्या उपचारांची सगळी सोय होत होती. महाराष्ट्र आणि मुंबई कायम आपत्तीजनक काळात देशासाठी धावून गेले आहेत. पण जेव्हा महाराष्ट्र व मुंबई कोरोनाच्या महासंकटाचा मुकाबला करत होते, तेव्हा स्वतःच्या आमदार निधीतील आर्थिक मदत महाराष्ट्राला न देता केंद्राच्या खात्यात जमा करणारे भाजपाचे राज्यातील नेते खरेच ह्या राज्याचे आहेत का, याची डीएनए चाचणी करायला हवी.
खरे तर महानगरपालिकांच्या निवडणुकीत जाण्यासाठीचे मुद्देच भाजपाकडे नाहीत. लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत प्रत्येक निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या भरवशावर मते मागायची आणि मग त्या मोदी ह्या नावाच्या आड राहून कामे न करता सत्तेत लोळायचे हे भाजपाचे हुकमी तंत्र. आता मात्र मोदींचा स्वतःची लोकप्रियता उतरंडीला लागल्याने हे हुकमी तंत्र फारसे प्रभावी राहिले नाही. बंगालच्या निवडणुकीत सुपडा साफ झाल्याने राज्याराज्यातून मुख्यमंत्री बदलून भाजपा जनतेच्या असंतोषावर वरवरची मलमपट्टी करत आहे. महानगरपालिका निवडणुकीपर्यंत तरी बिनबुडाच्या आरोपांचा ढासळता बुरूज महाराष्ट्रात भाजपाला लढवायचा आहे, पण महाराष्ट्रातील सगळ्या नेत्यांची जीभ रोज घसरतच चालली आहे आणि भाजपाची आजची छबी बेताल वक्तव्य करणारा पक्ष अशी निर्माण झाली आहे. ह्या नैराश्यातून बाहेर येण्यासाठी एक नवीन प्रयोग म्हणून स्वतःच्या राज्यात देखील ज्यांना कोणी विचारत नाही अशा सी. टी. रवी ह्यांना विरोधासाठी कर्नाटकातून आयात केले गेले.
महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करणार नाही कारण यातील तीन घटक पक्षांचा डीएनए वेगवेगळा आहे असे बालिश विधान सी. टी. रवी यांनी नुकतेच ठाण्यात केले. जनतेला व उद्योगजगताला विनाकारण आणि सतत राजकीय अस्थिरतेची भीती दाखवत राहणे हा भाजपाचा खेळ महाविकास आघाडी सरकार आल्यापासून सुरूच आहे. भाजपाचे वाजपेयी ह्यांच्या नेतृत्वातल्या सरकारच्या घटकपक्षाचे डीएनए वेगवेगळे असूनदेखील सरकार पाच वर्षे टिकले होते. स्वतःच्या पक्षाची नाव सत्तेबाहेर गटांगळ्या खात असताना एखाद्या दगडावर आपटून फुटू नये या काळजीपोटी सी. टी. रवी यांना काहीतरी विधान करतच राहावे लागणार. सी. टी. रवी भाजपाचे जनरल सेक्रेटरी आहेत का भविष्य सांगणारे ज्योतिषाचार्य आहेत असा प्रश्न पडावा इतके हे विधान हास्यास्पद आहे.
अजून पंचवीस वर्षे हेच सरकार आणायचे का नाही हे मुख्यमंत्र्यांचा कारभार पाहून जनता ठरवेल. बाबासाहेबांनी संविधानातून तो अधिकार जनतेकडेच दिला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा डीएनए हा महाराष्ट्र राज्याचा महाविकास करणे हाच आहे. मोदीजींनी केलेला सात वर्षांतील विकास पाहून जनतेचा विकास या शब्दावरील विश्वासच उडाला आहे. ह्यापुढे महाविकास हाच शब्द विश्वासपात्र ठरणार आहे.
खरे तर फक्त डीएनए बघून युती करायची आणि टिकवायची असती तर ते भाजपाला स्वतःला तरी कधीच अशक्य नव्हते. पंचवीस वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळे महाराष्ट्र नव्हे तर देशभरात भाजपा समर्थपणे वाढला टिकला. २०१४ला परत भाजपा सत्तेत आला, त्यावेळी भाजपाने स्वतःहून फडणवीस यांच्याएवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या डीएनएची म्हणजेच मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांची निवड केली असती तर ती बाळासाहेबांच्या उपकारांची अंशतः परतफेड ठरली असती. पण निवडणुकीतील तात्पुरत्या यशाची हवा डोक्यात गेलेला भाजपा एक दिवसात शिवसेनेला सोडून कोणत्या डीएनएसोबत जाऊन सरकारस्थापनेची शपथ घेत होता हे रवी यांनी आठवावे. ठाकरे आणि महाराष्ट्राचे हित हा एकच डीएनए आहे व त्याचा जर योग्य सन्मान सत्तेत असताना केला गेला असता तर २०१९ला महाराष्ट्रात सत्तेबाहेर तडफडायची वेळ भाजपावर आलीच नसती.
ठाकरे डीएनए हा पदांच्या लालसेपासून कायमच लांब राहिला आहे. पदांचे वाटप करून उपेक्षित आणि वंचितांची सत्तेची तहान भागवणे हे शिवसेनेच ब्रीद आहे. सत्ता तळागाळात पोहोचणे म्हणजे काय ते शिवसेनेने मोठे केलेल्या कोणालाही विचारा. अक्षरशः चमत्कार वाटावा असे शिवसेनेचे हे काम आहे. ठाकरे डीएनए स्वतः कधीच सत्तेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून भल्या पहाटे बोहल्यावर चढला नाही. असा उतावळेपणा कोणी केला आहे ते महाराष्ट्राला माहीत आहे. मा. उद्धवजी स्वतः सरकारचे नेतृत्व करणार म्हटल्यावर त्याक्षणी अखंड महाराष्ट्राला झालेला आनंद हा ह्या ठाकरे डीएनएवरच्या प्रेमापोटीच होता. सत्तेसाठी मेहबूबा मुफ्तींसोबत विचाराना तिलांजली देऊन भ्रष्ट युती करून स्वतःचा खरा सत्तापिपासूपणाचा डीएनए जगजाहीर करणार्या सी. टी. रवी अथवा त्यांच्या भाजपाला ठाकरे डीएनए पचनी पडत नाही हे गेल्या काही वर्षात लक्षात आले आहे. पेट्रोल वर जीझिया कर लावून केली गेलेला लूट कमी पडली असावी आणि मग आता महाराष्ट्रातील संपन्न अशा महानगरपालिकांच्या तिजोरीवर डल्ला मारायचा एकमेव हेतू घेऊन भाजपा कामाला लागली आहे. महाराष्ट्र लुटून पक्षाची तिजोरी भरण्याचे भाजपाचे कारस्थान जनता जाणते. शाळा आणि मंदिरे उघडण्याचा आदेश काढून मा. उद्धवजींनी महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे.
महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आजपर्यंत इतकी कठीण परीक्षा देण्याची वेळ कोणत्याच मुख्यमंत्र्यांवर आलेली नव्हती. पण ज्या समर्थपणे हे सरकार ही परिस्थिती हाताळत होते ते पहाता तीन पक्षातील अनुभवसंपन्न नेत्यानी एकदिलाने काम केले आहे हे जनता जाणून आहे. सी. टी. रवी ह्यांच्या स्वतःच्या कर्नाटक राज्यात मुख्यमंत्री बदलायची वेळ का आली ते पण जरा त्यांनी सांगावे. देशाचा जीएसटी महसूल ऑगस्टमध्ये घटत असताना महाराष्ट्राचा हिस्सा मात्र घसघशीत वाढत होता. म्हणजेच इतर भाजपाशासित राज्ये विकास करत नसताना महाराष्ट्र मात्र महाविकास करत आहे हे सी. टी. रवी यांनी पडताळून घ्यावे. उचलली जीभ लावली टाळ्या असे जर भाजपाचे जनरल सेक्रेटरी पदावरचा सी. टी. रवींसारखा व्यक्ती करू लागला तर मग प्रवीण दरेकराना किती खाली घसरावे लागेल? ‘तू गप्प रे..’ असे राणेंनी सांगूनदेखील गप्प न बसण्याचा बाणा ठेवणारे दरेकर सगळे प्रावीण्य वापरून नुकतेच बायकांच्या मेकअप करण्यापर्यंत घसरून आले आहेत.. त्यांना अजून खाली घसरणे किती अवघड जाईल हे तरी पक्षाने बघत जावे.
सी. टी. रवीअण्णांनी आधी स्वतःच्या पक्षाची डीएनए चाचणी करून घ्यावी. त्यांना हवे असेल तर देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था असणारी एकमेव महानगरपालिका असा जिचा गौरव केला जातो, त्या मुंबई महानगरपालिकेकडून ती मोफत करून देता येईल.
– संतोष देशपांडे
(लेखक राजकीय विश्लेषक आहेत)