साप्ताहिक ‘मार्मिक’चे मुखपृष्ठ रेखाटणारे तरुण व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांना ‘अस्तित्व ट्रस्ट’ आणि ‘दादर मुंबईकर’ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण पूरक गणपती सजावट मखर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. कोरोना संकटाचे सावट असतानाही लोकांनी घरोघरी गणेशोत्सव मोठ्या आनंदाने, उत्साहाने आणि मोठ्या प्रेमाने साजरा केला. घरच्या घरी गणपतीसाठी सजावट करताना आजच्या काळाचे भान राखून केलेल्या मखरासाठी ‘अस्तित्व ट्रस्ट’ आणि ‘दादर मुंबईकर’ यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण पूरक गणपती सजावट मखर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता.
एकूण १५१ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धकांचा उत्साह आणि गणपतीवरील प्रेम यामुळे सर्वच स्पर्धकांचे मखर वेगवेगळ्या धाटणीचे होते. त्यामुळे त्यातून पहिले तीन क्रमांक निवडणे खरे तर परीक्षकांना कठीणच गेले. पण यातच परीक्षकांनी काही निकष ठेवले होते. सुंदर पर्यावरण पूरक देखाव्याबरोबर त्यामागचा सामाजिक बांधीलकी देणारा संदेश निकष ग्राह्य परीक्षकांना महत्त्वाचा वाटला. यामुळे परीक्षकांनी १५१ स्पर्धकांमधून पहिल्या तीन नावांची घोषणा नुकतीच केली. यात गौरव सर्जेराव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अन्य दोन क्रमांक उत्तेजनार्थ म्हणून देण्यात आले.