सोयाबीनचे भाव पडले. साधारणपणे १० हजार प्रति क्विंटल दर होता सोयाबीनचा. दोन दिवसांपूर्वीच तो ८२०० झाला. काल त्यात मोठी घसरण होवून प्रति क्विंटल ५५०० ते ५७०० दर आहे. म्हणजे तब्बल ४० ते ५० टक्के दर पडले आहेत. सोयाबीनचे दर पडणारचं होते. गेल्याच आठवड्यात १५ लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात केले आहे. याला महाराष्ट्र सरकारने लेखी विरोध केलाय. त्यातच खाद्यतेल आयातशुल्क कमी केलंय. त्याचबरोबर सोयापेंड १२ लाख टन आयात केलीय. मग सोयाबीनचे भाव पडले नसते तर नवल! देशातील महत्त्वाचं पीक म्हणून सोयाबीनकडे शेतकर्यांचा कल वाढत आहे. सोयाबीनला चांगला दर मिळेल म्हणून आशा निर्माण झाली असताना सोयाबीनचे भाव पडत आहेत. देशामध्ये जोपर्यंत मोदींच सरकार आहे तोपर्यंत शेतमालाची माती होणारं आहे हे सांगायला ज्योतिष्याची गरज नाही. फक्त एकच माहिती सांगतो. देशात तेलबियांच्या व्यवसायात सगळ्यात मोठा ब्रँड म्हणजे फॉर्चुन आहे. हा ब्रँड अदानी ग्रुपचा आहे. हा ग्रुप खाद्यतेलाच्या मार्केटमध्ये शब्दशः दादागिरी करतो. देशांतर्गत शेतमालाचे भाव पाडून, पडलेल्या भावात शेतमाल खरेदी करून त्यावर प्रक्रिया उद्योग उभारून, भरमसाठ नफा कमवण्याचे उद्योग सध्या जोरात सुरू आहेत. सध्या सगळ्याच शेतकर्यांची अवस्था चक्रव्यूहामध्ये अडकलेल्या अभिमन्यूसारखी झाली आहे. शेतमाल पिकवण्यासाठी लागणारी खते, बियाणे, औषधं, औजारे, यंत्र, ते यंत्र चालण्यासाठी लागणारे इंधन (डिझेल) यांचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र त्याच वेळेस शेतमालाचे भाव मात्र संघटितपणे पाडण्याचं काम केले जात आहे. टोमॅटोचा लाल चिखल नुकताच सगळ्यांनी पाहिला असेलच. अगदी मिरची, कांदा, भाजीपाला या पिकांचेही माती झालीय. काही दिवसांपूर्वीच भुईमुगाच्या शेंगाचाही बाजार असाच पडला होता. मात्र शेंगतेलाचं दर मात्र दिवसेंदिवस चढेच होते. बाजारपेठेत कृत्रिमरित्या तुटवडा निर्माण करणे किंवा कृत्रिमरित्या पुरवठा वाढवणे ही खेळ मोठे मोठे उद्योजक खेळत असतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बनवलेल्या यंत्रणा अशा उद्योजकांच्या रखेल असतात. कायद्याला पायदळी तुडवत पैसे कमावण्याचं नवं फॅशन वाढत आहे. यात मात्र मरण होतं ते सर्व सामान्य शेतकर्यांचं. शेतकरी पोरांनी नव्या कंपन्या स्थापन करून व्यवसाय करावा म्हटलं तर त्यासाठी लागणारं भांडवलं कुठून उभे करायचं? हा प्रश्न असतो. बँका शेतकऱ्यांना दारातही उभं करत नाहीत. यावर काही जणांनी स्टिंग ऑपरेशनदेखील केले होते. बँकेतील कर्मचारी शेतकर्यांना हाकलून लावतात. कर्जाचा मोबदल्यात पैसे मागतात. एकाने तर थेट शेतकर्यांच्या बायकोकडे शरीरसुखाची मागणी केली होती.
असो.. तर बँका सरकारच्या आदेशाला जुमानत नाहीत. बँकांच्या लेखी शेती आणि शेतकरी दुय्यम आहेत. शेतीसाठी औजारे घेण्यासाठी बँका वार्षिक १५ टक्के दराने भांडवलं देतात. चैन म्हणून फिरण्यासाठी कार घेत असाल तर त्याला सात टक्के व्याज आकारले जाते. म्हणजे शासनाचा प्राधान्यक्रम समजतो. सध्या सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय. शेतीची माती होण्याची सुरुवात यापूर्वीच झालीय. शेतकरी वैतागून जमीन विकून टाकेल. त्या जमिनींवर मोठमोठ्या कंपन्या पुन्हा शेतीच करतील. फरक येवढाच की त्या शेतात ज्यांच्या जमिनी गेल्या ते शेतकरी मजूर म्हणून काम करतील. तुमचं नव्या भारतात स्वागत आहे. या सगळ्याविरोधात तुम्ही बोललात तर देशद्रोही ठरवले जाल. तुमच्यावर खटला दाखल केला जाईल. तुम्हाला शत्रूराष्ट्राचे हस्तक ठरवलं जाईल. अनेक वर्ष तरूंगात खितपत पडून तुमचा तिथेच मृत्यू होईल. यातुन सुटलात तर तुम्हाला सुखाने जगू दिले जाणार नाही. यामुळे बंद झालेली आयपीएल पुन्हा सुरू झालीय. तिचा तुम्ही आनंद घ्या.
बाप काय आज ना उद्या मरणार आहेच की!