जॉर्ज फर्नांडिस हे शिवसेनाप्रमुखांचे ‘अरेतुरे’तले मित्र. राजकारणात मात्र जॉर्ज यांच्या अनेक भूमिकांवर शिवसेनाप्रमुखांनी कुंचल्याचे फटकारे आणि शब्दांचे सपकारे ओढले होते. जॉर्ज हे एकेकाळचे कामगारांचे संपसम्राट, जहाल नेते… सरकारला कामगारांच्या वतीने जाब विचारणारे, संप करून वेठीला धरणारे. पण सत्तेत गेल्यानंतर, मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर संपांचं समर्थन करता येत नाही, हे सत्तेचं दुखणं जॉर्ज यांनाही जडलं, याचं फार नेमकं चित्रण बाळासाहेबांनी या व्यंगचित्रात केलेलं आहे. त्यांच्याकडे आशेने पाहणारा कामगार आणि जॉर्ज यांच्या चेहर्यावरची संतप्त अगतिकता अफाट आहे… हे चित्र पाहिलं की २०१३पर्यंत महागाईबद्दल तेव्हाच्या पंतप्रधानांना जाब विचारणारे नेते आता स्वत:च दुप्पट महागाई कशी सहजतेने घडवून आणतात, ते दिसतं आणि तेव्हाचे महागाईने संत्रस्त झालेले काकू-काका किती दयनीय पद्धतीने या महागाईचंही समर्थन करतात, तेही दिसतं… कालाय तस्मै नम: