एका छोट्या गावात एका संस्थेने आयोजित केलेल्या शिबिरात नंदू सरांना वक्ता म्हणून बोलावले होते. तिथे पोहचल्यावर संस्थेच्या लोकांनी त्यांचं छान स्वागत केलं. कार्यक्रमाला अजून बराच वेळ होता. त्यामुळे सरांना फ्रेश होऊन, चहा-नाश्ता घेऊन थोडा वेळ आराम करता येईल याची व्यवस्था संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केली. त्या छान माणसांच्या छान आदरातिथ्याने सर भारावून गेले. एका कार्यकर्त्याने विचारलं, ‘सर तुमची आवडती भाजी कोणती? दुपारच्या जेवणात ती भाजी करू.’ नंदू सर म्हणाले, ‘असं काही नाही. काहीही चालेल.’ कार्यकर्ते म्हणाले, ‘सांगा ना सर. एखादी तुम्हाला न आवडणारी भाजी नको बनवायला.’ सरांची आवडती भाजी शिराळे. पण उगीच ते सांगून ती भाजी इथे या आडगावात उपलब्ध नसेल तर यांची पळापळ कशाला? या मंडळींनी विचारलं नसतं अन् जेवणात शिराळीची भाजी दिसली असती, तर सरांना नक्कीच आनंद झाला असता. पण इथे आपण सेशन घेण्यासाठी आलो आहोत. जेवणात आवडीची भाजी असलीच पाहिजे असं काही नाही. पण ‘काहीही चालेल’ असं सर म्हणाल्यानंतरही ‘नाही सर, तुम्ही सांगा प्लीज’ असं कार्यकर्ते म्हणाले, तेव्हा नंदू सर म्हणाले, ‘तुम्ही विचारता आहात तर मिक्स कडधान्याची उसळ मला आवडते.’ सरांनी मिक्स कडधान्य सांगण्याचं एक कारण असं होतं की कडधान्ये उपलब्ध होऊ शकतील हे त्यांना माहीत होतं.
शिबीर सुरू झालं. दुपारच्या जेवणात सरांनी मिक्स कडधान्याच्या उसळीचा आस्वाद घेतला अन् संध्याकाळी शिबिर संपवून सगळ्यांचा निरोप घेतला.
याच शिबिरात दुसर्या दिवशी सुधीर सर वक्ते होते. सुधीर सरांचं नाव सुधीर होतं, पण त्यांना धीर नव्हता. आल्या आल्या त्यांनी आयोजकांना विचारलं, दुपारच्या जेवणाचा काय बेत आहे? काय बनवत आहात? दोन पायाचं की चार पायाचं? कोंबडं की बकरं? चिकन की मटण? घास फुस घालू नका बुवा मला! आयोजक संस्थेचा कार्यकर्ता नम्रपणे म्हणाला. माफ करा सर. तेवढं सोडून बोला. आमच्या संस्थेत नॉन वेज चालत नाही. सुधीर सरांचा मूडच गेला. त्यांनी शिबिरात त्यांचा विषय मांडला, पण त्यांच्या सेशनवर ‘जेवणात नॉन वेज नाही’ याची गडद छाया होती. जेवणात नॉन वेज असतं तर सुधीर सरांचा सेशन घेण्याचा उत्साह नक्कीच अधिक असता. पण नॉन वेज असतं तर दोन घास जास्त खाल्याने ते आफ्टर लंच सुस्तावलेही असते.
आता शिबिरात नंदू सर आणि सुधीर सरांना भेटल्यानंतर आपण मुक्ता या तरुणीला भेटू. मुक्ता एक साधारण बावीस वर्षांची तरुणी. आज मुक्ताच्या मैत्रिणीचं, मनालीचं लग्न आहे. मुक्ता या लग्नाला निघाली आहे. मनालीच्या लग्नाचा दिवस मुक्ताच्या डोक्यात पंधरा दिवस घोळतो आहे. पंधरा दिवसापूर्वी मुक्ताला लग्नाची पत्रिका आली होती. मुक्ता लग्नाला जाण्यासाठी कायम उत्सुक असते. कारण तिला गुलाबजाम खूपच आवडतात. लग्नात, पार्टीत कुठेही गेली की ती भरपूर गुलाबजाम खाऊन अगदी तृप्त होते. गुलाबजामने पोट आणि मन भरून घेते.
मनालीची लग्नपत्रिका आली तेव्हापासून मुक्ता गुलाबजाममय झाली आहे. गेले पंधरा दिवस तिच्या डोक्यात गुलाबजाम होता. डोक्यात गुलाब माळतात तसा तिने गुलाबजाम माळला होता. ती मनात मिटक्या मारत होती. अन् आज तर तिचा गुलाबजाम ओरपायचा दिवस उजाडला आहे.
मुक्ता लग्नाच्या हॉलमधे दाखल झाली तेव्हा तिचं लक्ष मनालीला भेटण्याकडे, तिच्या घरच्यांना किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना भेटण्याकडे नव्हतं, तर जेवणाचं काऊंटर कुठे लागणार आहे, कधी लागणार आहे याकडे होतं. जेवायला पहिला नंबर लावायचा. उगीच असं नको व्हायला की आपलं दुर्लक्ष झालं, आपण कुणाशी तरी बोलत राहिलो आणि काऊंटरवर भल्या मोठ्या रांगा लागल्या. आपला नंबर आला अन् गुलाबजाम संपले…
तिकडे मनालीच्या डोक्यावर अक्षता पडत होत्या, शुभमंगल म्हटलं जात होतं, पण इकडे मुक्ता सावध होत होती. अक्षता टाकता टाकता तिने आपला मोर्चा काऊंटरकडे वळवायला सुरुवात केली. तिने पहिला नंबर लावला. जेवण घेतलं. पण तिला गुलाबजाम काही दिसेनात. तिने कॅटरर्सच्या माणसाला विचारलं, भय्या, गुलाबजामुन किधर है? तो म्हणाला गुलाबजामुन नही है, जलेबी है! मुक्ताला राग आला. तिचं टाळकंच सटकलं. ती स्वत:शी म्हणाली, अरे हे मनालीच्या घरचे मूर्ख आहेत का? ही काय फालतुगिरी आहे? लग्नात स्वीट डिश म्हणून जिलेबी का ठेवली आहे?
मुक्ताला जिलेबी बिलकुल आवडत नसे. हातात घेतलेलं जेवण ती धुसफुसत जेवत होती. तिला राग आला होता. मैत्रिणी तिच्याशी बोलत होत्या पण ती फक्त हूं हूं करत होती. जेवण आटपून ती एकटीच हॉलबाहेर पडली. हॉल शेजारच्या पानवाल्याला विचारलं, ‘इधर आजूबाजू में कोई गुलाबजामुन की दुकान है क्या?’ पानवाला म्हणाला, ‘नहीं!’ शेजारी एक माणूस उभा होता. तो म्हणाला, आहे पण थोडं लांब आहे. मुक्ताने त्याच्याकडून नीट पत्ता विचारून घेतला आणि रिक्षाला हात केला. पाच सात मिनिटात ती त्या स्पॉटवर पोहचली. पण नेमकं ते दुकान आज बंद होतं. मुक्ता अजून वैतागली. मग तिने तिथे आजूबाजूला कुठे दुसरं गुलाबजामचं दुकान आहे का, याची चौकशी केली. तिच्या सुदैवाने तिथून काही अंतरावर दुसरं एक दुकान होतं. मुक्ता तिथे पोहचली. तिने एक डझन गुलाबजाम मागितले. दुकानदार ते पॅक करू लागला. मुक्ता म्हणाली, ‘पार्सल नको आहे. इथे खायचे आहेत,’ दुकानदार आश्चर्याने पाहू लागला. मग म्हणाला ‘माझ्याकडे एवढी मोठी प्लेट नाहीय. चार-चार देतो. चार-चार गुलाबजाम तीन वेळा खा!’ मुक्ता चालेल म्हणाली. चार-चार गुलाबजाम तीन वेळा मटकावल्यानंतर मुक्ताला जरा बरं वाटलं…
मंडळी, आपल्याला आवडतं ते आपल्याला मिळालं की आपल्याला आनंद होतो. आपण त्याचा मनापासून आस्वाद घेतो. नंदू सरांना शिराळ्याची भाजी मिळाली असती तर त्यांनाही आनंद झाला असता. पण ती मिळालीच पाहिजे असं काही त्यांना वाटत नव्हतं. जेवणात काय मेनू आहे, तो आपल्या आवडीचा आहे की नाही हे त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचं नव्हतं. नंदू सरांच्या वागण्यात विचारीपणा दिसून येतो.
सुधीर सरांच्या बाबतीत तसं नव्हतं. त्यांना मांसाहारी पाहुणचार हवा होता. जेवायला काय असणार हा त्यांच्या आकर्षणाचा विषय होता. जेवणात नॉन वेज नाही कळल्यावर ते नाराज झाले. त्यांचा मूड गेला. त्याच्या सेशनवर (सत्र) परिणाम झाला. असं होण्याची गरज नव्हती. आपल्याकडे काही आश्रमात, काही संस्थात, काही समाजात मांसाहार वर्ज्य असतो.
मुक्ताला गुलाबजाम आवडतात. नुसते आवडत नाहीत. गुलाबजाम मिळाले नाहीत म्हणून ती चिडली. गुलाबजाम आत्ताच्या आत्ता मिळायला हवे म्हणून तिने तडक गुलाबजामचं दुकान गाठलं. ते दुकान बंद होतं म्हणून तिने दुसरं दुकान शोधून काढलं. गुलाबजामबद्दल तिला वाटणारी हाव इतकी होती की मुक्ता मनालीच्या लग्नाचा आनंद घेऊ शकली नाही की मित्रमैत्रिणींमध्ये रमू शकली नाही.
गुलाबजाम आपल्या सार्यांनाच आवडतात. पण मुक्ताचं गुलाबजामबद्दल जे वाटणं आहे त्याला आवड किंवा आकर्षण म्हणता येणार नाही. त्याला आसक्ती म्हणता येईल.
आपल्याला एखादी गोष्ट आवडायला हरकत नाही, तिचं काही अंशी आकर्षण असायलाही हरकत नाही. पण आपली आवड, आपलं आकर्षण आपल्याला नियंत्रित करता यायला हवं. अन्यथा ते आसक्ती होईल. आणि आसक्ती झाली तर आपला विवेक हरवेल. आपल्याला याचे भान असायला हवे.