(जुनी एक मार्शल जीप, त्यात ड्रायव्हर वगळता सहाजण बसलेले. कुठल्या पॅनलची पाच मेंबर, त्यातला एक म्होरक्या, आणि एक विरोधी पॅनलचा कार्यकर्ता इत्यादी. गाडी टेपच्या आवाजाच्या दुप्पट आवाजात धडधड वाजतेय. आणि वेग म्हणाल तर एक सायकलस्वार सत्तरीचं म्हातारं गाडीशी आट्यापाट्या खेळतंय, ते सोडता बाकी गाड्यांना गाडी टफ देऊन पुढं आलेली, अर्थात ड्रायव्हरच्या मते!)
संपतराव उशीर : मग पंतांनी कुठं जायला सांगितलंय?
मेवेंद्र थुकचाटे : पंत म्हणले, गावच्या खाल्यांग नदीच्या काठाला ते लॉज आहे ना? तिथं ने म्हणी!
चारपैकी एक : (एकदम उसळून) अय मेव्या! त्या नदीतल्या लॉजवर नेतोस का? अरे मागल्या हफ्त्यात तिथं गेलो, संडासात पाणीच नव्हतं. नदीत गेल्थो बाटली घेऊन, हागायला. अन् रातभर डास झोंबले ते वेगळंच. त्याच्यात ती मच्छरछाप कॉईल जाळली तर त्याच्यानं खोकल्याची ढास लागली, अख्ख्या रातीचा विचका. गेलो चाखायला, बसलो राखायला. अशी गत! (बाकीचे वळून त्याच्याकडे बघू लागतात.)
संपतराव : असा करायला काय गेल्था तू? अजून नाद गेलाच नाही का? बायकोनं अन् सासर्यानं चपलेनं सडकवला तरी वळ गेलाच नाही का?
थुकचाटे : नाही, आता बरीच सुधारणा झालीय. त्या लिक्विडच्या डब्या आहेत आता. मोर्दिनच्या! अन् मागल्या हफ्त्यात नगरपालिकेची चौतीस गाव पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटेल होती ती?
संपतराव : (बारीक आवाजात) अय मेव्या आपण चाललोय ते कोणाला माहीत नाही ना? नाहीतं पॅनेलची माणसं येतील आडवी!
थुकचाटे : (त्याच्या कानात पुटपुटतो) प्लॅन एव्हडा फुलप्रूफे का ह्या ड्रायव्हरला सुद्धा गाडीत कोणे ते माहीत नाही!
ड्रायव्हर : कावो पिन्याचे पप्पा ना तुम्ही? (मागे वळून बघत) पिन्यानंच आता फुटपाथवर सँडविचची गाडी टाकली ना?
चार नं : तू काश्याचा का? काय बरोबर ओळखलं तू? हे जीपडं जुनं झालं, इकून नवं घेयचं ना? (संपतराव थुकचाट्याकडं खाऊ का गिळू नजरेनं पहातात. तर थुकचाटे ओशाळतो.)
संपतराव : अय जत्रा! नंतर झोडा गप्पा! (मेवेंद्रच्या कानात) आणखी काही उपाय केलेत का? पंतांनी काही सांगितलं का?
थुकचाटे : (बारीक आवाजात) हे बघा, सगळ्यांचे मोबाईल काढून घेतलेत. आता पंत सांगत नाहीत, तोवर कुणीच कोणाशी बोलू शकणार नाही. (पिशवीतले मोबाईल दाखवतो. तेवढ्यात कोणाचा तरी फोन वाजतो.)
तीन नं : आयला बायकोचा चौथा फोने! संध्याकाळी जेवायला येणारे का नाही, ईचारून डोकं खराब केलं. (फोन उचलतो.) हां, बोल गं… नाही गाव सोडलं… ते नदीत हाटेले ना?… हां मग तिथंच मुक्कामाला राहणार आहे मी… हां, ये संपतरावांचं काम झालं का? तसंच जाईन माऊंद्याला… हां ठेव!
संपतराव : ओ माऊली! आता अख्ख्या गावाला सांगत्या का वरडून? खेळण्यातले मोबाईल जमा केले का? मेव्या? (मेव्याकडं वळत)
तीन नं : खेळण्यातले कसले? तो निघताना म्हणी मोबाईल द्या! माला वाटलं, तेच्याकडं मोबाईल नसंल. म्हणून साध्यातला किपॅडचा मोबाईल घेऊन दिला, नवाकोरा! (संपतराव डोक्याला हात मारतात.)
संपतराव : (मेवेंद्रकडं बघत) ये बाबा! पुढली तरी तयारी नीट केली का?
थुकचाटे : टिव्हीत पाह्यल्यानुसार शेम तसंच केलं. गंधे साहेबांच्या पॅटर्ननुसार!
संपतराव : हां, पण नेमकं काय केलं ते सांग!
थुकचाटे : एक अविश्वासाचं लेटर लिहिलंय…
संपतराव : लिहून उपेग काय? दिलं का कोणाला?
थुकचाटे : दिलं तर…! चांगले आठदहा फोटो पण काढले. पाठवू का व्हॉट्सअपला?
संपतराव : अरे पण दिलं कोणाला?
थुकचाटे : आता आम्ही निघालो उशिरा! तवर गावातले बरेचसे गवरमेन्ट हाफीसं बंद होत्या. मग शक्कल लढवली. गेलो, उघड्या वितरणाच्या हाफीसात अन् दिला मुख्य अभियंत्याला अविश्वासाचा अर्ज…
संपतराव : अरे सरपंच पदाच्या इलेक्शनमधी त्याचा संबंध काय? ऐ!! घ्या रे कोरा कागद. करा पटापट सह्या. बाकी मी बघतो. (पुटपुटत) एकतर मेंबरमधून सरपंचकीची जुनी सिस्टीम इथंच आहे. बाकी शेजारल्या गावांत थेट लोकांतून सरपंच निवडून आल्यात आणि हे बेणं, सारखा एकच गोंधळ करतंय. (मोठ्याने) अय मेव्या आणि काय आणलंय पिसुड्यांत दाखव बरं. (पिशव्या बघू जातो.) अरे हे काय? काहीच नाही? आणि ह्या फक्त गोळ्या?
थुकचाटे : मग काय घेयचं होतं?
संपतराव : अरे गुलाल, माळा, पेढे-बिढे?
थुकचाटे : ते घेता येईल की! एखाद्या टपरीटुपरीतून. तसंही हे बंड यशस्वी झालं तर लागल ना?
संपतराव : मग तुला शंका आहे का काही? आणि ह्या गोळ्या कशासाठी?
थुकचाटे : आवो मिनी शेठ बंडात फेल झाल्यावर गोळी झाडून घेणार होता म्हणी. आता आपलं बजेट कमी. बंदूक परवडली नसती, मग झोपेच्या गोळ्या घेऊन आलो. वेळेवर खा आणि…
संपतराव : भाड्या माझ्या मरणावर टपलास होय?
थुकचाटे : तसं नाही, संपतराव. पण घात करून जे सत्तेत आले वा ज्यांनी प्रयत्न केला, अश्या बहुतेकांचा अंत घातपातानेच झाल्याचं इतिहास सांगतो. त्यात तुम्ही नाचताय बेभरवशी पंतांच्या इशार्यावर. त्यांनी खुर्चीसाठी किती जणांच्या कारकिर्दी संपवल्या? माहित्ये ना?