मोदींचा राजीनामा मिळवण्यासाठी अडवाणींनी नियोजन केलं असेल असं वाजपेयींनी गृहीत धरलं होतं. पण प्रत्यक्षात वेगळ्याच प्रकारचं नियोजन करण्यात आल्याचं यशवंत सिन्हा म्हणतात. असे विनय सीतापती यांनी आपल्या ‘जुगलबंदी’ या रोहन प्रकाशनाच्या पुस्तकात म्हटले आहे. यात वाजपेयी-अडवाणी यांच्या नात्यातील चढउतारांचा धांडोळा आहे. त्यातलाच हा भाग.
– – –
गुजरातमधील हिंसाचाराबद्दलची अडवाणींची पहिली प्रतिक्रिया वाजपेयींसारखीच होती. दोघांनाही खरोखरच ही घटना भयावह वाटली. पण दंगलीनंतर आठवड्याभराने अडवाणी नरेंद्र मोदींचा बचाव करण्याकडे झुकू लागले. `गुजरातमध्ये यापूर्वी कधीच असा सांप्रदायिक हिंसाचार ७२ तासांमध्ये नियंत्रणात आणला गेला नव्हता’ असं जाहीर विधान त्यांनी केलं. ६९ शीखविरोधी दंगलींमधील काँग्रेसच्या वर्तनाशी त्यांनी मोदींच्या वर्तनाची तुलनाही केली. पोलिसांनी १९८४ साली एकाही दंगलखोराला मारलं नव्हतं, तर गुजरात पोलिसांनी पहिल्याच दिवशी शेकडो दंगलखोरांना मारलं. उदारमतवादी भारतीयांना ज्या कृती भयंकर वाटल्या, त्याच कृतींमुळे मोदी पक्षकार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय झाल्याचं अडवाणींना जाणवत होतं.
अडवाणींचं मुख्य लक्ष कायमच पक्षावर केंद्रित झालेलं होतं, तर वाजपेयींचं लक्ष संसदेवर होतं. अकरा वेळा खासदार झालेल्या वाजपेयींच्या राजकीय कारकीर्दीची जडणघडण ४५ वर्षांच्या संसदीय कामकाजातून झाली होती. संसदेच्या सभागृहांमधून होणार्या आरोपांनी ते अधिक संवेदनशील होत असत. वाजपेयींनी अनेक दशकांच्या कालावधीत जोपासलेली `धर्मनिरपेक्ष’ प्रतिमा हास्यास्पद असल्याचे आरोप मार्च २००२मध्ये एकामागून एक वक्ते करत असताना वाजपेयी पुढच्या बाकावर क्षुब्ध अवस्थेत बसून होते. नरेंद्र मोदींविरोधात कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस, आययूएमएल, समाजवादी पक्ष व राष्ट्रीय जनता दल अशा विविध पक्षांकडून करण्यात आली. काही दिवसांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मोदींवर निष्क्रियतेबद्दल ताशेरे ओढले. माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील एका वैधानिक संस्थेने केलेली ही टिप्पणी विरोधकांनी उचलून धरली आणि पंतप्रधान हत्याकाडांवर पांघरूण घालू पाहत असल्याचा हा पुरावा असल्याचा आरोप केला. आधी नमूद केल्याप्रमाणे, काही निर्णय घेताना अडवाणींचे कान पक्षाच्या कामकाजाकडे अधिक वळलेले असायचे, तसं वाजपेयींचे कान संसदीय कामकाजाकडे लागलेले असत आणि त्यानुसार ते निर्णय घेत.
याच दरम्यान परराष्ट्र मंत्री जसवंतसिंग यांना एक फोन आला. संसदेचं सत्र सुरू होतं आणि वाजपेयींचे संसदीय सचिव प्रमोद महाजन यांनी सिंग यांना `संभालीये संभालीये’ असं म्हणत गडबडीने तिकडे येण्याची विनवणी केली. जसवंत सिंग घाईने वाजपेयींच्या संसदीय कार्यालयात गेले. ते समोर हजर असताना पंतप्रधान वाजपेयींनी एक कागद घेतला आणि ते स्वत:चा राजीनामा लिहू लागले. `मी त्यांचा हात थांबवला. ते माझ्याकडे कठोरपणे बघत म्हणाले, `तुम्ही काय करताय?’ अखेर जसवंत सिंग यांनी वाजपेयींचं मन वळवलं आणि त्यांनी राजीनामा दिला नाही.
त्या संपूर्ण महिन्याभरात मोदींना काढून टाकण्यासंदर्भात टीव्हीवरून चर्चा होत होत्या. इंग्रजी वृत्तवाहिनीवरील एक निवेदक सांगतात, `भाजपच्या बहुतांश लोकांना टीव्हीवर यायचं नव्हतं. आम्हाला केवळ काही साधूमंडळीच बोलण्यासाठी मिळत होती… पण ती विश्वासार्ह नव्हती.’ त्यावेळी वृत्तवाहिन्यांवर केवळ प्रफुल्ल गोराडिया तेवढेच नरेंद्र मोदींचा बचाव करत होते. मोदींनी पायउतार व्हायला हवं, या मागणीवर गोराडिया एकदा म्हणाले, `नरेंद्र मोदी म्हणजे काही कुठल्या शाखेचे व्यवस्थापक नाहीत, ते गुजरातचे निवडून आलेले मुख्यमंत्री आहेत.’ लवकरच गोराडिया यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला. पलीकडून बोलणारी व्यक्ती म्हणाली, `मोदी काही तुमचा भाऊ किंवा भाचा नाहीये, मग तुम्ही त्यांना कशाला धरून ठेवता आहात?’ हा फोन प्रमोद महाजन यांच्या स्पष्ट आदेशानुसार सुधींद्र कुलकर्णींनी केला होता आणि वाजपेयींना याची माहिती होती, असं पंतप्रधान कार्यालयातील स्रोत सांगतात. पण हा आरोप स्वत: कुलकर्णी मान्यही करत नाहीत अथवा नाकारतही नाहीत.
वाजपेयींनी २८ मार्च २००२ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी दिल्लीला बोलावलं. या बैठकीत मोदींनी पश्चात्ताप व्यक्त केला नाही. उलट, गुजरातमध्ये (वेळापत्रकारानुसार वर्षभराने निवडणुका घेण्याऐवजी) तात्काळ निवडणुका घेतल्या तर भाजपचा विधानसभेच्या दोन-तृतीयांश जागांवर विजय होईल, असं भाकित वर्तवणार्या मतचाचणीचा तपशील त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. अडवाणींना मोदींचं म्हणणं पटलं, पण वाजपेयींना ते पटलं नाही. निवडणुकीच्या समीकरणांनी वाजपेयींच्या राजकारणालाही आकार दिला होता, पण त्यांना हा प्रस्ताव अवाजवी महत्त्वाकांक्षा राखणारा वाटला. तात्काळ निवडणुका घेण्याची मोदींची विनंती पंतप्रधानांनी फेटाळून लावली.
या प्रसंगावेळी वाजपेयी व अडवाणी यांच्यातील फारकतीची प्रक्रिया पूर्ण झाली. गेली काही वर्षं ते तणावग्रस्त वैयक्तिक संबंधांच्या पातळीवर होते आणि त्यांच्यातील व्यावसायिक भागीदारी फुटली. `या मुद्द्यावर अटलजींनी त्यांचं मत उघडपणे मांडलं नाही, पण त्यांना मोदींचा राजीनामा हवा होता, हे मला कळलं. आणि मोदींना राजीनामा द्यायला लावू नये, असं माझं मत असल्याचं त्यांना कळत होतं,’ असं खुद्द अडवाणींनी नोंदवलं आहे.
त्यानंतर काही दिवसांनी दंगलीतील निर्वासितांच्या पुनर्वसनाची व्यक्तिश: पाहणी करण्यासाठी वाजपेयी गुजरातच्या दौर्यावर जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. आदल्या वर्षी भूकंपानंतरच्या दौर्यात वाजपेयींसोबत अडवाणी होते, पण यावेळी त्यांनी अडवाणींना सोबत घेतलं नाही. यातून स्पष्ट संदेश दिला जात होता : नरेंद्र मोदींना काढून टाकण्यासाठी वाजपेयी पूर्वतयारी करत होते.
पंतप्रधानांना घेऊन भारतीय हवाई दलाचं विमान ४ एप्रिल २००२ रोजी दिल्लीहून गांधीनगरच्या दिशेने उडालं. यावेळी अडवाणी हजर नसले तरी मंत्रिमंडळातील इतर सदस्य वाजपेयींसोबत होते. गांधीनगर विमानतळावर मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर तीन हेलिकॉप्टरांच्या ताफ्यातून वाजपेयी गोध्य्राला गेले. तिथे त्यांनी एस-६ या जळालेल्या रेल्वेडब्याची पाहणी केली. काही तासांनी ते गांधीनगरला परतले आणि नरेंद्र मोदींचा समावेश असलेल्या वाहनांच्या ताफ्यासह शाह आलम निर्वासित छावणीकडे रवाना झाले. अहमदाबादमधील मुस्लीम मोहल्ल्यात ही छावणी होती. स्वत:च्याच भूमीवर निराश्रित झालेले नऊ हजार मुस्लीम या छावणीत राहत होते. पंतप्रधानांच्या मोटारींचा ताफा तिथे पोचण्यापूर्वी छावणीच्या संयोजकाने संतप्त निर्वासितांना सूचना केली, `इस्लाममध्ये पाहुण्याशी उद्धटपणे वागू नये असं सांगितलेलं आहे. हे तुमचं घर आहे आणि मोदी पाहुणे आहेत. त्यामुळे स्वत:वर ताबा ठेवा…’
स्वत:च्याच भूमीवर निर्वासित झालेल्या लोकांकडे पाहून वाजपेयी अस्वस्थ झाले. आपला भाऊ पलंगावर असताना त्याच्यावर वार करण्यात आले, मग त्याच्यावर अॅसिड टाकण्यात आलं आणि मग त्याला जिवंत जाळण्यात आलं, असं एका मुस्लीम महिलेने पंतप्रधानांना सांगितलं. स्थानिक पोलीस स्थानकापासून काही मीटरच्या अंतरावर आपल्या डोळ्यांसमोर पन्नास लोकांची कत्तल कशी झाली, याचं वर्णन दुसर्या दंगलग्रस्ताने केलं. `तुम्ही मुख्यमंत्री बदलायलाच हवेत,’ असं ती व्यक्ती म्हणाली. वाजपेयींनी एका अनाथ मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा एका तरुणाने वाजपेयींच्या मागे उभ्या असणार्या मोदींकडे बोट दाखवलं आणि `हे मारेकरी आहेत’ असं तो ओरडला. पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा छावणीतून बाहेर पडला, तेव्हा गर्दीमधून मोदीविरोधी घोषणा दिल्या जात असल्याचं त्यांना ऐकायला येत होतं. वाजपेयींच्या प्रतिनिधी मंडळाचा भाग असलेल्या अरुण जेटलींना मात्र वेगळा संदेश ऐकू आला. `आम्ही शाह आलम छावणीतून बाहेर आलो, तेव्हा ड्रायव्हरने आम्हाला खिडक्या खाली करायला सांगितलं. त्यावेळी आम्हाला `नरेंद्र मोदी जिंदाबाद’ असे नारे ऐकू आले,’ असं जेटलींनी म्हटलं होतं. वाजपेयींना त्रासलेले अल्पसंख्याक दिसत होते, तर त्यांच्या उर्वरित मंत्रिमंडळाला एकवटलेल्या बहुसंख्याकांचा सूर ऐकू येत होता.
गांधीनगर विमानतळावर पत्रकार प्रिया सेहगल यांनी मोदी शेजारी बसलेले असताना वाजपेयींना प्रश्न विचारला की, ते मुख्यमंत्र्यांना कोणता सल्ला देऊ इच्छितात. यावर वाजपेयी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे क्षणभर थांबले आणि मग काळजीपूर्वक म्हणाले, `चीफ मिनिस्टर के लिए मेरा एकही संदेश है, की वो राजधर्म का पालन करें.’ मग वाजपेयींनी पुन्हा तोच शब्द उच्चारला, `राजधर्म’. शेजारी मोदी दात दाखवून हसत चेहरा दुसरीकडे वळवत होते. `राजा के लिए, शासक के लिए प्रजा प्रजा में भेद नहीं हो सकता.’ जाहीररीत्या सक्त ताकीद देणार्या या विधानाचा मुख्य भाग पूर्ण झाल्यावर मोदी आठ्या घातलेल्या चेहर्याने वाजपेयींना मधेच तोडत म्हणाले, `हम भी वही कर रहे है साहब.’ वाजपेयी पुन्हा थांबले आणि पुढे म्हणाले, `मुझे विश्वास है की नरेंद्रभाई यही कर रहे है.’
वाजपेयी दिल्लीला परतल्यानंतरही त्यांचा कल मोदींना काढून टाकण्याकडेच झुकलेला होता, पण त्यांना अखेरचं पाऊल उचलता येत नव्हतं. ७ ते ११ एप्रिल २००२ या दिवसांमध्ये त्यांचं सिंगापूर व कंबोडिया दौर्याचं नियोजन होतं. त्यानुसार त्यांना पालम विमानतळावरून सिंगापूरमधील चांगी इथे घेऊन जाणारा विमानप्रवास सुरू झाला. विमानामध्ये पंतप्रधानांसाठी खास तयार केलेल्या खाजगी खोलीत वाजपेयी बसले होते. तर मंत्री व प्रशासकीय बाहेरच्या सामायिक जागी बसले होते. अचानक वाजपेयींचे जावई रंजन भट्टाचार्य निर्गुंतवणूक मंत्री अरुण शौरींकडे आले आणि म्हणाले, `प्लीज, त्यांना जाऊन भेटा. बापजी खूपच अस्वस्थ आहेत.’
शौरी लगोलग पंतप्रधानांच्या खोलीत गेले तेव्हा जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा नेता खुर्चीत खाली मान घालून बसलेला होता. `त्यांनी वर बघितलं आणि खुणेने मला खाली बसायला सांगितलं. मग पुन्हा ते आधीसारखेच खाली बघत राहिले. ते चिडले होते,’ अशी आठवण शौरी सांगतात. `मला परदेशात का पाठवतायत? माझं तोंड काळं झालेलं आहे,’ असं वाजपेयी म्हणाले. यावर शौरींनी त्यांना सल्ला दिला, `तुम्ही सिंगापूरला गेल्यावर अडवाणींना फोन करा आणि मोदींना राजीनामा द्यायला सांगा, असं अडवाणींना कळवा.’ त्या संपूर्ण दौर्यादरम्यान वाजपेयींनी शौरींच्या सल्ल्यावर विचार केला, पण मोदींचा राजीनामा मागावा असं सांगण्यासाठी अडवाणींना फोन मात्र व्ाâेला नाही. नाराज झालेल्या शौरींनी सोबत असणार्या एका राजनैतिक अधिकार्याला विचारलं, `अटलजी अडवाणींना फोन का करत नसतील?’ तो अधिकारी म्हणाला, `कारण समोरून नकार मिळेल अशी त्यांना भीती वाटतेय.’
आपल्या सर्वांत जुन्या मित्राला उचकावण्याची भीती वाजपेयींना का वाटत होती? या प्रश्नाचं अरुण शौरींनी दिलेलं उत्तर असं : `अनेक वर्षं सासुरवास सहन केलेल्या सुनेच्या बाबतीत सासूला जशी भीती वाटेल, तसा हा प्रकार होता. सुनेला उचकावलं आणि तिने तोंड उघडलं तर ती बोलायचं थांबणार नाही अशी भीती सासूला वाटेल, तसंच.’
मग वाजपेयींनी आणखी दुसरी व्यूहरचना आखली. दिल्लीला परत जात असताना ११ एप्रिल २००२ रोजी पंतप्रधानांनी विमानामध्ये एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी मोदींबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर वाजपेयी म्हणाले की, `नवी दिल्लीला परतल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भवितव्याबद्दल विचार केला जाईल. पण त्याआधी माझ्या सहकार्यांशी मला सल्लामसलत करावी लागेल.’ भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक गोव्यात १२-१३ एप्रिल २००२ या दिवसांमध्ये भरणार असल्याचाही उल्लेख वाजपेयींनी त्यावेळी केला. दरम्यान, `पंतप्रधानांनी मोदींना काढण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी बातमी अधिकार्यांनी माध्यमांपाशी फोडली. `(गोव्यातील बैठकीमध्ये) मोदींचा राजीनामा घ्यावा, असं वाजपेयीजींना वाटत असल्याचं आमच्यापैकी काहींना माहीत होतं. अडवाणीजींना हे नको होतं, याचीही आम्हाला कल्पना होती. पण ते दोघे हे सगळं कसं हाताळणार आहेत, याबद्दल आम्हाला अंदाज नव्हता,’ असं भाजपचे एक ज्येष्ठ नेते सांगतात.
दुसर्या दिवशी दिल्लीहून गोव्याच्या दिशेने विमान उडालं, तेव्हा वाजपेयी व अडवाणी सोबत होते. अखेरच्या क्षणी त्यात अरुण शौरींचीही भर पडली. आदल्या रात्री त्यांना ब्रजेश मिश्रांनी फोन केला आणि ते म्हणाले, `तुम्ही त्या दोघांना ओळखत नाही. ते यावर बोलणार नाहीत. म्हणूनच मी तुम्हाला आणि जसवंत सिंगांना सोबत पाठवतो आहे.’
पंतप्रधानांच्या परदेशप्रवासासाठी वापरल्या जाणार्या एअर इंडियाच्या जम्बो जेटसारखं हे विमान नव्हतं. गोव्याला जाणार्या हवाई दलाच्या या विमानामध्ये पंतप्रधानांसाठी खाजगी खोली नव्हती; तर एक छोटं केबिन आणि चार खुर्च्या ठेवलेल्या होत्या. मधल्या टेबलावर त्या दिवशीची वर्तमानपत्रं पसरलेली होती. गोव्यातील मोदींच्या संभाव्य भवितव्याबद्दल `द हिंदू’मध्ये तीन लेख आलेले होते. `(गोव्यातील बैठकीमध्ये) मोदींना काढून टाकावं अशी मागणी अनेक वत्तäयांनी केली, तर कदाचित पंतप्रधानांनासुद्धा मोदी नको आहेत याचा तो संकेत असेल,’ असं `द हिंदू’च्या पहिल्याच पानावर म्हटलं होतं. `द टाइम्स ऑफ इंडिया’ने एक पाऊल पुढे जात काही अधिकार्यांची विधानं उद्धृत केली आणि पंतप्रधानांनी मोदींना काढून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी त्याआधारे दिली होती. `पंतप्रधानांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना काढून टाकण्याचा मानस पक्का केला आहे,’ असं `द इंडियन एक्स्प्रेस’नेही म्हटलं होतं. वाजपेयी आणि अडवाणी एकमेकांसमोर बसले होते, तेव्हा त्यांच्या मनातल्या गोष्टीमधल्या टेबलावरील वर्तमानपत्रांद्वारे बोलल्या जात होत्या.
विमान उडाल्यानंतर वाजपेयींनी एक हिंदी वर्तमानपत्र वाचायला घेतलं आणि अडवाणींशी नजरानजर टाळली. अडवाणींनी एक इंग्रजी वर्तमानपत्र उचलून तसंच केलं.
अनेक वर्षं वाजपेयींनी गृहीत धरलेल्या अडवाणींनी आता ठाम भूमिका घेतली होती. जसवंत सिंग आणि अरुण शौरी एकमेकांकडे बघत होते. मग शौरींनी वाजपेयींच्या हातातील पेपर घेतला आणि ते म्हणाले, `पेपर नंतरही वाचता येईल. गेले तीन दिवस तुम्हाला अडवाणीजींशी बोलायचं होतं, मग आता बोला.’
पुन्हा शांतता. शेवटी वाजपेयींनी मौन सोडून `कम से कम इस्तिफे का ऑफर तो करते है’ असं म्हटल्याची आठवण अडवाणींनी नोंदवली आहे. मोदींनी राजीनामा दिल्याने काही गुजरातमधील परिस्थिती सुधारणार नाही आणि पक्ष हा प्रस्ताव स्वीकारेल का, याबद्दलही आपल्याला खात्री नाही, असं ढोबळ उत्तर अडवाणींनी दिलं. मोदींच्या राजीनाम्याने पक्षात गहजब उडेल, असं अडवाणी म्हणाल्याचं जसवंत सिंग नोंदवतात. विमान गोव्यात उतरलं तोवर वाजपेयींच्या म्हणण्यानुसार, पुढे जाण्याबाबत सहमती झाली होती. मोदींचा राजीनामा मिळवण्यासाठीची कार्यवाही अडवाणींकडे सोपवण्यात आली.
गोव्यात मॅरिएट हॉटेलमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सुमारे अडीचशे सदस्य हजर होते. मंचावर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आणि पक्षाध्यक्ष जना कृष्णमूर्ती पहिल्या रांगेत बसले होते. नरेंद्र मोदी श्रोत्यांतील मधल्या एका रांगेत होते.
गुजरातमधील दंगलींवर दुसर्या दिवशी चर्चा करण्याचं ठरलं होतं. पण पक्षाध्यक्षांचं भाषण सुरुवातीला झाल्यानंतर लगेचच मोदी उभे राहिले. त्यांनी स्वत:च्या कृतींचं समर्थन करणारं मोठं भाषण दिलं. मग ते म्हणाले, `मी एक निर्णय घेतला आहे. पक्षाची कोणतीही हानी होता कामा नये. त्यामुळे मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचं ठरवलं आहे.’ इथपर्यंत सगळं वाजपेयींच्या मनासारखं होत होतं.
पण अचानक परिस्थिती पालटली.
राष्ट्रीय कार्यकारिणीमधील अनेक सदस्य घोषणा द्यायला लागले, `मोदींना जाऊ देऊ नका.’ एकापाठोपाठ एक वत्त्ाâे मोदींच्या समर्थनार्थ भाषणं करत होते. `मोदी, मोदी’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. या गोंधळात मंचावरील वाजपेयींचा पडलेला चेहरा स्पष्ट दिसत होता. परिस्थिती आपल्या हातातून निसटत असल्याचं लक्षात आलेल्या वाजपेयींनी चर्चेअखेरीस म्हटलं, `याबद्दल आपण उद्या बोलूया. आत्ता जाहीर सभा आहे.’
मोदींचा राजीनामा मिळवण्यासाठी अडवाणींनी नियोजन केलं असेल असं वाजपेयींनी गृहीत धरलं होतं. पण प्रत्यक्षात वेगळ्याच प्रकारचं नियोजन करण्यात आल्याचं गर्दीच्या प्रतिसादावरून उघड झालं, असं त्यावेळी उपस्थिती असलेले तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा म्हणतात. `हे उत्स्फूर्तपणे झालेलं नव्हतं. सगळं नियोजित होतं. मोदी त्यांचा राजीनामा देऊ करतील, उपस्थितांची गर्दी त्याला विरोध करेल आणि राजीनामा स्वीकारला जाणार नाही. अडवाणींना हे माहीत होतं. त्यांनी अरुण जेटली, वेंकय्या नायडू यांना सोबत घेऊन हे नियोजन केलं होतं.’ अडवाणी व वाजपेयी या दोघांच्याही जवळचे असणारे सुधींद्र कुलकर्णी म्हणतात, `राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतील कल आणि तिथे व्यक्त झालेली भावना वाजपेयींनी पाहिली. त्यामुळे त्यांनी स्वत:चा निर्णय बदलला. शिवाय अडवाणींचं याबाबतीत ठाम मत होतं, त्याचाही वाजपेयींवर परिणाम झालेला होता. यातल्या काही गोष्टी अर्थातच नियोजनपूर्वक घडवून आणलेल्या होत्या.’ दिनेश त्रिवेदी म्हणतात त्याप्रमाणे, `मोदींच्या बाबतीत कधीच काही उत्स्फूर्त नसतं. त्यात काहीतरी नियोजितपणे घडवून आणलेलं असतंच.’