□ मोदी बाबा बरळतात आणि चमचे ‘वाह वाह’ म्हणतात – राहुल गांधी यांची टीका.
■ योग्य वेळी मानसोपचार न मिळालेले असे बरेच रुग्ण नंतर बुवा-बाबा म्हणून ख्याती पावतात आणि लोक त्यांच्या भजनी लागतात.
□ महारेराचा दणका; २० हजार इस्टेट एजंट्सची नोंदणी स्थगित.
■ म्हणजे ग्राहकाचा भुर्दंड वाढणार. ही मंडळी नोंदणीकृत एजंटांच्या माध्यमातून व्यवसाय करतच राहणार.
□ महाराष्ट्रावर पुन्हा दरोडा; ५० हजार कोटींचा ‘गेल’ प्रकल्पही गेला.
■ बेकायदा सरकारला काय फरक पडतो गेला तर? मालक खूष तर शेपटी हलवत हेही खूष.
□ पुण्याच्या अपघातानंतर यंत्रणेला जाग; ३२ पबचे परवाने रद्द
■ जखम मांडीला, मलम शेंडीला… पबचे परवाने रद्द करून काय होणार? अपघात पबमुळे झाला आहे का? अल्पवयीन मुलांना प्रवेश देण्याचा विषय होता, त्यांना मद्य देण्याचा विषय होता ना? बरं तिथे हे सगळं करून बाहेर पडणारी सगळीच अल्पवयीन मुलं वेगाने गाड्या चालवून लोकांचे जीव घेत नाहीतच!
□ पुण्यात ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरण गाजत असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार गायब.
■ त्यांचाच सध्या हिट अँड रन अपघात झालाय राजकीय! ते काकांना हिट करायला गेले आणि स्वत: पळायची पाळी आलीये त्यांच्यावर.
□ फडणवीस पुण्यात सावरायला आले अन् शेकून गेले.
■ पोलिसांचा, त्यांच्या दलाचा गैरवापर केला की नंतर तो अशा प्रकरणांमध्ये उलटतो, सावरताही येत नाही आणि लोकांचा संताप आवरताही येत नाही.
□ काँग्रेसचं सरकार आलं तर मतांसाठी मुजरा करेल : मोदी.
■ यांना नेहमी अशा उपमा सुचतात, यांची उठबस नेमकी कोणत्या लोकांत असते? काय करतात हे दिवसाचे १८ तास? की संघाचे संस्कारच असे आहेत?
□ एसआरए मुख्यालयच दुरुस्तीच्या प्रतीक्षेत.
■ एखाद्या बिल्डरकडून करून टाका त्याचाही पुनर्विकास. वर काही पैसेही मिळतील.
□ नालेसफाई ‘१०० टक्के’चा दावा; नाले मात्र तुंबलेलेच!
■ पहिल्या पावसात सगळे दावे वाहून जातील आणि मुंबई तुंबून बसेल… शिवाय कोट्यवधी रुपयांचा खर्च नेमका कशात गेला, ते कोणी सांगू शकणार नाही.
□ अवैध दारूच्या धंद्यांवर पोलिसांचे नियंत्रण नाही – सत्र न्यायालयाने उपटले कान.
■ सत्र न्यायालयाची माहिती कमी पडते आहे… सगळ्या अवैध धंद्यांवर पोलिसांचंच ‘नियंत्रण’ असतं, त्याशिवाय ते चालू शकत नाहीत.
□ सहा महिन्यांत पक्की घरे देण्याचे आश्वासन देत मिंधे सरकारने इर्शाळवाडी दरडग्रस्तांना गंडवले.
■ चला, गंडवलेल्यांच्या यादीत आणखी एक भर. शिवाजी पार्क कमी पडेल गंडलेल्यांचा एकेक प्रतिनिधी बोलावायचं ठरवलं तरी.
□ विक्रमगडमध्ये भाजपचे ‘नोट लो, वोट दो’ उघडकीस.
■ सगळीकडे तेच आहे. इथे उघडकीला आलं इतकंच.
□ मोदींची ‘हर घर जल’ योजना फेल; म्हसळ्यात पाण्याचा टिपूस नाही…
■ त्यांना लाल किल्ल्यावरून फेकाफेक करायला योजनांची आकर्षक नावं आणि बनावट आकडे मिळाल्याशी मतलब असतो.
□ जिथे मोदींच्या सभा, तिथेच शेतकर्यांचे आंदोलन.
■ नंतर मतं त्यांनाच देणार असाल तर उपयोग काय त्याचा?
□ मतदानाच्या टक्केवारीचा संशय अजूनही कायमच.
■ तो निकाल लागल्यानंतरही फिटणार नाही. म्हणजे ज्या कारणासाठी ईव्हीएम आणलं, तेच कारण फेल गेलं.
□ ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूममध्ये घुसखोरी.
■ काहीतरी कालाकांडी करायचे प्रयत्न सुरू आहेतच सतत.
□ जनतेच्या रेट्यामुळे पुण्यातील ‘हिट अॅण्ड रन’प्रकरणी अखेर कारवाई.
■ त्यासाठी जनतेचा रेटा लावावा लागतो पुण्यासारख्या सुविद्य शहरात, ही फार वाईट गोष्ट आहे.
□ ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत; राज्यकर्त्यांचे या दुष्काळी परिस्थितीकडे लक्षच नाही – शरद पवार.
■ त्यांचं लक्ष फक्त चार तारखेकडे आहे… झोला तयार आहे. भरून, उचलून निघायचं कुठे, एवढाच विषय आहे.
□ भाजपच्या सरपंचाचा घोटाळा; अंत्यसंस्कारासाठी आणलेली लाकडे बेकरीला विकली.
■ शवपेटिका घोटाळ्याची आठवण झाली… मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात बदलेल कशी?
□ यंदाच्या पावसात दिवा, मुंब्रा तुंबणार; ठाणे पालिकेची सफाई फक्त कागदावर.
■ मुळात ठेकेदार मिळवता मिळवता मारामार झाली, आता वरवरचे देखावे करून बजेट संपवलं, वाटावाटी झाली की संपलं काम! लोक बुडाले की वेगळं टेंडर काढता येईल.
□ डोंबिवलीच्या दुर्घटनेला गद्दारांचे सरकारच जबाबदार – अंबादास दानवे यांचा आरोप.
■ हे सरकार हीच महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत घडलेली एक दुर्घटना आहे दानवे साहेब! त्यातून आपण कधी सावरणार असा प्रश्न आहे.