४ जून २०२४… सध्याचे काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसर्यांदा सत्तेत येणार आहेत की नाही या प्रश्नाचं उत्तर ही तारीख देणार आहे.
निकाल काहीही असो एक गोष्ट स्पष्ट आहे की जो सस्पेन्स २०१४ ला नव्हता, जो २०१९ला नव्हता, तो यावेळी प्रथमच जाणवतो आहे. निवडणुकीची सुरुवात ‘अब की बार ४०० पार’च्या आवेशात केल्यानंतरही ऐन निवडणुकीच्या मध्यातच चर्चा भाजपला पुन्हा बहुमत मिळतंय की नाही याची सुरू झाली. त्याबद्दल दोन्ही बाजूंनी आकड्यांचे दावे होताना दिसतायत. भाजप २७२च्या खालीही येऊ शकतं असा अंदाज योगेंद्र यादव यांनी मांडला तर पाठोपाठ प्रशांत किशोर यांनी ‘आयेगा तो मोदीच’ असं भाकित वर्तवलं. आता खरंतर प्रशांत किशोर आणि योगेंद्र यादव हे दोघेही सध्या ओपिनियन पोलच्या कामात नसतात. दोघेही सध्या थेट राजकीय भूमिका घेऊन सार्वजनिक जीवनात वावरतायत. योगेंद्र यादव हे आधी सीएसडीएस या संस्थेशी निगडित होते, नंतर ते काही काळासाठी ‘आप’मध्ये होते, आता ते स्वराज ही राजकीय संघटना चालवतात. ते काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेतही सहभागी झाले होते. तर प्रशांत किशोर हे नाव निवडणूक रणनीतीकार म्हणून मोदींच्या २०१४च्या विजयानंतर प्रकाशझोतात आलं. त्यावेळी प्रशांत किशोर यांच्या ‘आयपीएसी’ या संघटनेनं ‘ब्रँड मोदी’ तयार करण्यात बर्याच अभिनव कल्पना राबवल्या होत्या. नंतर ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी यांच्यासह इतरही अनेक पक्षांना विधानसभेसाठी त्यांनी कॅम्पेन चालवण्यासाठी कॉर्पोरेट सुविधा पुरवली होती. मध्यंतरी प्रशांत किशोर हे काँग्रेसच्या पण खूप जवळ गेले होते. पण काँग्रेसमध्ये बाहेरून काम नको तर पक्षात प्रवेश करून काम करावं लागेल, आणि त्यांना हवा असलेला पूर्ण फ्रीडम मिळत नसल्यानं त्यांचं बिनसलं. त्यानंतर जनसुराज नावाची एक राजकीय संघटना प्रशांत किशोर यांनी स्थापन केली. संपूर्ण बिहारमध्ये त्यांनी एक पदयात्रा पण नुकतीच पूर्ण केली आहे.
तिसर्या टप्प्यानंतर योगेंद्र यादव सांगू लागले की ४००-३०० सोडा, भाजप २७२च्या पण खाली येऊ शकते, त्यानंतर अचानक माध्यमांमध्ये सगळीकडे प्रशांत किशोर यांच्या मुलाखतींचा सिलसिला सुरु झाला. भाजपच्या सध्याच्या जागांमध्ये फारसा फरक पडणार नाही, पुन्हा मोदीच पंतप्रधान बनणार हे प्रशांत किशोर ठामपणे सांगू लागले. देशाच्या पूर्व-दक्षिण पट्ट्यात म्हणजे बंगाल, ओडिशा आणि साऊथचा काही भाग इथे भाजपच्या जागा पूर्वीपेक्षा वाढतील आणि उत्तरेत भाजपला फारसं मोठं नुकसान होणार नाही, हा प्रशांत किशोर यांचा दावा आहे. थोड्याफार जागा उत्तरेत कमी झाल्या तरी बंगाल, ओडिशा, साऊथमध्येच त्या भरून निघतील असा भाजपचा परफॉर्मन्स असेल असं त्यांना वाटतंय. आता यात गंमत अशी आहे की यात राज्यनिहाय काय चित्र असेल असं मी नाही सांगणार, पण मला एकंदरीत असं चित्र दिसतंय असं सांगून ते हा अंदाज व्यक्त करतायत. महाराष्ट्र, बिहार या दोन राज्यांबाबत त्यांचं म्हणणं आहे की इथे भाजपच्या मित्रपक्षांचं नुकसान होईल, पण वैयक्तिक भाजपच्या जागा फार कमी होणार नाहीत. झाल्या तरी तीन चारच कमी होतील. सध्या जनतेत जो रोष दिसतोय, त्याबद्दलही त्यांचं म्हणणं आहे की भाजपला मागच्या वेळी पण ३८ टक्केच मतं मिळालेली होती. म्हणजे ६२ टक्के मतं विरोधात होती. एवढे लोक विरोधात असतानाही भाजपला ३०३ जागा मिळाल्याच होत्या. म्हणजे दहातले सहा लोक तेव्हाही मोदींच्या विरोधातच होते. त्यामुळे आजही तुम्हाला मोदींच्या विरोधात बोलणारे लोक आजूबाजूला दिसतीलच. राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी माहौल पूर्णपणे भाजपच्या बाजूने बनलेला आहे असा आभास निर्माण करण्यात आला. हा आभासच मुळात चुकीचा होता, त्यात भाजपची हवा जितकी गृहीत धरली तितकी ती प्रत्यक्षात जमिनीवर नव्हतीच, त्यामुळे आत्ता मोदी बॅकफूटवर गेल्याचं वाटतंय. पण लोकांच्या मनात मोदींच्याबद्दल नाराजी असेल, तक्रार असेल पण राग नाही, असा त्यांचा दावा आहे.
योगेंद्र यादव आणि प्रशांत किशोर दोघांचेही याआधीचे अंदाज चुकले आहेत का, तर नक्कीच चुकले आहेत. योगेंद्र यादव आत्ता राजस्थान विधानसभेला काँग्रेसच जिंकेल असं सांगत होते, २०१९च्या लोकसभा निवडणुकीलाही त्यांचा अंदाज चुकला होता. प्रशांत किशोर हिमाचल प्रदेश, तेलंगणाच्या निवडणुकीबाबत याच प्रकारे चुकले होते. हिमाचलमध्ये काँग्रेसचं पानिपत होईल, तेलंगणात बीआरएस सत्तेवर येईल असं प्रशांत किशोर म्हणत असताना प्रत्यक्षात मात्र उलटंच घडलं होतं. निवडणूक रणनीतीकारांचे सगळेच अंदाज बरोबर येणं काही अपेक्षित पण नाहीय. पण जिथे इतर सगळे आपल्या चुका प्रांजळपणे कबूल करतात तिथे प्रशांत किशोर यांच्या मात्र उर्मटपणाचं दर्शन करण थापर यांच्या मुलाखतीत घडलं. ज्यावेळी करण थापर त्यांना तुमचा हिमाचल प्रदेशबद्दलचा अंदाज चुकला असं सांगत होते, त्यावेळी मी असं काही म्हटल्याचा व्हिडिओ दाखवा असं प्रशांत किशोर म्हणू लागले.
व्हिडिओच का, तुमचेच जुने ट्विटस, वर्तमानपत्रात तुमच्याच नावाने छापून आलेली वक्तव्यं का नाहीत चालणार, असा प्रतिप्रश्न करण थापर करत होते. पण आपण जणू हिमाचल प्रदेशबद्दल असं कधी म्हटलंच नव्हतं या आविर्भावात प्रशांत किशोर अस्वस्थ झाले आणि उलट उत्तरं देऊ लागले. त्यामुळे करण थापर यांची आणखी एक मुलाखत गाजली. समोरच्या व्यक्तीला थेट भेदक प्रश्न विचारण्याची त्यांची शैली आहे. याआधी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना करण थापर यांची मुलाखत अर्धवट सोडून उठले होते… दोस्ती बने रहे असं सांगून त्यांनी निरोप घेतला. आता यावेळी प्रशांत किशोर यांनी मुलाखत सोडली नसली तरी एका प्रश्नानं इतकं अस्वस्थ होणं यातून जवळपास तीच मानसिकता दिसत होती.
प्रशांत किशोर यांच्या डझनभर मुलाखती अचानक दिसू लागल्या, त्यापाठीमागचं टायमिंगही लक्षात घ्या. उत्तर भारतात जिथे भाजपला आपली पूर्वीची कामगिरी राखणं हे आव्हान आहे, तिथल्याच मतदानाच्या वेळी ही मालिका सुरू झाली. हरियाणा, झारखंड, दिल्ली, यूपी इथलं मतदान बाकी आहे. या सगळ्याच ठिकाणी विरोधकांची ताकद पूर्वीपेक्षा वाढलेली आहे, भाजप बहुमताच्या खाली येऊ शकते हे नॅरेटिव्ह परवडणारं नाहीय. काठावरचे मतदार जरी हलले तरी भाजपच्या जागांमध्ये मोठं नुकसान होऊ शकतं. नेमकं त्याचवेळी प्रशांत किशोर भाजपच्या मदतीला धावून आल्यासारखे बोलू लागले. ते जे सांगताय त्यात काही तर्कसंगत गोष्टी आहेतच, आपल्याला न आवडणारं सांगतायत म्हणूनही त्यांना संशयानं पाहण्याचा प्रकार नाही. पण एकीकडे सगळी माध्यमं, सगळ्या संस्था ताब्यात असताना, विरोधकांना निवडणूक लढवायलाही बळ नसेल इतकं भंडावून सोडलेलं असताना निवडणुकीत पंतप्रधानांची भाषा बदलत चाललेली आहे. ती भाषा नक्कीच आत्मविश्वासाची नाहीय. अशावेळी भाजप निवडणूक हरूच शकत नाही हे नॅरेटिव्ह कृत्रिमपणे तर करण्याचा प्रयत्न बाह्य घटकांच्या माध्यमातून सुरु नाही ना अशी शंका येते. भाजप स्वबळावर बहुमत गाठू शकलं नाही तर राजकारणाच्या अनेक शक्यता खुल्या होतात. त्यात भाजपमधल्या अंतर्गत सत्तास्पर्धेलाही उधाण येऊ शकतं. आघाड्यांची फेररचनाही होऊ शकते. त्या दृष्टीनंही भाजपचा स्वत:चा आकडा या निवडणुकीत काय असणार याची उत्सुकता आहे.
ब्रँड मोदी घसरणीवर आहे ही गोष्ट तर प्रशांत किशोर पण मान्य करतायत. फक्त यावेळी त्याचा परिणाम निकालात दिसणार नाही असा त्यांचा दावा आहे. मोदींना पुढची टर्म मिळाल्यावर लोकांचा रोष मोठ्या प्रमाणात सार्वजनिक होताना दिसेल, राज्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर अधिक बंधनं येतील. पेट्रोलियम पदार्थांवरच्या जीएसटीबाबत मोठा निर्णय केंद्र सरकार घेईल असंही प्रशांत किशोर म्हणतायत. मुद्द्यांच्या बाबतीत असंच निरीक्षण सीएसडीएस या संस्थेनंही नोंदवलं होतं. बेरोजगारी, महागाई हे दोन मुद्दे या निवडणुकीतले गंभीर प्रश्न आहेत असं मानणार्या लोकांची संख्या देशात एकत्रितपणे ५० टक्क्यांच्या आसपास आहे असं या सर्व्हेत दिसलं होतं. जे प्रश्न जनतेच्या हिताचे आहेत, त्या प्रश्नांवर जर सरकार अपेक्षित कामगिरी करत नसेल, तर मग केवळ काँग्रेसच्या इतिहासातल्या चुका दाखवूनच निवडणूक मोदी जिंकणार आहेत का?
या देशातल्या जनतेचा विवेक मोठा आहे. जनतेचं हे शहाणपण कुणी गृहीत धरु नये, याआधी २००४ला इंडिया शायनिंगची हवा अशीच निघाली होती, आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत बलाढ्य समजल्या जाणार्या इंदिरा गांधींनाही पराभवाची धूळ याच जनतेनं चारलेली होती. त्यामुळे आता देशातली जनता केवळ या समस्यांचे चटके खात शांत बसतेय की खरोखर पुन्हा आपल्या विवेकाचं दर्शन घडवतेय हेच पाहायचं आहे. ४ जून काही फार लांब नाही.