एकनाथ शिंदे
गद्दारांची सेना स्थापून
मी झालो त्यांचा सरदार
खुशीत गाजरे खातो आता
४ जूनला मिळेल मार
मोदी मोदी जप करून
मूळ सेनेवर केले वार
नकली असून असलीपणाचे
नाटक केले सुंदर फार
शिजत होती कारस्थाने
पूर्वीपासून माझ्या मनात
सीएम झालो, सार्थक झाले
अब्रू जरी गेली जनात
—– —– —–
निवडणूक आयोग
कसले लोक नि कसली शाही
आम्ही तर हुकुमाचे बंदे
आम्हालाही ठाऊक आहेत
यांचे भले-बुरे धंदे
आखले होते वेळापत्रक
पीएम मोदींच्या सोयीने
महाराष्ट्रात भरपूर फिरण्या
वेळ दिला आयोगाने
लांबच लांब होत्या रांगा
सावळा गोंधळ सगळीकडे
जाणून बुजून दिरंगाई
तरी पापाचे भरतील घडे
—– —– —–
मोहन भागवत
मी तर ऐकून चाट झालो
असे कसे बोलले नड्डा
त्यांनीच खणला आहे आता
भाजपासाठी मोठा खड्डा
ज्यांच्या जीवावर मोठे झाले
त्यांनाच आता मारतात लाथ
असेच वागत गेले पुढे तर
लवकर होईल त्यांचा घात
इतका अहंकार बरा नव्हे
आरएसएसच तुमची आई
तिला लाथाडून कसे चालेल
भोगाल फळे, पर्याय नाही
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
एकनाथाच्या नादी लागून
आम्हीच विकत घेतले दुखणे
वाटले होते फायदा होईल
आता कळले ते बुजगावणे
सेना फोडून पोसले रावण
त्यांना झालाय भस्म्या रोग
४ जूनला होतील आडवे
तेव्हा कळतील पुढचे भोग
त्यांना झुंजवून बघत बसलो
आम्ही त्यांची खरी गंमत
आता संपवून टाकले त्यांना
पुन्हा उठायची नाही हिंमत
—– —– —–
नरेंद्र मोदी
घाटकोपरचा भीषण अपघात
सोयरसुतक नाही मला
दणक्यात काढली तिथून रॅली
उन्मादाचा कहर केला
नाही वाहिली श्रद्धांजली
तोंडातून ना ब्र काढला
माणुसकीची नाही पर्वा
हा तर माझा जुना जुमला
मृतात्म्यांचे शिव्याशाप
नाही बाधणार कधी मला
निगरगट्ट आहे काळीज
नाही फुटणार पाझर त्याला