संपूर्ण स्टेडियम बेभान होऊन नाचत होते. तरूणतरुणींनी खच्चून भरलेल्या त्या स्टेडियममध्ये एक नशा भरून राहिली होती. मुली तर अक्षरश: बेधुंद होऊन किंचाळत होत्या आणि प्रत्येकीच्या ओठांवर एकच नाव होते… ते म्हणजे सध्याच्या काळातला सुरांचा बेताज बादशहा असलेला ’अथांग’. तीन वर्षांपूर्वीपर्यंत हे नाव कुठेही कोणी ऐकले सुद्धा नव्हते. पण अचानक एक दिवस संगीतकार जावेद खानने त्याला आपल्या ’पैमाना’ चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली आणि अथांगने त्याची अक्षरश: सोने केले. त्याने गायलेल्या ‘आँख का पैमाना छलके’ने लोकांना अक्षरश: वेड लावले. हे गाणे आणि अथांगची लोकप्रियता इतक्या टोकाला पोहोचली की चक्क चित्रपटाच्या निर्मात्याने खास अथांगच्या आवाजात अजून एक गाणे पुन्हा चित्रपटात घुसवले. फक्त त्या गाण्यासाठी पुन्हा लोकांनी चित्रपटगृहात पुन्हा एकदा गर्दी केली. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात खूप काळाने असे काही घडले होते.
अथांग एका रात्रीत जगभरात पोहोचला होता आणि प्रसिद्ध देखील झाला होता. जे मिळवण्यासाठी अनेकांना आयुष्य वेचावे लागते, ते सर्व काही अथांगने अवघ्या एका गाण्यात कमावले आणि आकाशाला गवसणी घातली. चित्रपट, म्युझिक कॉन्सर्ट, समारंभ, जाहिरातींनी अथांगचे आयुष्य व्यापून गेले. तो हात लावेल त्याचे सोने होत होते. प्रत्येक निर्मात्याला, अभिनेत्याला, संगीतकाराला अथांगच आपल्या चित्रपटासाठी हवा होता. एकेकाळी संगीतसृष्टीवर राज्य करणारे अमन, चिरागसारखे गायक आता अथांग गाण्यासाठी मिळणे शक्यच नाही हे लक्षात आल्यावर मग गायनासाठी बोलावले जात होते. त्यांनी गायलेली गाणी हिट झाली, तरी ती अथांगने नाकारलेली म्हणून जास्ती चर्चेत राहायला लागली.
प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या अथांगने आज आपल्या वाढदिवसानिमित्त खास शो आयोजित केला होता. या कार्यक्रमाची संपूर्ण रक्कम शहीद सैनिकांच्या परिवारांना देण्यात येणार होती. अथांगच्या या कृत्याची सर्वच स्तरातून प्रशंसा होत होती. तिकीटविक्रीतून जमा झालेल्या रकमेत स्वत: अथांगने एक कोटीची भर घातलेली होती आणि आज त्याच शो मध्ये ही बेभान तरुणाई अथांगच्या जादुई आवाजावर थिरकत होती. माहौल असा सुरांनी व्यापलेला असतानाच अचानक अथांगला गायनात साथ देत असलेली तरुणी प्रिया खाली कोसळली आणि स्टेजवर अचानक धांदल उडाली. प्रियाला घाईने उचलून आत नेण्यात आले, मात्र तिचा रक्ताने माखलेला पांढरा ड्रेस लोकांच्या नजरेतून सुटला नाही.
अथांगचा शो अर्ध्यातच रद्द करण्यात आला. अथांग पुन्हा शो करेल असे जाहीर करण्यात आले आणि खिन्न मनाने नाराज चाहत्यांनी स्टेडियम रिकामे केले. लोक खिन्न झाले होते तर अथांग स्वत: प्रचंड मानसिक धक्क्याने चक्कर येऊन पडायचा बाकी राहिला होता. त्याने आयुष्यात रक्त पाहिले नव्हते असे नाही, पण शेजारचा माणूस गात असताना, एकदम रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला तर? राहून राहून अथांगला रक्ताळलेली प्रिया डोळ्यासमोर दिसत होती.
’लोकप्रिय गायक अथांगच्या कार्यक्रमादरम्यान गोळीबार, अथांगचा खून करण्याचा प्रयत्न’ अशा बातम्यांनी संपूर्ण मीडिया व्यापला होता. सोशल मीडियावर अथांगसंदर्भात चुकीची बातम्या देखील वेगाने पसरत होत्या. शेवटी खुद्द अथांगला एका व्हिडिओ मेसेजच्या माध्यमातून आपण सुखरूप असल्याचा आणि मानसिक तणावामुळे एकांतात गेल्याचा खुलासा करावा लागला होता. त्यातच एका वर्तमानपत्राने गोळी लागलेली अथांगची सहगायिका प्रिया ही सध्या तुरुंगात असलेल्या माफिया प्रणव सिन्हाची बहीण असल्याची माहिती समोर आणली आणि गोळीबाराच्या चर्चेची दिशाच बदलली. गोळी नक्की कोणाची हत्या करण्यासाठी चालवण्यात आली? अथांग का प्रिया?
– – –
’राज, केस सेन्सिटिव्ह आहे. अथांगच्या काही फॅन्सनी तर चिराग आणि अमन या गायकांना अटक करा अशी हाकाटी सुरू केली आहे. दुसरीकडे प्रणव सिन्हाच्या टोळीतले गुंड शिकारी कुत्र्यासारखे खुन्याचा माग काढत आहेत. वरून पण प्रचंड प्रेशर आहे की केस फक्त एका शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर संपूर्ण देशाची केस बनली आहे. तेव्हा जे काही करशील ते जपून कर माझ्या राजा,’ कमिशनर जडेजा त्यांच्या लाडक्या ऑफिसरला अर्थात राजला समजावत म्हणाले. पोलिस खात्याची शान असलेला हा तरणाबांड इन्स्पेक्टर राज खोसला कमिशनर साहेबांचा आणि इतर अधिकार्यांचा लाडका असला तरी काही राजकारण्यांना मात्र सलणारा काटा होता. ते त्याला कुठेतरी अडकवायची संधी शोधतच होते आणि त्यामुळे कमिशनर साहेबांना विशेष काळजी वाटत होती.
’बाळासाहेब, मला या अथांग आणि प्रियाची संपूर्ण कुंडली हवी आहे. प्रियाच्या जोडीला तिचा भाऊ प्रणवची देखील. विशेषतः दोघांचे संबंध कसे होते? ती गाते हे त्याला खुपत होते का? तिच्या नावावर काय काय प्रॉपर्टी आहे? तिचे कोणा तरुणाबरोबर अफेयर सुरू होते का? किंवा मोडले होते का?’ राजने हुकूम सोडला आणि हवालदार बाळासाहेब माने होकारार्थी मान हालवत तातडीने रवाना झाले.
’भेलके, हे जे प्रतिस्पर्धी गायक आहेत चिराग आणि अमन यांची माहिती कशी काढता येईल?’ राजने अनुभवी हवालदार भेलकेंना विचारले.
’साहेब, माझा मित्र आहे जमसंडे म्हणून. त्या संगीतकार मनू शर्माला अंडरवर्ल्डची धमकी मिळाली होती, तेव्हा त्याला आपण संरक्षण दिले होते. हा जमसंडे जवळपास मागील एक वर्ष मनू शर्मासोबत होता. त्याला या संगीतकारांची, गायकांची सगळी अंडी पिल्ली माहिती आहेत.’
’ग्रेट! त्याला तातडीने मला भेटायला सांगा. आता या क्षणी आता तरी देखील चालेल!’ राज उतावीळपणे म्हणाला. भेलकेंनी खरंच कमाल केली, अवघ्या अर्ध्या तासात जमसंडेला राजसमोर हजर केले.
’जमसंडे, मी तुम्हाला इथे का बोलावले आहे, त्याची भेलकेंनी तुम्हाला कल्पना दिली असेलच. त्यामुळे आता कुठलाही वेळ न घालवता बोलायला सुरुवात करा.’
’काय सांगू साहेब? या संगीतकार, गायक लोकांचे मला जाम कौतुक होते. मी गाण्याचा लै शौकीन; त्यामुळे संगीतकार मनू शर्माकडे ड्यूटी लागली तेव्हा जाम खूश झालो होतो. पण काही काळातच माझ्या लक्षात आले की, सभ्यपणाच्या मुखवट्यामागे वावरणारे हे लांडगे आहेत. हा मनू शर्मा नव्या आलेल्या पोरांचे संगीत चक्क विकत घेतो आणि स्वत:चे म्हणून वापरतो. त्या चिरागला तर दारू ढोसल्याशिवाय गाण्यासाठी उभे राहता येत नाही आणि त्या अमनला रोज नव्या नव्या पोरींबरोबर रात्र घालवल्याशिवाय चैन पडत नाही.’
’या दोघांपैकी कोणी अथांगच्या हत्येचा प्रयत्न करू शकेल?’
’नाही साहेब! त्या दोघांमध्ये येवढा दम नाही आणि कोणाकडून असले काही करून पण घेणार नाहीत. रंग ढंग करणारे असले, तरी गुन्हेगारी मनोवृत्तीचे नाहीत साहेब ते.’
’इंडस्ट्रीमध्ये इतर कोणाचे अथांगशी काही वैर किंवा वाद वगैरे?’
’आता इतक्या कमी वेळेत इतके यश अन पैसा मिळालाय म्हणाल्यावर काही लोकांना पोटदुखी होणारच की साहेब. पण ते किरकोळ लोक आहेत. खुनासारख्या भानगडीचा विचार पण त्यांच्या डोक्यात येणार नाही. हान पण साहेब, एकदा त्या हीरोला, मोहित अरोराला म्हणे अथांगने धमकी दिली होती.’
’धमकी? का म्हणे?’
’त्याने त्या प्रियाची काहीतरी छेड काढली होती.’
’या प्रियाचे अन अथांगचे संबंध?’
’बिनालग्नाचे एकत्र राहतात साहेब ते. अजून कोणाला फारसे माहिती नाही, पण त्यांचे पण आजकाल एकमेकांशी पटत नव्हते म्हणे,’
’तुला कसे कळले?’
’मौसम पिक्चरच्या वेळी दोन्ही गाणी गायला दोघे वेगवेगळ्या गाडीने आले आणि काम झाल्यावर एकमेकांकडे न बघता निघून पण गेले.’
’धन्यवाद जमसंडे. तुम्ही गेलात तरी चालेल आता.’
जमसंडे बाहेर पडले आणि भेलके आत शिरले.
’साहेब, मी माझी माणसे कामावर लावली आहेत. पण मी काय म्हणतो साहेब, आपण तपास करतोय अथांगच्या दृष्टीने पण ही गोळी त्या प्रियासाठीच झाडली गेली असेल तर?’
’भेलके, मी त्या दृष्टीने देखील विचार करतो आहे. ती शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे मी तुरुंगात जाऊन प्रणवची चौकशी करायची परवानगी घेतली आहे. मी आजच नाशिकला रवाना होतो आहे.’
– – –
मुंबई ते नाशिकचा प्रवास तसा लहानसा वाटणारा आहे पण तितकाच कंटाळवाणा देखील आहे असे राजचे ठाम मत होते. त्यात ही केस हातात आल्यापासून सतत फोनची रिंग वाजतच होती. त्यामुळे प्रवासात विश्रांती अशी त्याला मिळालीच नाही. कंटाळवाण्या प्रवासानंतर तुरुंगातले सगळे कागदोपत्री घोडे नाचवून अखेर तो प्रणवसमोर बसला तेव्हा चांगलाच कावलेला होता.
’प्रणव, मी इथे का आलोय तुला चांगले माहिती आहे. तुझ्याकडे रिकामा वेळ बराच आहे पण माझ्याकडे नाही. तेव्हा जेवढे पटापट आणि खरे तू बोलशील तेवढे आपल्या दोघांसाठी चांगले आहे,’ राज प्रणवच्या डोळ्यात डोळे रोखत बोलला. तशीही राजची कीर्ती प्रणव ऐकून होताच. शिवाय त्यालाही बहिणीचा हल्लेखोर हवा होताच.
’साहेब, सगळ्यात आधी म्हणजे या सगळ्यात माझा काही हात नाही. गैरमार्गाने का होईना, मी इतकी संपत्ती कमावली आहे की सात पिढ्या बसून खातील. माझ्या बहिणीला माझे धंदे पसंत नाहीत आणि तिला ते आवडावेत असा माझाही आग्रह नाही. ती तिच्या गाण्याच्या करिअरमध्ये खूश आणि मी माझ्या धंद्यात. आमच्यात कुठलेही वाद नाहीत, पण जवळीक देखील फारशी नाही. रक्ताचे नाते मात्र दोघेही विसरू शकत नाही. दर भाऊबीज आणि राखीला ती येते आणि कोर्या चेहर्याने सोपस्कार पार पाडते. ‘मला भेट म्हणून फक्त कॅश देत जा’ असे तिने मागेच ठणकावले होते, त्यामुळे मी तिला ओवाळणीत कॅशच देतो. ती न मोजता ते पाकीट जाता जाता ’कैवल्य अनाथ आश्रमा’त देऊन जाते. मला त्याचा देखील राग नाही. पण म्हणून कोणी उद्या तिच्या जिवावर उठले तर मी गप्प राहणार कसा?’
’तुझ्या एखाद्या जुन्या वैर्याने घात केला असेल तर?’
’शक्यच नाही! आम्ही गुन्हेगार असलो तरी घरच्यांना कधीच लफड्यात घेत नाही. त्यात मी गेली तीन वर्षे आत आहे. एखाद्याला घात करायचाच असता, तर तीन वर्षे कशाला वाट बघत बसला असता?’ प्रणवने खाडकन प्रश्न टाकला आणि राज विचारात पडला. प्रणव बोलायला स्पष्ट होता आणि त्यामुळे राजला त्याच्यावर चटकन विश्वास देखील बसला होता.
’पण मग अथांगसारख्या सज्जन माणसावर..’ प्रणव खळखळून हसला आणि राज बोलता बोलता एकदम थांबला.
’सज्जन? साहेब, अथांगला सज्जन म्हणायचे तर मग माझ्यासारख्याला देवमाणूस म्हणायला हवे.’
’म्हणजे?’ राजने चमकून विचारले.
’याच जेलमध्ये बराक नंबर ९ला माझा एक पंटर आहे, दिनेश गोस्वामी. तो नुकताच येरवड्यावरून इकडे हलवला गेलाय. त्याला एकदा भेटा,’ कुत्सित हसत प्रणव म्हणाला आणि राजला गुडबाय करत सरळ उठून निघून गेला.
राजला विचार करायला फारसा वेळ मिळालाच नाही. त्याने घाईघाईने कमिशनर साहेबांना फोन फिरवला आणि सगळा किस्सा कानावर घातला. नव्या कैद्याला भेटायला पुन्हा नव्याने सगळे कागदी घोडे नाचवायला आता वेळही नव्हता आणि उत्साह देखील. समोर बसलेला तरूण ’पंटर’ टाइप तरी नक्कीच दिसत नव्हता. नाजूक, काहीसा बायकी आवाजाचा तरूण या तुरुंगात कैदी आहे हेच मनाला पटत नव्हते.
’दिनेश, तुला प्रसिद्ध गायक अथांगबद्दल काय माहिती आहे?’
’जेवढी पेपरमध्ये छापून आली आहे तेवढीच,’ पोरगं बुद्धीने तल्लख दिसत होतं. पण राजकडे आता बुद्धिबळ खेळत बसायला वेळ नव्हता.
’हे बघ, मला प्रणवने तुला भेटायला सांगितले आहे. त्यामुळे मी इतक्या लांबचा प्रवास करून आलो आहे,’ राजने एक लोणकढी फेकून मारली. प्रणवचे नाव सांगताच दिनेशच्या चेहर्यावरचे भाव भराभर बदलले.
’आधीच सांगायचे ना साहेब. काय माहिती हवी तुम्हाला?’
‘अथांग सज्जन नाही असे प्रणव सांगत होता. तो असे का म्हणाला असेल?’
’साहेब, हा अथांग आता आता फेमस झाला. त्याचा भूतकाळ कोणाला माहिती आहे?’
’तो म्हणे ट्रेनच्या डब्यात गाणी गायचा आणि पैसे कमावायचा.’
’साहेब, करोडो लोक ट्रेनने फिरतात. इतक्या चांगल्या आवाजाचा गायक कोणाच्या पण लक्षात नाही राहिला इतक्या वर्षात?’ राजने या दृष्टीने विचारच केला नव्हता. खरंच, आजवर आपण पूर्वी कधीतरी अथांगला गाताना बघितले आहे, असे सांगणारा अजून कोणीच कसा पुढे आला नाही?
साहेब, हा अथांग रोज ट्रेनने फिरायचा, कधीतरी गायचा देखील पण त्याचा धंदा वेगळाच होता.’
’म्हणजे? हा अथांग ड्रग्ज आरपार करायचा. एक स्टेशन ते दुसरे स्टेशन.’
’काय? आणि हे आजवर समोर कसे आले नाही मग? आणि तुला हे कसे कळले?’
’मी येरवडा जेलला असताना माझ्या बराकीत एक शिवराम म्हणून कैदी होता. मी एकदा सहज गाणे गुणगुणले तर त्याने रागाने माझा गळाच पकडला. गायक आणि गाणी याची त्याला प्रचंड चीड होती. एकेकाळी हा अथांगचा जोडीदार होता साहेब. अथांगने त्याची कधी दखल देखील घेतली नाही. शिवराम कायम माझ्यापाशी त्या अथांगला शिव्या द्यायचा. त्याचा मुडदा पाडणारे म्हणायचा. त्याची सुपारी घेणार का विचारायचा, काय निशाणा होता साहेब त्याचा, एकदम शार्पशूटर.’ दिनेशच्या माहितीने राज एकदम थक्कच झाला. त्याने घाईघाईने दिनेशचा निरोप घेतला आणि पुन्हा एकदा कमिशनर साहेबांचा फोन लावला.
– – –
राजची गाडी नाशिकच्या बाहेर पडून पुण्याचा दिशेने निघाली आणि त्याचा फोन वाजला. खुद्द कमिशनर साहेबांचा फोन होता.
’राज, पुण्याकडे न जाता तसाच माघारी फिर.’
’पण का सर? त्या शिवरामला गाठणे अत्यंत आवश्यक आहे.’
’राज, शिवराम आता जेलमध्ये नाही. चांगल्या वर्तणुकीमुळे त्याला सात महिने आधीच सोडले आहे. राज, ज्या दिवशी गोळीबार झाला, त्याच्या आदल्या दिवशीच त्याची सुटका झाली होती…’ कमिशनर साहेब शांतपणे म्हणाले आणि आज दिवसभरात किती धक्के अजून बसणार आहेत या विचारात राज पडला.
पाच तासांच्या प्रवासात राजला दिवसभराच्या घडामोडींवर विचार करायला बराच वेळ मिळाला. जर शिवरामने गोळी झाडली असेल तर तो आता कुठे असेल? तो शहर सोडून पळाला असेल, का पुढच्या संधीसाठी दबा धरून बसला असेल? राजचा मेंदू उलटे सुलटे विचार करत नुसता घोड्याच्या वेगाने धावत होता. गाडी शहराच्या हद्दीत शिरली आणि काहीतरी ठाम निश्चयाने राजने मान हालवली.
’शिंदे, गाडी अथांगच्या बंगल्यावर जाऊ द्या.’
प्रशस्त बाग ओलांडत राजची गाडी आत शिरली आणि अथांगला पुरवण्यात आलेल्या संरक्षणातील एक हवालदार सलाम ठोकत पुढे झाला. त्याच्याकडे मान लववत राज घाईघाईने आत शिरला. हॉलच्या मध्यभागीच अथांग रियाज करत बसला होता.
’गुड ईव्हिनिंग मिस्टर अथांग..’
’या साहेब. असे अचानक येणे केलेत?’
’अथांग, तुझ्यावर गोळीबार झाला त्याच्या बरोबर आदल्या दिवशी शिवराम तुरुंगातून सुटलाय.’ अथांगने खिन्नतेने मान हालवली आणि उसासा सोडला.
’तुला काय वाटते, त्यानेच गोळी झाडली असेल?’
’तुम्हाला शिवराम माहिती आहे म्हणजे माझा भूतकाळ कळला असेलच. आता तर मला खात्री आहे की, माझ्या जिवावर जो उठलाय तो शिवरामच आहे!’ कावरा बावरा होत अथांग म्हणाला.
’पण तुरुंगातून सुटल्याबरोबर ’जॅक्सन पिक्सल’सारख्या महागड्या कंपनीचे पिस्टल मिळवणे, तुझ्या कार्यक्रमाचा पास मिळवणे, योग्य जागा निवडून तुझ्यावर गोळी झाडणे हे सगळे त्याने कसे शक्य केले असेल?’
’तो काहीही करू शकतो साहेब. त्याच्या ओळखी प्रचंड आहेत, जोडलेली माणसे आहेत, प्रचंड काळा पैसा आहे…’
’आणि इतके सगळे असून तो इतक्या सहजी पोलिसांच्या तावडीत सापडला?’ राजने खाडकन प्रश्न टाकला आणि अथांग गांगरला.
’तो तुझ्या जिवावर का उठला आहे अथांग? तू त्याचा विश्वासघात केलास म्हणून ना? तो अडकला नाही, तू त्याला अडकवलेस..’
’मी… मी असे कशाला करू?’
’मग त्याचा तुझ्यावर राग का? तू त्याला एकदाही तुरुंगात भेटायला का गेला नाहीस? इतका पैसा हाताशी आल्यावर त्याला सोडवावे असे तुला का वाटले नाही?’
’कारण ज्या पोझिशनवर मी आता आहे, तिथे शिवरामसारख्यांना जागा नाही साहेब. तुम्ही थोडे समजून घ्या.’
’शिवरामच्य्ाा केसमध्ये एक नाही तर दोन जण ड्रग्जची वाहतूक करणारे होते असा पोलिसांना संशय होता, पण पुराव्याअभावी तो दुसरा माणूस कधी कळला नाही आणि शिवरामने देखील आपले तोंड उघडले नाही. शिवरामला तुझा बदला घ्यायचा होता हे खरे आहे अथांग पण तू त्याला ती संधीच दिली नाहीस. शिवरामचा निशाणा अचूक होता अथांग. गोळी शिवरामने झाडली असती, तर तू वाचणे शक्यच नव्हते. शिवराम तुझ्या जिवावर उठलाय, कदाचित त्यानेच झाडलेली गोळी प्रियाला लागली असेल, असे क्षणभर देखील प्रणवला वाटले नाही तेव्हाच मी काय ते ओळखून गेलो होतो. प्लॅन तर तू मस्त आखला होतास. शिवराम बाहेर येतोय हे कळताच तू सावध झालास. दुसर्याच दिवशी असलेल्या कार्यक्रमाचे निमित्त करून तू कार्यक्रमात गोळीबार करून घेतलास. प्रियाला गोळी लागावी अशी व्यवस्था देखील केलीस. एकदा का प्रणवला हे कळले, की तू हळूच शिवरामची माहिती त्याच्या माणसांपर्यंत पोहोचवणार होतास आणि मग आपसूकच त्यांनी शिवरामचा काटा काढला असता. पण तुझ्या दुर्दैवाने शिवरामबद्दल प्रणवला आधीच सगळे माहीत होते. चला.. आता उरलेला रियाज तुरुंगाच्या भिंतीआड करा..’