मी जेव्हा जेव्हा माझ्या प्रेयसीला फोन करतो, तेव्हा तेव्हा तिचा नवराच फोन उचलतो. मध्ये मध्ये कडमडू नकोस, तिचा फोन तिलाच उचलू दे, असं या अरसिक मूर्खाला कसं सांगू?
– प्रणीत शिंदे, सोनगाव
एक आयडिया करा… तुमच्या बायकोला सांगा त्याच्या बायकोला फोन करायला… तिने फोन घेतला की बोला तिच्याशी… बाकी मग तुमची बायको काय करेल, त्यावर तुम्ही काय करायचं, हे आपण ठरवू. तुम्ही प्रश्न विचारायच्या अवस्थेत राहिलात तर.
मुलं कुतूहलातून शिकतात, असं म्हणतात. मग सतत प्रश्न विचारणार्या मुलांवर आईवडील का डाफरत असतात? त्यांना मुलांना मठ्ठ ठेवायचं आहे काय?
– सायली जवळकर, पन्हाळा
मुलाच्या आई वडिलांना त्यांनी त्यांच्या आई वडिलांना विचारलेले प्रश्न आठवत असावेत…
अनेक कार्यक्रमांमध्ये आता अमुक येतायत, त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करा, असं सूत्रसंचालक सांगतात… अरे, तो त्या योग्यतेचा असेल, तर लोक आपसूक वाजवतील की टाळ्या, हा कशाला लोकांना डायरेक्शन देतो?
– पंडित सावकार, चाळीसगाव
श्रद्धांजलीला ‘कार्यक्रम’ म्हणणारे, पुण्यतिथीला ढोल वाजवणारे लोक आहेत आपल्याकडे… त्यांना डायरेक्शन नाही दिलं तर ते आलेल्या पाहुण्याला पोहोचवतील हे सूत्रसंचालकाला माहित असावं किंवा त्याला टाळ्या वाजवा हेच सांगायचे पैसे मिळत असावेत किंवा त्याला तेवढंच येत असावं किंवा येणारा सुप्रसिद्ध पाहुणा तेवढा प्रसिद्ध नसावा.
न्यूज चॅनेलवर डिबेट कंडक्ट करणारे अँकर लोक पाहुण्यांवर ज्या प्रकारे डाफरून बोलतात, ते पाहिल्यावर यांच्यातला एखादा जाऊन त्यांच्या कानाखाली जाळ का काढत नाही?
– सारंग प्रवीण आठवले, सदाशिव पेठ, पुणे
मग त्यांचे ठरलेले पैसे कोण प्रवीण आठवले देणार का??
झाडाला पैसे लागले असते तर?
– प्रभाकर सुतार, रत्नागिरी
तर अशा प्रश्नांची उत्तरं कशाला दिली असती?
‘एप्रिल फूल बनाया, पर उनको गुस्सा नहीं आया’ असे कसे काय झाले?
– संजय क्षीरसागर, पिंपळे-गुरव
तेवढा आयक्यू नसेल तिचा… किंवा तुम्हाला फाट्यावर मारलं असेल…
राज्यात सत्तेवर कोणीही आले आणि कोणीही गेले तरी सर्वसामान्यांच्या संघर्षात काय फरक पडणार आहे?
– अशोक परब, ठाणे
मी या प्रश्नाचं उत्तर दिल्याने तुम्हाला जो फरक पडणार आहे तोच.
तुम्हाला कधी कोणी एप्रिल फूल बनवले आहे का? आणि तुम्ही कधी कोणाला एप्रिल फूल बनवले आहे का?
– स्वाती रोशन पाटील, शिंदेवाडी
लग्नाआधी बायकोला एप्रिल फूल केलं होतं… लग्नानंतर कळलं की मीच एप्रिल फूल बनलोय!
लोकांना सगळ्यात भारी लग्नसमारंभाचा पुरस्कार मिळत नाही. तरी कर्ज काढून लोक इतक्या थाटामाटात का लग्नं करतात?
– विलास चिपडे, मलकापूर
जे कर्ज काढून लग्न करतील ते ईएमआय भरतील… तुम्हाला कुठे कोणाचं कर्ज फेडायचंय?
एखाद्या सज्जन, सचोटीच्या, कोणतंही गैर काम न करणार्या, लोकल-बस-एसटीने प्रवास करणार्या, लाच न खाणार्या उमेदवाराला कधीच न निवडून देणारे लोक भ्रष्टाचारावर कसे बोलू शकतात?
– सायमन डिसूझा, सांताक्रुज
जसे काहीजण भ्रष्टाचारावर प्रश्न विचारू शकतात, तसेच!
सगळं जग सगळ्या धर्मांपासून मुक्त झालं तर मानवजातीवर काही आभाळ कोसळेल का?
– साहिल बेटावदकर, कल्याण
आभाळ कोसळलं तर वर स्वर्ग नाही हे उघडं पडेल आणि स्वर्ग उघडा पडला तर वर स्वर्ग आहे हे सांगणारे उघर्र्र्डे ेेे पडतील… मग स्वर्गाच्या नावाने धर्म धर्म करणारे खुलेआम अधर्म करतील… पुरोगामी तोंडात मारल्यासारखे गप्प होतील… मी फिलॉसॉफी मांडू शकणार नाही… नाही, नाही… आभाळ कोसळून चालणार नाही… आभाळ ही पोकळी असल्याने ती कोसळू शकत नाही, हे पण सांगू शकत नाही.