जॉर्ज बर्नार्ड शॉच्या ‘पिगमॅलिअन’ नाटकाच्या मोहात पडून, विविध भाषेत अनेक कलाकृती निर्माण झाल्या. पु. ल. देशपांडे यांनी अजरामर केलेलं ‘ती फुलराणी‘ हे नाटक त्यापैकीच एक. पुलंच्या शब्दांत सांगायचं झालं तर, ती फुलराणी म्हणजे, ‘स्वर आणि व्यंजन यांच्या ब्रह्मघोटाळ्यात सापडलेल्या माणसांची कथा!’
पुलंच्या नाटकात उच्चारशास्त्राचा प्रोफेसर अशोक फुलं विकणार्या गावठी मंजुळेला पाहिल्यावर ‘तीन महिने ही मुलगी माझ्या ताब्यात मिळू देत, राजघराण्यातील राजकन्या म्हणून एखाद्या समारंभात फिरवून आणीन’ अशी पैज लावतो आणि मंजुळेच्या भाषाशुद्धीचा मजेदार प्रवास सुरू होतो. ‘फुलराणी’ चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक विश्वास जोशी सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन भाषाशुद्धी हा कथेचा गाभा न ठेवता त्यांनी सौंदर्यस्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कोळीवाड्यातल्या फुलराणीचा आधुनिक प्रवास साकारला आहे.
आर ग्रुमिंग अकॅडमीचे विक्रम राजाध्यक्ष हे नाव सौंदर्यस्पर्धेतील स्पर्धक मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यात अव्वल आहे. गरीबी असो की शेतकरी प्रश्न, सर्वसामान्यांच्या विषयावर परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना, त्या विषयाचा गंध नसलेल्या इंग्रजी माध्यमातील उच्चभ्रू मुली आत्मविश्वासाने उत्तर देतात. याला कारण आहे, या मुलींची तयारी विक्रम यांनी करून घेतली आहे. सलग पाचव्या वर्षी त्यांच्याच अकॅडमीच्या मुलीनं सौंदर्यवती हा किताब जिंकला आहे. अकॅडमीच्या सक्सेस पार्टीत, फुलं विकणार्या शेवंता या अशिक्षित मुलीची गाठ विक्रमशी पडते. ‘मॉर्डन मुलींना शिकवून तर कुणीही स्पर्धा जिंकू शकतं, तू या गावठी शेवंताला पुढील वर्षी ब्युटी क्वीन करून दाखव,’ असं चॅलेंज पत्रकार सौरभ देतो. विक्रम हे चॅलेंज स्वीकारतो. या संभाषणाची क्लिप व्हायरल होते. सौंदर्यस्पर्धेच्या प्रायोजकांना विक्रमच्या चॅलेंजमधे जाहिरातविक्रीची संधी दिसते. ते विक्रमला आर्थिक पाठबळ देतात, मग सुरू होतो फुलवाल्या शेवंताचा फुलराणी बनण्याचा प्रवास. फुलराणी ब्युटी कॉन्टेस्ट जिंकते का, या आणि कथानकातल्या इतर प्रश्नांची उत्तरे हा चित्रपट पाहिल्यावर मिळतील.
मूळ नाटक लिहिलं गेलं तो शंभर वर्षांपूर्वीचा काळ आणि आजच्या काळ यांत नक्कीच फरक आहे. त्यामुळे, लेखक विश्वास जोशी आणि गुरू ठाकूर यांनी या सिनेमाची कथा सौंदर्यस्पर्धेच्या पार्श्वभूमीवर गुंफली असावी. हा चित्रपट पडद्यावर अधिकाधिक आकर्षक कसा दिसेल याची काळजी दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी घेतली आहे. मराठी सिनेमात अभावाने दिसणार्या टू पीस बिकिनी परिधान केलेल्या किंवा की रॅम्पवर उंच टाचांचे हिल्स घालून चालणार्या मॉडेल्स हौशी न दिसता प्रोफेशनल वाटतात. शेवंताच्या कोळीवाड्यातील गरिबी आणि झगमगत्या दुनियेची श्रीमंती हे दोन्ही फरक पडद्यावर उठून दिसतात. शेवंताचं इतर श्रीमंत मुलींनी रॅगिंग करणं, या प्रसंगातून शेवंता अजून कणखर होणे, विक्रम आणि शेवंताचं प्रेम खुलत जाणे या गोष्टी आपल्याला गुंतवून ठेवतात. तुंबलेल्या पाण्यात विटांवरून चालण्याची सवय, पाणी भरून आणताना डोक्यावर हंडा कळशी ठेवण्याची सवय, शेवंताला रॅम्पवर चालायला उपयोगी पडते, असे प्रसंग कोणतीही मेहनत कधी वाया जात नाही याची आठवण करून देतात. फार धक्के न देता अपेक्षित वाटेवरून जाणार्या सिनेमात घटनांचा वेग खूप महत्त्वाचा असतो. या सिनेमात तो काही ठिकाणी मंदावतो. सिनेमातील ‘ब्युटीफुल राणी’ हे शीर्षक गीत उत्तम जमलं आहे.
नावाप्रमाणेच हा चित्रपट फुलराणी म्हणजे प्रियदर्शनी इंदलकरचा आहे. आगरी कोळी भाषेत बोलणारी ठसकेबाज, अल्लड, निरागस शेवंता तांडेल ही भूमिका प्रियदर्शनीने उत्तम साकारली आहे. कोळीवाड्यातील अशिक्षित मुलगी ते आत्मविश्वासाने रॅम्प वॉक करू शकणारी मॉडेल हा कायापालट तिने छान साकारला आहे. ‘झगामगा आणि मला बघा’ असं म्हणणारी शेवंता चित्रपटात लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली आहे. सुबोध भावे यांनी विक्रमचा विक्षिप्तपणा, जिंकण्याची जिद्द आणि फुलराणीला ग्रुमिंग करताना होत जाणारे बदल उत्तम रीतीने दाखवले आहेत. पण काही महत्वाच्या प्रसंगात त्यांच्या केसांचा कृत्रिम विग अकारण लक्ष वेधून घेतो आणि रसभंग करतो.
‘ती फुलराणी’ नाटकात फुलराणीचे वडील साकारणारे मिलिंद शिंदे इथेही तीच भूमिका करताना दिसतात. दारूसाठी लाचार, पण मुलीवर प्रेम करणारा हनुमंतराव तांडेल, मिलिंद शिंदे यांनी ‘झोका’त साकारला आहे. दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांची शेवटची भूमिका या सिनेमात आहे. विक्रमच्या वडिलांच्या भूमिकेत त्यांना पाहून ते आपल्यात अजूनही आहेत असं वाटत राहतं. सुशांत शेलार यांनी डिजिटल युगातील पत्रकार साकारताना, ‘ब्रेकिंग न्यूज पहिल्यांदा फक्त आमच्या चॅनलवर पाहा’ असे डायलॉग म्हणत उतावीळ माध्यमांना मिश्किल चिमटे काढले आहेत.
तुमच्यात टॅलेंट असेल तर तुम्ही कोणती भाषा बोलता, कुठे राहता याने तुमच्या प्रगतीत अडथळा येत नाही, हा संदेश देण्यात हा चित्रपट यशस्वी होतो. कलाकारांचा उत्तम अभिनय आणि चांगले मनोरंजनमूल्य यासाठी हा चित्रपट पाहायला हवा.