‘जैतर’ ही एका विद्यार्थीदशेतील प्रेमी युगुलाची, मालेगावातील एका सत्यघटनेवर आधारित गोष्ट आहे. जाती, वर्ण, आर्थिक स्तर आदी गोष्टींवरून समाजात भेदाभेद होतो. त्याचे पडसाद अनेकदा प्रेमप्रकरणात किंवा लग्नादरम्यान उमटतात आणि प्रेमी युगुलाला संघर्षाला तोंड द्यावे लागते. ग्रामीण भागात ह्या संघर्षाचे गंभीर परिणाम अनेक अंगाने मुलीला भोगावे लागतात. प्रामुख्याने तिच्या शिक्षणावर आणि एकूणच स्वातंत्र्यावर बंदी येते. चित्रपटाचे कथालेखक आणि निर्माते मोहन घोंगडे हे मूळ शेती व्यावसायिक आहेत. मालेगावातील ‘त्या’ सत्यघटनेत त्यांना याहून गंभीर समस्या दिसली आणि तिला वाचा फोडण्यासाठी त्यांनी जैतर ही कथा लिहिली व ती समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सिनेमा हे माध्यम निवडले.
या चित्रपटाचा संगीत व ट्रेलर प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. ह्या प्रसंगी सिनेमातील प्रमुख कलावंत रजत गवळी, सायली पाटील, गणेश सरकटे, गीतकार विष्णू थोरे, संगीतकार योगेश खंदारे आणि निर्माता मोहन घोंगडे व इतर तंत्रज्ञ उपस्थित होते. मंगेश कांगणे, विष्णू थोरे आणि योगेश खंदारे यांची योगेश खंदारे यांनी संगीतबद्ध केलेली गाणी हे या चित्रपटाचे बलस्थान आहे. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजातील ‘देव मल्हारी’ अवधूत गुप्ते यांनी गायलेले ‘आधाराचं आभाळं’ आणि हर्षवर्धन वावरे-कस्तुरी वावरे ह्या गायक दांपत्याने गायलेलं ‘गुलाबी जहर’ हे प्रेमगीत ही गीते मनाचा ठाव घेणारी आहेत.
पटकथा-संवाद आणि दिग्दर्शन घन:श्याम पवार यांचे आहे. कथानकाची गरज ओळखून चित्रीकरण खान्देशात करण्यात आले आहे, त्यामुळे चित्रपटाला खानदेशी स्पर्श लाभला आहे. चित्रपटात रजत गवळी आणि सायली पाटील यांच्याबरोबर गणेश सरकटे, गायत्री सोहम, अविनाश पोळ, रामेश्वर डापसे, अरुण गीते, स्मिता प्रभू, जीवन महीरे तसेच संग्राम साळवी आदी कलाकार आहेत.