अँड टीव्हीवरील मालिका ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेनं नुकतेच दोन हजार भाग पूर्ण केले आहेत. प्रेक्षकांच्या मनात जागा तयार केलेल्या या मालिकेचे नाव आणि संकल्पना अॅडल्ट कॉमेडीच्या पद्धतीची असली तरी या मालिकेने एका मर्यादेत राहून कमरेखालचे विनोद टाळले आहेत. यामुळे सर्व वयोगटातील प्रेक्षकवर्ग त्यांना मिळाला आहे हे विशेष. २ मार्च २०१५पासून सुरु झालेल्या या मालिकेचा प्रेक्षकांना अजून कंटाळा कसा आला नाही, यावर बोलताना मनमोहन तिवारी ही भूमिका साकारणारे रोहिताश गौड म्हणाले, याचं संपूर्ण श्रेय लेखकांना जातं. ते दर पाच भागांनंतर एक नवीन गोष्ट लिहितात जी प्रेक्षकांना खिळवून ठेवते. मी वीस वर्षे सिनेमात क्षेत्रात काम करतोय, पण या मालिकेने मला लोकांचे प्रेम आणि व्यावसायिक यश मिळवून दिलं. ‘सही पकडे हैं’ या पालुपदाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अंगुरी भाभी उर्फ शुभांगी अत्रे म्हणाल्या, टेलिव्हिजनवर फक्त सास-बहू पद्धतीच्या मेलोड्रमॅटिक मालिकाच चालतात हा समज या मालिकेने खोडून काढला. लग्न झालेल्या पुरुषाला दुसर्याची बायको जास्त देखणी दिसते, या संकल्पनेवर विनोदी अंगाने भाष्य करणारी ही मालिका आहे. माझी व्यक्तिरेखा नवरा हेच जग असणार्या गृहिणीची आहे. माझ्या आईला मी गाणी म्हणत जेवण बनवताना, घरातील काम करताना पहिलं आहे. तिला डोळ्यासमोर ठेवून मी ही भूमिका करते.’ ‘गुनिया के खेत’, ‘का चिराग बो रहे हो’ असे हिंदी भाषेतील शब्दप्रयोग या मालिकेच्या निमित्ताने चलनात आले आहेत.
चित्रपट कारकीर्द बहरली नाही तरी ‘बिन तेरे सनम’ या हिंदी गाण्यातून आजही आठवणीत असणारे आसिफ शेख हे अभिनेते या मालिकेत विभूती नारायण मिश्राची भूमिका साकारतात. ते म्हणाले ‘२००० एपिसोड्स आणि आठ वर्षे हा आम्हा सर्वांसाठी मोठा मैलाचा दगड आहे. आम्ही अथक मेहनत घेतली आहे आणि पुढे देखील घेत राहू. मी पन्नाशीमध्ये देखील ३० वर्षांच्या विभूतीची भूमिका साकारत असल्यामुळे स्वत:ला धन्य मानतो.’
अनिता भाभीची ग्लॅमरस भूमिका साकारणार्या विदिशा श्रीवास्तव म्हणाल्या, ‘मी गेल्याच वर्षी ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेमध्ये सामील झाले, पण असे वाटते की मी सुरूवातीपासूनच मालिकेशी संलग्न आहे. माझं स्वावलंबी, करारी व्यक्तिमत्त्व या भूमिकेशी साधर्म्य राखणारे आहे. त्यामुळे आधीच्या अभिनेत्रीने छाप सोडलेल्या या भूमिकेत प्रवेश करणं माझ्यासाठी खूप सोपं गेलं.
– – –
खान्देशातील सत्यघटनेवर आधारलेला ‘जैतर’
‘जैतर’ ही एका विद्यार्थीदशेतील प्रेमी युगुलाची, मालेगावातील एका सत्यघटनेवर आधारित गोष्ट आहे. जाती, वर्ण, आर्थिक स्तर आदी गोष्टींवरून समाजात भेदाभेद होतो. त्याचे पडसाद अनेकदा प्रेमप्रकरणात किंवा लग्नादरम्यान उमटतात आणि प्रेमी युगुलाला संघर्षाला तोंड द्यावे लागते. ग्रामीण भागात ह्या संघर्षाचे गंभीर परिणाम अनेक अंगाने मुलीला भोगावे लागतात. प्रामुख्याने तिच्या शिक्षणावर आणि एकूणच स्वातंत्र्यावर बंदी येते. चित्रपटाचे कथालेखक आणि निर्माते मोहन घोंगडे हे मूळ शेती व्यावसायिक आहेत. मालेगावातील ‘त्या’ सत्यघटनेत त्यांना याहून गंभीर समस्या दिसली आणि तिला वाचा फोडण्यासाठी त्यांनी जैतर ही कथा लिहिली व ती समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सिनेमा हे माध्यम निवडले.
या चित्रपटाचा संगीत व ट्रेलर प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. ह्या प्रसंगी सिनेमातील प्रमुख कलावंत रजत गवळी, सायली पाटील, गणेश सरकटे, गीतकार विष्णू थोरे, संगीतकार योगेश खंदारे आणि निर्माता मोहन घोंगडे व इतर तंत्रज्ञ उपस्थित होते.
मंगेश कांगणे, विष्णू थोरे आणि योगेश खंदारे यांची योगेश खंदारे यांनी संगीतबद्ध केलेली गाणी हे या चित्रपटाचे बलस्थान आहे. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजातील ‘देव मल्हारी’ अवधूत गुप्ते यांनी गायलेले ‘आधाराचं आभाळं’ आणि हर्षवर्धन वावरे-कस्तुरी वावरे ह्या गायक दांपत्याने गायलेलं ‘गुलाबी जहर’ हे प्रेमगीत ही गीते मनाचा ठाव घेणारी आहेत.
पटकथा-संवाद आणि दिग्दर्शन घन:श्याम पवार यांचे आहे. कथानकाची गरज ओळखून चित्रीकरण खान्देशात करण्यात आले आहे, त्यामुळे चित्रपटाला खानदेशी स्पर्श लाभला आहे. चित्रपटात रजत गवळी आणि सायली पाटील यांच्याबरोबर गणेश सरकटे, गायत्री सोहम, अविनाश पोळ, रामेश्वर डापसे, अरुण गीते, स्मिता प्रभू, जीवन महीरे तसेच संग्राम साळवी आदी कलाकार आहेत.