साहित्य संमेलनात महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून तीन हजारावर मराठी लोक आले होते. या सोहळ्यात धर्म आणि जात शोधणारे काही किडेही अवतरले. मराठीचे तख्त राखण्याचे पोवाडे गाताना जाती-धर्मांच्या भिंती अशाच राहणार असतील तर संजय नहारांनी राष्ट्रीय एकात्मतेची कोणतीही सरहद पार केली तरी ती निरर्थक ठरणार आहे.
– – –
९८वे अखिल भारतीय मराठीत साहित्य संमेलन अखेर पार पडले. ‘सरहद’ या आयोजक संस्थेने झोकून देत दिल्लीतील हा महासोहळा यशस्वी करून दाखवला. तीन हजारांवर मराठी भाषिक एकत्र आणणे हे साधे काम नव्हते. ‘सरहद’चे संजय नहार घेतलेली जबाबदारी अत्यंत चोख पार पाडतात ते पुन्हा एकदा सिद्ध झाले. पत्रिकेत ठरलेल्या विषयांवर सर्वच कार्यक्रम व्यवस्थित झाल्याचे श्रेय सरहदच्या वाट्याला जाईल, परंतु या संमेलनात साहित्य कमी आणि राजकारण अधिक असल्याचा ठपका पुसता येणार नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्यांमध्येच एकमेकांबाबत आकस असणे आणि मिरवणे यापलीकडे दुसरे काहीही दिसून आले नाही. महामंडळाला हे साहित्य संमेलन साहित्यिकांचे करता आले असते. मराठीतील दिग्गज ज्येष्ठ, श्रेष्ठ साहित्यिकांना ऐकण्याची संधी मराठी रसिकांना देता आली असती. त्यांच्या भावना समजून घेता आल्या असत्या. नवे वेध घेता आले असते. मराठी समृद्ध होण्यासाठी दिल्लीतील ‘तख्त’ राखण्यासाठीचे नियोजन होऊ शकले असते. तसे न होता बहुतांश वृत्तपत्रातील आजी-माजी संपादकांना साहित्यिक म्हणून रसिकांच्या उरावर बसवण्यात आले. राजकारण्यांनी केलेले उद्घाटन आणि समारोप आत्मकेंद्री ठरला.
संमेलनाच्या अध्यक्षा लोकसाहित्य आणि संस्कृतीच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी मात्र या सगळ्यात सगळ्यांना जागा दाखवली. त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजैविकता काढली. सरकारच संपूर्ण यंत्रणेला कसे नासवत आहे याबाबतची चिरफाड केली आणि संमेलन साहित्यिकांचे असावे असेही बजावले. अभिजात म्हणजे लोकसंस्कृतीचा अनादर करणे नव्हे, हेही ठणकावून सांगितले. अलीकडे फोफावलेल्या बुवाबाबांनी शरणागत व्हा म्हटलं तर त्यांना फाट्यावर हाणत या शरणागतीला ज्ञानाने विरोध करीत माणसाने निर्भय व्हावे, हा मोलाचा संदेश त्यांनी दिला आहे.
कुलगुरूंनी नेमके काय करायचे त्याचे आदेश सरकारी स्तरावरून येतात. कोणाच्या नावाने कोणता दिवस साजरा करायचा याबाबतच्या सूचना कुलगुरूंना दिल्या जातात. विद्यापीठांना स्वत:चा निर्णय घेता येत नाही, ही शोकांतिका असल्याच्या भावना भवाळकरांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केल्यात. त्यांच्या भाषणाचा काहीसा रोख सरकारकडून लादण्यात येत असलेल्या अनिष्ट धोरणांवर होता. एकूणच तीनही दिवस तारा भवाळकरांच्या विचारांनीच या संमेलनात जिवंतपणा होता. यापुढेही त्यांच्या भाषणाची, पुरोगामित्वाची चर्चा होतच राहणार आहे. या साहित्य संमेलनाने काय दिले तर ताराबाईंच्या निमित्ताने अवघ्या मराठीजनांना ऊर्जा दिली आहे. त्यांनी दिलेला विचार आचरणात आणला तर सुडाचे राजकारण, द्वेष-मत्सर यांतून सुटता येईल. विज्ञानवादी समाज घडवता येईल. महिलांना गुणात्मकतेने दालने उघडली जातील. शिव्यांची जागा ओव्यांनी घेण्याचा प्रचंड आत्मविश्वास ताराबाईंनी दिला. ही या संमेलनाची उपलब्धी ठरली.
या संमेलनाची पत्रिका पाहिली तरी हे संमेलन महाराष्ट्र सरकारचे, राजकारण्यांचे की पत्रकारांचे हा संभ्रम दिसून येत होता. यावर साहित्यिकांकडून मोठ्या प्रमाणात टीका झाली. राजकारण्यांनी साहित्य संमेलनाला जरूर यावे परंतु रसिक म्हणून. साहित्यिकांची जागा व्यापणाचा प्रयत्न करू नये असे तारा भवाळकरांनी संमेलनाआधीच बजावले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनाला येणार म्हटल्यावर राज्य सरकारला महाराष्ट्रधर्माचे पालन करावे लागणे स्वाभाविक होते. आयोजक संजय नहार हे कौशल्याने साहित्य संमेलनाचा बाज कायम ठेवू शकले. सरहद संस्थेचे शंभराहून अधिक प्रतिनिधी पंधरा दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. दिल्लीतील लोकांचा नहारांना दांडगा अनुभव आहे. इथल्या लोकांना हस्तिनापूरची बाधा झाली दिसते. कार्यक्रमात अतिमहत्त्वाच्या लोकांपुढे मिरवण्यापुरते हे लोक दिसतात. या संमेलनासाठी माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी स्थापन केलेल्या ‘पुढचे पाऊल’ या संस्थेचा मोठा उपयोग होईल असे वाटत होते. मुळे स्वत: आयोजन समितीत होते परंतु त्यांचे पुढचे पाऊल केव्हा मागे पडले कळलेच नाही. त्यांचे काही सहकारी पत्रिकेपुरते मर्यादित ठरले. तर काहींना परिसंवादात मिरवायला मिळाले एवढेच काय योगदान. दिल्ली मराठी प्रतिष्ठानने सुद्धा सुरुवातीला उत्साह दाखवला. या प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी इंडिया गेट, कॅनॉट प्लेस इथे दिवाळी पहाटचा कार्यक्रम जोरात होतो. संमेलनातही सहभाग नोंदवण्याचा प्रतिष्ठानने विश्वास दिला होता. त्यानुसार काही लोक पत्रिकेत विराजमान झाले. परंतु प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. स्वाभाविकच संपूर्ण संमेलनात श्रमाची कामे सरहदच्या कार्यकर्त्यांना करावी लागली. दिल्लीत राहणारे मराठीजन खर्या अर्थाने दिल्लीकर झाल्याचा अनुभव नहार यांना आला. परंतु हे संपूर्ण संमेलन नहार यांनी सुपरडुपर हिट करून दाखवले. यासाठी त्यांच्याबरोबरच डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर, युवराज शहा, लेशपाल जवळगे, अनुज नहार यासह अनेकांची नोंद घ्यावी लागणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी मराठीचा गौरव केला. परंतु त्यांचे भाषण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाने लिहून दिले असल्याचे स्पष्टपणे जाणवते. ते नागपुरातील व्यक्तीने लिहून दिलेले असावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून ते थेट संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली आणि हा वटवृक्ष कसा डौलदार झाला याची महती त्यांना आवर्जून गावीशी वाटली. संघामुळेच मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील परंपरांना जुळण्याचे भाग्य लाभले हेही त्यांनी सांगितले. मराठीतील शूरता, वीरता, सौंदर्य, संवेदना, भक्ती, शक्ती, मुक्ती त्यांनी अधोरेखित केली. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामापासून त्यांनी विदर्भातील तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांचाही नामोल्लेख केला. यानिमित्ताने बहिणाबाईंची आठवण काढली. वि. दा. सावरकरांचे साहित्य मराठी भाषेला समृद्ध करते हेही सांगितले. १२ कोटी लोक मराठी भाषिक असल्याचा आकडा त्यांनी जाहीर केला. राजकारणासाठी हा आकडा खूप महत्त्वाचा ठरतो. अमृताहुनी गोड असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
मग मराठी अभिजात कशी?
मात्र, हे सांगताना मराठी भाषेचा जन्म संस्कृतमधून झाल्याचा शोधही मोदी यांनी लावला. मोदी ज्या विचारधारेचे आहेत किंवा ज्यांनी भाषण लिहून दिले त्यांना संस्कृत अधिक महत्त्वाची वाटते. म्हणून सातत्याने हे लोक हा भ्रम रुजवण्याचा प्रयत्न करतात. मुळात केंद्र सरकारचे एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी काही निकष आहेत. त्यात भाषा स्वतंत्र असणे, त्यात मौलिक साहित्य असणे, भाषेचे वय किमान दोन हजार वर्ष असणे, भाषेचे सलग प्रवाही अस्तित्व असणे, हे सारे निकष तपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर त्याच सरकारचे प्रमुख ‘मराठी संस्कृतोद्भव असून ती भाषा स्वतंत्र नाही’ असे सांगतात, हा केवढा विरोधाभास. आद्य रामकथा सांगणारे महाकाव्य वाल्मिकी रामायण नसून माहाराष्ट्री प्राकृतातील विमल सूरी लिखित ‘पउमचरीय’ हे जैन दृष्टिकोनातील महाकाव्य हे आदी-रामकाव्य आहे. इसवी सन ४मध्ये ते प्रसिद्ध झाले असे पुराव्यांनिशी सिद्ध झालेले आहे. म्हणजे आजच्या मराठीची पूर्वज असलेल्या माहाराष्ट्री प्राकृतात रामकाव्य स वात आधी सिद्ध झाले होते. असे अनेक पुरावे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यास पुरेसे आहे. लिखित पुराव्यांनुसार मराठी भाषेचा इतिहास किमान २२०० वर्ष जुना असल्याचे दिसते. प्राचीन माहाराष्ट्री प्राकृताचीच विकसित होत आलेली अवस्था म्हणजे आजची आपण बोलतो-लिहितो ती मराठी. वररुचीने या माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण इसपू २००च्या आसपासच लिहिले होते, याचा अर्थ त्याआधीही अनेक शतके ही भाषा बोलीभाषा म्हणून प्रचलित होती. इसपू पहिल्या शतकातील नाणेघाट, पाले आणि लोहगड येथील शिलालेख या प्राचीन मराठीचे लिखित रूप दर्शवतात. महाराष्ट्रात जैन धर्म किती प्राचीन काळातच पोहोचला होता याचेही पाले व लोहगड येथील शिलालेख निदर्शक आहेत. इसपू २२० ते इस २३० या साडेचारशे वर्षांच्या सातवाहन काळातील बौद्ध व जैन विहारांतील असंख्य महाराष्ट्री प्राकृतमधील शिलालेख आज उपलब्ध आहेत. तसे संस्कृतचे नाही. मराठी भाषेतील स्वतंत्र साहित्य, काव्य आणि महाकाव्यांचा इतिहासही पुरातन आहे. हाल सातवाहन राजाने इसवी सनाच्या पहिल्या शतकात संकलित केलेल्या ७०० गाथांचा समावेश असलेले गाथा सप्तशती तर आज काव्यरसिकांना चांगलेच माहित आहे. याच काळातील अंगविज्जा हा तत्कालीन समाजजीवन व संस्कृतीचे दर्शन घडवणारा माहाराष्ट्री प्राकृतातील ग्रंथ गद्यात लिहिलेला आद्य ग्रंथ आहे. मराठी अतिप्राचीन भाषा असून ती संस्कृतातून निघालेली भाषा नव्हे हे जे. ब्लॉख, रिचर्ड पिशेल, हरगोविंद सेठ ते आजच्या पिढीचे संशोधक संजय सोनवणी यांनी स-प्रमाण दाखवून दिले आहे. संकरित संस्कृतातील एकमेव मिळणारा प्राचीन पुरावा म्हणजे इसवी सन १६०चा राजा रुद्रदामनचा शिलालेख. त्याआधी संस्कृत भाषेचे अस्तित्व दाखवणारा एकही शिलालेखीय अथवा नाणकीय पुरावा उपलब्ध नाही. संत एकनाथांनी रोकडा सवाल केला होता की संस्कृत देवांपासून झाली मग काय मराठी चोरांपासून झाली? असे सगळे असतानाही मोदींच्या भाषणातून मराठीची जननी संस्कृत असे सांगण्याची गरज का पडली असेल, ते उघड आहे.
मोदींना मराठी भाषेबद्दल इतकेच प्रेम होते तर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून एवढे प्रयत्न केल्यानंतर मोदी २०१४मध्येच दर्जा देऊ शकले असते. त्यासाठी तब्बल दहा वर्ष का थांबावे लागले? त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान आणि केंद्र सरकारशी वारंवार पत्रव्यवहार केला. ही सगळी पत्रे केराच्या टोपलीत टाकण्यात आली. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेसाठी पूर्ण बहुमत मिळू शकले नाही. आणि त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे चित्रही तसेच दिसत होते. तेव्हा निवडणुकीच्या आधी म्हणजे ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मोदी यांच्या कॅबिनेटने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे मंजूर केले. निवडणुकीत पुढे तसा प्रचारही झाला. मराठीचे वैभव किती मोठे असेल याचे सत्ताधार्यांकडून लोभस चित्र रंगवण्यात आले. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. मराठीला भाषेचा दर्जा देणे हा भाजपचा केवळ निवडणुकीपुरता स्टंट होता. ३ ऑक्टोबरच्या कॅबिनेटनंतर अधिसूचना निघायला तब्बल तीन महिने लागले. ही अधिसूचना निघण्यासाठी मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीचे प्रमुख डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आणि अनेक साहित्यिकांना पाठपुरावा करावा लागला. साहित्यिकांनी ओरड केल्यानंतर मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिल्लीत तळ ठोकला. तेव्हा जुन्या तारखेची म्हणजे ४ ऑक्टोबर २०२४ या रोजीची अधिसूचना काढली.
निवडणुकांपुरता स्टंट?
आजपर्यंत मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याचे शासन पत्र का निघाले नाही? यासाठीही केंद्रीय भाषा मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालयाकडे महाराष्ट्रातून पाठपुरावा होतो आहे. परंतु एकाही पत्राचे उत्तर दिले जात नाही. माहितीच्या अधिकारातून विचारलेल्या प्रश्नात संभ्रमित करणारे उत्तर दिले जाते. खरंतर उद्घाटनाच्या भाषणात मोदींनी आता महाराष्ट्राला काय काय देणार आहे हे सांगणे अपेक्षित होते. केंद्र सरकारने ५०० कोटी रुपये महाराष्ट्राला मराठी भाषेसाठी दर वर्षी देणे अपेक्षित आहे. देशभरातील विद्यापीठांमध्ये मराठी शिकवले जाईल याचे आदेश काढायचे आहेत. तितक्या प्राध्यापकांना नियुक्त करायचे आहे. परंतु मोदींनी यातील काहीही केलेले नाही. अभिजात भाषेचा दर्जा हा केवळ मतांवर डोळा ठेवून देण्यात आलेला आहे. या आधीच्या ज्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यांना केंद्र सरकारकडून नियमित निधी मिळत नाही ही शोकांतिका आहे.
पवारांची सोयीची भूमिका…
संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे मोदी संमेलनाच्या उदघाटन सोहळ्याला आले यात जराही दुमत नाही. १९५४मध्ये दिल्लीत झालेल्या संमेलनाला तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आले होते. नेहरूगंडग्रस्त मोदींनी त्यामुळेच ही संधी सोडली नसती. पवारांना महाराष्ट्र जाणता नेता म्हणतो, याकडे डॉ. तारा भवाळकर यांनीही लक्ष वेधले. परंतु मोदी कार्यक्रमाला आल्याने पवार इतके भारावले की त्यांच्या छापील भाषणातील मोदींना अडचणीचा ठरेल किंवा ते दुखावले जातील असा भाग त्यांनी वगळला. ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे हे ‘सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य’ या परिसंवादाचे अध्यक्ष होते. त्यांनी तर पवार कसे सोयीचे राजकारण करतात हे सांगून पवारांनी वगळलेला भागच वाचून दाखवला.
‘भोवताली वणवा पेटला असताना आत्ममग्न राहणार्यांना काळ माफ करणार नाही,’ पवारांचे हे वाक्य म्हणजे अतिथी असलेल्या मोदींना शालजोडीतून हाणण्याचा प्रकार ठरला असता. ते त्यांनी केले नाही. महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येऊ नका हे पवारांना मोदींना बजावून सांगता आले असते. महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळविले जातात त्याबद्दल जाब विचारता आला असता. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आदेश का काढला नाही, हा सवालही त्यांना करता आला असता. परंतु तसे काहीही झाले नाही. आपल्या एका शब्दावर मोदी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आलेत या हर्षातून ते बाहेर पडले नाहीत.
असे (बि)घडलो आम्ही…
समारोपाच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात ‘असे घडलो आम्ही’ या विषयावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांची मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत राजीव खांडेकर आणि प्रवीण बर्दापूरकर या ज्येष्ठ पत्रकारांनी घेतली. पृथ्वीराज चव्हाण आणि सुरेश प्रभू यांच्या मुलाखती सुरेख झाल्या. परंतु साहित्य संमेलनाच्या या व्यासपीठाला राजकीय व्यासपीठ समजत नीलम गोर्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केल्यावरून शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी साहित्य महामंडळाला पत्र पाठवीत तुम्ही या मताशी सहमत असाल तर आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा जाहीर माफी मागावी असे पत्रच लिहून टाकले. ज्या गोर्हे बाईंना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजींनी विविध पदे दिली, त्या त्यांच्यावरच त्या गरळ ओकतात हे अनेकांना आवडले नाही. दुसरीकडे सुरेश प्रभू यांनी मात्र बाळासाहेब ठाकरेंबाबत अनेकदा कृतज्ञता व्यक्त केली. आपण काहीही नसताना मला बाळासाहेबांनी खासदार केले आणि मंत्रीही केले. त्यांनी जेव्हा राजीनामा देण्यास सांगितले तेव्हा आपण तो निमूटपणे अटलजींकडे सोपवला, असे सांगून प्रभू म्हणाले, मी बाळासाहेबांना मला खासदार किंवा मंत्री का करता हे विचारले नाही, त्याप्रमाणेच मला मंत्रीपदावरून का काढता हेही विचारले नाही. माझ्या आयुष्यात त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मी आज भाजपमध्ये असलो तरीही त्यांचं प्रेम, त्यांनी मला दिलेली संधी या गोष्टी मी कधीही विसरू शकत नाही.
राबायला मागे, मिरवायला पुढे…
या साहित्य संमेलनाचे उद्घाटन विज्ञान भवनात होते. पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर बसता यावे यासाठीचे मराठी साहित्य महामंडळातील पदाधिकार्यांचे रुसवे फुगवे दिसून येत होते. सरहदचे संजय नहार व्यासपीठावर होते. तर पंतप्रधान मोदी, संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्याव्यतिरिक्त साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्वला मेहंदळे यांच्याशिवाय कोषाध्यक्ष प्रकाश पागे व्यासपीठावर होते. प्रारंभी पागे यांच्याऐवजी उपाध्यक्ष गुरय्या स्वामी हे व्यासपीठावर बसणार होते. त्यांचे नावही लिहिले होते. परंतु पदाधिकार्यांचे आपसात मतभेद झाले. शेवटी गुरुय्या स्वामी यांच्या नावाचा फलक काढून त्यांना प्रेक्षकांत बसवण्यात आले आणि पागेंच्या नावाची पाटी व्यासपीठावर लागली. समारोपाच्या वेळेस तर महामंडळातील सदस्यांची अख्खी फौजच व्यासपीठावर होती. यांचे कर्तृत्व काय, तर ते महामंडळाचे पदाधिकारी आहेत एवढेच. संमेलन यशस्वी होण्यासाठी यांचे योगदान कोणते हाही प्रश्न विचारायला हवा. राबायचे आयोजकाने आणि श्रेय घेऊन जायचे महामंडळाने, असा हा हास्यस्पद प्रकार यानिमित्ताने दिसून आला.
शमीमा आणि पसायदान…
काश्मीरची शमीमा अख्तर! मूळची काश्मीरमधली. तिच्या घरावर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ती केवळ सहा महिन्यांची होती (काश्मिरात मुसलमानांच्या घरावरही दहशतवादी हल्ले होतात). या हल्ल्यात तिची आत्या मारली गेली. आईने तिला वाचवण्यासाठी बसमधून बाहेर फेकले. शमीमा मोठी झाली ती बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजांतच. तिने पुण्यात सरहद संस्था गाठली. तिथे संजय नहार यांनी तिच्यातील गायकीला ‘गाश बँड’चा सुंदर साज चढवला. याच शमीमाने विज्ञान भवनात उद्घाटन सोहळ्यात संपूर्ण सभागृहाला मंत्रमुग्ध करणारे ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्रगीत आणि ज्ञानोबांचे पसायदान सादर केले. तिच्या आवाजाने संपूर्ण सभागृह भारावलं. शमीमाने आयुष्यात अनेक यातना झेलल्या. रक्तपात आणि हिंसाचार पाहिला. सरहदच्या पंढरीने तिच्या मनात देश, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जात माणसांना माणसासोबत जोडणारे पसायदानाचे बीज रोवले. ती आता अत्यंत निर्मळ मनाने संपूर्ण जगात शांती आणि सौहार्द नांदो यासाठी पसायदान मागते आहे. पसायदान म्हणताना अल्लाला दुवा मागतो त्याप्रमाणे तिच्या हाताची कृती आहे अशी टीका करायला काही मठ्ठ लोक या सोहळ्यातही सरसावले. हात जोडणे असो की हात उघडे ठेवणे असो, देवाकडे आर्जव करण्यामागे भावना एकच आहे ना, असे उत्तर या धर्मांधांना देण्याची वेळ शमीमावर का यावी? याच मुलीचे काही महिन्यांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात कौतुक केले होते, हे विशेष.
संजय नहार स्वत:ला मराठी माती, संस्कृती, साहित्याशी एकरूप करतात. त्यांची घरीदारी बोलण्याची भाषा मराठी आहे. पंजाबनंतर दिल्लीतील मराठी साहित्य संमेलन प्रतिकूल परिस्थितीत गाजवतात. हा माणूस सरहदच्या माध्यमातून काश्मीर, कारगिल आणि लडाखच्या मुस्लिम विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारत त्यांच्यात राष्ट्रप्रेमासोबतच मराठीबाबत असीम प्रेम निर्माण करतो. याबाबत कृतज्ञता बाळगायची की त्यांच्यावर प्रश्न उभे करायचे? साहित्य संमेलनात महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून जवळपास तीन हजारावर मराठी लोक आले होते. या सुंदर सोहळ्यात धर्म आणि जात शोधणारे काही किडेही अवतरले. मराठीचे तख्त राखण्याचे पोवाडे गाताना जाती-धर्मांच्या भिंती अशाच राहणार असतील तर कित्येक महिने जिवाचे रान करून दिल्लीतील संमेलन यशस्वी करून दाखवणार्या संजय नहारांनी राष्ट्रीय एकात्मतेची कोणतीही सरहद पार केली तरी ती निरर्थक ठरणार आहे.
या संमेलनाच्या निमित्ताने एक झाले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज अध्यासन सुरू करण्याला गती मिळाली. महाराष्ट्राचे भाषा मंत्री उदय सामंत आणि नहार यांनी पुढाकार घेत ही बाब तडीस नेली आहे. याप्रमाणेच दिल्ली विद्यापीठात व अन्य विद्यापीठातही मराठी भाषा विभाग सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. तेव्हाच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे सार्थक होईल.
उद्घाटन कार्यक्रमात नहार यांनी बंदुकीने प्रश्न सुटणार नाहीत, वैचारिक क्रांतीनेच प्रश्न सुटू शकतात हे पंतप्रधानांसमोर सांगितले. या देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचा वाटा असावा, द्वेष असू नये हेही ठणकावून सांगितले. जे काम फडणवीस, पवारांनी करणे अपेक्षित होते ते नहारांनी केले. हेच या संमेलनाचे सार समजायला हरकत नाही.