बीड फेम धस आणि मंत्रीमहोदय धनंजय मुंडे यांची दिलजमाई होणार आणि त्या अनुपम सोहळ्याचं यजमानपद महसूल खात्याचे मंत्री चंद्रशेखर ५२कुळे स्वीकारणार याची कुणकुण माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याला काही दिवस अगोदरच लागली होती. मला तसं त्याने सांगितलंही होतं. अखेर तो सुवर्णक्षण आला आणि ५२कुळेंच्या राजदरबारी तो अविस्मरणीय सोहळा पार पडला. तेव्हा तो मला म्हणाला, टोक्याजी, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तसंच घडलं. तेव्हा मी म्हणालो, पोक्या मी तुला धनंजय मुंडे किंवा धस यांची मुलाखत घ्यायला सांगणार नाही. मात्र ५२कुळेंची मुलाखत तू अवश्य घे. ते खूप अघळपघळ बोलतात. तू तिकडे लक्ष देऊ नकोस. मात्र हे सारं का आणि कसं घडलं हे मात्र अवश्य जाणून घे. पोक्याने मी सांगितलेली कामगिरी फत्ते केली. तीच ही ५२कुळे यांची मुलाखत…
– नमस्कार ५२कुळे साहेब.
– नमस्कार राहू दे. आधी या चार बॉक्समधले हवे तेवढे पेढे घे आणि तोंड गोड कर. हा बॉक्स पंकजाचा, तो धनंजयचा, त्याच्या पलीकडचा धसांचा आणि हा माझ्या उजवीकडचा सर्वात मोठा माझा.
– साहेब, मानलं तुम्हाला. कशी काय जमवून आणलीत ही अशक्य कोटीतली गोष्ट. एकवेळ त्या ट्रम्पला पान्हा फुटेल पण हे दोन टोकांचे दक्षिण आणि उत्तर ध्रुव कधी बापजन्मात एकत्र येतील असं वाटलं नव्हतं.
– त्याचं काय झालं, आमचा धनंजय धर्मसंकटात सापडल्यामुळे त्याला त्याच्या घरी भेटायला जाणं हे माझं आद्य कर्तव्य होतं. एकतर तो आमच्या महायुतीचा मंत्री… त्यात अजितदादांचा लाडका… त्या वाल्मिक कराडच्या नादाला लागून त्याने स्वत:ची बदनामी ओढवून घेतली असा सार्वत्रिक समज. कदाचित तो खरा असेलही किंवा नसेलही. मी त्याबाबत भाष्य करणार नाही. तरीही तो निराश मन:स्थितीत असल्यामुळे मी त्याला भेटायला गेलो तेव्हा तो सोफ्यावर बसून तोंड दोन्ही हातात खुपसून गाणं म्हणत होता. ‘धस धस करने लगा…’ मला पाहिल्यावर त्याने गाणं थांबवलं आणि उठून माझ्या गळ्यात पडून धाय मोकलून त्याने अश्रूंना मोकळी वाट करून दिली. तेव्हा मी म्हणालो, तू काही काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना. तुला त्या धसची भीती वाटत असेल तर मुळीच घाबरू नकोस. आत्ता त्याला फोन करून इथे तुझ्या पुढ्यात साक्षात उभा करतो. मला सारी कल्पना होतीच. म्हणून धसला इथे येण्याआधीच दावत दिली होती. त्यावर धन्या म्हणाला, इथे नको, त्याला तुमच्या बंगल्यावर बोलवा. मी म्हटलं ठीक आहे. मग मी त्याला फोन करून बंगल्यावर ताबडतोब येण्याचं आवतण दिलं आणि मी बंगल्यावर निघालो. धन्याला मी मागून थोड्या वेळाने येण्यास सांगितलं. बंगल्यावर मी आधीच दोघांच्या स्वागताची जय्यत तयारी करून ठेवली होती. पाठोपाठ दोघेही आले. मी दोघांना हस्तांदोलन करण्याची खूण केली. त्याप्रमाणे त्यांनी ते केलं. मी धसांना स्पष्टच विचारलं, तुला हे प्रकरण चिघळत ठेवायचंय की संपवायचंय? तो म्हणाला, आता लोक माझ्याबद्दलच संशय घ्यायला लागलेत. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपल्या दोघात मी सांगितलेली तडजोड झाली तर मी यापुढे धन्याच्या वाटेला जाणार नाही. तेव्हा मी म्हणालो, तुला वाटतो तितका धनू वाईट नाही. पण कधीतरी नकळत माणूस चुकतो आणि एकदा का तो त्या चक्रात अडकला की त्याची त्यातून सुटका नसते. कराडने जर देशमुखांना हालहाल करून मारलं असेल तर त्याला फाशी झालीच पाहिजे. त्याला वाचवण्याचा प्रयत्न जे करत असतील तर तसे पुरावे मिळाल्यावर त्यांनाही सहआरोपी म्हणून शिक्षा मिळाली पाहिजे ही मुख्यमंत्र्यांसह आमची सर्वांची भूमिका आहे. मग त्यात धन्या असला तरी त्याला सोडू नये. पण तसे पुरावे नसताना त्याच्या नावाने बोंबाबोंब करणं, त्याचा राजीनामा मागणं योग्य नाही असं आम्हा सर्वांना वाटतं.
– पण त्यांनी पुरावेच नष्ट केल्याचा आरोप होतोय त्याचं काय? शिवाय त्या कराडची त्या परिसरात एवढी दहशत आहे की यापूर्वीही त्याने अशी बरीच प्रकरणं पचवलीयत असं म्हणतात.
– नुसत्या म्हणण्यावर आम्ही आणि आमचा पक्ष विश्वास ठेवत नाही. धसांनी सुद्धा पुराव्याशिवाय धन्याची बदनामी चालवली होती. त्याला मी माझं वजन खर्च करून धन्याची बाजू पटवून दिली तेव्हा त्याला ते पटलं. तेव्हा त्याने स्वत:हून मी चुकतो, यापुढे मी तोंडाला चिकटपट्टी न लावता माझं तोंड बंद करीन, असं लेखी आश्वासन मला दिलं. तेव्हा धन्याला सुद्धा गहिवरून आलं. त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारून झालं गेलं विसरून जाऊया असं परस्परांना सांगितलं आणि यापूर्वी असं काही घडलंच नाही असं वाटेल अशा पद्धतीने ते दोघे गप्पा मारू लागले. मी मुख्यमंत्र्यांना फोन करून ही गोड बातमी दिली तेव्हा ते म्हणाले, ५२कुळेजी जी गोष्ट मला जमत नव्हती ती तुम्ही चुटकीसरशी केली आणि माझ्या व अजितदादांच्या डोक्यावरचं ओझं उतरवलं याचं मला कौतुक वाटतं. मी दिल्लीच्या आपल्या दोन हायकमांडरांकडे तुम्हाला तुमच्या सध्याच्या खात्याशिवाय आणखी दोन खाती देण्याची शिफारस करतो. ते असंही म्हणाले की माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं आता उतरलंय. आपले अजितदादाही धन्याबद्दल गुळमुळीत बोलत होते, पण तुमच्या डोकेबाजपणामुळे धन्याविरुद्धचे वादळ शांत झालंय. याचा गैरफायदा शिंदे घेतील आणि माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करतील याची मला कल्पना आहे. पण आपण भाजप नेते इतके निगरगट्ट आहोत की अशा नेत्यांना योग्यवेळी योग्य धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असंही मुख्यमंत्री ठासून म्हणाले. त्यानंतर मी आणलेली मिठाई आम्ही एकमेकांना भरवली आणि तिघेही एकत्र बाहेर पडलो. बाहेर पशुसंवर्धन मंत्री पंकजा पेढे घेऊन उभीच होती. तिने आमचं औक्षण केलं आणि आमच्यावर फुलं उधळून शुभेच्छा दिल्या. बाहेर चॅनेलचे वार्ताहर आणि फोटोग्राफर यांची तुडुंब गर्दी झाली होती. तेवढ्यात कुणीतरी फटाक्यांची माळ लावली आणि पांगापांग झाली.
५२कुळेंनी सांगितलेली ही स्टोरी ऐकून मी जड अंत:करणाने बाहेर पडलो.