सकाळी उठल्यावर फ्लॅमच्या हॉटेलमध्ये फोन लावला. त्यांनी हवामान सुधारले असल्याची ग्वाही दिली, परंतु रस्त्यावरच्या पूरस्थितीची माहिती घेण्यास सांगितले. हवामानाचे अॅप चेक केले असता रेड वॉर्निंग गायब झाली होती आणि तापमानात थोडी वाढ आणि सूर्यप्रकाश दाखवत होता.
नाश्ता आणि चेकआउट करेपर्यंत सकाळचे ११ वाजले. ३००पेक्षा जास्त किमी ड्राइव्हसाठी गुगल मॅप पाच तास दाखवत होते. म्हणजे जेवण, रेस्ट आणि वॉशरूम ब्रेक गृहीत धरले तर संध्याकाळी पाच किंवा साडेपाच वाजेपर्यंत पोहोचणे गृहित धरले होते. दुपार तीननंतर अंधार होत असल्याने मी रात्रीच्या प्रवासाची मानसिक तयारी केली होती. थोड्या वेळाने ऑस्लो सोडल्यानंतर डोंगराळ भाग चालू झाला आणि निसर्गाच्या सौंदर्याची उधळण चालू झाली.
बहुतांश नॉर्वेजियन रस्ते जुन्या मुंबई गोवा-हायवेसारखे म्हणजेच सिंगल कॅरियेजवे असून ८० किमीची कमाल वेगमर्यादा असलेले बटर, मस्का, मख्खन आहेत. ते एवढे सुळसुळीत आहेत की जणू ऑलिम्पिकचे वेगवान रनिंग ट्रॅक्स. खड्डा किंवा पॅचवर्क शोधणे म्हणजे बुमराकडून वाइड बॉलची अपेक्षा करण्यासारखे. काही ठिकाणी डोंगराळ भागात भरपूर बागा लावल्या होत्या, शेती होती आणि सगळीकडे हिरवाई होती. सर्वात कहर म्हणजे चांगला सूर्यप्रकाश होता. मलाच प्रश्न पडला होता की मी खरंच नोव्हेंबर महिन्यात नॉर्वेला आलो आहे का?
ऑस्लो ते फ्लॅम प्रवास करणारा दुसरा महामार्ग ई ५० हा कमी डोंगराळ, अधिक विकसित आणि मोठा आहे. पण मी ई ५२ मार्ग निश्चित केला होता, कारण हा मार्ग नॉर्वेच्या डोंगराळ प्रदेशातून आणि लहान गावांमधून जातो. त्यामुळे यावरून प्रवास करताना तुम्हाला निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव मिळतो. त्यावरील रस्ते आणि लँडस्केप अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहेत. हे सीनिक रूट्स म्हणून प्रसिद्ध आहेत, पण..
…पण, आम्ही आमच्या दुपारच्या जेवणासाठी खूप वेळ घेतला आणि मुबलक वॉशरूम ब्रेक झाल्यामुळे अंधार पडण्याआधी खूपच कमी अंतर कापले गेले. गेले दोन दिवस महामार्ग बंद असल्याने समोरून येणारी वाहतूक जास्त प्रमाणात वाढली होती. शिवाय, हेम्सेडाल ते बोर्गुंड हा रोडरूटचा एक भाग समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर आहे (हा भाग निसर्गाच्या सर्वोत्तम सौंदर्याने नटलेला असून आणि प्रत्येक प्रâेम न प्रâेम अप्रतिम आहे याची जाणीव परतीच्या दिवसा केलेल्या प्रवासात झाली). जोरदार वार्यामुळे आणि बर्फाच्या वादळामुळे माझ्या ड्रायव्हिंगची सर्वात कठीण कसोटी या भागात लागली. मी इकडूनच का आलो, हा प्रश्न मला फक्त त्या ७९ किमीसाठीच पडला. एकदा हा भाग पार पडला की परत हिरवाई, जंगल आणि नद्या यांचा सुंदर मिलाफ दिसतो.
पुढे जाऊन लॉर्डल टनल लागतो जो जगातील सर्वात लांब भुयारी रोड आहे. हा बोगदा पार होण्याचे नाव घेत नव्हता, मग बायकोने गुगल सर्च करायला घेतले. तेव्हा कळले की हाच तो जगप्रसिद्ध बोगदा आहे. या बोगद्याची खास बात म्हणजे भरपूर विश्रांतीस्थळे आणि थोड्या थोड्या अंतरावर निळी रोषणाई आणि निळा प्रकाश; जेणेकरून चालकाला थोडी विश्रांती आणि डोळ्यांना विसावा मिळावा. कारण अशी लांब टनल्स ड्रायव्हिंग करताना काही लोकांना क्लॉस्ट्रोफोबिक म्हणजे कोंडल्याकोंडल्यासारखे वाटू शकते. हे लोक एवढा का विचार करतात चालकाचा, प्रवाशांचा आणि सुरक्षिततेचा? असे प्रश्न आपल्याकडील प्रशासनाला पडत असतील का? तुम्हाला आश्चर्य वाटेल पूर्ण प्रवासात, भुयारी रोड, डोंगराळ भागामध्ये (ट्रॉम्सो, ऑस्लो, फ्लॅम), कुठेही आमचे मोबाईल नेटवर्क गेले नाही की आमच्या कारच्या यूट्यूब म्युझिकची गाणी बफर होणे नाही की ती बंदही झाली नाहीत. प्रत्येक ठिकाणी आम्हाला उत्तम कनेक्टिविटी आणि इंटरनेटचा चांगला स्पीड मिळाला.
फ्लॅमला पोहचेपर्यंत संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. हॉटेलच्या बाजूलाच त्यांचेच रेस्टॉरंट होते, तिकडे नॉर्वेजियन स्टाईलचे रात्रीचे जेवण घेतले. ते एवढे अप्रतिम होते म्हणून दुसर्या दिवशी रात्री डिनरला तिकडेच गेलो. ऑफ सीझन असला तरी रेस्टॉरंटमध्ये बर्यापैकी गर्दी होती. टेबलसाठी वेटिंग होती म्हणून तिकडे फ्रेंच वेटरशी आम्ही इंग्रजीतून गप्पा मारत बसलो. एक वेळ आपले विश्वगुरू खरे बोलतील संसदेत किंवा सभेत, नाहीतर एकदा तरी तटस्थ (?) पत्रकार परिषद घेतील; पण फ्रेंच माणूस इंग्रजी बोलेल असे बघायला मिळणे म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात! त्याला मी मला सर्वात कठीण वाटलेल्या रोडविषयी सांगितले. तो हसून बोलला की त्याने सुद्धा फ्रान्समध्ये असताना एवढा बर्फ पाहिला नव्हता आणि बर्फावर ड्रायव्हिंग केली नव्हती, पण आता बर्फावर कार चालवणे सोपे वाटते. त्याने दुसर्या दिवशी फिरण्यासाठी काही ठिकाणे सुचवली आणि आवर्जून त्या ठिकाणांना भेट द्यायला सांगितलं.
फ्लॅम हे सोग्नेफियॉर्डमधल्या अत्यंत सुंदर परिसरात वसलेलं आहे, ज्याला आँडाल्सनेस फियॉर्ड म्हणतात. हा भाग युनेस्कोच्या हेरिटेज यादीत येतो. निसर्गप्रेमी, साहसी आणि इतिहासाची गोडी असलेल्यांसाठी फ्लॅम हे एक आदर्श पर्यटनस्थळ आहे. फ्लॅम हे उन्हाळ्यात सर्वात गजबजलेले गाव असते. मोठ मोठ्या क्रूज किनार्याला लागून पर्यटक येथील पर्यटन स्थळांना भेटी देतात. ऑफ सीझन असल्याने फ्लॅमला फिरण्यासाठी आम्ही खास अशी आयटेनेरी ठरवली नव्हती, म्हणून त्या फ्रेंच माणसाने सुचवलेल्या जागा पाहण्याचे ठरवले.
उंड्रेडाल- एल्सा विलेज
उंड्रेडाल एक छोटं आणि देखणं गाव आहे, जो नॉर्वेतील सोग्नेफियॉर्डच्या किनारी स्थित आहे. गावाची वस्ती फक्त साठ लोकांची आहे आणि बकर्यांची संख्या ४००पेक्षा जास्त आहे. पण हे गाव आश्चर्यकारक निसर्गसौंदर्य आणि ऐतिहासिक आकर्षणांसाठी प्रसिद्ध आहे. उंड्रेडालमधील स्टेव्ह चर्च खूपच अनोखं आहे! हे बांधले गेले होते ११४७मध्ये आणि ३५ माणसे त्यामध्ये मावू शकतात. आम्ही ऑफ सीझनला आलो असल्यामुळे सगळेच बंद होते. असे म्हणतात डिज्नीच्या फ्रोझन या चित्रपटाची प्रेरणा नॉर्वेच्या या गावापासूनच मिळाली आहे. उंड्रेडाल १९८८पर्यंत रस्त्याने जोडलेलं नव्हतं, त्यात एक वेगळीच शांतता आणि निसर्गाशी गहन असे नातं आहे, जे फ्रोझनमधल्या उंड्रेडाल गावात पाहायला मिळते. और्लंड हे नॉर्वेमधील फ्लॅमशेजारील एक आकर्षक गाव असून फियॉर्डमधील निळं पाणी, भव्य पर्वत, आणि शांत वातावरण डोळ्यांसाठी एक सुंदर आणि अविस्मरणीय दृश्य तयार करतात.
साहस आणि सौंदर्याचा मिलाफ!
पुढच्या दिवशी पुन्हा एकदा पाच ते सात तास फ्लॅम ते ऑस्लो या परतीच्या प्रवासाला लागणार होते. परत अॅपवर हवामान बघायला सुरुवात केली. ज्या मार्गाने आलो त्या कठीण पर्वतीय प्रदेशातून परत जायचे की दुसरा मार्ग निवडावा, यावर आम्हा दोघांची गहन चर्चा झाली. हवामान अॅपवर वार्याचा वेग कमी आणि तापमान थोडे सुधारलेले दाखवत असल्याने आम्ही आलो त्या रस्त्यानेच प्रवास करायचा हे नक्की केले. रस्त्याला खेटून उभे असलेले पर्वत, काही अंतरावर असलेले सरोवर अशा अप्रतिम दृश्यांची रेलचेल होती. मला नाही वाटत की कुठलाही कॅमेरा या सुंदर गोष्टी कैद करू शकेल अथवा त्यांना न्याय देऊ शकेल. एक गोष्ट मला कळाली की मनुष्य कितीही ताकदवान होऊ दे, पण तो प्रत्येक वेळी निसर्गावर मात नाही करू शकणार. नॉर्वेजियन प्रशासनाचे कौतुक यासाठी की त्यांनी निसर्गाच्या विरुद्ध न जाता आधुनिक विज्ञानाचा वापर करून हा एकपदरी रोड १९८८ला बांधला. त्यांना चार पदरी किंवा सहा पदरी रोड बांधता आला असता; तेवढा पैसा, टेक्नोलॉजी असून सुद्धा त्यांनी टाळले. नॉर्वेचा पर्यावरण संरक्षणावर भर असल्याने, अनेक रस्त्यांचा विकास निसर्गाच्या दृष्टिकोनातून केला जातो. यामुळे काही ठिकाणी रस्त्यांची क्षमता मर्यादित असते, परंतु पर्यावरणीय फायदे मोठे असतात.
अशा प्रकारे सर्वोत्तम नैसर्गिक सौंदर्याने नटलेला रोड प्रवास हा ऑस्लोला परत येऊन संपला. तब्बल नऊ दिवसांनी भारतीय जेवण खायची हुक्की आली. जवळच असलेल्या, फक्त नावाने भारतीय असलेल्या रेस्टॉरंटमध्ये जेवण केले. लवकर सगळे आटोपून दुसर्या दिवशीच्या लंडन फ्लाइटसाठी लवकर झोपी गेलो.
लोकशाही आणि पर्यटन
१८व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत, गरीब दुर्गम देश असलेल्या नॉर्वेचा प्रवास, १९व्या शतकाच्या शेवटापासून आणि २०व्या शतकाच्या प्रारंभापासून संवैधानिक लोकशाहीमुळे आधुनिकतेकडे सुरू झाला.
नॉर्वेने नैसर्गिक संसाधनांचा उपयोग सुरू केला, विशेषतः हायड्रोपॉवर आणि मासेमारीचा. मात्र, अनेक वर्षांपासून नॉर्वेच्या जलविद्युत प्रकल्पांवर परदेशी कंपन्यांचा ताबा होता. दुसर्या जागतिक महायुद्धानंतर नॉर्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि एक कायदा केला, ज्याच्या अंतर्गत नॉर्वेची नैसर्गिक संपदा फक्त नॉर्वेच्याच ताब्यात राहील. यामुळे नॉर्वेच्या संपत्तीचे नियंत्रण देशांतर्गत ठेवले जाऊ लागले आणि या संपत्तीतून मिळालेला महसूल सरकारने शिक्षण, सार्वजनिक सेवेसाठी आणि स्थानिक उद्योगांसाठी वापरला. १९६०च्या दशकात खरे बदल घडले, जेव्हा उत्तर समुद्रात तेल आणि गॅसच्या खाणींचा शोध लागला. अनेक तेलसमृद्ध देशांप्रमाणे सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला यांच्याकडे देखील मोठ्या प्रमाणात तेल संसाधने होती, परंतु ते नॉर्वेसारखे ते समृद्धी साधू शकले नाहीत. कारण तेलामुळे मिळालेल्या संपत्तीने या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि राजकीय अस्थिरता निर्माण केली.
नॉर्वेने इंग्लंडचाही कित्ता गिरवला नाही हे विशेष. ८०च्या दशकात मार्गारेट थॅचर यांच्या नेतृत्वाखालील इंग्लंड, तेल इंडस्ट्रीचे खाजगीकरण करण्यात गुंतलेले होते तेव्हा नॉर्वेजियन सरकारने तेलस्रोतांचे राष्ट्रीयीकरण केले, तेव्हा त्याचा फायदा त्यांना मिळालाच, शिवाय ती भविष्यासाठी मोठी गुंतवणूक ठरली.
ट्रॉम्सो सोडले तर उरलेले नॉर्वे हे आमच्यासाठी ऑफ सीझन टूर होती. उन्हाळ्यात नॉर्वे आणखी सुंदर आणि आल्हादायक असेल. मिडनाइट सनचा भरपूर उपयोग फिरताना होईल. नॉर्वे एक सुंदर आणि वैविध्यपूर्ण पर्यटन पर्याय असलेला देश असल्याने इथे निसर्गाची विविधता आणि अद्वितीय सौंदर्य पाहता येते. उन्हाळ्यात नॉर्वेच्या फियॉर्डमध्ये तुम्ही क्रूजवर जाऊन छोट्या गावांना आणि अप्रतिम जागांना भेटी देऊ शकता. उन्हाळी ट्रिपसाठी किमान दोन आठवडे हवेत आणि खिसा बराच गरम हवा.
युरोपमध्ये हिवाळा निराशाजनक मानला जातो आणि प्रत्येक युरोपियन रहिवासी हा उन्हाळ्याची वाट बघत हिवाळ्यावर मात करत असतो. हिवाळ्यातही नॉर्वे एवढे सुंदर दिसत असेल, तर उन्हाळा नक्कीच स्वर्गीय असेल. या ट्रिपमुळे बायकोच्या मनातले स्वित्झर्लंडचे स्थान हे दुसर्या क्रमांकावर घसरले आणि नॉर्वेने पहिला क्रमांक पटकावला.
(क्रमश:)