१९९०च्या दशकात दूरदर्शनवर एक जाहिरात लागायची. सगळ्यात आधी पडद्यावर दोन नारळ दिसायचे, त्यातल्या एका नारळावर हेल्मेट ठेवलं जायचं, तर दुसरं नारळ हेल्मेटशिवाय. छातीची धडधड वाढवणारं पार्श्वसंगीत… दोन पैलवान हातात हातोडी घेऊन दोन्ही नारळावर घाव घालायचे, हेल्मेट नसलेला नारळ पहिल्या फटक्यात फुटायचा तर हेल्मेटखाली असलेला नारळ सुरक्षित राहायचा. शब्द कानावर येतं, ‘‘मर्जी है आपकी, आखिर सर है आपका.‘‘
बर्याच मध्यमवर्गीय कुटुंबात दुचाकी आणि दूरदर्शन एकाच वेळी येत असतानाच्या त्या काळात या जाहिरातीने कमीत कमी शब्दांत महत्वाचा संदेश दिला. पण तो अमलात आणण्यात भारतीय आजही मागे आहेत. रस्ते अपघातात आजवर लाखो प्राण गेले आहेत, यात सर्वाधिक संख्या हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांची आहे. कायदासक्तीमुळे काही ठिकाणी तरी आज तुमची इच्छा असो की नसो, हेल्मेट घालावंच लागतं. जनजागृती आणि सरकारी आदेश या संयोगातून भारतातील मोटरसायकल हेल्मेट्सची बाजारपेठ २०२२ साली अंदाजे पाच हजार कोटी रुपयांची होती आणि २०३०पर्यंत हा आकडा नऊ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सर सलामत ठेवणारा हेल्मेटचा हा व्यवसाय सुरू कसा झाला आणि वेगाने धावायला कसा लागला हे आजच्या लेखातून जाणून घेऊ.
मुळात हेल्मेट हा शब्द हेल्मवरून आला आहे, जो संरक्षणात्मक पद्धतीने डोके झाकण्यासाठी एक जुना इंग्रजी शब्द आहे. हेल्मेटची निर्मिती होण्याआधी डोक्याला इजा होऊ नये यासाठी मानवाने प्राचीन काळापासूनच विविध उपाय शोधले. युद्ध, शिकारी आणि दैनंदिन आयुष्यात डोक्याच्या संरक्षणार्थ शिरस्त्राण प्राचीन काळापासून विकसित होत गेले. मानवी इतिहासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर मानवाने प्राण्यांची कातडे, झाडाची साल आणि बांबू अशा नैसर्गिक साधनांचा वापर केला. तांबे आणि कांस्याचा शोध लागल्यानंतर शिरस्त्राणे बनवली जाऊ लागली. प्राचीन मेसोपोटेमिया आणि इजिप्तमधील सैनिक गोलाकार तांब्याचा आणि लोखंडाचा शोध लागल्यानंतर वजनाने हलकी शिरस्त्राणे वापरू लागले. कालांतराने शिरस्त्राणांमधे विविधता आली. ग्रीक सैनिक संपूर्ण डोक्याचे आणि चेहर्याचे संरक्षण करणारे ‘कोरिंथियन हेल्मेट’ घालत असत. रोमन सैनिकांचे ‘गालेआ’ शिरस्त्राणांची रचना लढाईत सहजतेने हालचाल करता येईल अशी केली होती. युरोपमध्ये मध्ययुगीन नाइट्स म्हणजे सरदार पूर्ण चेहरा झाकणारी मजबूत लोखंडी शिरस्त्राणे वापरत. या हेल्मेटवर हवा खेळती राहण्यासाठी छोटे छिद्रे असत. प्राचीन भारतातील योद्धे कासे, तांबे, आणि लोखंडाचा वापर करून शिरस्त्राणे तयार करत. मुघल आणि राजपूत योद्ध्यांची शिरस्त्राणे सुंदर नक्षीकामाने सजवलेली असत, काही शिरस्त्राणांमध्ये टोप्या आणि चेहर्याचे संरक्षण करणारी जाळी जोडलेली असे.
भारतीय उपखंडात जन्माला आलेल्या शीख धर्मातील पगडी हा केवळ एक पोशाखाचा भाग नसून, तो एक आत्मसन्मान, श्रद्धा, आणि परकीय आक्रमणांविरोधातील संघर्षाचे प्रतीक आहे. सततच्या परकीय आक्रमणांमुळे शीख समुदायाने पगडीला महत्त्व दिले, मुघल कालखंडात शीखधर्मीयांवर आणि त्यांच्या सांस्कृतिक चिन्हांवर हल्ले करण्यात आले, तेव्हा पगडी धार्मिक व सांस्कृतिक ओळख टिकवून ठेवण्यास कामी आली. उत्तर भारतावर सतत अफगाण, तुर्क आणि इतर परकीय आक्रमकांनी हल्ले केले, तेव्हा युद्धात डोक्याचे संरक्षण करणार्या पगडीला शीख योद्ध्यांनी संरक्षक म्हणूनही स्वीकारले. पगडीच्या आत लपवलेली छोटी शस्त्रे युद्धात उपयोगी पडत असत.
औद्योगिक क्रांतीनंतर आधुनिक काळातील हेल्मेट्स एकोणिसाव्या शतकात तयार झाली. पहिल्या आणि दुसर्या महायुद्धात सैनिकांच्या डोक्याचे संरक्षण करण्यासाठी ‘हार्ड हॅट्स’ विकसित झाल्या. त्यावेळी स्टीलची मजबूत हेल्मेट्स वापरली गेली. आधुनिक सैन्यात हलक्या पण अधिक मजबूत केव्हलर या साहित्याचा वापर केला जातो. महायुद्ध संपल्यानंतर बांधकाम कामगार, खेळाडू, आणि अग्निशमन दल यासाठी विशेष हेल्मेट्स डिझाइन केली गेली. आजही इतर अनेक गोष्टींसाठी हेल्मेटविक्री होत असली तरी हेल्मेटचा मोठा ग्राहकवर्ग दुचाकीस्वार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने भारतातील हेल्मेट उद्योगाचा प्राण दोन महत्त्वाच्या घटकांवर आधारित आहे: मोटर सायकल विक्री आणि हेल्मेटसक्तीच्या कायद्याची अंमलबजावणी.
हेल्मेट आपल्या सुरक्षेसाठी आहे हे सरकारने आपल्याला सांगण्याआधी काही लोकांनी ते ओळखलं होतं. अशा सुजाण लोकांसाठी भारतातील स्टड्स या पहिल्या हेल्मेट ब्रँडची मुहूर्तमेढ १९७३ साली मधूसूदन भगत या दूरदृष्टी असलेल्या उद्योजकाने रोवली. त्या काळात भारतात सुरक्षिततेबद्दल जागरूकता नसल्यामुळे हेल्मेटच्या धंद्यात आव्हाने प्रचंड होती. कच्च्या मालाची उपलब्धता मर्यादित असल्याने उत्पादनखर्च खूपच वाढत होता. गुणवत्ता मानके नसल्यामुळे दर्जेदार आणि अप्रमाणित हेल्मेट्स यांच्यातला फरक ओळखणे ग्राहकांसाठी कठीण होते. पण स्टड्सने हार मानली नाही. भगत आणि त्यांच्या सहकार्यांनी हेल्मेटच्या सुरक्षिततेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी जनजागृती मोहिमा राबवल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किफायतशीर आणि उच्च दर्जाची हेल्मेट्स तयार करून स्टड्स हा ब्रँड हेल्मेट उद्योगातील आदर्श आणि अग्रगण्य बनला. हरियाणातील गुरुग्राममधील एका छोट्या उपक्रमाने भारतातील हेल्मेट उद्योगाला यशाचा मार्ग दाखवला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
१९६४मध्ये स्थापन झालेली स्टीलबर्ड हाय-टेक इंडिया लिमिटेड ही भारतातील दुचाकी अॅक्सेसरीजमधील सर्वात जुनी कंपनी. हेल्मेट्सची मागणी वाढायला लागल्यावर प्रगत उत्पादन यंत्रणा विकसित करून त्यांनीही हेल्मेट उद्योगात प्रवेश केला. परंतु आंतरराष्ट्रीय ब्रँड्सशी स्पर्धा आणि उत्पादन मर्यादित क्षेत्रात (फक्त उत्तर भारत) राहिल्यामुळे स्टीलबर्ड कंपनीला आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र झालेल्या चुकांपासून धडा घेऊन इटलीतील प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी मॅट फिनिश व अँटी-ग्लेअर व्हायझरसह स्टायलिश, प्रीमियम हेल्मेट्स विकसित केली आणि बाजारपेठेत स्थान निर्माण केले. १९८२मध्ये स्थापन झालेल्या व्हेगा ऑटो अॅक्सेसरीज प्रा. लि.ने सुरक्षेसोबतच तरुणाईची आवड असलेल्या स्टाईलचे महत्त्व ओळखले. व्हेगा भारतातील पहिला हेल्मेट स्टाइल स्टेटमेंट बनला. नवीन ब्रँड असल्याने व्हेगाला स्टड्स आणि स्टीलबर्ड यांसारख्या स्थापित ब्रँड्सशी स्पर्धा करावी लागली. फॅशन डिझायनर्सच्या सहकार्याने ट्रेंडी हेल्मेट्स तयार करून आणि हलक्या, स्टायलिश व परवडणार्या किमतीत उत्पादने पुरवून व्हेगाने तरुणाईमध्ये स्थान निर्माण केले. भारतात दुचाकी अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे आणि जनजागृतीमुळे लोकांना सुरक्षेचे महत्त्व पटू लागले यासोबतच सरकारने मोटर वाहन कायद्यात सुधारणा करून हेल्मेटवापर सक्तीचा केल्याने या व्यवसायाला चालना मिळाली. स्टड्स, स्टीलबर्ड आणि व्हेगा यांनी जागरूकता मोहिमा राबवून, ब्लूटूथ, अँटी-ग्लेअर व्हायझर, कार्बन फायबर आणि केव्हलरसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश करून दर्जेदार उत्पादने निर्माण केली. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागात सहज पोहोच मिळाल्यामुळे हेल्मेट व्यवसाय वेगाने वाढला.
१९८०-९०च्या दशकात हमारा बजाजची वाढती क्रेझ आणि सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेची अनास्था यामुळे दुचाकींची विक्री भारतात मोठ्या प्रमाणावर वाढली. हीरो, बजाज, टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांनी मोटरसायकल बाजार काबीज केला. सुरुवातीच्या काळात, हेल्मेटला केवळ ‘ऑप्शनल अॅक्सेसरी’ म्हणून पाहिले जात होते. हेल्मेट न घालण्याच्या अनेक सबबी सांगितल्या जात. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे, माझ्या मित्राच्या मित्राचा मित्र संध्याकाळी मोटरसायकलने कामावरून घरी परतत असताना मागून एका मोटारीने त्याला धडक दिली. सुदैवाने डोक्यावर हेल्मेट होतं, हातापायाला खरचटलं होतं. तो उठून उभा राहिला. त्याला मदत करायला आजूबाजूला लोकही जमले डोक्याला मार लागला आहे का हे पाहायला त्याने हेल्मेट काढलं, तेव्हा तो तिथेच धारातीर्थी पडला. तरुण वयात ही गोष्ट जशी माझ्या मित्रांनी मला सांगितली तशीच ती देशभरातील अनेक मित्रांनी त्यांच्या मित्रांना सांगितली असेल. ही गोष्ट रचणारा नक्की कोण होता हे कळलं नाही, परंतु या गजालीमुळे अनेक तरुण हेल्मेट घालायला टाळाटाळ करायचे किंबहुना हेल्मेट न घालण्याच्या अनेक कारणांपैकी हे प्रमुख कारण त्या काळात सांगितलं जायचं. अशा गावगप्पांमुळे रस्ते अपघातात हेल्मेट न घातलेल्या हजारो दुचाकीस्वारांचे प्राण गेले आहेत. पण आज कायद्याच्या धाकामुळे का होईना, हेल्मेट घालणे काही भागांत तरी बंधनकारक झालंय हे समाधानकारक आहे.
एखादं सरकारी धोरण व्यवसायात आमूलाग्र बदल घडवू शकतं… २०१९मध्ये हेल्मेट न वापरणार्या दुचाकीस्वारांवर कारवाईची मोहीम आखण्यात आली. मग दुचाकीस्वारांच्या हेल्मेटच्या दुकानाबाहेर रांगा लागल्या.. मागणी वाढायला लागल्यावर स्टड्स, स्टीलबर्ड, व्हेगा आदींनी संधी ओळखून दर्जेदार आणि परवडणार्या हेल्मेट्सची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली. देशी कंपन्यांसोबतच एल एस २, एजीवी यांसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सनी भारतीय बाजारात प्रवेश करून प्रीमियम सेगमेंटमध्ये दबदबा वाढवला. व्यवसायात एखाद्या वस्तूची मागणी वाढली की त्यात सोयीसुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान आणलं जातं. प्रमुख कंपन्यांनी ग्राहकांच्या गरजा ओळखून हलक्या वजनाची, हवेशीर आणि स्टायलिश हेल्मेट्स बाजारात आणली. आज दोन प्रकारचे हेल्मेट्स जास्त प्रसिद्ध आहेत. फुल फेस हेल्मेट, ज्याने डोके, चेहरा आणि मान पूर्ण झाकली जाते, अपघात झाल्यास डोक्याला आणि चेहर्याला संपूर्ण संरक्षण मिळते. पाऊस, धूळ, सोसाट्याचा वारा यापासून बचावासाठी ते सर्वोत्तम मानले जातात. याशिवाय, त्यात अँटी-ग्लेअर व्हायझर, हवेशीर डिझाइन आणि आवाज कमी करणारी प्रणाली देखील असते. फॅन चालवून डोक्याला थंड हवा देणारे हेल्मेटदेखील आज बाजारात उपलब्ध आहेत. हाफ फेस हेल्मेट्स वजनाने हलके व आरामदायी असतात, पण चेहरा उघडा असल्यामुळे कमी सुरक्षित मानले जातात. असे हेल्मेट मुख्यतः शहरांतर्गत वाहतूक आणि कमी वेगाने प्रवास करणार्यांसाठी लोकप्रिय आहेत.
आधुनिक युगातील स्मार्ट हेल्मेट्समध्ये जीपीएस नॅव्हिगेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, हँड्स-फ्री कॉलिंग, संगीत ऐकण्यासाठी
ऑडिओ सिस्टीम, आणि क्रॅश डिटेक्शन सिस्टीम यांसारखे फीचर्स असतात. कार्बन फायबर हेल्मेट्स हलके असूनही अत्यंत मजबूत असल्याने प्रीमियम श्रेणीतील ग्राहकांत लोकप्रिय आहेत. हे हेल्मेट्स बुलेटप्रूफ तंत्रज्ञानातून प्रेरित अस्ाून, दीर्घकाळ टिकणारे व प्रगत डिझाइनयुक्त असतात. याशिवाय, मॉड्युलर हेल्मेट्स म्हणजेच फोल्ड होणारे हेल्मेट्स प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर आहेत, ज्यामध्ये पूर्ण चेहरा आणि अर्धचेहरा हेल्मेट्सची वैशिष्ट्ये एकत्र आहेत. ऑफ-रोड हेल्मेट्स मोटरस्पोर्ट्ससाठी डिझाइन केलेली असतात, चेहर्याला वाढीव संरक्षण आणि अधिक टिकाऊपणा देतात. आजच्या हेल्मेट उत्पादनांमध्ये अँटी-फॉग व्हायझर, एअर कूलिंग सिस्टीम आणि कस्टमाईज्ड डिझाइन्स यांचा समावेश असून ग्राहकांच्या आवडीनुसार विविध रंग, फिनिश व आकार उपलब्ध आहेत.
नेसायची साडी असो की चालवायची गाडी; वस्तूच्या क्वालिटीपेक्षा नजरेत पहिल्यांदा भरतो तो रंग. रंगाच्या बाबतीत हेल्मेटदेखील ब्लॅक अँड व्हाईट जमाना मागे सोडून सप्तरंगात बुडालेले दिसतात. लाल रंग लक्षवेधक आणि स्पोर्ट्स बाइक्ससोबत उठून दिसणारा असल्यामुळे तरुणांना विशेष आवडतो, तर निळ्या व राखाडी रंगाचे हेल्मेट्स प्रीमियम डिझाईन्समध्ये अधिक दिसून येतात, कारण ते स्टायलिश पण कमी लक्षवेधक असतात. फ्लोरोसेंट आणि यलो-ग्रीन यांसारखे उठून दिसणारे रंग, तसेच मॅट ब्लॅक व मॅट रेड रंगातील स्टायलिश व आधुनिक हेल्मेट्सची मागणी झपाट्याने वाढते आहे. ग्राहक आता बाइकच्या रंगाशी मॅचिंग साधणारे हेल्मेट निवडतात. तरी हेल्मेटच्या रंगबिरंगी दुनियेत आजही काळा रंग सर्वाधिक विकला जाणारा आहे, कारण त्यावर डाग, ओरखडे लवकर दिसत नाहीत आणि बाईकच्या कोणत्याही रंगासोबत तो मॅच होतो. यामुळे या रंगाच्या हेल्मेट्सची विक्री ५०-६० टक्के आहे. पांढर्या रंगाचे हेल्मेट्स त्यांच्या उच्च दृश्यमानतेमुळे रात्री व अंधार्या हवामानात सुरक्षिततेसाठी लोकप्रिय आहेत, तसेच उन्हाळ्यात उष्णता कमी शोषतात, ज्यामुळे त्यांच्या विक्रीत २०-२५ज्ञ् वाटा आहे. सुरक्षा आणि स्टाईल यांचा समतोल साधणारे, उच्च दृश्यमानता असणारे रंग भविष्यात ही बाजारपेठ गाजवतील असे स्पष्ट दिसते.
मोटारसायकलस्वारांबरोबरच बांधकाम, उत्पादन, खाणकाम, आणि विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये काम करणार्या कर्मचार्यांसाठीही हेल्मेट अत्यंत महत्त्वाची सुरक्षा उपकरण आहेत. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का की उद्योगांमध्ये वापरली जाणारी हेल्मेट्स वेगवेगळ्या रंगांच्या का असतात? यामागे काही ठरावीक नियम आणि कारणे आहेत. औद्योगिक क्षेत्रांमध्ये हेल्मेटच्या रंगांचा उपयोग प्रामुख्याने कर्मचार्यांची ओळख आणि जबाबदार्या दर्शवण्यासाठी केला जातो. पांढरे हेल्मेट हे सामान्यत: अभियंते, उच्चपदस्थ अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापक आणि पर्यवेक्षक वापरतात. कामगारांना ते सहज ओळखता येऊन निर्णयप्रक्रियेसाठी त्यांच्याशी संपर्क साधता येतो. पिवळे हेल्मेट सर्वात जास्त आढळते, बहुतेक वेळा सामान्य कामगार, बांधकाम मजूर आणि उत्पादन क्षेत्रातील कर्मचारी हे हेल्मेट वापरतात. निळे हेल्मेट तांत्रिक कर्मचारी, इलेक्ट्रिशियन, मशीन ऑपरेटर आणि देखभाल करणारे कर्मचारी वापरतात. लाल हेल्मेट अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि सेफ्टी ऑफिसर्स यांच्यासाठी असते. काही ठिकाणी ते प्रशिक्षणार्थींनाही दिले जाते. हिरवे हेल्मेट प्रामुख्याने सुरक्षा निरीक्षक किंवा पर्यावरणतज्ज्ञ वापरतात. केशरी हेल्मेट काही ठिकाणी रहदारी नियंत्रक किंवा उच्च-धोका असलेल्या भागांमध्ये काम करणार्या कर्मचार्यांसाठी वापरले जाते. काळ्या हेल्मेटचा उपयोग विशिष्ट वरिष्ठ व्यवस्थापक किंवा उच्चपदस्थ अधिकार्यांसाठी केला जातो. औद्योगिक प्रकल्पांच्या कर्मचार्यांसाठी हेल्मेट हा जीवनरक्षक घटक आहे. बांधकाम स्थळे, उत्पादन कारखाने, आणि खाणी यांसारख्या ठिकाणी डोक्यावर पडणारे अवजड साहित्य, विजेच्या तारा, आणि यंत्रसामग्रीचा धोक्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हेल्मेट घालणे हे कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.
ठिकठिकाणी सुरक्षित राहण्यासाठी हेल्मेट घालणे आपण मान्य केलं आहे, परंतु त्याच्या स्वच्छतेकडे किती जण लक्ष देतात? डोक्यावरची टोपी नियमित धुतली जाते, पण हेल्मेटच्या स्वच्छतेबाबत मात्र कोणीच विचार करत नाही. काही लोक तब्बल चार-चार वर्षे हेल्मेट धूत नाहीत! त्याच्या आतील बाजूस केसांचे तेल, घाम, धूळ, माती आणि पावसाचे पाणी यांचे थर साचत राहतात. परिणामी केसगळती, कोंडा, डोक्यावरील त्वचेचे आजार आणि दुर्गंधी यांसारख्या समस्या उद्भवतात.
हेल्मेटची आणखी एक दुर्लक्षित बाब म्हणजे ते दुसर्याला वापरण्यास देणे. आपल्या कंगव्याचा वापर दुसर्याने करू नये याकडे आपण जसे लक्ष देतो, तसेच हेल्मेटसाठीही केले पाहिजे. मित्राने बाईकची चावी मागितली की आपण सहज हेल्मेटही देऊन टाकतो, पण तो त्याच्या केसांमधले घटक तुमच्या हेल्मेटमध्ये टाकतोय, हे कोणाच्या लक्षात येत नाही! हेल्मेट स्वतःपुरतेच मर्यादित ठेवावे आणि शक्यतो दुसर्याला देऊ नये. महिन्यातून किमान एकदा तरी हेल्मेट धुवावे. हलक्या साबणाच्या पाण्यात धुतल्यास ते स्वच्छ राहते. हेल्मेट वापरण्यापूर्वी डोक्यावर रुमाल किंवा इनर कॅप घातल्यास घाम थेट हेल्मेटमध्ये जाणार नाही. वापरानंतर हेल्मेट थोडा वेळ उन्हात ठेवल्यास त्यातील ओलावा आणि दुर्गंधी निघून जाईल. तसेच हेल्मेटसाठी स्प्रे क्लीनर किंवा फेसवॉशचा वापर करून ते स्वच्छ ठेवता येईल.
देशात मोठे हेल्मेट उत्पादक ब्रँड तयार झाले असले तरी आजही या व्यवसायाचा मोठा भाग अनऑर्गनाईज्ड निर्मात्यांनी व्यापला आहे. हायवेला रस्त्याकडेला उभारलेल्या तंबूत हलक्या दर्जाचे हेल्मेट विकणारे विक्रेते दिसतात. इथे दोनशे रुपयांपासून हेल्मेट मिळायला सुरुवात होते. यात प्रामुख्याने सुरक्षित नसलेली बनावट हेल्मेट विकली जातात. ज्यांचा प्रमुख उपयोग जीव वाचवण्यापेक्षा ट्रॅफिक फाईन वाचवण्याचा असतो. यावर उपाययोजना म्हणून सरकारने प्रत्येक हेल्मेटला बीआयएस प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे, परंतु याची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. उच्च दर्जाच्या हेल्मेट्सच्या भरमसाठ किंमती बहुतांश ग्राहकांसाठी अडसर ठरतात, त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा कमी बजेटमधील हेल्मेट्सकडे कल असतो. अलीकडे स्थानिक उत्पादकांनी देखील परवडणार्या किमतीत दर्जेदार हेल्मेट्स उपलब्ध करून दिली आहेत. याशिवाय सोशल मीडियाचा वापर करून हेल्मेट उद्योजकांनी ऑनलाईन विक्रीकडे लक्ष दिलं आहे, त्यामुळे उत्पादकांना वितरक-दुकानदार ही साखळी तोडून कमी किमतीत थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता येते.
हेल्मेट बनविण्याची फॅक्टरी टाकण्यासाठी साधारण एक ते पाच कोटी रु. खर्च येतो. उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल स्थानिक पातळीवर गुजरात, महाराष्ट्र, आणि हरियाणा येथून किंवा चीन, जपान आणि जर्मनीतून आयात केला जातो. हेल्मेट बनवण्यासाठी इंजेक्शन मोल्डिंग मशीन, फायबरग्लास मोल्डिंग मशीन, कटिंग, ट्रिमिंग मशीन, पेंटिंग आणि फिनिशिंग उपकरणे लागतात. याशिवाय सरकारी परवाने, प्रमाणपत्र, पर्यावरण परवाना, जीएसटी नोंदणी, आणि आयात/निर्यात परवाने आवश्यक आहेत.
हेल्मेट तयार करण्याची प्रक्रिया तांत्रिक कौशल्य, अचूक नियोजन, आणि सुरक्षा मानकांची अंमलबजावणी यावर आधारित असते. ग्राहकांच्या गरजा, आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार सामग्रीच्या समतोलातून ती साकारली जाते. डिझाइन आणि नियोजन या टप्प्याने सुरुवात होते. सॉफ्टवेअरद्वारे हेल्मेटचं थ्रीडी मॉडेल तयार केलं जातं. यामध्ये बाह्य कवचाची रचना, आतील फोमची जाडी, व्हायझरची स्थिती आणि हवा खेळती ठेवणार्या प्रणालीचा समावेश होतो. डिझाईन तयार करताना आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या मानकांचे पालन केले जाते. डिझाईन पक्के झाल्यानंतर हेल्मेटच्या बाह्य कवचासाठी थर्मोप्लास्टिक,
पॉलीकार्बोनेट्स, फायबरग्लास किंवा कार्बन फायबरसारख्या हलक्या व मजबूत साहित्याचा वापर केला जातो. तर आतील संरचनेसाठी ईपीएस फोम, आणि पॉलीयुरेथेन फोम, हेल्मेटच्या काचेसाठी अँटी-ग्लेअर, अँटी-स्क्रॅच, आणि यूव्ही प्रोटेक्शन असलेले पॉलीकार्बोनेट्स वापरले जातात. उत्पादन प्रक्रियेत, बाह्य कवच तयार करण्यासाठी इंजेक्शन मोल्डिंग तंत्राचा उपयोग करून ठराविक आकार दिला जातो. फायबर ग्लाससाठी मोल्डिंग तंत्रज्ञान वापरले जाते, जे प्रीमियम श्रेणीतील हेल्मेटसाठी उपयुक्त ठरते. ईपीएस फोमला कट करून बाह्य कवचात अचूक बसवले जाते. त्यानंतर फायबर ग्लास जोडले जाते, ज्यावर अँटी-स्क्रॅच, अँटी-फॉग, आणि यूव्ही प्रोटेक्शन कोटिंग दिले जाते. प्रीमियम हेल्मेट्समध्ये हवा खेळती राहण्यासाठी छिद्रे, एअर कूलिंग तंत्रज्ञान, आणि रिबन स्ट्रॅप्स जोडले जातात, जे डोक्याला आराम देतात आणि सुरक्षित असतात. पेंटिंग आणि फिनिशिंग हा टप्पा हेल्मेटला आकर्षक बनवतो. मॅट फिनिश, ग्लॉसी फिनिश, आणि ब्रँडचा लोगो यांचा समावेश असतो, ज्यामुळे हेल्मेट केवळ सुरक्षेचे साधन न राहता स्टाईल स्टेटमेंट बनते.
उत्पादनानंतर प्रत्येक हेल्मेट गुणवत्ता तपासणीच्या कठोर टप्प्यातून जाते. इथे प्रभाव प्रतिरोधक चाचणी, टिकाऊपणा, व्हायझरची पारदर्शकता, आणि स्क्रॅच प्रतिरोधकता तपासली जाते. या चाचण्या पूर्ण केल्यानंतर बीआयएस, डॉट, ईसीई, किंवा स्नेल प्रमाणपत्र दिले जाते. ते हेल्मेटची सुरक्षा आणि दर्जा सुनिश्चित करते. लहान वर्कशॉपमध्ये एका हेल्मेटच्या निर्मितीला दोनचार तास लागतात, तर मोठ्या फॅक्टरीमध्ये एका दिवसात शेकडो हेल्मेट्स तयार होतात.
सामान्यत: एका हेल्मेटचा उत्पादन खर्च ४००-६०० रु. ते प्रीमियम/स्मार्ट हेल्मेटसाठी ८००-१२०० रु.पर्यंत असतो. वितरक ते स्थानिक दुकानदार या साखळीनंतर ग्राहकांसाठी साधं हेल्मेट १००० ते १२०० रु. आणि प्रीमियम श्रेणीचे हेल्मेट २५०० ते ३००० रुपयांना विकलं जातं. ऑनलाइन विक्रीसाठी अमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारखे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स वापरले जातात. ऑनलाइन विक्रीमुळे आज उत्पादने ग्रामीण आणि शहरी भागांपर्यंत सहज पोहोचतात. विक्रीनंतर ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी काही ब्रँड्स दुरुस्ती सेवा आणि रिप्लेसमेंट सुविधा देतात.
कायद्याची हेल्मेट सक्ती आपल्याला हेल्मेट सोबत ठेवायला भाग पाडते, परंतु ते कसं घालायचं यावर देखील जनजागृती होण्याची गरज आहे. काही दुचाकीस्वार हेल्मेट डोक्यावर न घालता, आपलं डोकं मोटरसायकलच्या आरशात दिसतंय म्हणून आरशाला हेल्मेट घालतात. काहीजण जण हेल्मेट डोक्यावर घालतात, पण त्याचा बेल्ट लावत नाहीत. असं केल्यास अपघाताच्या वेळी हेल्मेट डोक्यावरून निसटून डोक्याला गंभीर दुखापती किंवा मृत्यू होऊ शकतो. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०२२ साली भारतात ६६,७४४ लोकांचा हेल्मेट आणि सीटबेल्ट न वापरल्याने रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. डबल डी-रिंग स्ट्रॅप, क्विक-रिलीज बकल, आणि रॅचेट स्ट्रॅपसारख्या प्रकारांमुळे हेल्मेट डोक्यावर घट्ट बसून राहते, अपघाताच्या वेळी ते डोक्यावरून निघून जाण्याचा धोका टळतो. डबल डी-रिंग स्ट्रॅप रेसिंग हेल्मेट्ससाठी अधिक सुरक्षित मानला जातो, तर क्विक-रिलीज बकल सामान्य वापरासाठी सोयीस्कर आहे. रॅचेट स्ट्रॅप प्रीमियम हेल्मेट्समध्ये अचूक फिटिंगसाठी उपयुक्त ठरतो. वेळोवेळी पट्ट्याची स्थिती तपासणे आणि योग्य ताणाने बांधणे गरजेचे आहे. सरकारने हेल्मेट पट्टा न बांधणार्यांवर दंडात्मक कारवाई करून प्रसारमाध्यमांद्वारे जनजागृती मोहिमा राबविल्या पाहिजेत.
हेल्मेट व्यवसायात फार भांडवल गुंतवायचं नसेल तर योग्य ब्रँड निवडून हेल्मेटची एजन्सी घेणे हा चांगला पर्याय आहे. हेल्मेटविक्रीचे दुकान काढताना स्थानिक बाजारपेठेतील मागणी, ग्राहकांची आवड यांचा विचार करावा. दुकान शक्यतो सायकल पार्ट्स विक्री किंवा मोटर सायकल दुरुस्ती मार्केटजवळ उघडावे. एजन्सी घेतल्यानंतर दुचाकी विक्रेते, स्थानिक डीलर्स यांच्याशी संपर्क साधावा, दुकानाच्या प्रचारासाठी सोशल मीडिया आणि स्थानिक जाहिरातींचा उपयोग करावा. हेल्मेटच्या एजन्सीमध्ये नफा मुख्यतः विक्रीच्या प्रमाणावर, निवडलेल्या ब्रँडवर आणि उत्पादनाच्या श्रेणीनुसार ठरतो. साध्या हेल्मेटवर प्रति युनिट ४०० ते ६०० रु. नफा मिळतो तर प्रीमियम हेल्मेट्सवर १००० ते १५०० रुपये आणि स्मार्ट हेल्मेट्सवर २००० किंवा त्याहून अधिक नफा मिळतो.
भारतीय हेल्मेट उद्योग हा केवळ देशातील सुरक्षा सुधारण्यात योगदान देणारा नसून जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करणारा अग्रगण्य उद्योग आहे. कोविडनंतर हवी ती वस्तू घरपोच पोहोचवणारे ई-कॉमर्स आणि दहा मिनिटात वस्तू हजर करणार्या क्विक कॉमर्स व्यवसायात मोठी वाढ झाली. या सेवा पुरवणार्या डिलिव्हरी पार्टनर्सकडून दुचाकी वाहनांची मोठी मागणी आली. स्वाभाविकच हेल्मेटची विक्रीही वाढली. २०२३-२४मध्ये भारताने तडाखेबंद २० लाख दुचाकी विकल्या. मागील वर्षांच्या तुलनेत ही १६.६ टक्के वाढ होती. भारतात दरवर्षी अंदाजे दोन ते अडीच कोटी हेल्मेट्स विकली जातात. २०३०पर्यंत या विक्रीत सात ते आठ टक्के वार्षिक वाढ होऊन हेल्मेट विक्री तीन ते साडेतीन कोटींपर्यंत पोहोचेल. हवेशी स्पर्धा करणार्या दुचाकीस्वारांची सुरक्षितता जपणार्या या व्यवसायात खबरदारी घेऊन उतरलात तर व्यवसाय प्रवास सुखकर होईल.