मार्मापव्हा गाव. मॉरिषच्या दुर्गम डोंगर रांगांतलं एक टुमदार खेडं. सफेद चुन्याच्या रंगात रंगलेल्या भिंती आणि त्यामधून खळाळत वाहणारी गटार हे गावचं विहंगम दृश्य. गावाला तसा समृद्ध इतिहास. गावात बाकु, माकू आणि टाकू अशा तीन जमातींचं वास्तव्य. गाव तसं कमालीचं लिबरल. इतकं की बाकु जमात आपलं परंपरागत कारकुनीचं काम करतेय, माकू शेती आणि उद्योग तर टाकू जमात सफाई आणि हलकी समजणारी कामं करतेय. गावाची रचना सुद्धा त्याचप्रमाणे आहे. गावाच्या मध्यात बाकु, बाजूने माकू तर वेशीवर टाकू राहताय. पण सारेच आपली जमात वरकड असली तरी आम्ही दुसर्या आणि तिसर्याप्रती समान नजरेने बघतो. आणि एकोप्याने राहतो. म्हणजे जमातवाद पाळत नाही, म्हणून पाठ थोपटून घेतात.
ह्या मार्मापव्हा गावात एक मोठं चर्च. चर्चमध्ये एक फादर, काही पाद्री आणि नन वगैरे प्रभू येशूचे सेवक.
एवढ्यात गावच्या चर्चसमोर क्रांतिकारक डेव्हिड थॉमसनचा पुतळा उभारला गेलाय. घोड्यावर रुबाबात बसलेला. एक हातात चप्पल उंचावलेली, उग्र मुद्रेतील. तो बघण्यासाठी देशविदेशातील अभ्यासक मंडळी पर्यटन करत येतात. तद्वत स्लाव्ह देशीचे इतिहास अभ्यासक लावरोव आलेत. त्यांना गाडल्या गेलेल्या जीवाश्मांपेक्षा उभारल्या गेलेल्या पुतळा अभ्यासण्याचं आणि त्यावर संशोधन निबंध लिहिण्याचं भयानक वेड. त्यांचं संशोधक, अभ्यासक वर्तुळात एक प्रसिद्ध वाक्य त्यांच्या कामाची रीत सांगायला पुरेसं आहे. ‘दगडात गाडली गेलेले जीवाश्म पुतळ्यातून पुन्हा अंकुरणार नसतील, तर ते कुजलेली, किडलेली वा टाकाऊच आहेत असं समजावं. ते अभ्यासण्यात वेळ घालवणं तद्दन मूर्खपणाच म्हणावा.’
तर लावरोव महोदय गावात आल्याबरोबर बर्म्युडा पँट आणि हॅट घातलेले उघडेबंब मेयर फर्डीनंड गावच्या वेशीवर लावरोवचं स्वागत करतात. त्यांना मेयर हाऊसवर घेऊन जातात. पण इतिहास अभ्यासण्याचा किडा लावरोवना स्वस्थ बसून देत नाही. एक गिलास वाइन सेवन आणि चारदोन स्ट्रॉबेरी चाखल्यावर ते मेयर हाऊसवरून तडक चर्चकडे येतात.
‘मी काय म्हणतो? आपण हिस्ट्री नंतर अभ्यासली असती ना? एकदा डिनर वगैरे करून?’ लावरोवच्या मागे धावत आलेले फर्डीनंड रिक्वेस्ट करून बघतात.
‘हो, म्हणजे इतर अभ्यासक इतिहासाचं पार्ट टाइममध्ये डिसेक्शन करत असतील. पण मी फुल्ल टाइममध्येच करतो,’ एक जाड भिंग घेऊन ते पुतळ्याच्या हातातील चप्पल न्याहाळू लागतात.
‘कदाचित विश्लेषण शब्द अपेक्षित असेल तुम्हाला नाही?’ फर्डीनंड सुधारणा सुचवू बघतो.
‘ह्या डेव्हिड थॉमसनच्या हाती चप्पल का आहे?’ ते मात्र पुतळा अभ्यासण्यावर ठाम रहात सवाल करतात.
‘म्हणजे बघा, आमच्या गावाला इतिहासात असल्यापासून इतिहासाचं वेड फार. आधी आमच्या गावात पोवाडे रचणारे भाट जन्मले, मागाहून इतिहासपुरुष,’ फर्डीनंड इतिहास पुस्तकाची प्रस्तावना उघडतो.
‘तुम्ही विषयावर बोला हो. एकतर एवढा इंटरेस्टिंग पुतळा मी उभ्या जगात बघितला नाहीय. मला त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. आणि तुम्ही वेगळंच सुरू केलंय…’ लावरोवची भाबडी अपेक्षा.
‘सांगतो हो! कुठलीही गोष्ट पायरी पायरीने समजून घेतली तर कळेल ना? त्यासाठी पार्श्वभूमी तर तयार करावीच लागेल ना?’ फर्डीनंड पुतळ्यापुढच्या चौथर्यावर बुड टेकत वर्ग भरवतात.
‘बोला, सांगा!’ लावरोव एक पाऊल मागे घेतो.
‘तर हे आमच्या गावचे आद्य क्रांतिकारक डेव्हिड थॉमसन! यांनी फार मोठा लढा उभारला. त्याची परिणती पुढे जुलमी रेड इंडियनची सत्ता उलथवण्यात झाली. आणि गोर्या लोकांना वसाहतवादापासून मुक्ती मिळाली…’ फर्डीनंड कॅसेट भाग १ चालू करतो.
‘पण ही चप्पल..?’ नजरेत अडकलेली चप्पल लावरोवला बेचैन करते.
‘तेच डेव्हिड थॉमसनने रेड इंडियनवर चल भाग आंदोलनाच्या वेळी उगारलेली ही चप्पल आहे…’ फर्डीनंड माहिती देतो.
‘पण त्यांची मूर्ती घोड्यावर बसलेली का आहे?’ थॉमसनची शंका.
‘आमच्या गावात दोन मतप्रवाह आहेत. काहींच्या मते थॉमसन यांनी शांततेच्या मार्गाने हट्टाग्रह करत लढा उभारला. तर काहींच्या मते त्यांनी सशस्त्र क्रांती उभारली. दुसरं मत ज्यांचं आहे, त्यांनी पुतळ्याखाली घोडा घातला. पहिलं मत असलेल्यांनी त्यांच्या हातात चप्पल दिली,’ फर्डीनंड चौथर्यातल्या विटा दात कोरणीने टोकरत माहिती देतो.
‘पण खरं आहे काय? कुणी सत्यावलोकन नाही केलं का?’ लावरोव तळमळीने विचारतो.
‘कोण करील? ते पडले माकू जमातीचे! शेतकरी गडी! त्यांनी उभ्या आयुष्यात दोन पत्र लिहिली. एक इंटर्नच्या पेपरमध्ये. दुसरं मैत्रीण लॉराला प्रपोज करण्यासाठी. त्यांची सवंगडी अडाणी मंडळी. अंगठेछाप! त्यात रेड इंडियनची केकची भाषा शिकणं धर्मात निषिद्ध कृत्य मानलं गेलेलं. काही सुधारणावादी मंडळीच काय ती केकची शिकून दरबारी कारकुनी करू लागलेली. त्यात बाकु जास्त. त्यांच्यात माकू लीडरबद्दल असूया, द्वेष, तिरस्कार फार! त्यामुळे समकालीन बाकुंनी आपल्या लिखाणात डेव्हिड थॉमसनविषयी काहीही लिहिलं नाही. त्यामुळे कुठलीही लिखित साधनं आज उपलब्ध नाहीत,’ फर्डीनंड हळहळतो.
‘पण त्यांचे सखे-सवंगडी असतील की? त्यांना भेटून काही..?’ लावरोवकडून उलटतपासणी चालू होते.
‘आता तसे सो-कॉल्ड सवंगडी फार. त्यात खरे किती आणि कोण हे ठरवणं फार जिकिरीचं काम! त्यात्ा थॉमसन यांच्या निधनाला १५० वर्षे उलटलीत. तेव्हा…’ दातकोरणीने सिमेंटचे खडे फोडून वीट मोकळी करत फर्डीनंड इतिवृत्त ऐकवतो.
‘हे काय? पुतळ्याची अर्धी मिशी आहे कुठे?’ लावरोव भिंगाने चेहरा बघू लागतो.
‘मुळात काही स्वच्छतावादी इतिहासतज्ज्ञांच्या मते सगळी इतिहासपुरुष मंडळी साफसूफच असायची. किंवा दाखवायला हवीत. म्हणजे समाज हा स्वच्छतेची पूजा करेल. म्हणून त्यांनी पुतळ्याच्या मिश्या हटवल्या होत्या. पण आदी गोरेजनवादी विचारांच्या तरुणांनी आमचे समाजपुरुष बिनामिशीचे दाखवून अवमान केला, म्हणून आंदोलन उभारलं. आणि शेवट समेट घडून पुतळ्याचं वाटप होऊन अर्धी मिशी बसविली गेली,’ एव्हाना अर्धी वीट सिमेंटमधून मोकळी होते.
‘ओह जीजस! काय ही एक क्रांतिकारकाची दशा? बरं डेव्हिड थॉमसन विषयी काही बुकं वगैरे उपलब्ध आहेत की नाही?’ लावरोव साहित्यातील डेव्हिड शोधू लागतो.
‘आहेत ना! त्यांच्या लाईफवर मागे एक प्ले आलेला. व्हिक्टोरियाज लव्हर नावाने. त्यात डेव्हिड बाथरूममधून बाहेर येतो आणि तसाच व्हिक्टोरियाला उचलून आत घेऊन जातो, असला काही सीन होता. केवळ त्यासाठी आंबटशौकीन प्रेक्षक जमायचे. आता गोरेजनवादी लोकांनी हे भोग-विलासी चित्र चुकीचं असल्याचं सांगत त्या प्लेच्या ऐंशी वर्षांच्या लेखकाला भर बाजारात हाणलं होतं. तेव्हापासून तो प्ले बंद आहे,’ फर्डीनंड सांगतो.
‘दुसरं काही..?’ लावरोव भिंगातून फर्डीनंडकडे बघतो.
‘हो, तसे वीसेक नॉवेल, बुक्स आहेत. पण काहींत क्रांतिकारक लफंगा, बदमाश, स्त्रीलंपट वगैरे रंगवला गेलाय,’ फर्डीनंड!
‘पण कुणीच ऐतिहासिक साधनांचा आधार घेत डेव्हिडबद्दल लेखन का केलं नसेल?’ भिंगापलीकडला लावरोवचा सवाल.
‘काय आहे ना? डेव्हिडनं त्याच्या आयुष्यात अगदी सुरुवातीला बाकुंची माणसं मारली होती म्हणतात. त्यामुळे बाकुंमध्ये त्यांच्याविषयी तिरस्कार भरला गेलाय. त्यामुळे ती जे लेखन करतात, त्यात त्याची बदनामी तरी असते किंवा हेटाळणी तरी. आणि दफ्तरीची कागदपत्रे मिळवणं बाकुंना सहजसाध्य आहे. त्यांनी ती मिळवली. त्याचे मनाजोगते अर्थ लावून इतिहास बाटवला. एक साधा योद्धा त्यांनी काळानिळा रंगवला. त्यातून दुसर्या पक्षाची मंडळी इरेला पेटली. त्यांनी इतिहास तद्दन ढवळा-साफ रंगवला. विकृती हटवण्याच्या नादात त्यांनी डेव्हिड क्रांतिकारी घडवला. संप-आंदोलन करून स्वातंत्र्य मिळवणारा डेव्हिड हाती तरवार घेऊन रेड इंडियनना चिरताना दाखवला. त्यातूनच हा घोडा आलाय,’ फर्डीनंड दातकोरणीने घोडा दाखवत बोलतो.
‘आणि फितुरी? फितुरी केली कुणी? डेव्हिडचा शेवट झाला कसा?’ लावरोवचा बहुतेक शेवटचा प्रश्न.
‘डेव्हिड त्या दिवशी स्टेप ब्रदरबरोबर ब्रेकफास्ट घेत होता आणि अचानक तिथे रेड इंडियन आले. त्यांनी त्याला चौकात नेऊन बेछूट गोळीबार केला, आणि त्याला ठार केलं. काही म्हणतात, ब्रेकफास्ट घेत असताना स्टेप ब्रदरने घात केला तर काही म्हणतात मैलोनमैल चालून आलेल्या रेड इंडियनना जवळचा कुणी बाकु कारकून फितूर होता वगैरे! पण खरं बोलू?’ मोकळी झालेली वीट हातात घेत फर्डीनंड विचारू जातो.
‘बोल की!’ लावरोव परवानगी देतो.
‘इतिहास हा समांतर रेषांत दाखवणं शक्यच नाहीय. त्यात मानवी स्वभाव कमालीचा लोभी. त्या लोभापायी रोज एक इतिहासपुरुष उकरून त्यांना रुजवू घालणं, कितपत योग्य? वर ज्या चौथर्यांवर इतिहासपुरुष उभा केला जाणार असतो, तो पायाच मुळात भुसभुशीत घेऊन त्यांना थोडक्या दिवसांत पुन्हा मातीतच गाडायचं असेल तर त्यांना उभं केलं का जातं असेल?’ विचारता विचारता फर्डीनंड वीट हवेत भिरकावतो.