नाशिकला पंचवटी पोलीस ठाण्यात (नाव बदलेलेले आहे) काम करीत होतो. एका सकाळी मुंबई हायवेजवळ श्री भैरव मंदिराच्या माथ्यावरजवळच एका महिलेचे प्रेत पडलेले असल्याची खबर आली. मृतदेह महिलेचा असल्याकारणाने ठाणे अंमलदाराने फोन करून माहिती कळवली. ताबडतोब खासगी वाहनाने घटनास्थळी आलो.
महिला गोर्या रंगाची, देखणी, वय तीस ते बत्तीस वर्षाची होती. अंगावर पंजाबी गडद रंगाचा ड्रेस होता. पायात फॅन्सी चपला घातलेल्या होत्या. अंगावर कुठेही गोंदवलेले नव्हते. मृतदेहाच्या जवळपास पर्स वगैरे काहीही मिळाली नाही. आजूबाजूला जंगलाचा परिसर होता, तेथे शोध घेतला पण काहीही मिळाले नाही. मृतदेहाच्या व आजुबाजूच्या घटनास्थळाचे फोटो काढण्यात आले. डॉग स्क्वाड बोलविण्यात काहीही अर्थ नव्हता, कारण संशयितांची कुठलीही वस्तू त्या ठिकाणी मिळालेली नव्हती. मृतदेह हायवेपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर कच्च्या रस्त्यावर पडला होता. त्या रस्त्यावर कारचे टायर मार्क्स उमटलेले होते. ताबडतोब महिला पंच बोलवून घेतले आणि मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आला. मृतदेहाला कुठेही जखमा झाल्या नव्हत्या. परंतु गळ्यावरील लाल रंगाच्या मार्कवरून तिला गळा आवळून ठार मारल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. मृतदेहाची ओळख पटेल असे काहीही तेथे मिळून आले नाही.
अँब्युलन्स बोलावून मृतदेह सरकारी हॉस्पिटलला आणण्यात आला. पोस्टमार्टेम झाले, डॉक्टरांनी गळा आवळून खून झाल्याचे अॅडव्हान्स्ड सर्टिफिकेट दिले. मृतदेहाच्या अंगावरील कपडे व पायातील पैंजण जप्त करण्यात आले. अंगावरील कपडे,अंतर्वस्त्रे, पैंजण व चपला फारच भडक रंगाच्या अति फॅशनेबल होत्या. मयत स्त्रीचे फोटो व माहिती वर्तमानपत्रात देण्यात आली. सगळ्या पोलीस ठाण्यांना व नजीकच्या जिल्ह्यांना फॅक्सने तसेच मोबाइलवरूनही मयत स्त्रीचे फोटो व माहिती पाठविण्यात आली, परंतु मयत महिलेची ओळख पटावी असे काहीही पुढे आले नाही.
दुसर्या दिवशी पोस्टमार्टेम नोट्स मिळाल्या, त्या घेऊन पोस्टमॉर्टेम करणार्या डॉक्टरांकडे गेलो. चर्चा करताना त्यांनी सांगितले की, महिलेचा मृत्यू १८ ते २४ तासांच्या आतल्या काळात कपड्याने गळा आवळून झालेला आहे. व्हिसेरा (अन्नांश) पुढील तपासणीसाठी राखून ठेवण्यात आलेला होता. तिने भात खाल्लेला होता आणि तो भात लाल व जाड तांदळाचा होता. जेवण २४ तासांपूर्वी घेतलेले असावे, तसेच तिच्या पोटात मद्यार्कपण मिळाल्याचे त्यामध्ये निष्पन्न झाले होते.
पोलिस स्टेशनला आलो आणि डिटेक्शनची सगळी टीम बोलावली. सगळ्यांना मिळालेली माहिती दिली. चार-पाच प्रश्न डोक्यात निर्माण झालेले होते, तेही सर्वांपुढे मांडले.
१- लाल भात महाराष्ट्रात खाल्ला जात नाही, तो आंध्र, तामिळनाडू, केरळ येथे खातात. तो जवळपास कुठल्या हॉटेलवर मिळतो?
२- चेहर्यावरून व अंगकाठीवरून ती केरळी असावी का? तिचा व्यवसाय काय असावा?
३- जेवल्यानंतर तिचा मृत्यू झालेला होता, म्हणजेच मृत्यूचा काळ सोळा ते अठरा तास यापूर्वीचा होता. त्यातही डेड बॉडी रात्री उशिरा टाकलेली असावी. म्हणजेच नाशिकपासून तीन चार किलोमीटर अंतरावर तिचा मृत्यू झाला असावा का?
चर्चेनंतर ती केरळी असावी असा निष्कर्ष काढण्यात आला. तसेच केरळी महिला स्टाफ नर्स म्हणून हॉस्पिटलमध्ये काम करतात, तेथे तपास करावा असे ठरले. परंतु महिलेचे कपडे, चपला अति फॅशनेबल होत्या, त्यावरून ती वेश्या असावी असा वहीम होता. म्हणून जेथे वेश्या व्यवसाय चालतो तेथेही तपास करावा असे ठरले. त्याप्रमाणे टीम्स तयार करण्यात आल्या. पाच-दहा किलोमीटरच्या जवळपास लाल जाडा भरडा तांदळाचा भात मिळणारे हॉटेल मिळाले नाही. हॉस्पिटलमध्येही काहीही माहिती मिळाली नाही. शहर व इतर भागांतील तशा वर्णनाची महिला मिळून आली नाही.
मुंबईत अशा प्रकारचा भात मिळणारी हॉटेल्स होती, म्हणुन मुंबईत तपास सुरु केला. सुदैवाने तिसर्या-चौथ्या दिवशी मुंबईतील एका आंध्र केरळ टिफिन हॉटेलमध्ये एका वेटरने मयताचा फोटो ओळखला. तिच्याबरोबर एक पुरुष होता आणि दोघांत भांडणे चाललेली होती. ते दोघेही दारू पीत होते, त्यामुळे ते वेटरच्या लक्षात राहिले होते. तो पुरुष अधूनमधून मराठीत बोलत होता एवढी महत्त्वाची माहिती मिळाली. हॉटेलला सीसीटीव्ही होता, परंतु तो बंद होता.
आता तपासाची दिशा निश्चित झाली होती. मराठी माणूस काही लाल तांदळाचा भात खात नाही म्हणजेच त्या बाईच्या पसंतीने हॉटेल निवडण्यात आले असावे. मुंबईत वेश्या वस्तीत जेथे केरळ व तामिळनाडूतिल स्रिया वेश्या व्यवसाय करतात तो भाग टार्गेट करण्यात आला. दोनच दिवसांत महिलेचा ठावठिकाणा मिळाला. तिचे नाव रोझी (बदललेले आहे) होते. ती केरळची होती आणि ५-६ वर्षांपासून त्या वेश्यालयात देहविक्री करीत होती. तेथे मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे सात आठ महिन्यापूर्वी त्या महिलेचे आणि एका गिर्हाईकाचे प्रेमसंबंध सुरू झाले. त्या इसमाचे नाव दीपक शेठ (नाव बदललेले). तो ठाण्याचा राहणारा असून वाळूचा मोठा कंत्राटदार होता. आपण रोझीला ठेवून घेणार आहोत, असे त्याने दोन महिन्यांपूर्वी वेश्यालयाच्या मालकिणीला सांगितले होते आणि रोझीच्या बदल्यात सहा लाख रुपये मालकिणीला द्यायचे कबूल केलेले होते. तसेच तो रोझीला दर महिन्याला खर्च म्हणून ७५ हजार रुपये देऊ लागला होता. आठवड्यातून दोन, तीन वेळा तो येत असे. रोझीने त्याच्याव्यतिरिक्त दुसर्या कोणाशीही संबंध ठेवू नयेत, अशी अट त्याने घातली होती.
अलीकडे काही दिवसांपासून दीपक शेठ आणि रोझी या दोघांमध्ये, तू दुसरे ग्राहक करते (म्हणजे अन्य व्यक्तीशीही शरीरसंबंध ठेवते), या संशयावरून भांडणे सुरू झाली होती. परंतु मालकिणीने मध्यस्थी करून भांडण मिटविले होते. त्यांचे पुन्हा पूर्ववत प्रेमसंबंध सुरू झाले होते. परंतु त्याला पुन्हा तिचा संशय येऊ लागल्याने त्याने आपला मित्र अब्दुल शेख याला डमी ग्राहक म्हणून तिच्याकडे पाठविले आणि ती फसली. आठ दिवसांपूर्वी दीपक तिथे आला आणि तिला फार्महाऊसवर नेतो असे सांगून घेऊन गेला. या पूर्वी अनेक वेळा ती त्याच्याबरोबर फार्महाऊसवर गेलेली होती, त्यामुळे कोणाला काहीही संशय आला नाही.
त्याचा मोबाईल नंबर त्याने मालकिणीकडे दिलेला नव्हता. त्याच्याकडे पांढरे रंगाची ऑडी कार आहे आणि तो ठाण्यात राहणारा आहे, एवढीच माहिती मालकिणीला होती. आम्हाला तिथे रोझीचा मोबाइल नंबर मिळाला. मोबाइल तिने बरोबर नेला असल्याचेही समजले. तिच्या मोबाईलच्या सीडीआर वरून दीपक शेठचा नंबर आणि मग पत्ता शोधायला अवघड गेले नाही. ठाण्यातून त्याला उचलून आणले. काही वेळातच तो पोपटासारखा बोलायला लागला.
त्याच्याकडे खाडीतून वाळू काढण्याची मशिनरी होती आणि त्यातून त्याला भरपूर पैसा मिळत होता. आधीपासून त्याला वेश्यांकडे जायची सवय होती. रोझी दिसायला देखणी होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याने त्याने रोझीसाठी ठाण्यात स्वतंत्र फ्लॅट घेतलेला होता, तेथे तो रोझीला ठेवणार होता. परंतु ठरल्याप्रमाणे रोझी त्याच्याशी प्रामाणिक न राहता वेश्या व्यवसाय करीत असल्याचे त्याला कळले होते. त्यावरूनच त्यांची भांडणे होत होती, ती मालकिणीने त्यांच्यात समझौता करून मिटविली होती. परंतु संशयाचा किडा त्याचे डोक्यात वळवळतच होता. यासाठी मित्राला ग्राहक म्हणून पाठवल्याने त्याची खात्रीच झाली. त्याच्या डोक्यात रोझीविषयी प्रचंड राग निर्माण झाला. खरे खोटे करून तिला उघडे पाडावे यासाठी त्याने प्लॅन केला आणि तिला गोड बोलून फार्महाऊसवर जायचे म्हणून बाहेर काढले. तिला पसंतीच्या आंध्र केरळ टिफिन हॉटेलमध्ये नेले तेथे ते दारू प्यायले आणि जेवले. डोक्यातील विषयाला तेथे सुरुवात झाली. त्यांच्यात भांडणे सुरू झाली. जेवणाचे बिल देऊन ते हॉटेलबाहेर आले. ड्रायव्हरने गाडी सुरू केली काही अंतर गेल्यानंतर ठरल्याप्रमाणे त्याचा मित्र अब्दुल शेख रस्त्यात उभा होता, त्याला गाडीत घेतले. त्याला पाहिल्यानंतर रोझीला सारे कबूल करावेच लागले त्यानंतर काही अंतर गेल्यावर दीपक शेठ व अब्दुल शेख या दोघांनी तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळून, फास देऊन तिचा खून केला. त्याचा तपास लागू नये म्हणून कसारा घाटातून ते नाशिकला रात्री एक वाजायच्या सुमारास आले. तिचा मृतदेह घटनास्थळी टाकला, वाटेत मोबाइल फेकून दिला. या जागेवर ते पूर्वी आलेले नव्हते. परंतु अंदाजाने कच्चा रस्ता बघून, तेच जंगल समजून तेथे मृतदेह टाकला. परंतु तो मृतदेह सकाळी गावाकडून नाशिककडे जाणार्या दूधवाल्याने बघितला आणि पोलीस स्टेशनला कळविले.
दीपक शेठ, अब्दुल शेख व ड्रायव्हर यांना अटक करण्यात आली. कार व मोबाइल जप्त करण्यात आले. सगळ्यांचे मोबाइलचे लोकेशन घडल्या घटनेप्रमाणे बरोबर होते. तपास पूर्ण झाला आणि अशा रीतीने लाल तांदळावरून रोझीच्या खुन्याचा शोध लागला.
(लेखक पुण्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत.)