न्यूयॉर्कमधल्या कार्नेगी सभागृहात युक्रेनमधील युद्धग्रस्त मुलांच्या मदतीसाठी कार्यक्रम चालू होता. सभागृहाच्या एका कोपर्यात वाईन ठेवली होती. पैसे द्यायचे, वाईनचा ग्लास घ्यायचा. अमेरिकेत काहीही फुकट मिळत नाही.
एका महिलेनं एक ग्लास चमकदार वाईन घेतली. तिला २४ डॉलर मोजावे लागले. एका ग्लासला २४ डॉलर म्हणजे फार होते. विकत घेतलीच आहे तर वाईन चाखावी म्हणून महिलेनं वाईन तोंडात घोळवत असताना तिथं हजर असलेल्या आयोजकांना सहज विचारलं की प्रस्तुत वाईन कुठली?
आयोजकांनी सांगितलं की ही वाईन युक्रेनमधली, बाखमुटमधली आहे. शँपेनसारखी वाटत असली तरी ही वाईन ‘शँपेन’ नाही. ही आहे ‘सोलोकिंग’, युक्रेनी वाईन. आयोजकांनी तपशीलही सांगितला. क्रायमियातल्या खास द्राक्षांपासून ती तयार केलीय. द्राक्षांचं वाण आणि वाईन तयार करण्याची पद्धत प्रâान्समधल्या शँपेन प्रांतातल्या शँपेनकडून घेण्यात आलीय. सुमारे २५० वर्षे ही वाईन तयार होतेय. ती महिला घेत होती ती वाईन २०१२ सालच्या द्राक्षांपासून २०१३ साली तयार केलेली होती आणि सहा वर्षं मुरवल्यानंतर ती बाजारात आली होती.
यात काय विशेष?
वाईनच्या सुमारे ७० हजार बाटल्या तयार होत्या, त्यातल्या १० हजार बाटल्यांची मागणी २०२१ साली अमेरिकन आयातकांनी नोंदवली. गोची झाली. २०२२ साल उजाडलं. रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं. बाखमुट विभाग रशियाच्या सरहद्दीवर आहे. बाखमुटवर बाँबिंग झाले, रशियन रणगाड्यांनी गोळाफेक केली. शहरात एक इमारत शिल्लक ठेवली नाही. पण बाखमुटमधली वायनरी मात्र शाबूत ठेवली. जमिनीखाली २३६ फुटावर असलेल्या वायनरीवर बाँब टाकायचे नाहीत, तोफा डागायच्या नाहीत अशा सूचना सैन्याला देण्यात आल्या होत्या. त्या सूचना अर्थातच लेखी नव्हत्या. तोंडी होत्या.
पुतीननी वायनरीवर कृपा का केली? कारण पुतीनना ती वायनरी प्रिगोझीन नावाच्या त्यांच्या मित्राला द्यायची होती. प्रिगोझीनचं एक खाजगी सैन्य होतं. ते पुतीनच्या वतीनं युक्रेनमध्ये लढत होतं. त्या सैन्याला काही मोबदला द्यावा लागणार होता. बाखमुटची वायनरी हा तो मोबदला होता.
या वायनरीला एक मोठ्ठा इतिहास आहे.
रशियाला वाईन तयार करण्याचा इतिहास आहे, फ्रेंच वाईनइतकाच जुना. फ्रान्समध्ये डॉम पेरेनॉन ही वाईन तयार झाली तेव्हा पाठोपाठ काही काळानं तशीच वाईन रशियात तयार होऊ लागली. तीच द्राक्षं, तशीच उत्पादन प्रक्रिया, तशीच चमकदार सोनेरी वाईन. सोविएत युनियन झाल्यावर सोविएत सरकारनं या वाईनचं नावच सोविएत शँपेन असं ठेवलं. पण या रशियन वाईनला बाजारात डॉम पेरेनॉनची प्रतिष्ठा नव्हती.
जे असेल ते असो, पण रशियन चमकदार वाईन ‘सोवियेत शँपेन’ या नावानं बाजारात विकली जात असे. रशियन जनता मद्यप्रेमी आहे. इतकी मद्यप्रेमी की दारुडी आहे असंही म्हणायला हरकत नाही. दारू पिण्यासाठी रशियन माणूस सतत कारणं शोधत असतो. कधी फार बर्फ पडलंय म्हणून पितो, तर कधी पूर्वजांच्या आठवणी आळवण्यासाठी कबरीसमोर बसून दारू पितो. मुख्य मुद्दा दारू पिणं. रशियाचे एक अध्यक्ष येल्तसिन दिवसभर दारू पीत असत. कित्येक वेळा एखाद्या परदेश प्रमुखाशी फोनवर बोलत असताना दारूकाम सुरू असे आणि दारू इतकी चढलेली असे की त्यांच्या हातातून फोन निसटत असे, पडत असे, पलिकडला माणूस हॅलो हॅलो करत फोन ठेवत असे.
क्रांती झाल्यावर, स्टालीनचं राज्य सुरू झाल्यावर, कम्युनिस्ट राज्यकर्त्यांना वाटलं की जनतेला दारूच्या व्यसनातून मुक्त केलं पाहिजे. सरकारनं दारूबंदी लागू केली. दारूबंदीला एक तात्विक किनारही होती. शँपेन (देशी किंवा फ्रेंच) फक्त श्रीमंत लोकच पिऊ शकत होते. तेव्हा श्रीमंतांची ठासण्यासाठी दारू-वाईन बंद.
गरीब माणसाला भाकरी मिळाली पाहिजे, दारू नव्हे.
पण लोक दारू पिणं थोडंच सोडणार होते. चोरटी दारू सुरू झाली. त्यातच रशियात मोठ्ठा दुष्काळ झाला. लाखो माणसं मेली. हाहाकार माजला. उपासमार झाली. आता लोकांच्या हातात पैसे पडायला हवेत यासाठी रोजगाराची नवी साधनं निर्माण करायला हवी होती. शिवाय हैराण झालेल्या लोकांना काहीतरी विरंगुळा, मानसिक आधार हवा होता. सोपे मानसिक आधार म्हणजे देवधर्म आणि दारू. पैकी देवधर्माचं नावच काढायला नको, कारण कम्युनिझमला देवधर्म मंजूर नव्हता. उरली दारू. स्टालीननं स्वस्त दारूचे कारखाने काढायचे आदेश दिले.
हा १९३६च्या आसपासचा काळ होता.
बाखमुटमध्ये जमिनीत खोलवर वायनरी काढायचा आदेश जारी झाला, वाईन उत्पादनाला सुरूवात झाली.
पण वाईनचं नशीब खडतर होतं. १९८५च्या सुमाराला पुन्हा रशियन सरकारला रशियन जनतेचा मद्यखुळेपणा आटोक्यात आणावासा वाटला. पुन्हा दारूबंदी. या काळात बाखमुटमधे वाईन तयार होत होती की नाही? माहीत नाही. पण वायनरी बंद झाली नसण्याची शक्यता आहे. नंतर पुतीननं पुन्हा वाईननिर्मितीला चालना दिल्यानंतर वायनरी भरभराटली असणार. १९९०मध्ये गोर्बाचेव यांनी गोंधळ घातला, सोविएत युनियन विस्कटलं, १९९१मध्ये युक्रेन सोविएत युनियनपासून वेगळा झाला. आता बाखमुटची वायनरी युक्रेनची प्रॉपर्टी झाली.
तर अशा रीतीनं रशियाचं आक्रमण सुरू झालं तेव्हा बाखमुटमधली वायनरी वाईन तयार करत होती. बाखमुटवर बाँबफेक सुरू झाली. आता पंचाईत अशी की अमेरिकेची १० हजार बाटल्यांची मागणी पूर्ण कशी करायची? वायनरी शाबूत होती, पण वायनरीचा परिसर, अख्खं बाखमुट शहर तोफगोळ्यांनी दणाणत होतं. बाखमुटचा प्रदेश सोडला तर बाकीचा युक्रेन झेलेन्सकी चालवत होते, बाकीच्या युक्रनमध्ये शेती होत होती, बाकीच्या युक्रेनमधून गहू व इतर वस्तू निर्यात होत होत्या. अडचण अशी की बाखमुटच्या भूमिगत वायनरीतल्या १० हजार बाटल्या काढून त्या युक्रेनमध्ये इतरत्र न्यायच्या कशा? वायनरी ते रेल्वे स्टेशन. रेल्वे वाघिण्या युद्धग्रस्त विभागातून सुरक्षित बाहेर काढायच्या.
युक्रेनच्या लोकांनी तो उद्योग जिवाच्या आकांतानं पार पाडला. एक तर युक्रेनला निर्यातीतून पैसे मिळवण्याची आवश्यकता होती. दुसरं म्हणजे वाईनसारखी पवित्र गोष्ट. ती वाईनसाठी तहानलेल्या भक्तांपर्यंत पोचवायची होती. सभोवताली तोफगोळे पडत असताना कंटेनर सुरक्षितरीत्या बाहेर पडले आणि शेवटी अमेरिकेत पोचले.
कार्नेगी हॉलमधले लोक असोत की आणखी कुठलेही, कॅलिफोर्निया किंवा टेक्सासमधले लोक असोत. त्यांना रशियन वाईन आवडत नाही. शँपेन म्हणजे शँपेन, सोलोकिंग म्हणजे शँपेन नाही असं दर्दी अमेरिकन म्हणतात. कार्नेगी हॉलमध्ये जमलेले काही लोक तर आयरिश मद्य पिणारे होते. त्यांनी युक्रेनी मद्य पिताना तोंड आंबट केलं. पण तरीही कार्नेगी हॉलमधला सोलोकिंगचा साठा संपला असावा. कारण आता युक्रेनच्या शँपेनला राजकीय आणि सामाजिक रुप मिळालं होतं. युक्रेनची दारू प्यायची म्हणजे युक्रेनच्या युद्धाला मदत करायची. युक्रेनची शँपेन प्यायची म्हणजे युद्धामुळे अनाथ झालेल्या मुलांना मदत करायची.
सोलोकिंग एक ऐतिहासिक दारू झाली. एका बाटलीची किंमत ३ हजार डॉलरपर्यंत पोचली.
बाखमुटची वाईन अमेरिकेतल्या ग्लासात ओतली जायला लागली, तोवर अमेरिकेचं राजकारण बदललं. वाईन युक्रेनमधून निघाली तेव्हा अमेरिकेत ज्यो बायडन यांचं सरकार होतं. बायडन यांचा युक्रेनला पाठिंबा होता, रशियाला विरोध होता, रशियाचं आक्रमण अमेरिकेला मान्य नव्हतं. पण ट्रम्प निवडून आले आणि अमेरिकेचं धोरण १८० अंशात बदललं. ट्रम्प यांचा रशियाला पाठिंबा आहे. रशियानं केलेलं आक्रमण योग्य आहे असं ट्रम्प यांचं मत आहे. युक्रेनला कोणतीही मदत करायला ट्रम्प तयार नाहीत. सार्या जगभरातून अमेरिकेत जाणार्या मालावर जकात लावायला निघालेले ट्रम्प युक्रेनला का सोडतील?
उद्या ट्रम्प युक्रेनमधल्या वाईनवर २५ टक्के जकात लावतील. तिथंच मजा येईल. अमेरिकन माणसांचा रशियाला परंपरागत विरोध आहे. बहुसंख्य अमेरिकन माणसं युक्रेनच्या बाजूनं आहेत. सोलोकिंगची किंमत २५ टक्क्यानं वाढून ४ हजार डॉलर झाली तरी लोक ती पितील, तेवढे पैसे अमेरिकन माणसाकडे आहेत. सरकारचं एक म्हणणं आणि जनतेचं दुसरं म्हणणं अशी स्थिती निर्माण होणं शक्य आहे. तसा बखेडा निर्माण झाला तर ट्रम्प काय करतील?
असो. ती स्थिती येईपर्यंत तरी अमेरिकेतले लोक ‘काठोकाठ भरू द्या प्याला, फेस तयाचा उसळू द्या’ म्हणत रशियन शँपेन पीत रहातील असं दिसतंय. फक्त बाखमुटच्या वायनरीत उरलेल्या हज्जारो बाटल्या युक्रेन कशा बाहेर काढतंय ते पाहायचं.