तुम्ही तुमची पापं धुवून काढण्यासाठी काय करता?
– यशवंत पेंढारी, सातारा
पहिली गोष्ट, पापं धुऊन काढण्यासाठी आधी ती करावी लागतात. दुसरी गोष्ट जाहीरपणे पाप धुवून काढण्यासाठी कपडे घालून डुबक्या मारल्या तरी तुम्ही पाप केलंय हे उघडं पडतं. आणि हे माहीत असताना जाहीरपणे पाप धुण्याएवढा भोंदूपणा आणि आस्तिकपणा आमच्यात नाही. (आस्तिक आणि नास्तिक दोघांनाही बॅलन्स करून उत्तर दिले आहे. उगाच कोणाची एकाची बाजू घेतल्याचं पाप आमच्या माथी नको… परत ते धुवायला १४४ वर्षांची वाट बघायला लागायची.)
आपला समाज हल्ली सतत इतिहासात का रमत असेल? वर्तमानात काय प्रॉब्लेम असेल आपल्या?
– पुष्कर चंद्रात्रे, दादर
मग लोकांनी काय भविष्यात रमायचं का? वर्तमानात ‘गॅरंटी’ देणारे तरी भविष्याची गॅरंटी देतील का? त्यापेक्षा इतिहासात दुसर्यांना रमवलं की दुसरे रमतात, आणि इतिहासात रमवणार्यांच्या वर्तमानातील वर्तनाचा आणि स्वत:च्या भविष्याचा विचार करत नाहीत… सब चंगासी… कोणालाच टेन्शन नाही. मग तुम्ही का टेन्शन घेताय?
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी माझ्या डोळ्यांसमोरून तीनचार चेहरे तरळून गेले भूतकाळातले… मन हळवं झालं… तुमच्या डोळ्यांसमोरून किती तरी चेहरे तरळून गेले असतील ना?
– मानसी येवले, पंढरपूर
आम्ही नाही सांगत बाबा!.. या गोष्टी आताच सांगितल्या आणि आम्ही पुढे जाऊन आत्मचरित्र लिहिलंच तर त्यात काय लिहायचं आम्ही? ‘तसं’ काही लिहिलंच नाही.. तर बायको तरी वाचेल का?
संतोषराव, प्रेमाचे रिचार्ज नेमके कोणत्या दुकानात मिळते हो?
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव
रिचार्ज जरूर करा, पण तुमची बॅटरी व्यवस्थित काम करते ना? (हृदयाची)… हँडसेट व्यवस्थित आहे ना? (शरीराने फिट आहात ना?) हे सगळं आधी चेक करा… रिचार्ज काय कुठेही मिळेल… नाही मिळाल्यास मिळेपर्यंत थांबा… उगाच कोणाचाही हॉटस्पॉट घेऊ नका… (मदत)… आणि दुसर्या कोणाचा डोंगल तर अजिबात वापरू नका… (सल्ला). सॉरी आम्ही न मागताच सल्ला दिलाय… कारण रिचार्जपेक्षा तुम्हाला तोच आवश्यक आहे, असं आम्हाला वाटलं. प्रेम मिळालं की माणूस रिचार्ज होतोच… प्रेमाचा वेगळा रिचार्ज असतो हे पहिल्यांदाच ऐकतोय… तुम्हाला कुठे मिळाला तर आम्हाला पण सांगा…
अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या फोटोत मला एका कोपर्यात संमेलनाध्यक्ष दिसल्या, बाकी सगळी जागा साहित्याशी वाचनापलीकडे (तोही निश्चित नाही) कसलाच संबंध नसलेल्या राजकारण्यांनी व्यापलेलं दिसलं? असं का झालं?
– मुग्धा कोरडे, वर्धा
यदाकदाचित साहित्यिकांमधले राजकारणी उघडे पडले असतील, त्यामुळे राजकारणी इनसिक्युअर्ड फील करत असतील. किंवा राजकारण्यांमध्ये साहित्यिक गुण नसतात, असं तुम्हाला वाटत असेल. कित्येक राजकारण्यांमध्ये ‘गुप्त’ साहित्यिक गुण आहेत. त्याच गुप्त गुणांना वाव मिळायला हवा… याच उदात्त हेतूने साहित्यिकांना कोपर्यात बसवून राजकारणी सेंटरला बसले असतील. (सेंटरवाल्यांना साइडला बसवायचं असं तुमचं म्हणणं आहे का? असं करून अर्बन साहित्यिक, नक्षली साहित्यिक अशी साहित्यिकांची नवीन जात निर्माण व्हावी असं वाटतं का तुम्हाला?) तुमचा प्रॉब्लेम लक्षात येतोय, थोडे दिवस थांबा… जाहीर सभेत, विधानसभेत, लोकसभेत, कॅमेर्यासमोर उधळल्या जाणार्या साहित्यिक गुणांचं जेव्हा शब्दांकन होऊन त्याची पुस्तकं निघतील, तेव्हाच तुम्हाला राजकारण्यांमधले गुप्त साहित्यिक गुण दिसतील. (सुप्त गुण माणसांमध्ये असतात… जास्त बोलणे न लगे…)
इतिहास समजून घेण्यासाठी तुम्ही काय करता? ऑप्शन ए : व्हॉट्सअप फॉरवर्ड वाचता, ऑप्शन बी : ऐतिहासिक कादंबर्या वाचता ऑप्शन सी : ऐतिहासिक सिनेमे पाहता, ऑप्शन डी : इतिहासाची पुस्तकं वाचता… द्या उत्तर…
– प्रवीण घोडके, नांदगाव
इतिहास संशोधन करणारे… आणि संशोधन न करता त्यावर बोलणारे, लिहिणारे, फिल्म बनवणारे यांचे वाद फॉलो करतो… काहीही अभ्यास न करता, न लिहिता, न बघता, न वाचता जे हवं असतं ते मिळतं आणि नको असलेलं कळतं (कशाला वाचण्यात, बघण्यात वेळ फुकट घालवायचा? आता कुठले इतिहासाचे पेपर पण द्यायचे नाहीयत की आपल्याला कुठला इतिहास घडवायचा नाहीये… टाइमपास तर हवाय आपल्याला. तो होतोय ना? बस झालं…