परवा टीव्हीवरचं चॅनल बदलता-बदलता जगद्गुरू संत तुकोबारायांवरचा एक जुना मराठी ब्लॅक अँड व्हाइट सिनेमा लागलेला दिसला! लहानपणी आम्हाला सगळ्यांना शाळेतर्पेâ हा सिनेमा दाखवला गेला होता ते आठवलं. त्या सिनेमानं माझ्या आणि माझ्या आधीच्या एका अख्ख्या पिढीवर एक असा तुकाराम ठसवला होता, जो नखशिखांत खोटा होता. ती होती त्या काळातली एक प्रोपोगंडा फिल्म… ‘संत तुकाराम’.
हल्ली छत्रपती शिवाजी महाराजांवर भारंभार प्रोपोगंडा सिनेमे येतात बघा. ज्यात फक्त मुघलांविरोधातल्या महाराजांच्या लढाया अतिरंजित करून दाखवल्या जातात… जेणेकरून नकळत मुस्लीमद्वेष पसरावा हा हेतू साधला जातो… जो कधी महाराजांच्या मनालाही शिवला नव्हता. याउलट मुस्लिमांसहित अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्यं जोपासणारे आणि रयतेसाठी ‘न्याय’ या संकल्पनेचे आदर्श उदाहरण असणारी स्वराज्यनिर्मिती करणारे शिवराय मात्र शातिरपणे लपवले जातात. तोच प्रकार तुकाराम महाराजांच्या बाबतीतही झाला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ तर म्हणायचं… ‘तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष तर करायचा… पण या महामानवांची महानता नेमकी ज्या गोष्टींत आहे ती गोष्ट मात्र शिताफीनं लपवायची, हे कपट शेकडो वर्ष खेळलं गेलंय!
‘तुकाराम म्हणजे दिवाळे निघाल्यामुळे हतबल होऊन विठ्ठलभक्तीकडे वळलेला भोळाभाबडा-व्यवहारशून्य संत, जो विठ्ठलाने पाठवलेल्या गरुडावर बसून वैकुंठाला गेला’ अशी वर्चस्ववाद्यांनी पूर्वीपासून निर्माण केलेली प्रतिमा या सिनेमानं जनमानसामध्ये घट्ट बसवली! उदाहरणादाखल तुम्हाला ‘संत तुकाराम’ सिनेमातला एक सीन सांगतो. सीन असा आहे की तुकोबा एका शेतकर्याच्या शेताची राखण करत असतात. राखण करता-करता विठ्ठलाचं भजन आळवण्यात ते इतके दंग होतात की गुरंढोरं शेतात घुसून शेताची नासधूस करून गेल्याचंही त्यांच्या लक्षात येत नाही. शेवटी तो शेतकरी येऊन त्यांना तंद्रीतून जागं करतो. नंतर त्या शेतकर्याचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी तुकोबाला घरदार विकायची वेळ येते. मग चमत्कार होतो! तुकोबाचं घरदार वाचवण्यासाठी विठ्ठल आकाशातून धान्याची रास त्या शेतकर्याच्या खळ्यात ओततो. विठ्ठलानं वरून ओतलेल्या धान्यामुळे खळं तुडुंब भरून जातं. शेतकर्याला अपेक्षेपेक्षा दुप्पट धान्य मिळतं. विठ्ठलकृपेनं सगळं नुकसान भरून निघतं.
…तुकोबा हा भोळसट, टाळकुट्या, देवदेव करत घरदार-संसार विसरलेला अव्यवहारी संत अशी प्रतिमा तयार करण्यासाठी पूर्वीपासून अशा ‘चमत्कारिक’, खोट्या प्रसंगांची जाणूनबुजून पेरणी केली गेली.
पण खरा तुकोबाराया असा होता का? अजिबात नाही. खरं तर त्या प्रसंगातल्या शेतकर्याला खळं तुडुंब भरण्याइतकं भरभरून धान्य मिळालं ते तुकोबांच्या शेतीविषयक कौशल्यामुळं! असाध्य ते साध्य करायला ‘सायास’ आणि अभ्यास लागतो हे ठासून सांगणारा तुकोबा आकाशातून होणार्या चमत्काराचा मोहताज असेल का हो? पण कारस्थानानं लेखणी स्वत:च्या हातात असलेल्या आणि बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या वर्चस्ववाद्यांनी, तुकोबाराया हा शेतीची नासधूस झाली तरी भावभक्तीची तंद्री लागलेला भाबडा संतच म्हणूनच ओळखला जावा, अशी व्यवस्था केली. एका विवेकनिष्ठ आणि निधड्या छातीच्या निडर महानायकाचं असं चारित्र्यहनन केलं गेलं.
दोस्तांनो, शब्दरचना आणि आशय या दोन्हीच्या जबरदस्त सौंदर्यानं सजलेला तुकोबारायाचा एक अभंग आहे. या अभंगातून त्यानं शेतकर्याला कायम जागं रहायला, सावध रहायला सांगितलंय. फक्त शेतकरीच नाही, तर ज्याला आयुष्यात सुखसमाधान हवंय, यशस्वी व्हायचंय, त्या प्रत्येकानं या अभंगाच्या आशयरसाचा स्वाद घेतला पाहिजे.
सेत आले सुगी सांभाळावे चारी कोण ।
पिका आले परी केले पाहिजे जतन ।।
सोंकरी सोंकरी विसावा तोंवरी ।
नको खाऊ उभे आहे तो ।।
गोफणेसी गुंडा घाली पागोर्याच्या नेटें ।
पळती हाहाकारें अवघी पाखरांची थाटे ।।
पेटवूनि आगटी राहे जागा पालटूनि ।
पडिलिया मान बळ बुद्धी व्हावी दोनी ।।
खळे दानें विश्व सुखी करी होता रासी ।
सारा सारूनिया ज्याचे भाग देई त्यासी ।।
तुका म्हणे मग नाही आपुले कारण ।
निज आले हातां भूस सांडिले निकण ।।
…सुगी आली, त्यामुळे आता शेत चारी कोपर्यांनी सांभाळावे लागणार आहे. शेतातलं पीक कणसांनी काठोकाठ भरुन आले आहे खरे, पण त्याचं आता काळजीपूर्वक जतन करायला पाहिजे.
…आता जोपर्यंत हे पीक शेतात उभं आहे, कापणी-मळणी होऊन धान्य घरात येत नाही तोपर्यंत शेतकर्यानं विसावा घेऊ नये.
…आता ही भरगच्च कणसं पाहून पाखरांचे थवे शेतावर येऊ लागतील, त्यावेळी शेतकर्यानं हाहा:कार करत नेटाने गोफण फिरवली तर ते पक्षी घाबरून दूर निघून जातील आणि पिकाची नासधूस टळेल.
…पक्षी-प्राण्यांना दूर ठेवण्यासाठी शेतकर्याने आगटी पेटवावी आणि आलटून-पालटून जागा बदलत रहावं, कारण एकाच जागी उभं राहिलं तर पक्षी-प्राणी वेगळ्या दिशेनं हल्ला करतील. चोर-लुटारूंपासूनही पिकाला धोका असतो, त्यामुळे आवश्यकता असेल त्याप्रमाणे राखण करताना बळ आणि बुद्धी दोन्हीचा वापर करावा.
…अशा प्रकारे काळजी घेऊन राखण केल्यानंतर खळ्यात धान्याच्या राशी उभ्या रहातात, ज्या शेतकर्याचं विश्व सुखी करून टाकतात, त्याच्या सगळ्या आशा-आकांक्षा पूर्ण होतात. त्याआधी त्यातला सरकारचा जो काही सारा असेल तो देऊन, शेतात ज्यांचा वाटा आहे ते वाटेकरी, बलुतेदार, भाऊबंद यांनाही ज्याचा त्याचा योग्य तो भाग द्यावा.
…शेवटी तुका म्हणे : एवढं सगळं केल्यावर शेतकर्याला काळजीचं काही कारण रहात नाही. कणांचा अभाव असलेले भूस बाजूला सारून हातात आलेले धान्य त्याच्या कुटुंबाला पुरून उरेल इतके असते, त्यामुळे तो सुखी-समाधानी होतो.
बघा. वाचलंत व्यवस्थित? हा एक वानगीदाखल अभंग सांगितला मी. तुकोबाराया हा एक उत्तम शेतीतज्ञ होता! फक्त शेतकर्यानं शेताची, पिकाची राखण कशी करावी हेच नाही… तर वाफसा आल्यावर जमिनीची मशागत करण्यापासून ते बी पेरण्यापर्यंत… अंकुर फुटल्यापासून ते कणसे दाण्यांनी भरण्यापर्यंत… पीक काढणीपासून ते अगदी घरात धान्याच्या कणगी भरण्यापर्यंत… प्रत्येक गोष्टीचे सखोल मार्गदर्शन करणारे असंख्य अभंग आहेत. पण या शेतीतज्ञ माणसाची बरोब्बर उलट प्रतिमा व्हावी, असे या सिनेमातल्यासारखे खोटे प्रसंग बहुजनांच्या मेंदूत मुरवले गेले.
शेतीसारख्याच अशा अनेक क्षेत्रातलं तुकोबारायाचं ज्ञान, त्याची प्रतिभा, त्याचा विवेक, त्याचं शौर्य, त्याचं धैर्य, त्याचं समाजभान दाखवणारे बख्खळ अभंग आहेत गाथेत… ती गाथा न वाचता आपण एखादा पिक्चर नाहीतर कुणीतरी तोंडी सांगितलेल्या दंतकथा ऐकून आपल्या मनात काहीतरी वेगळीच प्रतिमा तयार करतो… आणि त्याच्या अनमोल विचारांपासून दूर रहातो. त्यामुळेच धर्माच्या नावावर बहुजनांना नाडून गुलामगिरीच्या जोखडात अडकवणार्या वर्चस्ववाद्यांना शड्डू ठोकून आव्हान देणारा तुकोबा लपवला गेला. तुकोबाराया हा गोरगरीब, दीनदुबळ्या, अज्ञानी समाजाला भेदभावाच्या, अंधश्रद्धेच्या, कर्मकांडाच्या सापळ्यातून मुक्त करून समानतेच्या, माणुसकीच्या, विवेकाच्या वाटेवर घेऊन जाणारा थोर समाजसुधारक होता. एवढंच नाही तर उत्तम अर्थतज्ज्ञ, जाणता राजनीतीज्ञ आणि उत्कृष्ट मानसोपचारतज्ज्ञसुद्धा होता!
माझ्या भावाबहिणींनो, तुकोबारायानं कष्ट करून, खपून, मानसिक शारिरीक घाव सोसून आपल्यासाठी मौल्यवान विचारांचं भरगच्च दाणेदार कणसांनी भरलेलं पीक उभं केलंय. ते पीक नासवण्यासाठी आजकाल महाभयानक कुटील कारस्थानी झुंडी सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे विशेषत: आजच्या नासलेल्या भवतालात आपण जागं रहायला पाहिजे. झोपून चालणार नाही. त्यानं कळवळून सांगितलंय ‘सोंकरी सोंकरी विसावा तोंवरी।’
…आता विसावा नाही घ्यायचा, डोळ्यांत तेल घालून राखण करूया. तुकोबानं पिकवलेल्या या मौलिक विचारांच्या पिकाची आपापल्या मेंदूत छान मळणी करूया… ते विचार‘धान्य’ एकमेकांना वाटून आपल्या प्रत्येकाच्या घरी नेऊया. आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना पुरून उरेल एवढी ताकद आहे त्यात.
चला, सगळे मिळून कंबर कसूया. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत या विचारधनाची जपणूक करूया.