हे मुखपृष्ठचित्र आहे १९७२चे, ५३ वर्षांपूर्वीचे. शिवसेनेच्या जन्मापासून तिला अनेक शत्रूंनी घेरलं होतं. वर्तमानपत्रांमध्ये शिवसेनेच्या विरोधात बातम्या येत होत्या, गलिच्छ पातळीवरची टीका होत होती, तेव्हा राज्यात, मुंबईत सत्ताधीश असलेल्या काँग्रेसच्या गुंडांचे हल्ले होत होते. तेव्हा ही तरुण रक्ताची सळसळती संघटना निग्रहाने ठाम उभी राहून म्हणत होती, या सार्या गोष्टींना पुरून उरेन! त्यानंतर शिवसेनाप्रमुखांच्याच हयातीत शिवसेनेला धक्के बसलेच, तिच्यावर हल्ले झालेच; पण, आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला जे धक्के येत आहेत, तसे धक्के आजवर कधी मिळाले नाहीत. गद्दारी शिवसेनेला नवी नाही, पण ईडीच्या भीतीने रडत भेकत पळून गेलेल्या गद्दारांनी आणि जिकडे खोबरं तिकडे चांगभलं या न्यायाने त्यांची साथसोबत करणार्या संधीसाधूंनी आपलीच शिवसेना खरी म्हणावं, निवडणूक आयोगाच्या साथीने हेरफेर करून आपल्याला जनतेचा कौल मिळाल्याचा दावा करावा आणि सत्तेच्या बळावर ज्यांनी शून्यातून उभं केलं त्यांना ललकारावं, असे दिवस कधी आले नव्हते. त्यात आता सुशिक्षित, सुसंस्कृत वगैरे म्हणवणार्या, शिवसेनेनेच मोठ्या केलेल्या कोणी ताई पक्षप्रमुखांवर बाष्कळ आरोप करताना दिसत आहेत… बाकी पाकीटचरणी निष्ठा गहाण ठेवलेल्या पाळीव पत्रकारितेतून दिले जाणारे ज्ञानाचे डोस तर काय वर्णावेत… ५३ वर्षे लोटली असली तरी शिवसेनेत तीच सळसळ आहे, तीच रग आहे… तुम्हा सर्वांना पुरून उरण्याची धमक आजही शिवसेनेत कायम आहे… कोणताही काळ कायम राहात नाही, एवढं लक्षात ठेवा.