वानखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात जम्मू काश्मीरविरुद्ध पत्करलेल्या मानहानीकारक पराभवानं मुंबईचं क्रिकेट ढवळून निघालं. मुंबईच्या खडूस वृत्तीला काळीमा फासणारा हा पराभव तारांकित क्रिकेटपटूंमुळे वाट्याला आला. देशांतर्गत क्रिकेट खेळा, हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसाठी काढण्यात आलेला ‘बीसीसीआय’चा फतवा मुंबईसाठी कसा हानीकारक ठरला, याचा वेध.
– – –
ती घटना २००७मधली. पण, मुंबईच्या खडूसपणाचं कर्तृत्व दाखवणारी. प्रवीण अमरे त्यावेळी मुंबई संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. तो त्यांचा पहिलाच हंगाम. साखळीत तिन्ही सामने गमावल्यानंतर मुंबईचा संघ बाद फेरी गाठू शकणार नाही, अशी चिन्हं दिसत होती. आव्हान टिकवायचं तर उर्वरित प्रत्येक सामना निर्णायक जिंकायचा होता. पण उरलेले दोन्ही सामने जिंकत मुंबईनं रुबाबात बाद फेरी गाठली. बडोद्याविरुद्धचा उपांत्य सामना हा अत्यंत संस्मरणीय. मुंबईची दुसर्या डावात ५ बाद ० अशी केविलवाणी अवस्था झाली होती. साहिल कुकरेजा, वसीम जाफर, हिकेन शाह, रोहित शर्मा आणि कर्णधार अमोल मुझुमदार भोपळाही फोडू शकले नाहीत. पण विनायक सामंत आणि विल्किन मोटा यांच्या झुंजार भागीदारीनं मुंबईची इभ्रत टिकवली. मग अभिषेक नायर, मोटा, स्वप्नील हजारे आणि राजेश वर्मा या गोलंदाजांनी बडोद्याच्या फलंदाजांना १७३ धावांवर गारद करीत मुंबईला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. नंतर अंतिम सामन्यात जहीर खान, सचिन यांच्यासह मुंबईनं विजेतेपदसुद्धा काबीज केलं. पण, उपांत्य सामन्यातील आणि एकंदर स्पर्धेतील मुंबईची फिनिक्सभरारी कौतुकास्पद होती.
गेल्याच वर्षी प्रवीण अमरे यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं. त्याचं नावही ‘झीरो फॉर फाइव्ह’ असंच आहे. या पुस्तकात हा इतिहास इत्थंभूतपणे मांडण्यात आलाय. पण वानखेडे स्टेडियमचं सुवर्णमहोत्सवी वर्ष चालू असताना या इतिहासाची गौरवशाली पुनरावृत्ती होण्याच्या ऐवजी मुंबईच्या क्रिकेटची वाताहत पाहायला मिळत आहे. शरद पवार क्रिकेट स्टेडियमवर मुंबईनं जम्मू आणि काश्मीरविरुद्ध मानहानीकारक पराभव पत्करला. रणजी विजेते, इराणी विजेते, मुश्ताक अली ट्वेन्टी-२० विजेते असा लौकिक असलेल्या मुंबईच्या या नाचक्कीला जबाबदार कोण? तर तारांकित क्रिकेटपटू. हे कारण मुंबईचे याआधीचे सामने आणि हा सामना याची तुलना केल्यास सहज लक्षात येते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची बोर्डर-गावस्कर चषक कसोटी मालिका १-३ अशी गमावल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी देशांतर्गत क्रिकेट सामने भारतीय क्रिकेटपटू खेळत नसल्यानं हे अपयश पदरी पडल्याचं कारण सांगितलं. चला, गावस्करजींना चर्चेसाठी मुद्दा मिळाला. त्यांनी प्रत्यक्षात कोणते क्रिकेटपटू रणजी सामने खेळतील, असा सवाल विचारून हा प्रश्न ऐरणीवर आणला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) या विषयावर गंभीर झालं. रणजी खेळा, असा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसाठी फतवा निघाला. विराट कोहली, जसप्रीत बुमरा आणि केएल राहुल यांनी दुखापतीमुळे यातून सूट मिळवली. पण कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल यांना विश्रांतीचं कारण यावेळी दाखवता येईना. श्रेयस अय्यरनं याआधीच देशांतर्गत क्रिकेट टाळण्याची शिक्षा अनुभवलीय. त्यामुळे हे तारे आले मुंबईकडून रणजी खेळायला. यांना सामावलं तर खरं. पण मुंबईच्या तार्यांची कामगिरी अत्यंत कुचकामी ठरली. रोहित (३, २८ धावा), सलामीवीर यशस्वी (४, २६ धावा), नियमित एकदिवसीय क्रिकेटपटू आणि ‘आयपीएल’ विजेता संघनायक श्रेयस (११, १७ धावा), ८०हून अधिक कसोटी सामन्यांचा अनुभवी गाठीशी असलेला अजिंक्य रहाणे (१२, १६ धावा) ट्वेन्टी-२० विश्वविजेत्या संघातील खेळाडू शिवम दुबे (०, ० धावा; १, ० बळी), ऑस्ट्रेलिया दौर्याहून परतलेला ऑफ-स्पिनर तनुष कोटीयन (२६, ६२ धावा; ०, ० बळी) यांच्या अपयशाचा मुंबईला फटका बसला. फक्त शार्दूल ठाकूरनं त्याच्या लौकिकाला न्याय देणारी कामगिरी केली. पण तो सध्या भारतीय संघाचे दरवाजे पुन्हा ठोठावत असल्यामुळे मुंबई संघात असा विशिष्ट अमावस्या-पौर्णिमेला दिसलेला नाही. तोच न्याय श्रेयसही या हंगामात देतोय. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय सामने खेळत नसताना आपल्या स्थानिक संघाकडून खेळावं का, हा विषय पुन्हा चर्चेत आलाय.
बरं हे आंतरराष्ट्रीय तारे स्थानिक संघांकडून खेळले तर त्या संघांचा समतोल बिघडतो, याकडे कोण लक्ष देणार? तार्यांच्या पुनरागमनामुळे मुंबईच्या संघातील आयुष म्हात्रे आणि अंगक्रिश रघुवंशी ही सलामीवीर जोडी, मधल्या फळीतील फलंदाज सिद्धेश लाड आणि सूर्यांश शेडगे, फिरकी गोलंदाज हिमांशू सिंग हे काही नियमित खेळाडू संघाबाहेर गेले. ‘बीसीसीआय’चा आदेश शिरसावंद्य मानल्यामुळे रोहित-यशस्वी यांनी मुंबईच्या सलामीवीरांची जागा घेतली. यापैकी रघुवंशी, शेडगे आणि हिमांशू यांना मुंबईच्या २३ वर्षांखालील संघाच्या सामन्यासाठी पाचारण करण्यात आलं, तर आयुषला १७ जणांमध्ये राखीव ठेवण्यात आलं. मुंबईकडून यंदाच्या रणजी हंगामात दुसर्या क्रमांकाच्या धावा आयुषच्या खात्यावर आहेत. त्यानं पाच सामन्यांत ७३.९१च्या सरासरीनं दोन शतकं आणि एक अर्धशतकासह ४०८ धावा काढल्या आहेत, सिद्धेशनंही चार सामन्यांत एक शतक आणि दोन अर्धशतकांसह एकूण ३७३ धावा केल्यायत, तर हिमांशूनं चार सामन्यांत १८ बळी मिळवलेत.
या सामन्याचं आणखी एक आश्चर्य म्हणजे २८ वर्षीय कर्श कोठारीचं पुनरागमन. २०१७-१८मध्ये काही प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या फिरकीपटू कर्शला पहिल्या डावात एकही षटक देण्यात आलं नाही, तर दुसर्या डावात त्याला २४ धावांत एकही बळी मिळाला नाही. फलंदाजीतही दोन्ही डावांत अनुक्रमे ० आणि एक धावा. याआधी, त्यानं सहा सामन्यांत ५०हून अधिक धावांच्या सरासरीनं जेमतेम १० बळी घेतलेले. त्यामुळे फक्त खेळपट्टीला अनुकूल रणनीती म्हणून तीन फिरकी गोलंदाजांना खेळवण्यासाठी आठ वर्षांनी कर्शची आठवण का यावी, हे कोडं अद्याप उलगडलेलं नाही.
मुंबईच्या क्रिकेटतार्यांचा अभ्यास करताना आणखी काही मुद्दे समोर येतात. ट्वेन्टी-२० क्रिकेट आणि ‘आयपीएल’ भारतीय क्रिकेट वेळापत्रकात समाविष्ट होण्यापूर्वी देशांतर्गत क्रिकेट हंगाम इतका भरगच्च नव्हता. त्यामुळे त्या काळातले क्रिकेटपटू रणजी क्रिकेट खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असायचे. गावस्कर या आठवणी कौतुकानं सांगतो. पण काळ बदलला, तसं हे दुरापास्त झालं. महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्या, इशान किशन यांच्यासारख्या काही क्रिकेटपटूंनी रणजी खेळायला वेळच मिळत नाही, असं सांगून टाळायला प्रारंभ केला. तारांकित क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय हंगामातून विश्रांती देण्यात यावी, म्हणून वर्कलोड मॅनेजमेंट म्हणजेच कार्यभार नियोजनाच्या गोंडस नावाखाली विश्रांतीचं एक नवं फ्याड गेली १५-२० वर्षं भारतीय क्रिकेटमध्ये रूढ झालं. कोहली, रोहित, केएल राहुल, बुमरा यांच्या पिढीनं हे ‘बीसीसीआय’ला स्वीकारण्यास भाग पाडलं. यातच कौटुंबिक कारणास्तव विश्रांतीचं सत्रसुद्धा भारतीय क्रिकेटमध्ये नव्यानं सुरू झालं. त्यामुळे सध्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी रणजी खेळावे, हे सूत्र अमलात आणणं आव्हानात्मक ठरू पाहतंय.
आत्ताशी कुठे सुरुवात झालीय. येत्या काही काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये हा बदल स्वीकारार्ह ठरेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. परंतु, तारांकित खेळाडूंमुळे मुंबईचं पानिपत मुंबईतच पाहायला मिळालं, हे सत्य मात्र कुणीही नाकारू शकणार नाही. आता मुंबईला आव्हान टिकवून एलिट गटातून बाद फेरीत जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, एवढं मात्र निश्चित.
prashantkeni@gmail.com