राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्वज्ञान हिंदू धर्माच्या सर्वसमावेशकतेच्या पासंगाला देखील पुरणार नाही. एकाच व्यक्तीला सर्वोच्च स्थानी प्रस्थापित करणे हा सुद्धा संघ विचार आहे. हिंदू धर्मात मात्र शेकडो देवी देवता पूज्य आहेत आणि त्यात लहान मोठा असा भेद नाही. त्यामुळेच निव्वळ संघ व्यापक करण्याऐवजी कूपमण्डूक वृत्ती सोडून देऊन संघविचार व्यापक केला तर संघाला दर धर्मासाठी, दर जातीसाठी वेगळी संघटना काढायची गरज भासणार नाही. मुसलमानांसोबत संवादाच्या ह्या देखाव्याचीही गरज भासणार नाही.
– – –
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी २१ आणि २२ सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये मुस्लीम समुदायातील वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी घेतल्या, ज्यात अलिगढ मुस्लीम विश्वविद्यालयाचे माजी कुलपती लेफ्टनंट जनरल जमीरुद्दीन शाह, माजी खासदार शाहिद सिद्दीकी, उद्योगपती सईद शेरवानी, दिल्लीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग, माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी आणि ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे मुख्य इमाम उमर अहमद इलियासी यांचा प्रामुख्याने समावेश होता. सरसंघचालक हे सर्व क्षेत्रातील लोकांना भेटत असतात आणि ही एक सामान्य संवाद प्रक्रिया आहे, अशी प्रतिक्रिया संघाने या भेटीगाठींवर दिली आहे. दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावर असलेल्या मशिदीत इमाम ऑर्गनायझेशनचे कार्यालय आहे. हिंदुत्वाचा जहाल पुरस्कार करणार्या संघाच्या सरसंघचालकांनी स्वतः एका मशिदीत जाऊन ही भेट घेतल्यामुळे त्या घटनेची सर्व माध्यमांनी विशेष नोंद घेतली आणि सरसंघचालक मशिदीत शिरतानाचा फोटो देखील वृत्तपत्रांनी ठळकपणे छापला. इमाम उमर अहमद इलियासी व सरसंघचालक ह्यांच्यातील भेट तासभर बंद खोलीत झाली. त्या भेटीचा तपशील हा अद्याप तरी बाहेर आलेला नाही. माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी ह्यांनी त्यांच्या व सरसंघचालकांच्या भेटीमध्ये देशातील वाढत्या असहिष्णू वातावरणाबद्दल काळजी व्यक्त करण्यात आली अशी माहिती एनडीटीव्हीशी बोलताना दिली आहे. माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी ह्यांच्या सांगण्यावरून सरसंघचालक मोहनजी भागवत हे देशातील वातावरणाबद्दल आनंदी नसून त्यांच्या मते एकमेकांना सहकार्य केल्याशिवाय देश प्रगती करू शकत नाही. सरसंघचालकांचे स्पष्ट मत त्यांनी मांडले हे योग्यच आहे, फक्त त्यांनी ते स्वतःच्या सरकारसमोर, स्वतःच्या संघ प्रचारकांसमोरच्या बौद्धिकातून देखील परखडपणे मांडावे, म्हणजेच त्याचा जास्त परिणाम होईल. ह्या चर्चेत गोहत्याबंदी मान्य करावी, तसेच हिंदूंना काफिर म्हणू नये, ह्यावरही चर्चा झाली, अशी माहिती माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी ह्यांनी दिली. नुसत्या एका शब्दावर आक्षेप घेऊन चालणार नाही, तर धार्मिक द्वेषाची भावना ह्या देशातून नष्ट झाली पाहिजे. हा ध्यास घेणे गरजेचे आहे आणि तो ध्यास ह्या देशात कधीकाळी गांधीजींनी घेतला होता म्हणून तर ते महात्मा ठरले आहेत, राष्ट्रपिता बनले आहेत.
सरसंघचालक संघाच्या सर्वोच्च स्थानावर आहेत आणि त्यांनी देशातील मुस्लीम समाजातील व्यक्तींसोबत चर्चा करण्यात पुढाकार घेण्यामागचा नक्की हेतू काय तो उघडपणे कधीच सांगितला जाणार नाही, कारण सर्व बाबतीत कमालीची गुप्तता बाळगणे व बंद खोलीतील बैठका घेणे ही संघाची जुनी कार्यशैली आहे. हेतू स्वच्छ असेल, त्यात प्रामाणिकपणा असेल तर संवाद मोकळ्या वातावरणात, खुल्या मैदानात देखील करता येतो. मग बंदिस्त खोलीची गरज भासणार नाही. मुस्लीम समाजासोबतच्या ह्या संवादामागे संघाचे प्रामुख्याने दोन उद्देश असल्याचे बातम्यांमधून सांगितले जाते आहे. पहिला उद्देश हा संघाच्या विचारांचा मुस्लीम समाजात प्रचार करणे हा आहे आणि दुसरा उद्देश हा देशातील धार्मिक समावेशकता मजबूत करणे आहे. ह्या दोन्ही उद्देशांची प्राथमिक मिमांसा केली तरी ह्यातील फोलपण कळेल.
ह्यातील पहिल्या उद्देशाचा म्हणजेच संघाच्या विचारांचा मुस्लीम धर्मात प्रसार करण्याचा हेतू हा संघामध्ये मुस्लीम समुदायही सहभागी व्हावा यासाठी प्रयत्न करणे हा आहे. संघाच्या कट्टर हिंदुत्वाच्या विचारसरणीमुळे मुसलमान थेट संघाच्या शाखेत येणे शक्यच नसल्याने संघाने एक वेगळीच क्लृप्ती लढवली आणि मुस्लीम राष्ट्रीय मंच (एमआरएम) ह्या नावाची एक संघाची वेगळी संघटना बनवली. थोडक्यात मूळच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात भारतीय मुसलमानांना सामावून घेण्यासाठी कोणताच विचार केला गेला नव्हता. कारण संघाचा मूळ पायाच संकुचित मुस्लीमविरोधावर आधारलेला आहे. तो काढला तर संघाचे प्रयोजनच उरत नाही. म्हणूनच संघाने त्यासाठी मुस्लीम राष्ट्रीय मंच बनवला जो आता संघ आणि मुसलमान ह्यांना जोडण्याच्या कामात व्यग्र आहे. इन्द्रेश कुमार हे त्याचे प्रमुख आहेत, राष्ट्रीय संयोजक मोहम्मद अफजल आहेत व दहा हजारपेक्षा अधिक स्वयंसेवक संघटनेत असल्याचा दावा केला जातो आहे. भारतासोबत बांगलादेश येथे देखील मुस्लिम समाजात संघ विचारांचा प्रसार व्हावा यासाठी सक्रीय काम चालू आहे. अखंड हिंदुराष्ट्राचे स्वप्न पाहणार्या आणि कट्टरतावादी, वर्चस्ववादी हिंदुत्व हाच एकमेव विचार असणार्या संघाला आता मुसलमान समुदायामध्येही कशासाठी शिरकाव करायचा आहे, हे जाणून घेणे महत्वपूर्ण आहे.
गुजरात दंगलीत मोदी निर्दोष असल्याचे मुस्लीम राष्ट्रीय मंच ह्या संघटनेकडून सतत सांगण्यात येते. तसेच मुसलमान समाजात शाकाहाराचा प्रसार करणे हे देखील ह्या संघटनेचे एक काम आहे. भारतात हिंदूंमध्येही मांसाहारी, मिश्राहारींचे प्रमाण शाकाहारींपेक्षा जास्त आहे, मांसाहाराची मोठी परंपरा आहे. देशाला मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि मत्स्याहार हा किनारपट्टीवरील बहुतेक सर्व हिंदूंचा मुख्य आहार आहे. बंगालमध्ये ब्राह्मणही मासे खातात, काश्मीरमध्ये वाझवान या मेजवानीचे हिंदू आणि मुस्लीम असे दोन प्रकार असले तरी दोन्हीमध्ये मटण असतेच. केरळमधले हिंदू तर सर्वाहारी आहेत. ही परंपरा गुंडाळून ठेवून अल्पसंख्याक जैनधर्मीयांचा शाकाहाराग्रह संघाने स्वीकारणे, तो मिश्राहारी हिंदूंवर लादण्याचा प्रयत्न करणे आणि मुस्लिमांना शाकाहारी बनवण्याचा प्रयत्न करणे, हे सगळे हास्यास्पद आणि संतापजनक आहे. असो. संघाच्या मुस्लीम शाखेचा साहजिकपणे कलम-३७० रद्द करण्यालाही पाठिंबा आहे. थोडक्यात संघ व भाजपा ह्यांची जी हुजूरी करण्यासाठी जे मुसलमान तयार होतील त्यांना ह्या संघटनेचा आधार दिला जाईल आणि त्यांनाच राष्ट्रप्रेमी ठरवून इतर मुस्लिमांना पाकिस्तानचे हस्तक राष्ट्रद्रोही असे ठरवता येईल. थोडीफार सत्तेतील पदे दिली तर बरेच मुसलमान ह्या प्रकारे थेट संघात येतील व मग संघ ही सर्वधर्मसमावेशक अशी व्यापक संघटना आहे ह्या बनावावर देखील एक शिक्कामोर्तब करून घेता येईल हा एक हेतू आहेच. या माध्यमातून संघावरचा मुस्लीमद्वेष्टे असण्याचा तथ्याधारित आरोपही कायमचा फेटाळता येईल, अशी संघाची समजूत दिसते. सध्या तरी या संवादामागे महात्मा गांधींचा हिंदू-मुस्लिम एकतेचा व्यापक हेतू नसावा, तर भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी इस्लामचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल गैर उद्गार काढल्यानंतर भारताची आणि संघ विचारांची जी आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी झाली आहे त्यातून संघाची छबी थोडीफार सुधारणे इतकाच संकुचित हेतू ह्या संवादामागे असावा.
आजवर हा देश महात्मा गांधींनाच राष्ट्रपिता मानतो. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परममित्र आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींनाच राष्ट्रपिता ठरवण्याचा, त्यांच्या स्वभावाला साजेसा अगोचरपणा करून टाकला होता. पण, दुर्दैवाने समस्त भारतीयांनी ट्रम्प यांची ही सूचना केराच्या डब्यात टाकून दिली. आता सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील राष्ट्रपिता आहेत, असे विधान चक्क इमाम उमर अहमद इलियासी यांनी केले आहे. खरे तर इमामसाहेबांनी त्यात थोडी सुधारणा करून लवकरच निर्माण होऊ घातलेल्या अखंड हिंदूराष्ट्राचे भावी राष्ट्रपितामह असे सरसंघचालकांचे वर्णन करायला हरकत नव्हती. कारण पुढील दहा पंधरा वर्षातच भारत एक अखंड हिंदू राष्ट्र होणार आणि त्यासाठी गरज पडली तर ताकदीचा वापर देखील करणार हे सरसंघचालकांनी नुकतेच सांगितले आहे. इमाम साहेबांनी सरसंघचालकांना राष्ट्रपिता ठरवण्यामागे भारतासह पाकिस्तान आणि बांगलादेश असे तीन देशांच्या मुसलमानांचे प्रमुख इमाम बनण्याची त्यांची महत्वाकांक्षा असावी असेच वाटते.
संघाने स्वतःच्या विचारांचा (हिंदुत्वाचा) प्रसार मुस्लीमधर्मीय समुदायात करायला काहीच हरकत नाही. कारण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली लिहिल्या गेलेल्या भारतीय राज्यघटनेत तसे स्वातंत्र्य अंतर्भूत आहे. पण त्यामुळेच उद्या कोणी कट्टर इस्लामवादाचा प्रसार हिंदूंमध्ये करायला लागला, तर संघाची त्यावेळी भूमिका काय असणार आहे? संघाकडे आज प्रचारासाठी लागणारे पाठबळ जास्तच असावे, कारण हातचे हिंदू सोडून पळत्या मुस्लीमांच्या मागे एरवी कोण लागेल? अजूनही ह्या देशात संघाला न मानणारे हिंदूच जास्त आहेत. जिथे संघाला आपले विचार बहुसंख्य हिंदूंनाच पटवून देता आले नाहीत, तिथे इतरधर्मीय संघासोबत जातील असे समजणे हे दिवास्वप्न आहे. खरा मूलभूत प्रश्न हा आहे की स्वतःचे विचार लोकांच्या मनात भिनवायला संघाला गेली ऐंशी वर्ष रात्रंदिवस काम करणारी एक प्रचारयंत्रणा का राबवावी लागते? प्रेमाने ओथंबलेल्या सर्वधर्मसमभावासारखे द्वेष कालवलेले जहरी कट्टर धार्मिक विचार हे नैसर्गिकपणे लोकांमध्ये वाढत नाहीत, तर ते विद्वेषाचे विष कट-कारस्थान करून समाजात कालवावे लागते. देशात गेली कित्येक वर्षे गांधीवादी सुस्त असताना आणि प्रचार प्रसार करत नसताना देखील त्यांच्या विचारांची वीण आजदेखील घट्ट आहे, कारण तो प्रेमाचा, सहनशीलतेचा, समानतेचा एक नैसर्गिक मानवी विचार आहे. ह्याउलट संघाचे विचार हे सहजपणे न पटणारे अनैसर्गिक आहेत. द्वेष हा शाश्वत आणि नैसर्गिक नसल्याने द्वेषावर आधारित विचार प्रयत्नपूर्वक लोकांच्या गळी उतरवायला लागतात, कसेतरी पटवून द्यायला लागतात आणि कोणी त्यांना नाकारू नये यासाठी त्या व्यक्तीच्या धार्मिक भावनेला, त्या व्यक्तीच्या श्रद्धास्थानांना हात घालून त्याला परत आपल्या विचारांकडे वळवायला लागते. संघासाठी ही एक सतत चालू राहणारी किचकट प्रक्रिया आहे आणि मिशनरी पद्धतीनुसार संघाचे हे जे काम चालते तेच मुळात सनातन हिंदू धर्माच्या परंपरेशी सुसंगत नाही. हिंदू धर्म मिशनरी पद्धतीचे प्रचारक वापरून मोठा झालेला नाही अथवा आजवर टिकलेला नाही तर तो भिन्न जाती, पंथ ह्यांना त्यांच्य्ाातील वैविध्य टिकवून देखील हिंदू म्हणून राहता येत असल्याने तो मोठा झाला. हिंदू धर्माचे मोठेपण हे सर्व पंथ आणि जातींना त्यांची ओळख टिकवून ठेवण्याची मुभा देण्यात आहे. काशीची गंगेची कावड घेऊन कन्याकुमारीला सोडायची हाच सनातन हिंदू धर्म आहे. ज्या धर्मात गंगेचे पाणी देखील घराघरात इतर देवांसोबत देव म्हणून पूजले जाते त्या धर्माची व्यापकतेला संघाचे तत्वज्ञान पासंगालादेखील पुरणार नाही. एकाच व्यक्तीला सर्वोच्च स्थानी प्रस्थापित करणे हा सुद्धा संघ विचार आहे. हिंदू धर्मात मात्र शेकडो देवी देवता पूज्य आहेत आणि त्यात लहान मोठा असा भेद नाही. त्यामुळेच संघ व्यापक करण्याऐवजी कूपमण्डूक वृत्ती सोडून देऊन संघविचार व्यापक केला तर संघाला दर धर्मासाठी, दर जातीसाठी वेगळी संघटना काढायची गरज भासणार नाही. मुसलमानांसोबत संवादाच्या ह्या देखाव्याचीही गरज भासणार नाही.
संघातर्पेâ मांडण्यात आलेला दुसरा उद्देश हा देशातील धार्मिक समावेशकता मजबूत करणे हा आहे. अर्थात हा हेतू अत्यंत चांगला असला आणि त्याबाबतीत संघ प्रामाणिक आहे असे देखील (फक्त वादापुरतेच) मान्य केले तरी फक्त ह्या उद्देशाने आज देशातील परिस्थिती सुधारणार आहे का? निव्वळ धार्मिक समावेशकता नव्हे तर, भाषिक, वांशिक, जातीय अश्या सर्वसमावेशकतेच्या मूलतत्वावरच तर भारताचे संविधान ताठ कण्याने गेली सात दशके मजबूतपणे उभे आहे आणि भारतातील प्रत्येक व्यक्ती आणि संघटनेने त्या समावेशकतेच्या तत्वाचे पालन करणे हे घटनेने नेमून दिलेले आद्य कर्तव्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्याला अपवाद ठरत नाही. असे असताना संघाने आजवर ह्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन केले आहे का? दाखवायचे दात धार्मिक समावेशकतेचे आणि आतले दात मात्र धार्मिक विद्वेषाच्या फोफावण्यासाठीचे, असे दुतोंडी तत्वज्ञान असणारी संघटना राष्ट्रीय निर्माणासाठी आहे का समाजात दुफळी माजवणारी आहे, हे जनतेने तपासून घ्यायला हवे.
हत्ती दलदलीमध्ये अडकला की त्याला त्यातून बाहेर काढणे हे सहजसाध्य काम नाही आणि ते वेळेत केले नाही, तर हत्ती त्या गाळात रूतत जातो आणि त्याची कायमची अखेर होते. आपला महाकाय भारत देश हा देखील आज पराकोटीच्या धार्मिक विद्वेषाच्या दलदलीत खोलवर फसलेला आहे आणि त्याच्या देशाच्या ह्या असहाय्य अवस्थेचा राजकीय फायदा घेतल्याने भाजपा पक्षाला राक्षसी बहुमत मिळवता आले आहे. आपला देश ह्या असहाय्य अवस्थेतून, धार्मिक विद्वेषाच्या दलदलीतून बाहेर काढणे ही काळाची गरज असताना त्यावर स्वतःची राजकीय पोळी भाजणारे राष्ट्रप्रेमी कसे ठरतात? धार्मिक समावेशकतेचा फक्त उद्देश बाळगणे म्हणजे दलदलीतून हत्ती आपोआप बाहेर यावा ह्याची इच्छा बाळगणे ठरेल. नुसता तसा उद्देश बाळगण्याएवजी संघाने ताबडतोब ठोस कृती करून त्यांची धार्मिक समावेशकता दाखवली पाहिजे. भाजपाच्या ३७ टक्के मते मिळवण्याच्या पराक्रमाला संघाने आपल्या विचारांचे यश असा अर्थ काढलेला असेल तर मग त्याचाच दुसरा अर्थ ६३ टक्के भारतीय संघाचे तत्वज्ञान नाकारतात असा होत नाही का? त्यामुळेच एकीकडे धार्मिक सलोख्याची भाषा आणि दुसरीकडे राजकीय फायदे होतात म्हणून धार्मिक विद्वेषाकडे डोळेझाक अशी एकाचवेळी नायक आणि खलनायकाची दुहेरी भूमिका करणे कदाचित संघ आणि भाजपासाठी हिताची असेल पण देशहिताची मात्र कदापि नसेल. धार्मिक विद्वेष देशासाठी घातक आहेच पण इतर धर्माविषयी आपुलकीचे सोंग आणणारी संघटना व विचार त्याहून जास्त घातक ठरू शकतात.