या शेअर मार्केटमध्ये इतकी वर्षं काढल्यावर निलेशच्या मते, गुंतवणूक हा एक प्रकारचा व्यवसायच आहे. बचत केलेले पैसे जेव्हा योग्य ठिकाणी गुंतवता तेव्हा ते पैसे वेळ व मेहनत न वापरता अधिक पैसे कमावून देतात. मी देखील दुसर्यांना शेअर विकून जितके कमिशन मिळविले त्याच्यापेक्षा कैक पटीने स्वतः शेअरमध्ये गुंतवणूक करून कमावले आहेत. ‘शेअर मार्केट ही जागा नक्कीच धोक्याने भरलेली आहे, म्हणून येथे गुंतवणूक करताना स्वतःच्या बचतीचे योग्य नियोजन करून त्यातील काही भाग चांगल्या कंपनीत नियमित गुंतवा; जेणेकरून बाजार यदाकदाचित कोसळला तरी तुमची बचत बुडणार नाही.
—-
दादरसारख्या मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी २५ मजली टॉवरमध्ये फ्लॅट बुक करून येताना निलेशच्या मनात अनेक गोष्टी दाटून आल्या होत्या… गतायुष्याकडे पाहताना त्याला गिरणी कामगार वडील, दोन मोठे भाऊ, एक बहीण, आई, असा मोठा संसार दहा बाय बाराच्या खोलीत परिस्थितीशी दोन हात करताना दिसतोय… म्युनिसिपालटीच्या शाळेत झालेलं प्राथमिक शिक्षण, मधल्या काळात गिरणी कामगारांचा संप, वडिलांची गेलेली नोकरी यातून पुढे दहावीनंतर फी भरायला पैसे नाहीत म्हणून कॉलेज करावं की नाही हा उभा ठाकलेला प्रश्न, यावर नोकरी करत शिक्षण घ्यायचा निर्णय घेऊन निलेश बांदेकर या मराठी मुलाचा प्रवास सुरू झाला होता…
…चाळीतल्या एका शेजार्यांच्या ओळखीने `रिच इन्वेस्टमेंट’ या शेअर खरेदी-विक्री करणार्या कंपनीत त्याला पहिली नोकरी मिळाली ती ऑफिस बॉयची. ग्राहकांच्या घरून चेक आणायचे, ते शेअर मार्केटमध्ये घेऊन जायचे आणि त्यांनी गुंतवणूक केलेले शेअर्स त्यांना घरी नेऊन द्यायचे या बेसिक कामापासून निलेशच्या स्टॉक मार्केटचा श्रीगणेशा झाला होता…
…निलेशच्या एकूण जडणघडणीत मुंबईतील चाळ संस्कृतीचा फार मोठा वाटा आहे. या चाळ संस्कृतीत काही गोष्टी बाय डिफॉल्ट तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होतात. त्यापैकीच एक म्हणजे येथील मुलांचं जन्मजात `कार्यकर्ता’ असणं. लहानाचे मोठे होताना इतरांच्या अडचणींना धावून जायचं, मदत करायची याचं बाळकडू मुलांना आपसूकच मिळत जातं. कोणी आजारी पडून इस्पितळात दाखल झाला तर तिथे रात्रपाळी करणे, अपघात झाला तर रक्तदान करणे, एखाद्याला महिना अखेर पैशाची चणचण भासली तर आपल्या खिशाला झेपेल अशी किंवा किमान त्याच्या घरची एक दिवसाची चूल पेटेल इतकी मदत करणे हा इथला मानवधर्म मानला जातो. चाळीतल्या मोठ्या कुटुंबाचा एक भाग होताना इथे साजरे होणारे सर्व सार्वजनिक उत्सव असोत वा सुख-दुःखाचे कार्य असो- त्याची तयारी करताना पडेल ते काम करण्याची सवय अंगवळणी पडत जाते. याचाच परिपाक म्हणून चाळील्या एखाद्या मोठ्या माणसाने, `माझा मदतनीस म्हणून चलतोस का?’ असं विचारलं, तर अशा `बिनपगारी नावीन्यपूर्ण’ कामासाठी नुकताच मिसरूड फुटून हंगामी नोकरीला लागलेला कोणताही मुलगा लगेच तयार होतो. अगदी तसंच, एके दिवशी निलेशला चाळीतील एका फोटोग्राफर काकांनी शिवसेना शाखेत हळदी-कुंकू समारंभाचे फोटो काढायला येतोस का, असं विचारलं आणि सोबत घेऊन गेले. तिथे पहिल्याच दिवशी निलेशचा उत्साह, मेहनत पाहून फोटोग्राफर काका पुढे काही महिने लग्न, मुंज, साखरपुडा अशा ठिकाणी मदतनीस म्हणून नेत असत. हळूहळू निलेशला त्यांचा कॅमेरा हाताळायची संधी देखील मिळाली. काही महिन्यांनी निलेशने `रिच इन्वेस्टमेंट’च्या नोकरीतून पैसे साठवत सेकंडहॅण्ड कॅमेरा विकत घेतला आणि अर्थार्जनाचे अजून एक छोटे द्वार खुले केले.
निलेश म्हणाला, फोटोग्राफी हा माझ्यासाठी नोकरी सांभाळून केलेला व्यवसाय कम छंद होता. एक दिवस शिवसेना शाखेतून काकांना बोलावणे आलं, तेव्हा काका नेमके बाहेरगावी गेले होते. मग कॅमेरा घेऊन मी गेलो, शाखेत मनोहर जोशी सर आले होते. मी काढलेले कार्यक्रमाचे फोटो सरांना आणि सर्व पदाधिकार्यांना फार आवडले. मग काका नसताना आमच्या विभागातल्या शिवसेनेच्या इतर कार्यक्रमांना मला बोलावणं येऊ लागलं. ही छोटीमोठी कामं सुरू असताना १९९५ साली युतीचं सरकार आलं आणि मनोहर जोशी सर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वर्षा बंगल्यावर, राजभवनात, दादर मतदारसंघात माझा कॅमेरा आणि मी संचार करू लागलो. जोशी सर जिथे जातील, तिथे आम्हा फोटोग्राफर मंडळींना जावं लागत असे. त्या काळात मला शिवसेनेच्या कार्यक्रमात तसेच मातोश्री बंगल्यावर हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकांनाशी संवाद साधताना अगदी जवळून पाहता आलं. त्यांच्या बोलण्यात एक विषय नेहमी असायचा, `आपल्या मराठी माणसाने नोकरीच्या मागे लागायचं सोडून धंद्यात यायला हवं.’ बाळासाहेबांचे हे विचार ऐकून महाराष्ट्रातील हजारो मराठी तरुणांनी स्वयंरोजगाराचं पाऊल उचललं. कुणी वडापावची गाडी टाकली, कुणी रेडिमेड कपडे विकायला सुरुवात केली, तर काही महिलांनी लोणची, मसाले, पापड घरी बनवून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. हे सर्व मी जवळून पाहत होतो. मला एका बाजूला नोकरीत छान पैसे मिळत होते, पण दुसर्या बाजूला बाळासाहेबांचे ज्वलंत विचार दुसर्य्ााची गुलामी करू देत नव्हते. मलाही स्वतःचा व्यवसाय असावा असं वाटू लागलं होतं.
नव्वदच्या दशकात कंपन्यांचे शेअर्स प्रमाणपत्र स्वरूपात मिळायचे. त्यामुळे त्यांची खरेदी-विक्री करताना अनेक कागदपत्रीय सोपस्कार करावे लागत. चौकस बुद्धीमुळे या कामात निलेश तरबेज झाला होता. आता त्याची ओळख फक्त ऑफिस बॉय अशी न राहता कोणतीही जबाबदारी पार पाडणारा एक `ऑलराउंडर’ मुलगा अशी होत होती. त्या काळात शेअर्स ट्रान्स्फर करताना `सिग्नेचर व्हेरिफिकेशन’ हा भाग खूप महत्त्वाचा असायचा. ही सही-पडताळणी संगणकपूर्व काळात बँका करून देत असत. पण बहुतांश वेळा बँकेतील कर्मचारी ही सेवा उपलब्ध नाही असे सांगून ग्राहकांना वाटाण्याचा अक्षता लावीत असत. एखादी बँक तयार झालीच तर मोठमोठ्या लेजर बुकच्या ढिगातून `नमुना सहीची’ पडताळणी करून सही योग्य आहे, हे सांगणारा कागद बँकेच्या अनेक वार्या केल्यावर किमान आठ ते दहा दिवसांनी हाताला लागत असे. हा द्राविडी प्राणायाम करायला अनेक ग्राहक आणि त्यांचे शेअर दलाल नाखूष असत. त्यामुळे सही-पडताळणीला बगल देऊन दलाल मंडळींचे ऑफिस बॉय शेअर ट्रान्स्फरचा फॉर्म भरून कंपनीच्या मुख्य कार्यालयात पाठवून देत. काही वेळेला ते रिजेक्ट होऊन शेअर्स `कस्टडी’मध्ये पडून राहात. त्या काळात अशा परिस्थतीमधून मार्ग काढायला ग्राहकांच्या हाताशी ईमेल, कस्टमर केअर नंबर हे संपर्क साधन नसायचं, माहिती नसायची; मग भारतीय डाक विभागाद्वारे केलेला पत्रव्यवहार हाच मुख्य आधार होता. निलेशला देखील या समस्येचा सामना करावा लागत होता. यावर काहीतरी तोडगा काढावा याचा विचार करत असताना त्याला एक उपाय सापडला. युतीचे सरकार आल्यावर निलेशचे अनेक शिवसेना शाखांमध्ये फोटोग्राफीसाठी जाणे-येणे वाढले होते. तेथील काही पदाधिकार्यांना जेपी (जस्टिस ऑफ पीस) हे पद मिळाले होते. याअंतर्गत त्यांना काही सरकारी कागदपत्रे साक्षांकित करण्याचे विशेषाधिकार सरकारने बहाल केले होते. याचा उपयोग आपल्या ग्राहकांसाठी करून घ्यायचा असं निलेशने ठरवलं. सुरुवातीला फार रिस्क न घेता कमी किंमतीचे शेअर्स (फॉर्म नाकारला गेला तरी फार नुकसान होऊ नये यासाठी) असलेल्या प्रमाणपत्राचे `सिग्नेचर व्हेरिफिकेशन’ जेपीकडून करून घेऊन त्याने ते कंपनीकडे ट्रान्स्फरसाठी पाठवून दिले. नंतर ग्राहकाकडे शेअर्स ट्रान्स्फर होऊन आले का, याचा फॉलोअप घेतला. निलेशच्या युक्तीला यश मिळाले आणि एका महिन्यात कंपनीकडून शेअर्स ट्रान्स्फर होऊन आले देखील. तेव्हापासून कमी दिवसात शेअर्स ट्रान्स्फर करून देणारा मुलगा अशी त्याची एक नवीन ओळख ग्राहकांमध्ये निर्माण झाली. त्या काळात एकाचे शेअर्स त्याला न कळवता दुसर्याच्या नावावर ट्रान्स्फर करणे किंवा वारसदाराचे नाव बदलून दुसर्याचे शेअर्स तिसर्याच्याच नावावर ट्रान्स्फर करणे, बनावट शेअर्स छापून विकणे असे फसवणुकीचे अनेक प्रकार होत असत. पण त्याचवेळी एक तरूण मराठी मुलगा अगदी प्रामाणिकपणे आणि जलदगतीने सेवा देतो आहे ही माहिती माऊथ टू माऊथ पब्लिसिटीमुळे अनेक ग्राहकांपर्यंत पोहचली आणि हळूहळू अनेक ग्राहक निलेशला शोधत येऊन कामे सांगू लागले. यामुळे नोकरीव्यतिरिक्त पैसे कमावण्याचे आणखी एक दालन त्याच्यासाठी खुले झाले. हे सगळं सुरळीत सुरू असताना एक दिवस काही कारणाने `रिच इन्वेस्टमेंट’ फार अडचणीत आली आणि गुंतवणूकदारांच्या रोषामुळे पुढे दोन वर्षांतच त्यांनी गाशा गुंडाळला. त्या कंपनीच्या ज्या गुंतवणूकदारांना निलेश सर्व्हिस देत होता त्यातील अनेक जणांनी निलेशसोबत संपर्क साधला आणि आपलं काम त्यानेच करावं, अशी अपेक्षा व्यक्त केली. शेअर मार्वेâटचे कामकाज कसं चालतं याची माहिती निलेशला होतीच- त्याचबरोबर कामाची अधिकची माहिती घेणं, जे कळत नाही, माहिती नाही ते विचारून घेणं या गोष्टी निलेशने आवर्जून केल्या होत्या, त्यामुळेच व्यवसायरूपी संधीने दार ठोठावले, तेव्हा निलेश पूर्ण तयारीनिशी तिच्या स्वागताला उभा होता.
आयुष्यातील पहिल्या टर्निंग पॉइंटबद्दल निलेश म्हणाला, `त्या काळात शेअरदलालीच्या परवान्याची किंमत एक कोटी रुपये होती. मला ग्राहकांच्या वतीने गुंतवणूक करायला शेअर दलालाकडे जावं लागत असे. पहिल्यांदा मी एका दलालाकडे काम घेऊन गेलो तेव्हा तो म्हणाला, `तुम्ही मराठी माणसं धंदा करू शकत नाही, तुझे सर्व ग्राहक मला दे आणि तू माझ्याकडे नोकरीला ये. मी तुला आधीच्या दुप्पट पगार देतो.’ पण, यापुढे कोणाचीही चाकरी करायची नाही या निर्धाराने त्याला हात जोडले आणि दुसरा दलाल शोधून त्याच्याकडे सब-ब्रोकर म्हणून कमिशनवर कामाची सुरुवात केली.’
या कामानिमित्त शेअर मार्वेâट बिल्डिंगमध्ये जाणं व्हायचं तेव्हा बाजारातील घडामोडी, बाजार वर खाली जाताना होणारे सूक्ष्म बदल निलेश चौकसपणे टिपत होता आणि त्यातून शिकत होता. गुंतवणूकदार पैसे कसे गुंतवतात, त्यांची मानसिकता काय असते, खूप अपेक्षा ठेवल्यानंतर त्यांचा भंग कसा होतो हेही तो जवळून पाहात होता. २००१ साली `केतन पारिख’ घोटाळा झाला. हर्षद मेहता प्रकरणानंतर झालेल्या या महाघोटाळ्यात लाखो लोकांचे पैसे बुडाले, कैक गुंतवणूकदार देशोधडीला लागले. यातूनही जे तरले, बाजारात टिकून राहिले, त्यांची प्रगती होत गेली.
शेअर बाजाराची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे बाजार फार तेजीत वर वर जात असताना इथे अनेक हौशे-गवशे-नवशे गुंतवणूकदार येत असतात. यांची तुलना नववर्षाचा आरोग्यसंकल्प घेऊन एक जानेवारीला जिममध्ये नोंदणी करणार्या तरुणाईशी करता येईल. या पहिलटकर शंभरांपैकी नव्वदजण पहिल्याच आठवड्यात पळून जातात आणि फक्त दहा टक्के टिकून राहतात. ही गोष्ट जुन्या मेंबर्सना `अवगत’ असते. म्हणूनच जुनी जाणती बॉडीबिल्डर मंडळी वर्षाच्या सुरुवातीला आठ-दहा दिवस जिमकडे फिरकतच नाहीत. ही भाऊगर्दी फक्त आठच दिवस टिकणारी आहे, हे त्यांना माहिती असतं. त्याचप्रमाणे कोणत्याही मोठ्या घटनेमुळे मार्केट कोसळतं, तेव्हा जे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले गुंतवणूकदार पाठीला पाय लावून पळून जातात आणि पुन्हा आयुष्यात कधीच शेअरबाजाराचे तोंड पाहात नाहीत. जे मार्केटच्या पडझडीत टिकून राहतात, तेच लाँग टर्ममध्ये पैसे कमावतात. अशा अनेक `ब्लॅक फ्रायडें’चे अनुभव निलेशच्या गाठीशी होते आणि त्यातून तो धडे घेत होता.
अनेक घोटाळे समोर आल्यावर सेबीने आणि भारत सरकारने शेअर बाजारातील व्यवहार अधिकाधिक पारदर्शक करण्यासाठी बाजार संगणकीकृत करायला सुरूवात केली आणि अनेक वर्ष सुरू असलेली दलालांची मक्तेदारी मोडीत काढून, बाजारातील व्यवहार हाताळण्यासाठी सुशिक्षित तरुणांना परीक्षा घेऊन लायसन्स द्यायला सुरुवात केली. याचाच लाभ घेत निलेशने २००४ साली नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि मुंबई शेअर बाजारची परीक्षा पास केली आणि स्वतःच्या नावाने शेअर ब्रोकर म्हणून नोंदणी केली.
ऑफिस बॉय ते शेअर ब्रोकिंग कंपनीचा मालक असे वर्तुळ पूर्ण केलं.
शेअर बाजारात `टिप्स’ मिळणं हा एक इंटरेस्टिंग विषय असतो. या टिप्सचा उगम कोणालाच माहिती नसतो, पण अनेक शेअर दलाल या टिप्सवर स्वार होऊन गुंतवणूकदारांच्या लाखो-करोडो रुपयांची उलाढाल करीत असतात. काही वेळा फायदा होतो, तर काही वेळा नुकसानही होतं, निलेश देखील सब ब्रोकर म्हणून काम करताना ग्राहकांना खरेदी-विक्रीचा सल्ला देत असे. स्वतःचे लायसन्स मिळाल्यावर आठ दिवसातच एका शेअरचे भाव उद्या भरपूर वाढणार आहेत अशी एक खात्रीदायक टिप त्याला मिळाली आणि निलेशने त्यांची गुंतवणूकदारांच्या वतीने मोठ्या प्रमाणात खरेदी केली. दिवसाच्या सुरुवातीला शेअरमध्ये `हलचल’ दिसू लागली, पण त्या समभागाची वर जाणारी रेषा अचानक पार खाली खाली जाऊ लागली. मोठे नुकसान घेण्यापेक्षा आता हे शेअर्स विकून टाकण्याचा निर्णय निलेशने क्षणाचाही विलंब न करता घेतला आणि लॉस बुक करून तो त्या चढाओढीतून बाहेर आला. त्या दिवशी निलेशला चार लाखाचा तोटा सहन करावा लागला. हे चार लाख रुपये अशा गुंतवणूकदारांचे होते ज्यांनी निलेशच्या शब्दावर विश्वास ठेवून ते पैसे त्या शेअर्समध्ये गुंतवले होते. गुंतवणूकदारांचे पैसे आपल्या चुकीच्या टिपमुळे बुडाले, याची खंत निलेशला सतावत होती. परिस्थिती नसतानाही असेल-नसेल ती सर्व पुंजी निलेशने एकत्र केली आणि चार लाख रुपये गुंतवणूकदारांना परत केले. (आज चौदा वर्षानंतर ते सर्व गुंतवणूकदार निलेशच्या कंपनीसोबत व्यवहार करीत आहेत आणि ते चार लाखाचे नुकसान त्यांनी दिलेल्या व्यवसायामुळे कैक पटींनी भरून निघाले आहे). ही मोठी ठेच लागल्यावर निलेश इंट्रा डे व्यवहार टाळून डिलिवरी बेस व्यवहार करत गेला आणि कोणा एखाद्या ग्राहकाला इंट्रा डे मध्ये गुंतवणूक करायचीच असेल तर ती उलाढाल करताना टिप्सवर आधारित सल्ला त्याने पुन्हा कधीही दिला नाही. काही वर्षांनी शेअर बाजार संपूर्ण संगणकीकृत झाल्यावर आर्थिक धोके कमी झाले. अनेक मध्यमवर्गीय सुशिक्षित नोकरदार बाजारात अधिकाधिक गुंतवणूक करू लागले. बँकेतील मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदर कमी कमी होत जाणे हेही याचं एक प्रमुख कारण आहे. याचा निलेशला व्यवसायवाढीसाठी फायदा झाला. जुनी माणसं म्हणायची, सगळी अंडी एकाच भांड्यात ठेऊ नयेत, चुकून कधी भांड्याला धक्का लागला तर सगळी अंडी एकाच वेळी फुटतात. अगदी तसचं बचतीचंही आहे. गुंतवणूकदाराने कधीही एकाच क्षेत्रात पैसे गुंतवू नयेत, असा आर्थिक साक्षरतेचा अलिखित नियम आहे. निलेशचा धंद्यासोबत या क्षेत्रातील खाचाखोचा शिकण्याचा स्वभाव त्याला एक `प्रॅक्टिकल’ गुंतवणूक सल्लागार बनवत होता. निलेशचे ग्राहक त्यांच्या इतर गुंतवणुकीविषयी त्याचाशी बोलायचे, तेव्हा निलेश त्यांना सोने, बँक एफडी, विमा योजना, घरखरेदी, म्युचुअल फंड अशा विविध पर्यायांचा अवलंब करण्याचा सल्ला विनामोबदला देत असे. आयकर-बचतीसाठी जी गुंतवणूक करावी लागते, त्याबाबतही अनेक उपयुक्त गोष्टी तो सुचवायचा. अनेकदा विमा प्रतिनिधी पॉलिसी विकताना कमिशनकडे डोळा ठेऊन ग्राहकांना चुकीचा विमा प्लॅन विकतात. त्यामुळे वीस वीस वर्षे नियमित पैसे भरूनही ग्राहकांच्या हातात पडणारी एकूण रक्कम बहुतांश वेळा बँकेतील व्याजपेक्षाही कमी भरते. अशा वेळी निलेश टर्म इन्शुरन्स पॉलिसी विकत घेण्याचा सल्ला ग्राहकांना द्यायचा तेव्हा अनेक विमा प्रतिनिधी या पॉलिसी विकायला राजी नसायचे किंवा नंतर सर्व्हिस द्यायला टंगळमंगळ करायचे. त्याउलट निलेशच्या कामातील प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा पाहून अनेक ग्राहकांनी त्याला विमा, पोस्ट, म्युचुअल फंड्स अशा कंपन्यांची एजन्सी घ्यायला सुचवलं. एक एक करत सर्व ग्राहकांची आर्थिक गुंतवणूक निलेशच्याच विविध एजन्सीजमधून होत गेली आणि `एव्हरी इन्व्हेस्टमेंट अंडर वन रूफ’ या संकल्पनेखाली निलेशच्या `प्लस इन्व्हेस्टमेंट’ या कंपनीच्या रोवलेल्या बीजाचा हळूहळू डेरेदार वटवृक्ष होत गेला.
व्यवसायाची सुरुवात निलेशने घरातूनच केली होती, पण ग्राहकांची कागदी शेअर सर्टिफिकेट्स, इतर कागदपत्रे यांचा साठा दिवसेंदिवस वाढतच गेला आणि घरातील माणसांना घरात राहायला जागा अपुरी पडू लागली. यामुळेच आधी भाड्याने आणि नंतर माहीम भागात स्वमालकीचं ऑफिस घेतल्यावर चार माणसं हाताखाली ठेवत `प्लस इन्व्हेस्टमेंट’ची सर्व्हिस निलेशला अधिकाधिक चांगली करता आली.
व्यवसायात आर्थिक उत्कर्ष साधत असताना निलेशचे वय देखील वाढत होते. कामाच्या रगाड्यातून लग्न हा विषय मागे पडत चालला होता. अधून मधून कांदेपोहे खाण्याचा कार्यक्रम व्हायचा, पण शेअर मार्केटशी संबधित व्यवसाय आणि चाळीतील `सार्वजनिक’ राहणीमान या कारणांमुळे पोहे पचण्याआधीच नकार मिळालेला असायचा. ही नकारघंटा वाजत असताना निलेशच्या जीवनाला कलाटणी देणारी एक घटना घडली. त्याच्या ऑफिसमध्ये सोनाली पडवळ ही मुलगी काम करत होती. निलेश बॉस असला तरी गरीबीतून वर आल्यामुळे त्याला परिस्थितीची जाण होती. ऑफिस कर्मचार्यांना तो समान वागणूक देत असे. एक दिवस सोनालीसोबत सहज गप्पा मारताना लग्न जमत नाही, हा विषय निघाला, तेव्हा सोनाली म्हणाली, `शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मुलाला लग्नासाठी मुलगी मिळत नाही हे कसं शक्य आहे?’ त्यावर निलेशने `हे खरं आहे, बोल तू करतेस का माझ्याशी लग्न?’असा प्रतिप्रश्न केला. हे ऐकून धक्का बसलेल्या सोनालीने, `घरच्यांशी बोलते,’ असं सांगून तो विषय तिथेच संपवला. चार वर्षं ऑफिसमध्ये काम करताना बॉसचा स्वभाव, वागणूक आणि आर्थिक स्थिती यांची सोनालीला कल्पना होती. अचानक घातलेल्या मागणीचा धक्का पचवल्यावर, आईबाबांसोबत बोलून तिने लग्नाला होकार दिला. घरातील माणूस धंद्यात असेल तर तो धंदा `दिन दुगनी रात चौगुनी’ प्रगती करतो असं म्हणतात. पण धंद्यातील माणूसच घरात लक्ष्मी बनून आली तर काय होतं, याचं प्रत्यंतर पुढील काही वर्षांतच निलेशला, त्याचा व्यवसाय कैक पटीत वाढल्यावर आले.
आज कोरोनानंतरच्या काळात शेअर व्यवसायात अनेक चांगले बदल झाले आहेत. लोक आर्थिक साक्षर होत आहेत. २५ वर्षांपेक्षा अधिक काळ या व्यवसायात व्यतीत केल्यावर निलेशने बिझनेस मॉडेलमध्ये कालानुरूप बदल केला आहे. जुन्यातील टिकाऊ आणि नव्यातील उत्तम संकल्पना घेऊन त्याने व्यवसाय वाढता ठेवला आहे. आज त्याचे बहुतांश ग्राहक हे पाच लाखावरील गुंतवणूक करणारे आहेत, ज्यांना तो पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस देतो आहे. त्याची बायको सोनाली आता कंपनीच्या बॅक ऑफिसची जबाबदारी उत्तम रीतीने हाताळून मोलाचा वाटा उचलत आहे.
निलेश बांदेकरसारखे हजारो तरूण जिथे नशीब आजमावयाला येतात, अशा मुंबई शेअरबाजाराला देशाच्या राजकीय, औद्योगिक आणि आर्थिक वर्तुळात महत्वाचे स्थान आहे. लक्षावधी गुंतवणूकदारांचे आर्थिक भवितव्य मुंबई शेअरबाजारावर अवलंबून असते. जगातील ११व्या क्रमांकावर असलेला हा शेअर बाजार सुरू कसा झाला, याचा इतिहास मोठा रोचक आहे. १८५५च्या सुमारास मुंबई टाऊन हॉलसमोरील वडाच्या झाडाखाली बसून व्यवसाय करणार्या चार गुजराती आणि एक पारशी अशा पाच शेअर ब्रोकर्सनी मिळून मुंबई शेअरबाजाराची स्थापना केली. नंतर हळुहळू ब्रोकर्सची संख्या वाढू लागली. त्यामुळे १८७५मध्ये या ब्रोकर्सनी एकत्र येऊन `द नेटिव्ह शेअर अॅन्ड स्टॉक ब्रोकर असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी दलाल स्ट्रीटवर एक कार्यालयही खरेदी केले. हेच कार्यालय सध्या मुंबई शेअर बाजार म्हणून ओळखले जाते. तर राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना १९९०मध्ये केली गेली. विविध क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या राष्ट्रीय शेअर बाजाराचे संचालन करीत असतात.
ऑक्टोबर २०२१च्या रिपोर्टनुसार या शेअर बाजारात पाच हजारहून अधिक कंपन्या नोंदणीकृत झाल्या आहेत, व बाजाराचे एकूण मार्केट मूल्य २५५ लाख कोटी रुपये इतके आहे.
या शेअर मार्केटमध्ये इतकी वर्षं काढल्यावर निलेशच्या मते, गुंतवणूक हा एक प्रकारचा व्यवसायच आहे. बचत केलेले पैसे जेव्हा योग्य ठिकाणी गुंतवता तेव्हा ते पैसे वेळ व मेहनत न वापरता अधिक पैसे कमावून देतात. मी देखील दुसर्यांना शेअर विकून जितके कमिशन मिळविले त्याच्यापेक्षा कैक पटीने स्वतः शेअरमध्ये गुंतवणूक करून कमावले आहेत. नवीन गुंतवणूकदारांना सल्ला देताना तो म्हणाला, `शेअर मार्केट ही जागा नक्कीच धोक्याने भरलेली आहे, म्हणून येथे गुंतवणूक करताना स्वतःच्या बचतीचे योग्य नियोजन करून त्यातील काही भाग चांगल्या कंपनीत नियमित गुंतवा; जेणेकरून यदाकदाचित बाजार कोसळला तरी तुमची बचत बुडणार नाही. या क्षेत्रात ज्ञान आणि अनुभव वाढत जाईल, तसतसे आपण हळुहळू गुंतवणूक वाढवू शकता. कुणी म्हणालं, मार्केट तेजीत आहे, लावा पैसे, कमी काळात कैक पटीने कमावाल, तर त्याचं ऐकून कर्ज काढून इथे पैसे लावू नका. काही मंडळी या बाजाराला सट्टा, जुगार असेही संबोधतात. अशा लोकांपासून चार हात लांब रहा. पैसे झाडाला लागत नाहीत, तसेच वाढणार्या सेन्सेक्सला देखील लागत नाहीत हे लक्षात ठेवा. आणि शेवटचं सांगायचं तर `रेस हमेशा लंबी रेस का घोडा ही जीतता है’ हे लक्षात ठेवा.’
निलेशचा हा यशस्वी प्रवास ऐकल्यावर छान वाटतं. पण शेअर मार्केटवर राज्य करणारी `राकेश झुनझुनवाला, राधाकिशन दमानी, रमेश दमानी, रामदेव अग्रवाल, विजय केडिया, निमिष शाह, पोरिंजू वेलियाथ, डॉली खन्ना, आशिष कचोलिया, चंद्रकांत संपत’ ही टॉप टेन नावं वाचली तर एक गोष्ट प्रकर्षाने टोचणी देते- ती म्हणजे यात एकही मराठी नाव नाही… अर्थात मराठी माणसाची येथील सुरुवात देखील उशिराच झाली होती. पण गेल्या काही वर्षात बाजारातील मराठी टक्का वाढताना दिसतोय. तेव्हा आता मराठी माणसाने या बाजारातून अधिकाधिक पैसे कमावून, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, असं म्हणत सेन्सेक्सच्या अटकेपार झेंडे लावावेत अशी मराठी मनाची अपेक्षा आहे.