नववर्षाशी जोडलेलं आणखी एक कर्मकांड म्हणजे नवीन वर्षाचे संकल्प. नवीन कोवळ्या वर्षाच्या नाजूक खांद्यावर आपल्या अपेक्षांचे ओव्हरलोडेड ओझे लादणे मला तरी पटत नाही. या वर्षाची सुरुवात शनिवारी म्हणजे ‘न कर्त्याच्या वारी’ होत आहे. त्यामुळे या वर्षीसाठी काही करण्याचा संकल्प करणे म्हणजे नो बॉलवर विकेट काढण्यासारखे आहे. खरं तर चांगलं काही सुरू करण्यासाठी लोकांना अमुक एका मुहूर्ताची गरज का लागते हे अनाकलनीय आहे. पुढील एक जानेवारीला संकल्प करता यावा म्हणून ३६४ दिवस वाट पाहणारे नग मी पाहिले आहेत.
—-
एरव्ही हा हा म्हणता दिवस, महिने, वर्षे संपतात, पण २०२० आणि २०२१ ही दोन वर्षे मात्र जगभर हाहाकार माजवून संपली… खरंतर, हा हा म्हणता काही वर्षे संपत नाहीत; तसं झालं असतं तर सिद्धू, अर्चना पुरनसिंग, सई ताम्हणकर, प्रसाद ओक ह्यांच्यासारख्यांचं वर्ष एका दिवसातच संपलं असतं!
‘थप्पड़ से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है’च्या चालीवर मला असं म्हणावंसं वाटतं की, ‘नये साल से डर नहीं लगता साहब, नये साल की शुभकामनाओं से लगता है’. जोवर सणासुदीच्या शुभेच्छा पाठविण्यासाठी लिहिण्याची मेहनत आणि पोस्टकार्डाचा खर्च करावा लागत होता, तोवर पाठविल्या जाणार्या शुभेच्छांमध्ये भावनांचा ओलावा होता. तीन मिनिटांच्या कॉलसाठी बंदा रुपया मोजावा लागत होता, तोवरही शुभेच्छांमधील भावनांचा ओलावा टिकून होता. पण व्हॉट्सअप नामक दैत्याच्या आगमनानंतर आणि ‘अनंतहस्ते कोकिलासुताने’ जवळजवळ फुकटात डेटा देऊ केल्यानंतर घाऊक प्रमाणात ब्रॉडकास्ट केल्या जाणार्या शुभेच्छांतून भावनांचं पूर्णपणे बाष्पीभवन झालं. ‘जे जे इनबॉक्सी पावे, ते ते फॉर्वर्डवून टाकावे, त्रस्त करून सोडावे, सकळ जन’ हेच नव्या काळाचं समर्थवचन झालंय. मी तर म्हणतो, जेव्हा वर्षाचा उंबरठा मद्याच्या नशेत ओलांडला जातो, नवीन वर्षाचा पहिला दिवस कोरड्या शुभेच्छा फॉर्वर्डण्यात आणि आलेल्या शुभेच्छा न वाचता ‘सेम टू यू’ म्हणून डिलीटण्यात जातो त्या वर्षाकडून आपण आणि आपल्याकडून त्या वर्षाने तरी काय अपेक्षा धराव्यात!
आजच्या काळात जगायचं, टिकायचं आणि यशस्वी व्हायचं असेल तर माणसाने धूर्त, स्वार्थी, बेमुर्वत आणि बेशरम होणे गरजेचे आहे. पण नवीन वर्षात ‘तुम्ही अधिकाधिक धूर्त, स्वार्थी, बेमुर्वत आणि बेशरम व्हावे’ अशा शुभेच्छा कुणी देत नाही. याचा अर्थ आपण यशस्वी व्हावे असे कुणालाच वाटत नाही असा घ्यावा काय?
काळ हा अखंड वाहणारा असतो. त्याला सुरुवात नाही, शेवट नाही. आपण आपल्या सोयीसाठी त्या काळाचे ऋतूनुसार वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे आणि दिनमानानुसार दिवस, पंधरवडा, महिने, वर्षे असे तुकडे पाडले. त्यातूनच पुढे महिना संपल्यावर पगार घेऊन बिले भरण्याची आणि वर्ष संपल्यावर दारू पिऊन नाचण्याची आणि शुभेच्छा देण्याची प्रथा सुरू झाली. असे म्हणतात की, वर्ष हा शब्द वर्षा (पावसाळा) या शब्दापासून आलाय. कधी काळी, एक पावसाळा जाऊन दुसरा पावसाळा आला की वर्ष बदलले असे म्हटले जात असे. पुढेपुढे निसर्गाचा समतोल ढळल्याने पावसाचं येणंजाणं देखील अनियमित झालं आणि मग शरद ऋतू हा वर्ष बदलल्याचं निदर्शक मानला जाऊ लागला (जीवेत शरदः शतम या शुभेच्छा त्यावरूनच आल्यात). आपल्या महाराष्ट्रात मात्र गेली काही दशके, ‘शरदा’च्या कलाने घेणार्यासच ‘वर्षा’चा लाभ होताना दिसतो आहे, हे जाणकारांच्या लक्षात आलंच असेल. जाणकार नसलेल्यांनी वाईट वाटून घेण्याचं कारण नाही, तुम्ही मेजॉरिटीमधे आहात!
एकीकडे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चिकन-मटण खाण्याचं, दारू पिऊन धिंगाणा घालण्याचं फॅड आहे. तर एक जानेवारीला नवीन वर्ष मानायचं नाकारून गुढी पाडव्यालाच नवीन वर्ष म्हणणार्यांचा टोकाचा अट्टाहास दुसरीकडे. मागील वर्षी, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री आमच्या घोटगाळकर काकांनी त्यांच्या शालेय मित्राला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. त्यावेळी तो मित्र कुटुंबासह, युरोपीय पद्धतीने सजवलेल्या दिवाणखान्यात बसून दुबईहून आणलेल्या चिनी प्याल्यातून स्कॉच पीत, इटालियन पिझ्झा खात, आपल्या ली-कूपरच्या शर्टवर पडलेला बेकनचा कण झटकत होता. मलेशियन साईड-टेबलवर ठेवलेला अमेरिकन कंपनीचा कोरियात बनवलेला फोन वाजला म्हणून त्याने तो उचलला. फोनवर घोटगाळकर काकांनी ‘हॅप्पी न्यू इयर’ म्हणताच तो मित्र कळवळ्याने म्हणाला, मित्रा, हा नव्हे रे आपला नववर्षदिन. काय द्यायच्या त्या शुभेच्छा आपल्या पाडव्याला दे. २ एप्रिलला शनिवारी आहे पाडवा यावर्षी, लक्षात ठेव. संस्कृती जपू या रे जरा!
नववर्षाशी जोडलेलं आणखी एक कर्मकांड म्हणजे नवीन वर्षाचे संकल्प. नवीन कोवळ्या वर्षाच्या नाजूक खांद्यावर आपल्या अपेक्षांचे ओव्हरलोडेड ओझे लादणे मला तरी पटत नाही. या वर्षाची सुरुवात शनिवारी म्हणजे ‘न कर्त्याच्या वारी’ होत आहे. त्यामुळे या वर्षीसाठी काही करण्याचा संकल्प करणे म्हणजे नो बॉलवर विकेट काढण्यासारखे आहे.
खरंतर चांगलं काही सुरू करण्यासाठी लोकांना अमुक एका मुहूर्ताची गरज का लागते हे अनाकलनीय आहे. पुढील एक जानेवारीला संकल्प करता यावा म्हणून ३६४ दिवस वाट पाहणारे नग मी पाहिले आहेत. कुणी एक जानेवारीपासून व्यायाम करण्याचं ठरवतं असतं, कुणी डायट करण्याचं ठरवतं, िसंगले लग्न करायचं ठरवतात, कुणी घर घ्यायचं ठरवतात, कुणी वाचन करायचं ठरवतात, कुणी दारू, सिगारेट, सोशल मीडिया सोडायचं ठरवतात. नवीन वर्षाचे संकल्प हे अच्छे दिन किंवा पंधरा लाखांच्या आश्वासनासारखे असतात. एक जानेवारी नावाचा नरेंद्र छातीठोकपणे बडेबडे संकल्प ठरवत असतो, तेव्हाच दोन जानेवारी नावाचा अमित ‘संकल्प हा एक जुमला असल्याचं’ आपल्या कानात कुजबुजत असतो.
मी खूपच मोजून मापून बोलणारा, चालणारा, वागणारा माणूस असल्याने येत्या वर्षी एखादा मोठा मूर्खपणा करायचा संकल्प करूया असे एक क्षण मनात येऊन गेले. पण मग मी मलाच म्हटले की या क्षेत्रात आधीच खूप स्पर्धा आहे त्यात आणखी आपली भर नको.
मुळात, तुम्ही-आम्ही सामान्य माणसांनी संकल्प करून काय होणार आहे? तिथे आपल्या डोक्यावर बसलेल्या सरकारचा संकल्प आहे की, ‘एक एक को चुन चुन कर मारुँगा, कोई नहीं बचेगा सिवाय उनके जिन्हें हम बचाना चाहेंगे.’ त्यामुळे आपल्या हाती इतकेच आहे की काहीही करून सरकार ज्यांना वाचवू पाहतेय त्या लोकांच्या लिस्टमधे आपलं नाव यावं.
असो, नवीन वर्षाकडून फार अपेक्षा नाहीयेत… सणासुदीला येणार्या बिन-भावनांच्या शुभेच्छांचा रतीब तसेच वर्षभर रोज व्हॉट्सअपवर येणारे ‘गुड मॉर्निंग’चे मेसेज आणि ज्ञानवर्धक सुविचारांचा ओघ थांबावा एव्हढी एक, माझी मलाच शुभेच्छा!