भावेकाका आमच्याकडे यायला लागले, त्यावेळी सगळ्या लढाया जिंकून झाल्या होत्या. चाळीस पंचेचाळीस पुस्तके, त्यात नाटक, सिनेमा, ललित, कथासंग्रह, वैचारिक लेख- काय म्हणून नाही! वृत्तीने उत्तम भांडखोर होते. असत्य, अन्यायाची चीड, स्त्री-हक्काचे आग्रही होते. परिणामी तरूणपणातच वडिलांपासून दोनदा वेगळे झाले होते. प्रगल्भ बुद्धिमत्ता, सहृदय मन, हिंदुत्वनिष्ठ पण कडवे नाहीत; अखंड भारताचे स्वप्न पाहणारे ते साहित्यिक होते. या अंगाने त्यांनी अनेक वैचारिक लेख लिहिले. प्रसंगी आचार्य अत्रेंसारख्या बलाढ्य साहित्यिकाशी त्यांनीच सभ्य भाषेत लढा दिला होता. अत्रेंना माघार घ्यावी लागली होती…
—–
स्वातंत्र्यानंतरचे अर्धशतक हे मराठी साहित्यक्षेत्रातील अनमोल रत्नांनी भरलेले म्हणता येईल. सर्वश्री वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे, साने गुरुजी, ना. सी. फडके, ग. दि. माडगूळकर, कुसुमाग्रज, व्यंकटेश माडगूळकर, पु. भा. भावे पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, श्री. ज. जोशी, रणजीत देसाई, जयवंत दळवी, गो. नी. दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे आणि कितीक जणांनी अत्यंत उत्कृष्ट साहित्यनिर्मिती केली. यांचं साहित्य म्हणजे अलिबाबाच्या गुहेतील एकेक रत्न… यातील अनेक दिग्गजांशी माझ्या भेटी, गप्पा झालेल्या आहेत, त्यांच्या सहवासाचे क्षण मला लाभले आहेत. मी व्यंगचित्रकार असल्याने मला माणसे पारदर्शक दिसतात. थोरामोठ्यांना बोलते करून मी अनेकदा त्यांचे पैलू समजून घेत राहिलो. त्यापैकीच एक होते मराठी नवकथेचे एक मोठे शिलेदार… पु. भा. भावे.
१९७० ते ८०च्या दशकात पु. भा. भावे माझ्या घरी अनेकदा मुक्कामी येत असत. त्या काळी हॉटेल्सचे प्रस्थ नव्हते. परगावी आले-गेलेले पाहुणे, व्याख्याते, कलावंत बहुधा गावातल्या प्रतिष्ठितांकडेच मुक्कामी राहात. भावेकाका व्याख्यानानिमित्त नाशिकला आले तर आमच्याकडे राहायचे. अशोकस्तंभ परिसरात माझा छोटासा फ्लॅट होता. दोन मुले, सुगरण पत्नी आणि मी असा प्रपंच होता. एच.ए.एल. या विमान कंपनीत नोकरीस होतो. कंपनीच्या बसेस होत्या. सकाळी ८ ते रात्री १० नोकरीची वेळ असायची. त्यानंतर रात्री एक-दोनपर्यंत जागून दिवाळी अंकांची, दै. गावकरीची आणि जाहिरातींची चित्रे काढीत बसायचो. मराठी विश्व लहान असल्याने भरभर प्रसिद्धी मिळत गेली. टीव्ही नुकताच डोकं वर काढीत होता. त्याचा इतका भयानक भस्मासुर होईल, अशी कल्पना कुणालाही नव्हती. कधीतरी पोरवयात भावेंची ‘वर्षाव’ कादंबरी लोकसत्ता दिवाळी अंकात वाचली होती. ती खूप सुंदर होती. जिचे कथानक त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनेवर बेतलेले होते. त्यावर मी अत्यंत सुंदर अक्षरात आंतरदेशीय पत्र लिहिले होते. ते त्यांना फार आवडले. त्यावर त्यांचे खुशीचे पत्र आले. त्यांचे अक्षराला अक्षर लागणे दुरापास्त होते. अक्षरे पत्रभर पसरलेली, जेथे जागा सापडेल तेथे मजकूर भरलेला. नंतर त्यांची सतत पत्रं येत राहिली. अक्षरांची सुसंगती समजू लागली. त्याच अक्षरात त्यांनी चाळीसच्या वर नाटके, कादंबर्या, ललित लेख, कथासंग्रह लिहिले… बापरे! त्यावर त्यांना विचारलं असता ते म्हणाले, विचारांची गती लिहित्या बोटांना दाद देत नाहीत. त्यामुळे शाळा सुटलेली पोरं जशी सैरावैरा धावतात, तसेच माझे लिखाण मोकाट सुटते.
आमच्याकडे यायचे त्यावेळी बहुदा ते साठीचे असतील. गोरेपान, तुंदिलतनू देहयष्टी, थोडे पुढे झुकलेले, निळे मिस्कील डोळे, मात्र नजर विलक्षण तीक्ष्ण. एखाद्या वयस्क सिंधी व्यापार्यासारखे गोरेपान दिसणारे. त्यांनी माझ्याकडे येताना हुतूतू अक्षरांत कळवलेले असे. मी त्यांना स्टेशनवर घ्यायला जायचो. त्याच्याकडे भली मोठी आकारहीन कातडी बॅग असायची. त्यात पांढरेशुभ्र झब्बे-लेहंग्याचे दहा बारा जोड, दोन-तीन पंचे असत. त्यांना कमालीची स्वच्छता लागे, आंघोळ तीन ते चार वेळा करत. ओले कपडे स्वत:च धूत वाळतही घालत. घरात आले की माझ्या पत्नीला हाक मारून बसवून घेत आणि म्हणत ‘अनुराधा, इकडे ये.’ हातातलं पैशांचं अस्ताव्यस्त जाडजूड पाकीट तिच्या हाती देत म्हणत, ‘मी तीन-चार दिवस राहणार आहे. तुझ्या नवर्याला सुट्टी घ्यायला सांग. या पैशातून त्याचा काय रोज असेल तो देऊन टाक. ते पाकीट म्हणजे ‘अजायबखाना’ असे. अनेक पत्त्यांच्या चिठ्ठ्या-चपाट्या, चुरगळलेल्या रुपया-दोन रुपयांच्या नोटा, बरीचशी चिल्लर, शंभरच्या नोटांचं छोटंमोठं बंडल असे. बॅगेत कपड्यांबरोबर सुंदर नक्षीकाम केलेली विविध अत्तरांच्या कुप्यांची पेटी. महागड्या सिगारेटची पाकिटं, मग सगळ्यांच्या हाताला अत्तर लावण्याचा कार्यक्रम चाले. त्या त्या अत्तरांच्या वर्णनासहीत. त्यांची दोन तीन व्याख्याने असायची. ते प्रखर हिंदुत्वनिष्ठ होते, सावरकरांवर निस्सीम श्रद्धा असलेले. स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेल्यांवर त्यांची जाज्वल्य भाषणे व्हायची. शब्द इतके भेदक असत की अग्नीफुले उडाल्याचा भास होई. अमोघ वाणी, विचारांची स्पष्ट बैठक. गोरापान चेहरा लालभडक होऊन जाई. त्यांचा आवेश पाहून समोरची हजार-पाचशे माणसे भारावून नि:स्तब्धशी होत. मी व माझा मोठा भाऊ दशरथ त्यांच्या दिमतीला असायचो.
आल्या आल्या ते सांगायचे, या भेटीत कवींना (कुसुमाग्रजांना) भेटायचे आहे. त्यांची वेळ घेऊन ठेव. त्या काळी कुणीही कोणाला सहज भेटे. अपॉइंटमेंट, सेक्रेटरी, वेटिंग हा प्रकार नसे. तात्यासाहेबांचे घर तर मुक्तद्वार होते. भारावलेले शेकडो चाहते, कोणीही कधीही दूरदुरून त्यांना भेटायला येत. तात्यासाहेब त्याचे स्मिताने स्वागत करीत. त्यांचे हसणे लहान मुलांसारखे निर्व्याज निर्मळ होते. त्यांना कोणी कितीही बाष्कळ बडबड करून छळलं, त्यांच्याच कविता त्यांना ऐकवल्या, तरी ते हसतमुखाने तो छळ सहन करीत. एका भेटीत आम्ही भावेकाकांना त्यांच्या घरी घेऊन गेलो. दोघेही खूप आनंदित झाले. काही महिन्यांपूर्वीच तात्यासाहेबांची हृदयाची शस्त्रक्रिया झालेली होती. भावेकाकांना आधीच कळलेले होते. म्हणूनही त्यांचे मन भेटण्यास ओढ घेत होते. मराठीतल्या असामान्य दिग्गज साहित्यिकांच्या भेटीचा तो अपूर्व क्षण होता. भावे कुतूहलाने अनेक प्रश्न विचारीत होते, एवढ्यात काय लिहिलं, कोणती नाटके बरी चाललीत? त्यात ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘महाराणी पद्मिनी’ आदी नाटकांचा ऊहापोह झाला. तात्यासाहेब संयतपणे प्रश्न विचारीत तर कधी उत्तरे देत होते.
‘भावे, काय घेणार चहापाणी कोल्ड्रिंक्स?’ तात्यांनी विचारल्यावर भावे म्हणाले, ‘फक्त चहापाणी?… किती दिवसांनी भेटतोय आपण!’
‘ठीक आहे, व्हिस्की देतो, पण मी घेणार नाही. डॉक्टरांनी बंदी घातली आहे.’
‘अजिबात घेत नाही?’
‘घेतो. पण आठवड्यातून एकदा, एकच पेग…’
‘म्हणजे तुम्ही घेणार नाही, मग मलाही नको. निघतो आम्ही!’
तात्यासाहेब मुकाट बैठकीच्या खोलीला लागून असलेल्या छोट्या खोलीत प्रा. बा. वा. दातारांना (तात्यांचे मित्र) घेऊन तयारीसाठी गेले. जरा वेळाने दातार बाहेर येऊन म्हणाले, भावेसाहेब आत या!
भावेकाका आत गेले. जाता जाता त्यांनी विचारले, ‘तुमचे दोघांचे काय तुम्ही घेता?’
‘कधीच घेत नाही. सवय नाही!’ भाऊ संकोचून बोलला.
आम्ही दोघे भाऊ बाहेरच बसलो. दहापंधरा मिनिटांनी तात्यासाहेब उठून बाहेर आले आणि आम्हाला म्हणाले, ‘दशरथ (भावाचे नाव) तुम्ही दोघे आत येऊन गप्पा ऐकत बसा.’
आम्ही आत बसलो. ते तिघे वेगवेगळ्या विषयांवर बोलत होते आणि अत्यंत संयमाने, रुचीने अपेयपान करीत होते. भावेंसारख्या मित्रासाठी तात्यासाहेबांनी नियम मोडला होता. गप्पांत तात्यासाहेब म्हणाले, ‘भावे, लोक तुम्हाला शिष्ट समजतात माहीत आहे ना?’ भावे दचकलेच. ‘इतरांचं जाऊ द्या, पण कवी तुम्ही म्हणता म्हणून मी हो म्हणतो. हो मी शिष्ट आहे. जगताना शिष्ट असणं आवश्यक आहे. त्यामुळे लोक चार हात दूर राहतात. नाहीतर कुणीही उठतो, शेपटीवर पाय देतो. त्याचा वकूब विसरून ठोशास ठोसा दिला नाही, तर ही खंत कायम सलत राहते. कवी, एक प्रसंग सांगतो, डोंबिवलीच्या आमच्या घरी अनेक चाहते येत असतात. दूरवरून आलेले असले व जेवायची वेळ असेल तर जेवूनच जातात. एकदा असेच एक-दोघे आले. त्यात एक पुणे आकाशवाणीचा ऑफिसर होता. नाटकी विनय, नम्रपणा, नाटकी चरणस्पर्श वगैरेत वाकबगार दिसत होता. टोकाचा आदरही दाखवत होता. दुपारचे बारा-एक वाजलेले म्हणून माझ्याबरोबर दोघांनाही काकूंनी (पत्नी प्रभावती) जेवायला वाढले. आमची वर्हाडी पद्धत- एकट्याने नाही, चारचौघांनी मिळून जेवायचे. पुण्यात ही अपेक्षा ठेवून जायचे नाही, अण्णांचे (गदिमा) घर सोडले तर. माझं पुण्याला नेहमीच जाणंयेणं असतं. व्यंकटेश माझा मित्र. अण्णा, पु.ल. माझे गप्पांचे मित्र. लोक आपल्याला टोप्या घालतात, आम्ही तिघेचौघे एकमेकांना टोपणनावे घालतो. माझी अनेक पुस्तकं छापणारे मेनका प्रकाशनाचे पु. वि. बेहरेही पुण्याचेच. बेहेरे हे एक मितभाषी पण व्यवहाराला चोख असे प्रकाशक. व्यंकटराव पुणे आकाशवाणीत असायचे. म्हणून त्यांना भेटायला गेलो. ते वरच्या मजल्यावर बसायचे. पुणे आकाशवाणीला बर्याच खोल्या आहेत. कॉरिडॉरमधून चालताना सहज एका खोलीकडे लक्ष गेलं. तिथे ऑफिसर म्हणून माझ्या घरी येऊन गेलेला तो नाटकी गृहस्थ बसला होता. आमची दोघांची नजरानजर झाली. खूप कामात आहोत असे दाखवीत त्याने मला टाळले. व्यंकटेशांना भेटून होईपर्यंत पु. भा. भावे आकाशवाणीत आलेत, असे कर्मचार्यांना कळले आणि एकच घोळका माझ्या पुढेमागे जमा झाला. हे त्या गृहस्थाने पाहिले आणि ऐट मिरवण्यासाठी तोही घोळक्यात माझ्या पुढेमागे करू लागला. भावेंच्या घरी जेवण केल्याच्या आठवणी इतरांना आणि मला सांगू लागला. मी स्वच्छ दुर्लक्ष केले. तरी तो पिच्छा सोडेना. शेवटी मी त्याला म्हटले, हे पाहा, तू ओळख काढू नकोस. मी तुला ओळखत नाही. तुला मी टाळतोय हे तुझ्या लक्षात आले नाही का? गडी चांगलाच वरमला. बाकीचे त्यांच्याकडे पाहू लागले तोंड लपवत घोळक्यातून तो सटकला.’ अशा मनसोक्त गप्पा त्या दिवशी तात्यासाहेबांकडे रंगल्या.
भावेकाका आमच्याकडे यायला लागले, त्यावेळी सगळ्या लढाया जिंकून झाल्या होत्या .चाळीस पंचेचाळीस पुस्तके, त्यात नाटक, सिनेमा, ललित, कथासंग्रह, वैचारिक लेख- काय म्हणून नाही! वृत्तीने उत्तम भांडखोर होते. असत्य, अन्यायाची चीड, स्त्री-हक्काचे आग्रही होते. परिणामी तरूणपणातच वडिलांपासून दोनदा वेगळे झाले होते. प्रगल्भ बुद्धिमत्ता, सहृदय मन, हिंदुत्वनिष्ठ पण कडवे नाहीत; अखंड भारताचे स्वप्न पाहणारे ते साहित्यिक होते. या अंगाने त्यांनी अनेक वैचारिक लेख लिहिले. प्रसंगी आचार्य अत्रेंसारख्या बलाढ्य साहित्यिकाशी त्यांनीच सभ्य भाषेत लढा दिला होता. अत्रेंना माघार घ्यावी लागली होती…
नाशिकला राहायला येण्याआधी काही वर्षे आम्ही एचएएलच्या क्वार्टरमध्ये राहिलो. काकांची तिथेही व्याख्याने झाली. त्यांना तो परिसर खूप आवडला. आमच्या दारापुढे अंगण आणि छोटीशी बाग लावलेली होती. अनेकदा उन्हाळ्यात चांदण्या रात्री आम्ही गप्पा मारत बसायचो. ते लाकडी खाटल्यावर, तर मी, पत्नी, मुले ओट्यावर बसून गप्पा ऐकायचे. त्यांना अनेक प्रश्न विचारून त्यांचं व्यक्तिमत्त्व समजून घ्यायचा मी प्रयत्न करायचो. एकदा सहज विचारलं, वडिलांनी घराबाहेर का काढलं?
ते म्हणाले, ‘फक्त वैचारिक मतभेदांमुळे. मला दमदाटी, दडपशाही, अन्याय्य वागणं आवडायचं नाही आणि वडील कडक शिस्तीचे मिलिट्रीतले डॉक्टर! मग काय! अंगावरच्या कपड्यांनिशी पत्नीला घेऊन घराबाहेर पडलो. भाड्याने खोली घेतली. खिशातल्या पैशांचा अंदाज घेतला. शंभरएक रुपये होते. तडक जाऊन तांदूळ आणि गव्हाचे एकेक पोते घेऊन आलो. पत्नीला म्हणालो, यावर आपले दोघांचे बरेच दिवस पार पडतील. घराबाहेर काढला आणि उपासमारीने मेला असे कुणी म्हणायला नको.
वडिलांसमवेत राहात असताना एके दिवशी आम्हा दोघा भावांना त्यांनी पोस्टमार्टेम करतात त्या ओसाड जागी नेले. तिथे एक भयावह वाटावी अशी बंद खोली होती. वडिलांनी ती उघडली. निळसर-मळकट कपड्यात लाकडी टेबलावर एक अत्यंत सुंदर अशा २५-३० वर्षे वयाच्या स्त्रीचा मृतदेह झाकून ठेवलेला होता. झाकलेल्या कपड्यातून तिचा हात बाहेर काढला. त्यावर नाइफ चालवली. फूटभर लांबीची स्किन वेगळी केली. मी पंधरासोळाचा आणि भाऊ चौदाचा असेल. म्हणाले, या सुंदर स्त्रीचा चेहरा बघा आणि हा विनात्वचेचा हात. प्रत्येक चेहर्याच्या खाली हीच हाडे आणि मांस असते. आयुष्यात परस्त्रीचा मोह धरू नका. पतन होण्याचे अनेक क्षण येतील, त्यावेळी सांभाळून राहा. खोल खोल दरी पहायची असेल तर अलीकडे उभे राहा. व्यसनांचेही तसेच. कोठे थांबायचे हे विसरलात तर आयुष्याची फरपट अटळ…’
भावेकाकांना अडवत मी विचारले, वडिलांच्या सांगण्याचा परिणाम झाला का?
यावर ते मूक झाले. म्हणाले, होत असावा आठवत नाही. रात्रीचे बारा वाजले चला झोपू या.
भावे तरुणपणी खूपच देखणे होते. अष्टपैलू लेखक तर होतेच. वडिलांनी घराबाहेर काढल्यानंतरचा काळ अनेक अर्थांनी भरभराटीचा ठरला. नाटके गाजत होती. कथा-कादंबर्यांवर सिनेमाही निघाले. त्यात छोट्या-मोठ्या भूमिकाही त्यांनी केल्या. ‘आदेश’ नावाचे पाक्षिकही चालवले. जाहीर भाषणे, संमेलनाध्यक्षपदे सन्मानाने मिळाली. उंची सिगरेट्स, अत्तरे ही त्यांची खास आवडीची होती. चित्रकार दीनानाथ दलाल, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक गोविंदराव तळवलकर आणि अनेक समकालीन लेखक-लेखिका हे त्यांचे जवळचे स्नेही होते. डोंबिवलीत वाडेवजा दुमजली घर होते, तर पुण्यातही ढोले रोडला त्यांचे भाड्याचे मोठे घर होते. मित्रांबरोबर मी त्यांच्या डोंबिवलीच्या घरी प्रथमच गेलो. त्यांनी शिरस्त्याप्रमाणे आम्हाला जेवू घातले. आम्ही निघालो, तेव्हा ते सज्जात येऊन उभे राहिले. आम्ही रस्त्यावरूनच म्हटले, आपण आत गेलात तरी चालेल. तेव्हा ते म्हणाले ‘गल्लीच्या कोपर्यावरून तू वळेपर्यंत मी इथेच थांबणार आहे. दूरवरून वळून पाहिले तर ते खरेच उभे होते.
एकदा गमतीने मी त्यांना म्हटलं की तुमचे गाल लाल आहेत हे ठीक पण, नाकाचा शेंडा इतका लाल का? मग मीच म्हणालो, आयुष्यभर लोकांशी भांड भांड भांडल्यावर दुसरं काय होणार?
असं म्हणतोस?… थोडे विचारात पडले आणि म्हणाले, ही शक्यता नाकारता येत नाही!
व्यंकटेश माडगूळकर हे पुभांचे जिगरी दोस्त. बरेचसे उनाड आणि खट्याळ भावे पुण्याला गदिमांकडे गेले की व्यंकटेशांबरोबर मनसोक्त हिंडत. उभयतांचे समकालीन पण थोडे सीनिअर असलेले ना. सी. फडके पन्नाससाठच्या दशकात खूपच पॉप्युलर होते. त्यांच्या प्रणयरम्य कादंबर्यांचे चाहते खूप असायचे. मात्र ते बरेचसे एकलखोरे, खूप शिस्तीचे, कुणालाही सहज न भेटणारे, त्यांच्याच वलयात वावरणारे असल्याने इतर लेखकांना कायम त्यांच्याबद्दल कुतूहल असायचे. भावे व्यंकटेश यांनी त्यांची भेट घ्यायचं ठरवलं. त्या काळात कमी लोकांकडे फोन असत. मात्र फडकेंकडे दोनतीन फोन होते. हे त्याकाळी श्रीमंतीचे लक्षण होते. या जोडगोळीने कुठून तरी नंबर मिळवून त्यांना फोन केला आणि भेटायचे आहे असं सांगितलं. कोण बोलतंय, असं पलीकडून विचारल्यावर आम्ही पु. भा. भावे आणि व्यंकटेश माडगूळकर बोलतोय, असं यांनी सांगितलं. तसे हे दोघेही नावाजलेले प्रतिष्ठित लेखक होतेच. फडकेंपेक्षा कांकणभर जास्तच. काही काम आहे का, असा पलीकडून प्रश्न. या दिग्गजांची रीतसर बोळवण. फडकेजी, आम्ही आपले चाहते आहोत. आपल्यासारख्या प्रज्ञावंत साहित्यिकाला भेटावं, असं वाटतं, भेट मळिाल्यास आनंद वाटेल, असं हे म्हणाले. समोरून शून्य प्रतिसाद. तीन मिनिटांनी फडके बोलले, दिवसभर मी लिखाणात गर्क असतो. सकाळी सहापासून लिखाण सुरू होतं. दुपारी चार ते पाच ही वेळ चाहत्यांसाठी आणि अभ्यागतांसाठी राखून ठेवलेली आहे. त्या वेळेत आपण येऊ शकत असाल तर बघा. ठीक चारच्या ठोक्याला आपण गेटजवळ हजर असणे आवश्यक आहे.
आम्ही अवश्य चारच्या ठोक्याला हजर राहू. आपण वेळ दिल्याबद्दल आभारी आहोत, असे भावेंनी सांगितले.
त्या काळात कच्चे रस्ते, वाहने नाहीत. सायकल मात्र घरोघर असायची. फडकेंकडे मात्र चकचकीत चारचाकी होती असे ऐकिवात आहे. बंगल्याचे नाव ‘दौलत’ होते. दुसर्याच दिवशी या जोडगोळीने दौलतकडे सायकलवर कूच केले. दोघेही बर्यापैकी जाडजूड, त्यात दुपारची वेळ. चांगलेच घामाघूम झाले. बंगल्यापर्यंत पोचता पोचता साडेचार वाजले. तसे दोघेही बर्यापैकी ओशाळले होते. एकाने गेटवरची बेल वाजवली. दहा मिनिटे उत्तर नाही. दोघांनी बेल वाजवण्याचा सपाटा चालूच ठेवला. जरा वेळाने सुटाबुटातले काळेसावळे फडके कपाळावर आठीचे भस्म लेवून गेटपर्यंत आले. या दोघांनी हात जोडून नमस्कार केला. उशिरा आल्याबद्दल क्षमा मागितली. गेटची कडी सरकवली. फडकेंनी बाहेर हात काढून कडी पुन्हा होती त्या जागी सरकवली. हातातले सोनेरी पट्ट्याचे घड्याळ दोघांना दाखवले आणि म्हणाले, ‘आपणास मी चारची वेळ दिली होती. आता चार पस्तीस झालेत. आपण माघारी जाऊ शकता.’ असं म्हणत ते माघारी वळले. भावेंचा संयम सुटला, म्हणाले, फडके जरा थांबा. खरे तर तुम्ही आमची खूप वाट पाहत होतात. पण तुमचा अहम् अधिक उद्द्याम आहे. अनेक साहित्यिकांनी आम्हाला सांगितले होते, माणूस फार अहंमन्य आहे, जाऊ नका. पण एवढा प्रतिभाशाली, सुबुद्ध, जाणीवानेणीवांनी परिपूर्ण लेखक असा असूच शकत नाही, असं आमचं मत होतं. आश्चर्य म्हणजे ते लोक खरे ठरले. फडकेंना काय वाटले असेल हे वळूनही न पाहता हे दोघे सायकलीवर टांगा टाकून परत फिरले.
भावेंना घाम खूप येई. दिवसातून दोनतीनदा ते आंघोळ करीत. बरेचदा उघडे बसत. हातात सतत सिगारेट लागे. उंची मद्याचा ब्रॅण्ड ठरलेला असे. घेणे मात्र माफक असे. आणि सतत तंद्री लागलेले. कुठले तरी नाट्यगीत सतत गुणगुणत असायचे. आमच्या घरी भावे आले की आजूबाजूचे रसिक, नवोदित नवोदित कवी, लेखक, पत्रकार, तरुणतरुणी भेटायला येत. हात जोडून नमस्कार करणार्याला नमस्कार तर वाकून नमस्कार करणार्याला रुपयाची नोट दिली जाई, अगदी प्रत्येकाला. या वेळी अनुराधाने निगुतीने ठेवलेली नोटांची बंडलं, सुट्टी नाणी, हे सगळं विस्कटून जाई. नंतर त्यांची स्वाक्षरी घेण्याकरता चढाओढ लागे. दिवसातून दोनतीनदा सांगत, ज्ञानेश, काकूंना पत्र टाक. म्हणावं, मी खुशाल आहे, तुझी काळजी घे. हे काम मी नेटकेपणाने करी. तशा काकू जाडजूड होत्या. आजारही भरपूर होते. काकांचे धाकटे भाऊ विश्राम भावे डॉक्टर होते, जे अचानक गेले. त्यांची मुले काकांनी मोठी केली. विक्रम नावाचा नातू होता. त्याचा विवाहही केला होता. भावाच्या मुलीचे लग्न केले. पण सासरचे विपरीत निघाले. बिचारीची होरपळ झाली. सहजच सांगावे वाटते, पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज आणि भावे यांना अपत्ये नव्हती. म्हातारपणी ही शल्ये जास्त जाणवतात. असो.
एकदा विचारलं, काका तुमचे गदिमांकडे सतत येणे जाणे असायचे. खूप गप्पा होत असतील ना?
ते म्हणाले, झकास गप्पा व्हायच्या. कधी पुलं, कधी व्यंकटेश, तर कधी राजा परांजपे आणि सुधीर फडके. सगळे सिनेमाशी या ना त्या कारणाने जोडलेले. गदिमा जास्त गप्पिष्ट. एकेक अनुभव हावभावांसह कथन करण्यात तरबेज. पुलंच्या शब्दाशब्दावर कोट्या चालायच्या. अण्णांनी एकदा एक किस्सा सांगितला. राजा परांजपे यांच्याबरोबर त्यांनी अनेक सिनेमे केले. पेडगावचे शहाणे, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर वगैरे. प्रत्येक सिनेमाची रिलीजच्या आधीची ट्रायल हे सगळे मिळून पाहात. त्यांच्यासमवेत वाघमारे नावाचा एक गृहस्थ असे. सिनेमा सुरू झाला की तो कितीदा हसला, त्याच्या वीसपट हशे मिळणार हे नक्की ठरे. ‘लाखाची गोष्ट’ची ट्रायल सुरू झाली. सिनेमा संपला. वाघमारे एकदाही हसला नाही. सगळे हवालदिल झाले. कुणी कुणाशी नजर मिळवेना. त्यात राजाभाऊ जास्त भावनाशील, घाबरट. अण्णांनी सहज राजा परांजपे यांच्या खुर्चीकडे पाहिलं. शेजारच्याला विचारलं. तेव्हा तो म्हणाला, ते तर कधीचेच सायकलवर टांग टाकून अंधारात पसार झालेत.
दुसर्या दिवशी दिवशी दिनकर द. पाटलांकडे फिल्म एडिटिंगला सोपवली. दोन दिवसांनी पुन्हा ट्रायल सुरू झाली. वाघमारे अर्थात हजर होताच. यावेळी फिल्म पाहताना तो वीस वेळा हसला. ‘लाखाची गोष्ट’ सुपरहिट झाला. अचूक एडिटिंग हे सिनेमाचे यशापयश ठरवते.
यावर मी काकांना विचारलं, तात्यासाहेब, कानेटकर आणि तुम्ही बिनीचे नाटककार. नाटकाचा आशय, अर्थपूर्ण संवाद, शब्दसामर्थ्य तिघांकडेही भरभरून आहे. तरीही कानेटकरांची नाटके व्यवसायाच्या दृष्टीने अधिक यशस्वी झालीत… ते क्षणभर गप्प बसले. सिगारेटचा झुरका मारला. अॅश ट्रेमध्ये राख झटकत म्हणाले, तू म्हणतोस ते खरे आहे. कथानक खुलवण्याचे, त्यात रंग भरण्याचे कसब त्यांच्याकडे भरपूर आहे. शिवाय विषयवैविध्य, संवादचातुर्य, नाट्यतंत्रज्ञानही चांगले आहे.
सत्तरच्या दशकात नाशिक फार विस्तारलेले नव्हते. त्र्यंबकेश्वर, सोमेश्वर, सप्तश्रृंगी गड आणि गुजरात हद्दीजवळचे सापुतारा हिल स्टेशनही जुजबी होते. आदिवासी लोक, दर्या, डोंगर, मोठे तळे एवढीच सामग्री. आता नव्या सुधारणा आणि हॉटेल्समुळे नाशिक विस्तारले आहे. चारपाच मित्रांबरोबर आम्ही भावेकाकांना सप्तश्रृंगीला नेले. आतासारख्या सुधारणा गडावर नव्हत्या. रडतुंडीच्या घाट चढून जावे लागे. तो चढताना खरेच रडू येई. अवघड चढण. काकांनी ठाम नकार दिला. डोलीची सोय होती. पण गरीब लोकांच्या खांद्याव्ार बसणं त्यांना पटत नव्हतं. मी एवढा जाडाजुडा. त्यांना किती त्रास होईल, हे त्यांचे टुमणे.
काका, गिर्हाईक मिळाले नाही तर त्यांनी खायचं काय? माझा प्रश्न.
तसे डोलीवाले फार काटक असतात. पळत पळत त्यांनी लिलया गड सर केला. आम्ही सगळे गडमाथ्यावर पोहोचलो. काका आमच्या आधीच पोचून एका झाडाखाली सावलीत बसले होते. ‘ज्ञानेश, हे फार कष्टाचं काम आहे. त्यांना बिदागी थोडी जास्त दे.’
‘काका, हे लोक तीसचाळीस रुपयांत वर आणतात. मी आधीच पन्नास दिलेत. काळजी नको.’ ते समाधानाने हसले. गडमाथ्यावरून देवीपर्यंत जायच्या पायर्या आणखीच अवघड होत्या (सध्या फ्युनिक्युलर ट्रॉली वापरात आहे). डोलीत यायलाही त्यांनी नकार दिला. तिथे दोनचार हेमाडपंथी मंदिरं आहेत. एकात त्यांना छान गारवा पाहून बसवलं. आम्ही मंडळी वर जाऊन देवीचे दर्शन घेऊन अर्ध्या तासात खाली आलो आणि सगळे सोबतची शिदोरी खात बसलो. काका मात्र बाहेरचं पाणी, खाणं याला स्पर्श करीत नसत. घरून थर्मासमधून आणलेला चहा मात्र त्यांनी घेतला. जेवल्यावर आम्ही जरा पाय मोकळे करून आलो. पाहतो तर काका एका काटकुळ्या, कृश, अंगावर मळकट भगवे कपडे, डोईला पांढरे फडके गुंडाळलेल्या जटाधारी साधूवर संतापले होते. कारण काय, तर मंदिराच्या गाभार्यात तो बिडी फुंकत बसला होता. ते मोडक्या तोडक्या हिंदीत त्याला रागावत होते. साधूचे हिंदी आणखीच मोडके होते. त्याच्या बोलण्याचा भावार्थ असा होता की मोकाट वार्यांमुळे मंदिरात पालापाचोळा खूप जमा होतो. तो सकाळदुपार मीच झाडून मंदिर स्वच्छ ठेवतो. दमलो होतो आणि साहेब पुढे बसले होते. त्यांना बिडीच्या धुराचा त्रास नको, म्हणून मी आत बसलो होतो… त्याचे बोलणे काकांना सांगितले. त्यांनी त्याला जवळ बोलावले. खरे तर तो टरकला होता, पण घाबरत पुढे झाला. काकांनी खिश्यातून पाचाची नोट (आताची पन्नासची) काढून त्याला दिली आणि म्हटले, तू अच्छा काम करता है. भगवान के सामने बिडी पीना ठीक नही. बाहर पिओ, मंदिर मे नही.
एकदा भर एप्रिलमध्ये काका म्हणाले, कुठेतरी जाऊ या. टॅक्सीने आम्ही सापुतारा हिल स्टेशनला गेलो. नोकरीव्यतिरिक्त व्यंगचित्रातून मला चांगला पैसा मिळे. तरी ‘काका खूप खर्च होतोय’ असे म्हणून त्यांना डिवचून देई. ते पाकीटातून नोटा काढून म्हणत, घे हव्या तेवढ्या!
‘काही नको, तुम्ही घरी जाऊन काकूंना सांगाल, ज्ञानेश फार चिक्कू आहे!
सापुताराचे निळेशार सरोवर खूप सुंदर, प्रशस्त आहे. मुलांनी आणि त्यांनी बोटिंग करण्याचा हट्ट केला. मोटारबोट केली. अर्ध्या तासासाठी वीस रुपये पडत. दोन तास झाल्यावर त्याचं आणि मुलांचं मन भरलं. ऊन खूप झालं होतं. चालत चालत आम्ही एका जेमतेम लांबरुंद हॉटेलजवळ आलो. भुका लागल्या होत्या. हॉटेलवाल्याला विचारून आम्ही एका टेबलावर बसलो. अनूने पिशवीतून जेवणाचे डबे काढले. काकांचं आवडतं कोरडं पिठलं, भाकरी, हिरवा ठेचा, शिरा आणि खिचडी अनूने सर्वांना ताटातून वाढली. पाण्याऐवजी कोल्ड्रिंक्सच्या गारगार बाटल्या सगळ्यांसाठी घेतल्या. काका या कल्पनेवर खूष झाले. मुले इकडेतिकडे खेळू लागली. काका एका खिडकीजवळ सिगारचे झुरके घेत ओणवे उभे राहिले. मी अनुला म्हटलं, काका बघ कसे हरवून बाहेर पाहत आहेत… अशात पाऊस आला तर?
‘वेडे आहात… बाहेर रणरणते ऊन आहे.’
पदराने हवा घेत अनू बोलली. दोन पाच मिनिटांनी वारा सुटला, धुळीचा लोट उठला. अचानक आसमंत अंधारले आणि पावसाच्या आक्रस्ताळी धारा वेड्यागत बरसू लागल्या. खिडकीतून आत शिंतोडे आले. पण काका हलले नाहीत. त्यांची नजर आणखीच हरवलेली वाटली.
‘काका वर्षाव कादंबरीत वर्णन केलेला पाऊस असाच होता ना! अशाच पावसात स्टेशनवरून कुसूम तुमच्यासमोरून कायमची दृष्टिआड झाली होती का… ती तुमच्यावर खूप प्रेम करायची. कारण काढून तुम्हाला भेटायलाही यायची. गोरीपान आणि खूप सुंदरही होती ना. तिचा दोष, ती विवाहित होती, तुमच्या संस्कारात ते बसत नव्हतं. तिचा पती ‘कापुरुष’ होता. खरे ना…
त्यांनी फक्त माझ्याकडे पाहिलं… निळे डोळे फक्त बोलत होते… आला तसा पाऊस अचानक थांबला सुद्धा! हॉटेलबाहेर टॅक्सीवाला हॉर्न वाजवत होता.
काका शांतपणे पुढच्या सीटवर जाऊन बसले. मी काऊंटरवर बिल दिलं. तिथे अनू आली. मला दबक्या आवाजात तिने विचारले, काका कुसुमबद्दल काही बोलले का?