- देशात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरल्यामुळे बॉलीवूडही हादरले आहे. महाराष्ट्रात कधीही लॉकडाऊन होऊ शकते या भीतीने निर्मात्यांच्या काळजात धस्स झालंय. त्यांनी येत्या काही दिवसांत रिलीज होणारे आपले चित्रपट पुढे ढकलायला सुरूवात केली आहे. यात पहिला नंबर राणा दग्गुबतीच्या ‘हाथी मेरे साथी’ या सिनेमाने लावला आहे. हा सिनेमा 26 मार्चला प्रदर्शित होणार होता. तो आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय इरॉस इंटरनॅशनल या बॅनरने घेतलाय. विशेष म्हणजे या सिनेमाचे तेलुगू आणि तमीळ आवृत्ती ठरल्याप्रमाणे 26 मार्चलाच दाखल होणार आहे असे कळते. तेलुगूमध्ये तो ‘अरण्य’ आणि तमीळमध्ये ‘कादान’ या नावांनी प्रदर्शित होत आहेत. इरॉसने आपल्या पत्रकातही कोरोनाबाबतची भीती व्यक्त केली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रभू सोलोमन यांनी केलंय, तर यात राणा दग्गुबतीसोबत पुलकित सम्राट, श्रीया पिळगांवकर आणि जोया हुसेन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.