• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

हाच आमचा धंदा!

टोक्या टोचणकर (टोचन)

marmik by marmik
February 27, 2026
in टोचन
0
हाच आमचा धंदा!

राज्यातल्या निवडणुका संपल्यावर माझा मानलेला परमप्रिय लाडका मित्र पोक्या याचं डोकं कधी नव्हे इतकं शांत झालं आहे. निवडणुका पार पडेपर्यंत तिच्या अनुषंगाने घडलेल्या अनेक गंमतीजमती आठवत पोक्या स्वतःशीच हसत असतो. कधी मूडमध्ये असला तर मलाही त्या गोष्टी सांगून हसवतो. अनेक चित्रविचित्र प्रकार त्याने निवडणुकीदरम्यान पाहिले, अनुभवले. पैशाच्या बंडलांच्या राशी पाहिल्या, ढीग पाहिले, मतदारांना पैशांच्या पाकीटांसह साड्या, पैठण्या, शर्ट-पॅन्ट पीस, चपला-बूट, गॉगल, मिक्सर, घरघंटी, गृहोपयोगी वस्तू, दारूच्या देशी-विदेशी बॉटल वाटल्या जाताना पाहिल्या. निवडणुका येती घरा, तोचि दिवाळी-दसरा हा मतदारांना आलेला स्वर्गानुभव पाहिला. मतांसाठी हपापलेले नेते आणि उमेदवार यांच्या परस्परांतील चढाओढी आणि कुरघोड्या पाहिल्या. पैसा फेकून मते विकत घेता येतात हे पाहिलं. पैशापुढे तत्व, निष्ठा, सत्य, न्याय, प्रामाणिकपणा यांची माती झालेली पाहिली. सत्तेचा माज आणि उन्माद पाहिला. खोटेपणा, गुंडागिरी, हल्ले, खूनबाजी पाहिली. स्वार्थ आणि हपापलेपणा पाहिला… आज काही वर्षांपुरते का होईना हे सारे शांत झालंय.

निवडणुकीतील फडणवीसांची एकसुरी भाषणे ऐकून कंटाळलेला पोक्या आता मनाला आनंद देणारी कर्णमधुर गाणी ऐकत असतो. तरीही निवडणुकीतील विनोदी पात्रं त्याच्या डोळ्यांसमोरून हलत नाहीत. आता अडगळीत टाकलेले शिंद्यांच्या पक्षाचे चिंबोरी फेम नेते तानाजी सावंत यांचे मजेदार किस्से तर त्यांच्याच पक्षाचे लोक चवीचवीने चघळत एकमेकांना आणि इतर पक्षातील मित्रमंडळींनाही सांगत असतात. तानाजी नाटक-सिनेमात गेले असते तर विनोदी अभिनेते म्हणून प्रसिद्धीस आले असते, पण ते शिंद्यांच्या पक्षाला घोरपडीसारखे चिकटून राहिले आणि शिंद्यांनी झटकल्यावर ना घर का ना घाट का अशी त्यांची दारुण परिस्थिती झाली. तरीही डगमगणारा माणूस अशी त्यांची प्रतिमा कधीच नव्हती. जे मनाला वाटेल ते बिनधास्त बोलणे हा त्यांचा मूळ स्वभाव, मग ते कुणाला पटो वा ना पटो, खरे असो वा खोटे असो; म्हणून तर त्यावेळी चिंबोर्‍यांनी डेंग्या मारूनही त्यांनी आपली भूमिका बदलली नाही आणि धरणे पडतात ती चिंबोर्‍यांमुळेच या भूमिकेवर ते ठाम राहिले.

डॉक्टर नसूनही मिळालेल्या आरोग्य खात्याच्या अर्ध्या जबाबदारीमुळे त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर केलेल्या भाष्यामुळे उपमुख्यमंत्री शिंद्यांचे आरोग्य बिघडले. पण हा पठ्ठ्या आपला हेका सोडण्यास तयार नव्हता. त्यांना मंत्रिपदावरून शिंद्यांनी डच्चू दिला. त्यांचा भाऊ विधानसभा निवडणुकीत पाडला की पडला हेही त्यांना समजलं नाही. तरीही आता नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिंद्यांच्या पक्षाचा मंत्रिमंडळ विस्तार होईल व त्यात आपली पुन्हा मंत्रिपदी नेमणूक होईल या आशेवर ते होते. तेवढ्यात कुणी तरी त्यांची निवडणुकीत मी पैसे वाटून मतं खरेदी करतो असे बोलल्याची ध्वनिफीत व्हायरल केली आणि पुन्हा ते अडचणीत आले. त्या ध्वनिफितीत ते जे बोलले ते शब्द असे आहेत- हो मी पैसे वाटतो, पण माझी पैसे वाटल्याची ध्वनिफीत कुणी व्हायरल केली ते सांगा. आज कोण पैसे वाटत नाही? सारेच वाटतात. कितीतरी प्रस्थापित असले तरी. आपल्या मराठवाड्यात तर त्याच्याशिवाय पान हलत नाही. मात्र जे करायचे ते ‘ना हाक ना बोंब ‘ अशा आळीमिळी गुपचिळी पद्धतीने. तेही तुम्हाला जमले नाही? मी कधीतरी तुम्हाला वाटलेल्या पैशांचा हिशेब घेतला का? जो तळे राखी तो थोडेबहुत तरी पाणी चाखी हे माहित आहे मला. तरीही ध्वनिफितीला पाय फुटले कसे? आणि प्रसारमाध्यमातून ती व्हायरल झाली कशी? तुम्हाला मी काय कमी केले होते? की कोणीतरी मोठी रक्कम दिल्यावर त्याला तुम्ही माझी बदनामी करणार मलिदा आयता दिला! याचे परिणाम वाईट होतील हे लक्षात ठेवा. माझ्या विश्वासू कार्यकर्त्यांकडून मला असा दगफटका होईल असं वाटलं नव्हतं. विकासाच्या बोंबा मारून कुणी निवडून येत नाही. त्यासाठी मतदारांना पैसा वाटावा लागतो. मी तेच करतो म्हणून सलग निवडून येतो. माझ्या या आजपर्यंत लपवलेल्या कारनाम्याला तुम्हीच भोक पाडलेत. याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल. शिंद्यांच्या गटात जाण्याआधी आणि गेल्यानंतरही मी बक्कळ पैसा मिळवला, करोडो कमावले.कारखाने, शिक्षणसंस्थाद्वारे त्यात भरच पडत गेली. त्यात मुलाने मला न विचारता थायलंड वारी केली आणि त्याला आवरताना माझ्या किती नाकीनऊ आले ते सार्‍यांना माहिती आहे. राजकारणात हाताशी मायंदाळ पैसा असावाच लागतो. पण हा नेता विकासकामाचे ढोंग करून पैशाच्या जोरावर काहीही, कुणालाही विकत घेतो, अशी माझी प्रतिमा माझ्या मतदारसंघात तयार झालीय ती कशी पुसणार मी, ते सांगा. आता पक्षातसुद्धा माझी प्रतिमा मलीन झालीय ती स्वच्छ करण्यासाठी पुन्हा पैशाचं मोठं घबाड कुणाकुणाला द्यावं लागेल, याचाच विचार मनात सुरू आहे. आमचा नेता गरीब आहे, असं तुम्ही जनतेला सांगितलं तरी ती विश्वास ठेवणार नाही. माझा बेटा मला म्हणतो, पैसा-पैसा-पैसा! आखिर क्या है ये पैसा. पॉलिटिक्स पैसेसे खरीदा नही जाता पिताजी, दिल से खरीदा जाता है! आखिर ये शिंदेसाबके पक्ष मे क्या है? मै जानता हूँ पिताजी, आपको और पैसा चाहिये! बोलो, कितना चाहिये? पाच अब्ज, पन्नास अब्ज, शंभर अब्ज, एक कोटी अब्ज मैं देता हूँ ! आपको इतना पैसा… आता यावर काय बोलू मी? पैशांच्याच गटारात बुडालोत आम्ही. तिथून बाहेर येणंही कठीण आहे. या व्हायरल ध्वनिफितीमुळे इज्जतीचा साफ फालुदा झालाय. आणि माझ्या पक्षातील विरोधकांच्या हाती आयतंच कोलीत सापडलंय…

मी ती ध्वनिफीत पोक्याला ऐकवल्यावर पोक्या पोट धरून हसायला लागला. मात्र म्हणाला, हे तानाजीराव म्हणजे अजब व्यक्तिमत्व आहे. मागे मला एकदा भेटले होते, तेव्हा म्हणाले होते कुणी निंदा, कुणी वंदा! मते खरेदी करणे हाच आमचा धंदा!

Previous Post

वेबकॅम जेव्हा हॅक होतो…

Next Post

राशीभविष्य ( २१ ते २७ फेब्रुवारी २०२६)

Next Post
राशीभविष्य ( २१ ते २७ फेब्रुवारी २०२६)

राशीभविष्य ( २१ ते २७ फेब्रुवारी २०२६)

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.