विष्णूचा आठवा अवतार मानला जाणार्या श्रीकृष्णाने महाभारतीय युद्ध थांबवून गळपटलेल्या अर्जुनाला गीता सांगितली आणि त्याला लढायला तयार केले. या गीतेतच श्रीकृष्णाचे एक वचन आहे ‘चातुर्वण्य प्रथा सृष्टाय’. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र असे चार वर्ण मी तयार केले असे म्हटले आहे. ब्राह्मण म्हणजे भटजी नव्हे. ब्रह्मवेत्ता क्षत्रिय म्हणजे शस्त्रधारी योद्धा. वैश्य म्हणजे सध्याच्या भाषेत वाणी. समाजाला लागणार्या वस्तू पुरवणारा. त्यासाठी त्या दुसरीकडून आणणारा आणि इकडचा माल जिथे जास्त असेल तिथे नेऊन विकणारा तो वाणी.
पण त्यात शेतकरी कुठे बसतो? याची चिकित्सा त्यानंतरच्या हजारो वर्षांमध्ये सांगोपांग कुणी केली नाही. शेतकरी बापडा जमिनीचे भाडे भरत तिच्यात पिके घेणारा, समाजाला अन्नपुरवठा करणारा आणि गरज पडेल तेव्हा सैनिक बनणारा असा घटक राहिला. पण त्याला पहिल्या तीन वर्णांमध्ये घालण्याचा व्यवहार कुणी केला नाही. तो धड शुद्रही राहिला नाही पण नितांत गरजेचा असल्यामुळे त्याला अस्पृश्यांमध्ये ढकलण्यात आले नाही इतकेच.
आश्चर्य वाटेल, इंग्रजी अमदानी येईपर्यंत अशी चिकित्सा कुणी केली नाही. आंग्लसहीत सुधारणावादी झाले. स्वातंत्र्यवादी झाले. यापैकी कुणी अशी चिकित्सा केली नाही. महात्मा फुले आणि सोलापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या हयातीत त्या प्रश्नांवर काम केले, पण ते पुरे वाटले नाही २०२ वर्षांपूर्वी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे या समाजसुधारक पत्रकार लेखकाने ‘शेतकर्यांचे स्वराज्य’ ही पुस्तिका लिहून तिच्याच शेवटी उपायही सुचवला.
‘शेतकर्यांचे स्वराज्य!’
पण त्यांच्या संशोधनाची विश्लेषणपणाची दखल कुणी घेतली नाही. त्यामुळे आज आपण या बाबतीत कुठे येऊन पोहोचलो आहोत ते पाहण्यासारखे आहे. केंद्रात सत्तारुढ असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने देशाला ताकास तूर लागू न देता शेतकर्यांसाठी तीन कायदे कधी केले देशाला समजले नाही. हे कायदे शेतकर्यांपेक्षा भांडवलदारांच्या आणि सरकार पक्षाच्या फायद्याचे आहेत. शेतकर्यांच्या अंगावर चार-दोन शिंतोडे उडवण्यापलिकडे त्यात काही नाही असे वाटण्यासारखी स्थिती आहे. ते तीनही कायदे रद्द करावे असा आग्रह करणार्या शेतकर्यांनी जवळपास तीन महिने दिल्ली वेढली तरी भारताच्या पंतप्रधानांना त्यांना सामोरे जायला वेळ नाही की तोंडही नाही हे समजण्यासारखे नाही.
पण एक गोष्ट खरी, प्रबोधनकारांनी शेतकरी या माणसाची दोनशेदोन वर्षांपूर्वी जी चिकित्सा केली त्या परिस्थितीत आजतागायत काही फरक पडलेला नाही. शेतकर्यांच्या तोंडावर कुळकायद्यासारखी पलिस्तरी मारून त्यांची मते पळविण्याखेरीज फारसे काही वेगळे झालेले नाही. त्यांनी किती काळजीपूर्वक हा विषय हाताळला हे तरी वाचणार्यांच्या ध्यानात येईल. त्यांचे काही उतारे खाली देत आहे. शेतकर्यांच्या दुर्दैवाला प्रारंभ इंग्रजी राजवट आल्यानंतर झाला. प्रबोधनकार म्हणतात-
शेतकर्यांची शेतकी मेल्यामुळे तो कर्जबाजारी होऊन देशोधडीला पोटासाठी हवी ती मजुरी करून जगण्याची धडपड करीत आहे. याचा परिणाम शहरी लोकांवर होऊन त्यांचीही उपासमार सुरू झाली आहे.
सार्या जगात पोटाने मारलेले जर कोणते राष्ट्र असेल तर ते हिंदुस्थानच होय.
एकजात शेतकरी शेती ओसाड टाकून किंवा ती असल्या कारखान्यांच्या भक्ष्यस्थानी घालून शुद्ध पोटार्थी बनला.
आज हिंदुस्थानात शेती आणि शेतकरी हे शब्दच काय ते शिल्लक आहेत. पूर्वीच्या पिढीजात शेतकर्यांचा वंशज आज पोटासाठी हवा तो रोजगार करणारा निर्भेळ मजूर बनून मुंबईसारख्या गिरणाळू शहरात येऊन पडला आहे.
पूर्वीच्या शेतकर्यांपैकी जेमतेम शेकडा पाच नांगरांवर टिकून असतील नसतील.
महात्मा गांधींच्या पूर्वी ६० वर्षे मागासलेल्या शेतकरी जनतेच्या बौद्धिक आणि आर्थिक प्रबोधनाचा प्रयत्न केला. ज्योतिबा फुले यांनी केला. फुले स्वत:च मागासलेल्या कष्टाळू शेतकरी समाजातले असल्यामुळे जोडा कुठे चावतो हे त्यांना बिनचूक कळले… ज्योतिबांना जेवढे काही देशकाळानुसार करता आले तेवढे त्यांनी केले. पण अखेर त्यांची शेतकरी कामगार वर्गाच्या जागृतीची चळवळ बांडगुळ्या भटांनी आणि थेटकर्यांनी चिरडून टाकली.
खेड्यातला शेतकरी अन्नाला मोहताद होऊन देशोधडीला चालला आहे. शेतकरी मेला तर राष्ट्र मरणारच या केला. ज्योतिबा फुलेंच्या घायाळ कल्पनेला उचलून धरणारे कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू बहुजन समाजाच्या आत्मोद्धाराच्या चळवळींच्या अग्रभागी येऊन उभे राहिले.
प्रत्यक्ष महायुद्धाच्या धामधुमीत जे समर्थ सरकार इतका बाचका—बाचकीचा प्रकार करीत नव्हते. ते ज्या अर्थी नुसत्या नि:शस्त्र गिरणबांबूच्या साध्या पोटापाण्याच्या प्रश्नाला निर्वाणीच्या संपाला एवढे भेदरू लागले आहे. त्या अर्थी जनता जनार्दनाच्या या नवावताराचे स्वरुप तसेच महासमर्थ आणि कर्दनकाळ असले पाहिजे खास.
संबंध हिंदुस्थानचा शेतकरी अभेदाने एकवटला तर त्यांच्या संघटनेचा ब्रिटीश पार्लमेंटवर जेवढा दणक्याचा दाब बसेल तेवढा शहरी बांडगुळांच्या तोंडच्या वाफार्यांचा जगाच्या अंतापर्यंत बसणार नाही. दिल्लीच्या किल्लीचा जुडगा खुळखुळण्याचा यापुढचा योग भारतीय शेतकर्यांचा आहे.
असे सांगून प्रबोधनकार शेवटी शेतकर्यांच्या स्वराज्याची कल्पना सांगतात. भारताच्या दुर्दैवाने ती कोणत्याच पक्षाने, संघटनेने त्या काळात उचलून धरली नाही. परिणामी आपण काय पाहातो आहोत? दिल्लीचे सत्ताधारी हजारो शेतकर्यांना उन्हातान्हात, थंडीवार्यात तडफडत टाकून कमरेला सत्तेचे बांडगुळ किल्ल्यांचा जुडगा म्हणून लावून आणखी प्रांत जिंकण्यासाठी कंठशोष करीत फिरत आहेत.
त्यांच्याकडे शेतकर्यांसाठी वेळ नाही, शेठ लोकांसाठी आहे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)