५०/६० वर्षांपूर्वी आपण रेडिओवरील कार्यक्रमांप्रमाणे ऑफिसला बाहेर पडायचो. दररोज आठ वाजता सकाळी’ ये ढेरसे कपडे मे कैसे धोऊं, अच्छा साबुन कौनसा लाऊं’ ही जाहिरात ऐकून दिवसाचे वेळापत्रक ठरवायचो. ही जाहिरात आमच्या मनावर कायम कोरली गेली, याचे श्रेय संगीतकार अशोक पत्कींना द्यायला हवं. एवढेच नव्हे तर ‘तंदुरुस्ती की रक्षा करता है लाइफबॉय’ किंवा ‘वॉशिंग पावडर निरमा’ या जाहिराती आम्ही आजही गुणगुणत असतो. अशा जवळजवळ ६००० जिंगल्स आमचे लाडके पत्की काका यांनी केल्या आहेत. याव्यतिरिक्त दूरदर्शन मालिकांची शीर्षकगीते -‘गोट्या’, ‘आभाळमाया’ ‘वादळवाट’ इत्यादी लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. याशिवाय चित्रपट संगीत, नाट्यसंगीत यामधील पत्कींचे योगदान अतुलनीय आहे. अशा पत्कीकाकांचा जीवनपट उलगडणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखंच होतं, परंतु त्यांनी लिहिलेल्या’ सप्तसूर माझे’ या आत्मचरित्रामुळे हे काम बरंच सोपं झालं. योगायोगाने प्रकाशन समारंभाला मी उपस्थित होतो. त्यामुळे पत्कीकाकांशी नंतर अनेकदा संवाद साधायची संधी मला मिळाली. त्यामधून त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणी, अनेक पैलू उलगडले गेले.
२५ ऑगस्ट १९४१ रोजी जन्मलेल्या अशोकचे बालपण गिरगावच्या कांदेवाडी परिसरातच गेले. तिथे बँड पथकांच्या सुरांनी अशोक भारावला जायचा. त्यांच्या बाजूच्याच खोलीमध्ये ज्येष्ठ गायक-संगीतकार सुधीर फडके पेईंग गेस्ट म्हणून राहत होते. त्यामुळे बाबूजींच्या मांडीवर बसून त्यांचा रियाज ऐकण्याचे भाग्य अशोकला मिळाले. आणि त्याच संस्कारांमुळे ‘मी इतका मोठा संगीतकार होऊ शकलो’ हे पत्की काका अभिमानाने सांगतात.
कौटुंबिक परिस्थितीनुसार अशोक त्याच्या आत्याकडे शिवाजी पार्कला काही दिवस राहत होता. तेथे राहणार्या आशा भोसले आणि अशोकचे दैवत असलेली संगीतकार जोडी शंकर जयकिशन यांच्यापैकी जयकिशनला जवळून पाहण्याचे भाग्य अशोकला मिळाले. जवळच असलेल्या सिटीलाइट, पॅराडाइज, श्री, कोहिनूर यांसारख्या थिएटर्समध्ये केवळ गाणी ऐकण्यासाठी तो नेहमी जाऊ लागला. ही गाणी ऐकण्याकरता आपण मोठेपणी डोअरकीपर होऊया अशी इच्छा मनात तयार झाली.
हे सर्व करत असताना मनापासून पेटी शिकण्याकरता पं. चिमोटे यांच्याकडून अशोकने संगीताचे धडे घेतले आणि त्यांचा एक वर्षाचा अभ्यासक्रम फक्त एक महिन्यात पूर्ण केला आणि शाबासकी मिळवली. एकेक आणा जमवून ३५ रुपये घेऊन अशोक वाद्यांचे प्रख्यात विक्रेते हरिभाऊ विश्वनाथ यांच्याकडे गेला. त्याची जिद्द पाहून हरिभाऊंनी ५० रुपयाची पेटी केवळ ३५ रुपयाला दिली. हे उपकार पत्की काका आजही विसरलेले नाहीत. पत्की काकांच्या आयुष्यामध्ये खार येथील त्यांचे वास्तव्य खरे वरदान ठरले. कारण येथेच ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनी आपल्या वाद्यवृंदाची संपूर्ण जबाबदारी अशोकजींवर सोपवली. सुमनताईंचे पती रामानंद यांनी वेस्ट इंडीज येथे तीन महिने आणि नंतर अमेरिका, कॅनडा, सिंगापूर असे संपूर्ण जगामध्ये कार्यक्रम आयोजित केले होते. ज्यामध्ये अशोकजींचा वादक, संगीत संयोजक आणि गायक असा मोठा सहभाग होता.
अशोक पत्कींच्या यशामध्ये त्यांची बहीण मीना पत्की यांचाही मोठा वाटा आहे. अत्यंत सुरीली गायिका असल्यामुळे लतादीदींची अनेक गाणी डबिंगसाठी ती गायली. रोशन, शंकर-जयकिशन यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांबरोबर तिने अनेक स्टेज शोजही केले. तिला सोबत म्हणून भाऊ अशोक अनेक रेकॉर्डिंगना जात असे. त्यामुळे बुजुर्ग संगीतकार, नामवंत वादक यांना जवळून न्याहाळायची संधी अशोकला मिळाली. यामुळे हार्मोनियमच नव्हे तर अनेक तालवाद्यांवरही अशोकने हुकूमत मिळवली. त्या काळात नवीन आलेल्या
इलेक्ट्रॉनिक सिंथसायझरवरही अशोकने मास्टरी मिळवली. दहा वर्षांहून अधिक काळ एस.डी बर्मन, आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल अशा संगीतकारांकडे अशोक पत्कींनी अनमोल योगदान दिले आहे.
जबरदस्त प्रतिभा असूनही पत्कींनी संगीतकार व्हावे यासाठी सुमन कल्याणपुर यांचे सेक्रेटरी शेरू यांनी त्यांचा पिच्छा पुरवला आणि अशोकजी परांजपे यांची गाणी अशोक पत्कींनी स्वरबद्ध केली, जी सुमनताईंनी गायली. ही गाणी एवढी लोकप्रिय झाली की त्यानंतर कारकीर्दीमध्ये एकूण १५०हून अधिक भावगीते अशोकजींनी स्वरबद्ध केली, जी सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, येसुदास, आरती मुखर्जी, डॉ. अपर्णा मयेकर, अजित कडकडे यांच्यासारख्या दिग्गज गायकांनी गायली.
शांताराम नांदगावकरांशी अशोकजींचे सूर एवढेच जुळले की त्यांचा ‘पैजेचा विडा’ हा पहिला चित्रपट देखील नांदगावकरांमुळेच अशोकजींना मिळाला, आणि त्यानंतर ७०हून अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. यात आपली माणसं, अर्धांगी, सावली या चित्रपटांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाले तर अंतर्नाद या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. रंगभूमीवरील अशोकजींचे योगदान अतुलनीय आहे. गुरू जितेंद्र अभिषेकी यांना ते संपूर्ण श्रेय देतात. मत्स्यगंधा, कट्यार काळजात घुसली आणि लेकुरे उदंड झाली या नाटकात अशोकजींनी त्यांच्याबराेबर सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले. आणि नंतर ‘आटपाटनगरची राजकन्या’या नाटकापासून त्यांनी स्वतंत्र संगीत दिग्दर्शन केले. एकूण शंभरहून अधिक नाटकांना त्यांनी संगीत दिले. त्यापैकी आचार्य अत्र्यांच्या मोरूची मावशी, ब्रह्मचारी यांसारख्या कलाकृतींचा समावेश आहे. टांग टिंग टिंगा, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ही अवीट गोडीची गीते आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. तू सप्तसूर माझे, राधा ही बावरी यांसारखी गीते लिहून त्यांनी गीतकार म्हणूनही आपल्या प्रतिभेचा पुरावा दिला आहे.
‘मिले सुर मेरा तुम्हारा’ हे राष्ट्रीय एकात्मता दर्शवणारे १४ भाषेतील गाणे स्वरबद्ध करून अशोकजींनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. परंतु असे असूनही त्यांना एकही हिंदी चित्रपट मिळाला नाही. गुलशन कुमार यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे अशोकजी या संधीला मुकले. त्यांच्या आयुष्यात एका निर्मात्याने तर त्यांना पन्नास लाखाहून अधिक रकमेला फसवले, पण दुःख उगाळत न बसता ते संगीतसेवा करत राहिले. एवढेच काय तरुण असताना त्यांची एक अप्रतिम पेटी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी तात्पुरती घेतली आणि परत दिलीच नाही, यावर ‘ठीक आहे, माझी पेटी सुरील्या हातामध्ये पडली हे माझं भाग्य म्हणून ते सुरीली वाटचाल करत राहिले.

