• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

सुनेत्रा वहिनींना सल्ला!

मर्मभेद

marmik by marmik
February 13, 2026
in मर्मभेद
0
सुनेत्रा वहिनींना सल्ला!

या संपादकीयाचे शीर्षक वाचल्यावर अनेकांच्या कपाळावर आठ्या उमटल्या असतील…त्याला कारणही तसेच आहे…सुनेत्रावहिनींचं काय चुकलं हे (कोणीही विचारलेलं नसताना) सांगणार्‍या आणि सुनेत्रावहिनींनी काय करायला हवं होतं आणि काय करायला हवं आहे, याबद्दल (पुन्हा कोणीही न मागता) सल्ला देणार्‍यांचं पेव फुटलेलं आहे महाराष्ट्रात! त्यामुळे इथेही आणखी एक ‘सल्लागार’ पाहून वाचक हाय खाणारच!

जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत सुनेत्रा अजित पवार कोणाच्याही चर्चेत नव्हत्या. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची धर्मपत्नी ही त्यांची ओळख. दादांनी त्यांना संसदेत पाठवलं, त्यामुळे त्या खासदार झाल्या. त्यांचं समाजकार्य बारामतीतल्या मंडळींना माहिती होतं. त्यापलीकडे आपली काही राजकीय ओळख असावी, असा काही विचार सुनेत्रा वहिनींनी कधी केला नसेल. मात्र, जानेवारी महिन्याच्या अखेरीस सगळंच चित्र पालटलं. अजित दादांचं बारामती विमानतळावरच विमान कोसळून आकस्मिक निधन झालं आणि महाराष्ट्राचा राजकीय सारीपाट अचानक उधळला गेला, गल्लोगल्लीत बोकाळलेल्या छोट्या मोठ्या चाणक्यांनी जी काही राजकीय मांडणी केली होती, ती सगळीच विस्कटून गेली.

यात सगळ्यात मोठा हादरा बसला तो राज्यात आणि केंद्रात (काय काय तिकडमबाजी करून ते विचारू नका) सत्तेत बसलेल्या भारतीय जनता पक्षाला. या अमानुष आणि पिसाट सत्ताकांक्षी पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी पार्टी हे दोन सक्षम विरोधी पक्ष फोडून तीन तिघाडा, काम बिघाडा सरकार स्थापन केलं आहे राज्यात. पवार आणि ठाकरे ही नावं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातून पुसून टाकल्याशिवाय आपले सर्वार्थाने चिमुकले पुढारी महाराष्ट्राचे महानेते म्हणून नाचवता येणार नाहीत आणि आपली विखारी विचारधारा महाराष्ट्राच्या मनात भरवता येणार नाही, याची खूणगाठ बांधून केलेला हा हल्ला होता. त्यात पक्षांतर्गत आणि कुटुंबांतर्गत मतभेदांमुळे भाजपच्या गळाला लागलेले अजित दादा सत्ताधारी समीकरणात जाऊनही भाजपच्या किंवा त्यांच्या मातृसंघटनेच्या संविधानद्रोही विचारांपासून फटकूनच होते. आपण सेक्युलर आहोत, सर्व धर्म समान मानतो, मुस्लिमांना निव्वळ धर्मावरून देशद्रोही ठरवत नाही, उलट त्यांना सत्तेत, विधीमंडळात प्रतिनिधित्व देतो, हे ते वारंवार ठसवत होते. अलीकडच्या काळात तर, खासकरून महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपशी थेट पंगा घेतला होता. भाजपच्या भ्रष्टाचाराची कुंडली आपल्याकडे आहे, असे ते उघडपणे सांगत होते. काही काळातच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि राज्यात अजितदादा सर्वोच्च नेते आणि केंद्राचा सुभा सुप्रिया सुळे यांच्याकडे अशी विभागणी होईल, अशी चर्चा सुरू झाली होती.

अशा पार्श्वभूमीवर दादांचं आकस्मिक निधन होणं हा भाजपला आणि अजितदादांमुळे सत्तेची ऊब मिळत असलेल्या त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना सर्वात मोठा धक्का होता. दादांनी विलिनीकरणाचा जो काही फॉर्म्युला ठरवला असेल, तो आता बदलणार आणि आता कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवार यांची पुन्हा एन्ट्री होणार हे लक्षात येताच भाजपने अजितदादांच्या पक्षात पेरलेल्या घरच्या भेद्यांच्या मार्फत दबाव आणला गेला आणि जन्माचा जोडीदार गमावल्याच्या दु:खातून सावरण्याच्याही आधी सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली…महाराष्ट्रासारख्या पुरोगामी वगैरे म्हणवून घेणार्‍या (कशाच्या आधारावर कोण जाणे) राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावर यापेक्षा वेगळ्या प्रकारे एखादी महिला विराजमान झाली असती, तर अधिक बरे झाले असते.

असो. आता, सुनेत्राताईंनी घरातल्या ज्येष्ठांशी मसलत करायला हवी होती, भाजपच्या नादी लागायला नको होतं, घरात सुतक असताना पदाची शपथ घ्यायला नको होती, अशी अनेक पुरुषसत्ताकवादी विश्लेषणं पुढे आली आहेत. त्या ज्या पक्षाच्या नेतृत्त्वाखालील सरकारचा भाग बनल्या आहेत, तिथे सक्षम महिलांना स्थान नसतं. त्यांची मूळ विचारधारा बाईला दुय्यम मानते आणि चूल व मूल हेच बाईचं मुख्य जीवितकार्य आहे, असे मानते. सुनेत्रावहिनींनाही हे पद त्यांच्या स्वतंत्र राजकीय ताकदीच्या बळावर किंवा राजकीय कर्तबगारीच्या बळावर मिळालेलं नाही (अन्यथा दादांकडे असलेलं अर्थ खातंही त्यांच्याकडे राहिलंच असतं की), दादांच्या निधनानंतर उसळलेली भावनिक लाट थोपवून, तिच्यावर स्वार होऊन ती जिरवण्यासाठी खेळली गेलेली ही एक चाल आहे, हे सांगायला कोणा भाष्यकारांची गरज नाही.
आता कळीचा विषय हा आहे की, या अतिशय शोकात्म परिस्थितीत लाभलेल्या या संधीचं सुनेत्रावहिनी सोनं करतील की त्यांच्या पक्षाचा घास गिळायला सज्ज झालेल्या राक्षसी जबड्यात त्यांचा पक्ष सापडेल आणि हा पक्ष संपूर्णपणे गिळंकृत करून हे नरभक्षक फूल तृप्तीचा ढेकर देईल? नेमकं काय होईल, ते ब्रह्मदेवालाही समजू शकणार नाही, कारण हे राजकारण आहे, इथे कोणत्या वळणावर काय होईल, ते कुणालाच सांगता येणार नाही. पण सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने काय व्हायला हवं, ते आपण सुनेत्रावहिनींना नक्कीच सांगू शकतो. दांभिक ‘सल्ला’ न देता अपेक्षा म्हणून सांगू शकतो.

महाराष्ट्राच्या सत्तेचा शकट एखाददुसरा अपवाद वगळता कायम रासवट पुरुषी संस्कृतीच्या हातात राहिलेला आहे. कधी सरंजामशाहीवादी, कधी माफक लोकशाहीवादी, तर वâधी थेट बाईला नरकाचं द्वार मानणार्‍या विचारधारेच्या हाती. इथे स्त्रियांच्या हिताचे खूप कायदे झाले, काही योजना आल्या, पण ते सगळं उदारमतवादी पुरुषांनी स्त्रियांवर केलेले उपकार, स्त्रियांचा केलेला उद्धार, अशा छापाचं राजकारण होतं. आता सत्तेच्या एका केंद्रस्थानी एक स्त्री बसणार असेल, तर तिच्या संवेदनशीलतेची छाप तिच्या आणि सरकारच्या कामकाजावर पडायला हवी, तिच्या माध्यमातून झालेल्या निर्णयांमध्ये पडायला हवी; त्यातून राज्यातल्या महिलांना जणू त्याच सक्षम झालेल्या आहेत, असं वाटेल. स्व. अजितदादांचीही हीच अपेक्षा असली असती ना वहिनींकडून? त्यांच्या पत्नी म्हणून महाराष्ट्र हक्काने सुनेत्रा पवार यांना सुनेत्रा वहिनी म्हणतो आहे. त्या नात्याने इतकी अपेक्षा ठेवायला हरकत नाही…
…बाकी सल्ल्यांचे म्हणाल, तर सुनेत्रावहिनींना एकच सल्ला…असल्या वावदूक आणि अनाहूत सल्ल्यांचे दादांनी जे केले असते, तेच करा…ते सगळे सल्ले कचरापेटीत टाका आणि खंबीरपणे वाटचाल सुरू करा… अवघा महाराष्ट्र तुमच्या पाठिशी आहे.

Previous Post

मुका पंडित

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.