
प्रसंग साखरपुड्याचा. ऐसपैस लॉन्सवर जेवणानंतर पाणी पिण्यासाठी ठेवलेल्या पाण्याच्या जारमधून अर्ध्यानं प्लास्टिकच्या (की कचकड्याच्या?) ग्लासनं पाणी घेतलं. आणि हात धुतले. साग्रसंगीत जेवल्यानं पोट टम्म भरलंय. त्यावरून हात फिरवत तृप्तीचा ढेकर देत जारभोवतीच्या उडालेल्या झुंबडीकडं त्यानं नजर टाकली. तो भैरव पाणी मिळवण्यासाठी उष्ट्या हातानं ताटकळत उभा दिसला.
ऐ! आवर! निघू परत! अर्ध्याला माघारी जायची घाई! पण आवाज भैरवपर्यंत पोहोचायला तर पाहिजे?
…ओ, हे ग्लास कुठून घेतले? एक चुरचुरीत आवाजात बोलणारी तरतरीत पोरगी त्याच्या नाकापुढं उभी राहून अर्ध्याला विचारायला लागली.
अर्ध्या इतका वेळ भैरवकडं बघायच्या नादात नाकापुढं आलेल्या ह्या सुंदरीकडं दुर्लक्ष कसं झालं, ब्वॉ? ह्या विचारात पडला.
…ग्लास ना? हे काय? तिथून…आयला! संपले वाटतं! तिथं ढीग होता ब्वॉ! आतापर्यंत! अर्ध्या चाट पडला. आता होते की रे! एवढ्यात…पाचेक मिनिटांच्या आत सगळे संपले? तो डोकं खाजवायला लागला.
…संपले असतील त्यात काय? हा तुमच्या हातातला देता का? हात धुवेपर्यंत! हवं तर परत देते मी तुम्हाला! तुमचा तुमचा..! बोलता बोलता ती हातातला ग्लास घेऊन कधी गेली? हे त्याचं त्याला उमगलं नाही. वर परत नकोय तो ग्लास! हे म्हणायचंही विसरला तो!
अर्ध्याचं सारं लक्ष तिच्यावर खिळलं. ही झिरमिळ्याची ओढणी. नेमका पंजाबी टॉप आहे की बाह्या नसलेलं टी-शर्ट यातला फरक त्याला उमजला नाही. पण सावळी असली तरी दिसायला सुंदर. नाकी-डोळी तरतरीत. ठसकेबाज त्या पोरीकडं बघत अर्ध्या उभा! ती तिचा हात धुवून इतरांचे हात धुवायला घेतेय. नि…
…तुझा पुतळा घडवायचा आहे का इथं? चाल. तुझ्या टाइमात जेवण आटपलं आपलं… भैरव कानाजवळ येऊन काही बोलला. पण अर्ध्याचं चित्त त्या चित्तचोरटीत अडकलेलं.
…अर्ध्या, पोरी पाहून झाल्या असतील तर जायचं का? भैरव एकूण नजरेची दिशा बघून अनुमान लावत बोलला.
…ह्यँ? काही काय? तूच लवकर आला नाही! मी किती वेळचा उभाय इथं! अर्ध्या तोंड देखलं उडवाउडवीनं बोलला. पण मनातलं सांगायचं कसं? ह्या विचारानं गुरफटला.
…हे बघ तू मोकळ्यानं बोलला तर आपल्या मित्राच्या चुलत भावाची मामेबहीण आहे ती! तुझ्याच जातीची येईल ती! मी एक शब्दात तुझं जुळवून देऊ शकतो… भैरव टोकरून बघायला लागला.
…ते तसं काही नाही रे! सहज नजर पडली! तिथं काय झुंबड उडलीय! सगळ्या पंगती होईपर्यंत तिथं पाण्याचा एक टिपूस राहायचा नाही… म्हणून बाकी काही नाही… अर्ध्या विषय टोलवायला लागला.
बघ. म्हणजे! नाहीतर ह्याच मंडपात तुझी सुपारी फोडायला घेतली असती… भैरव अर्ध्याची खेचू लागला.
…तुझं दरवेळी भलतंच राहतं! अर्ध्या पुन्हा टाळायला लागला… पण खरंच तुझ्या मित्राची नातेवाईक आहे का ही?… अर्ध्याला भारी खुदबुद! काय सांगावं? इथं जुळवाजुळवीत घडलं काही चांगलं तर…? काय सांगावा? कोणाचं नशीब कधी आणि कसं फळंल?
…मग मी काय खोटं बोलतो का? भैरव आव आणत बोलला… आपल्या नुसत्या एक फोनवर तिचे घरचे डन म्हणतील. हां..! भैरव हरभर्याच्या बारक्या फांदीवर अर्ध्याला चढवायला लागला.
…कोण गावची आहे मग ही? अर्ध्या आंधळी चाल खेळला.
हे… ते… याच्याजवळ नाही का? भैरव काही आठवायचा प्रयत्न करत बोलता बोलता अडखळला.
…हा दहाव्याच्या घाटापुढं! मार तू थापा!!! अर्ध्या काही खडे उचलून भैरवच्या मागं लागला, भैरव हसत चिडवत पुढं पळतोय. अशी धराधरी रंगलीय. शेवट पळत पळत ते स्टेजपुढल्या खुर्च्यांत येऊन बसले.
…पण माझं जाऊ दे! तुझं जाऊ दे! तू खरंच त्या पोरीलाच न्याहाळत होता ना?
… भैरवला अजून पण तेच जाणून घ्यायचंय.
…हां म्हणजे! तीच आली होती! मी तुला आवाज दिला बघ. तेव्हा. डायरेक तोंडापुढं. माझं लक्ष नव्हतं. म्हणजे नाही का? तुझ्याकडं पाहत होतो. अन् एकदम ग्लास मागितला अन् हातातला घेऊन बी गेली. म्हणून कोणे ब्वॉ एवढी डेरिंगबाज पोरगी? ते बघत होतो तर तुझं तर आपलं काहीतरीच! अर्ध्या गोर्यामोर्या तोंडानं गाल फुगवून लटक्या रागानं निषेधवाचन करायला लागला.
ग्लास मागितला का पाणी? अर्ध्या तू पाणी द्यायच्या लायकीचा पण नाही रे! कश्या पटायच्या पोरी तुला?… भैरव पुन्हा चिडवायला लागला. अर्ध्या धपाटे टाकायच्या पावित्र्यात येणार तोच एक मध्यमवयीन माणूस तिथं आला.
…ओ, पलीकडं नवरा-नवरीचे फोटोसेशन चालुय. त्यात तुमचं हे असं कॅप्चर झालं तर…? बरं दिसंल का? शेजारच्या खुर्चीवर बसत त्या माणसानं ज्ञान पाजलं.
…बघा ना! मी शांत बसलोय. हाच ऐन कार्यक्रमात माझ्यावर हात उचलतोय…भैरव अर्ध्याची तक्रार करायला लागला.
…नाही हो! मी शांत होतो. यानीच मला चिडवायला सुरुवात केली… अर्ध्यानं लागलीच बाजू मांडली.
…काय चिडवलं? बोल ना?…भैरव उलट प्रश्न करायला लागला. त्याला माहितेय अर्ध्या काय सांगंल?
…हां मी बघितलं ना! तुमच्या मागच्या रांगेतच होतो जेवायला मी! अगदी हात धुवून इथं येईपर्यंत. सगळं बघतोय मी! …तो माणूस बोलला. तशी दोघं चपापली. गप्प झाली… त्या पोरीवरूनच चिडवत होता ना तुम्ही? यांना? त्या माणसानं यॉर्कर टाकला.
…नाही म्हणजे… सहज! असं काही… भैरवला स्पष्टीकरण कसं द्यावं ते उमजंना.
…ती माझ्या चुलत भावाच्या साडवाची पोरगी आहे… तो माणूस धक्क्यावर धक्के द्यायला लागला.
…सॉरी! आमच्याकडून चूक झाली! …अर्ध्या घायकुतीला येत कान पकडायच्या मनस्थितीत आला. काय ही बला चालून आली? ओळखीतल्या साखरपुड्याला आमंत्रणावरून यावं. योगायोगानं नजर कुणा सुंदर चेहर्यावर जावी. फक्त दोन क्षण त्यावरून चेष्टा-विनोद व्हावे. तेही संबंधित तरुणीच्या नकळत. तिला न दुखवता. ना अश्लील ना असभ्य. तरीही माफी मागायची वेळ यावी? काय दुर्दैव? पण हेच बरंय! माफी मागावी. नि चटकन सटकावं इथून. ह्या विचारात अर्ध्या पोहोचला.
…सॉरी? इतक्यात? अजून तर मी सुरू पण नाही केलं… माणूस बोलायला लागला.
…जाऊ द्या ना! आम्ही ओळखीच्या साखरपुड्याला आमंत्रण मिळालं म्हणून आलो. तुमच्या घरातल्या मुलीबद्दल आम्ही चुकूनही काही वाईट बोललो असू, असं वाटलं असंल तर आम्ही दोघं पण माफी मागतो. पुन्हा आम्ही त्या दिदीला… भैरव काकुळतीला आला.
…अरे बसा! बसा! मी काही तुमचे माफीनामे लिहून घ्यायला आलो नाही. मी तुम्हाला केव्हापासून बघत होतो. सहज वाटलं बोलावं म्हणून तुमच्याजवळ आलो. तर ती जी आहे. ती फार्मसी झाली आहे. पुढं पीचडी केलीय. आणि आता एक मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पॅकेजची नोकरी करतेय. आता आठवडाभराची सुटी काढून आलीय. त्यात हा साखरपुडा आला. म्हणून इथं आलीय… तो माणूस सांगायला लागला.
…वाटत नाही. मल्टीनॅशनल… भैरव काही शब्द नकळत पुटपुटला.
…असतं काहींचं! चटकन समजत नाही. तर तिच्यासाठी तिचा बाप स्थळं शोधतोय. जातीत. पोटजातीत. बड्या हुद्यावाला, गलेगठ्ठ पगारदार. उच्चशिक्षित. एकतर एखादा मिळालाच तर वय, गुण किंवा पत्रिका जुळत नाही. वा आणखी काही अडचणी येतात. नाही म्हणायला मागं एक मिळाला होता. पण मागाहून तो भपकेबाज, लंपट असल्याचं कळलं आणि लग्नं मोडलं. आता काही नात्यातली मंडळी म्हणतायत की मिळेल तो पकडा. काय आहे, पोरीचा पाय वाकडा पडायला नको. नाहीतर कुळाला बट्टा लागायचा. तुम्हाला काय वाटतं? एक उच्चशिक्षित मुलीने तिच्या योग्यतेचा मुलगा निवडला तर समाजाला कुळाला बट्टा लागू शकतो का? का तो लागू नये म्हणून आई-बापाचं ऐकून कुणाही ऐर्यागैर्याशी लग्न केल्याने कुलगौरव वाढतो? तुमची पिढी काय विचार करते?… तो माणूस बोलूच राहिला.
अर्ध्याला मागं कधीतरी ऐकलेलं वा वाचलेलं वाक्य आठवतं. ‘बाई प्रगती करायला लागली की ती वाईट चालीची ठरते. किंवा झटपट प्रगती वाईट चालीच्या बायांचीच होते.’ वा ‘बाईनं उंबरा ओलांडला की समजावं ती वाईट चालीची!’
…ओ, तुमचा ग्लास घ्या! …पाण्यानं गच्च भरलेला ग्लास घेऊन ती सुंदरी अर्ध्यापुढं आली देखील. केव्हा हे त्याचं त्याला कळलं नाही. त्याने त्या माणसाकडे बघत भीत भीत ग्लास हातात घेतला, पण त्याला समाजात वावरताना ऐकू येणारं आणखी एक वाक्य आठवलं… ‘चांगल्या चालीच्या मुली चटकन अनोळखी मुलांशी बोलत नाहीत.’
आपली पुरुषप्रधान व्यवस्था बाईला किती चटकन आणि सहज चांगल्या-वाईटाचं लेबल लावते ना?
अर्ध्या पाणी पीत मनात आलेले विचार पाण्यानं धुवू बघत होता… जमेल त्याला?

