
भारताच्या पुरुष संघानं ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकत विजयलाट कायम राखली. त्यामुळे नेमेचि होतो विश्वविजेते असं छातीठोकपणे म्हणता येतं. या विश्वविजेतेपदाच्या प्रवासात भारतानं अभिषेक शर्माचा धावांचा दुष्काळ, तिलक वर्माचं झगडणं, वरुण चक्रवर्ती महागडा ठरणं आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण या चार प्रमुख समस्यांचं निराकरण करीत कशा रीतीनं हा विजयाध्याय लिहिला, त्याचं हे शास्त्रशुद्ध विश्लेषण.
स्वप्नपूर्ती आणि स्वप्नभंग… यापैकी जे काही घडलं असतं, त्याचा इतिहास लिहिला गेलाच असता… ती दंतकथा झालीच असती. पण इथे स्वप्नपूर्ती झाली, ती केवळ मैदानावर लढलेल्या ११ क्रिकेटपटूंची नव्हे, तर १४० कोटी भारतीयांची. एके काळी आपण दीर्घ प्रतीक्षेनंतर विश्वविजेते व्हायचो. १९८३नंतर जग जिंकण्यासाठी २००७ उजाडावं लागलं, म्हणजे २४ वर्षं… दोन तपं. मग पुढचं मिळालं ४ वर्षांत. मग पुन्हा ११ वर्षांची म्हणजेच जवळपास एक तप वाट पाहावी लागली. २०२३ला स्वप्नभंगाची अनुभूती घेतली. पण वर्चस्वाची मोहोर उमटवली गेली. २०२४नंतर आपण पुढच्याच विश्वचषकात त्याची पुनरावृत्ती करू, हे तसं अविश्वसनीय. पण ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारताची कामगिरी पाहिल्यास असं घडू शकतं, हे म्हणायला आकडेवारी अनुकूल अशीच होती. त्यामुळे गेल्या दोन-चार वर्षांचं भारतीय क्रिकेट पाहिल्यास आपण ‘नेमेचि होतो विश्वविजेते’ याचीच प्रचिती येते.
स्टेडियमवर उपस्थित राहणार्या लाखभर प्रेक्षकांना शांत झालेलं पाहायचंय, अशा फुशारक्या न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरनं मारल्या. आता काही तरी नवं बोल, असं उत्तर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनं दिलं होतं. सूर्याच्या माथी विश्वविजेता कर्णधार म्हणून टिळा लागला. विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांची घसरगुंडी उडाली, तेव्हा संघनिवडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. पण न्यूझीलंडविरुद्धचा नीरस अंतिम सामना भारतानं वर्चस्व गाजवत जिंकला.
हा प्रवास नऊ सामन्यांचा. सुपर-८मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून नरेंद्र मोदी स्टेडियमवरच हार पत्करली, तेव्हा परिस्थिती बिकट वाटत होती. गटसाखळीत ऑस्ट्रेलियासारख्या संघानं गटांगळ्या खाल्ल्या. भारताचा प्रवास सुपर-८पर्यंत मर्यादित राहणार असं वाटलं होतं. पण हे भारतीय संघातील शिलेदारांना नामंजूर होतं.
विश्वविजेत्या संघाच्या निवड प्रक्रियेपासून हा दृष्टिकोन दिसून आला. देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या आधारे ईशान किशन, मोहम्मद सिराज यांना स्थान देण्यात आलं. क्रिकेटच्या दोन प्रकारांत भारताचं नेतृत्व करणार्या शुभमन गिल आणि धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जैस्वालला वगळण्यात आलं. यष्टीरक्षक-सलामीवीर असावा हे पक्क करून ईशानकडे पाहण्यात आलं, तेव्हा संजू सॅमसनला पर्यायी खेळाडू म्हणून ठेवलं गेलं होतं. पण तोच पुढे भारताच्या यशाचा प्रमुख नायक झाला, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान त्याला मिळाला, तो त्याच्या असीम कर्तृत्वाच्या बळावर. या प्रवासात समस्या येत गेल्या, त्यांचं निराकरण कसं केलं गेलं, ते पाहू.

१. समस्या : स्फोटक अभिषेक शर्मा दुष्टचक्रात!
विस्तार : ट्वेंटी-२० विश्वचषकात जागतिक क्रमवारीत क्रमांक एकचा फलंदाज म्हणून उतरलेल्या अभिषेकची बॅट त्याच्या दर्जाला साजेशी मुळीच तळपली नाही. त्याला चक्रव्यूहात कसं अडकवायचं, हे सूत्र परदेशी खेळाडूंना उलगडलेलं. ऑफस्पिनरच्या गोलंदाजीवर अभिषेक चेंडू भिरकावून देतो आणि झेलबाद होतो, हे प्रतिस्पर्धी संघांना कळल्यामुळे पहिल्या किंवा दुसर्या षटकांत ऑफस्पिनर आणण्याची रणनीती यशस्वी होत गेली. अभिषेक तीच चूक पुन्हा पुन: करीत तंबूची वाट धरत होता. त्यात पोट बिघडल्यामुळे नामिबियाविरुद्धच्या लढतीला त्याला मुकावं लागलं होतं. अंतिम सामन्या आधीपर्यंत या विश्वचषकातील सात सामन्यांत त्याच्या खात्यावर जेमतेम ८९ धावा जमा होत्या. पहिल्या तीन सामन्यांत तर त्याचे भोपळेच होते. पण तरीही संघ व्यवस्थापन त्याच्या पाठीशी राहिलं. जेव्हा बाकीच्यांकडून धावा होत नव्हत्या, तेव्हा अभिषेक धावा करीत होता. आता त्याच्याकडून होत नसतील, तर आम्ही करू, अशा शब्दांत सूर्यानं त्याची पाठराखण केली. अंतिम सामन्यात नाणेफेकीनंतर न्यूझीलंडचा संघ पाहून ऑफस्पिनर नसल्याबद्दल सूर्यानं सँटनरकडे आश्चर्य प्रकट केलं. अभिषेकच्या फटकेबाजीचा मार्ग मोकळा झाला. त्यानं फक्त २१ चेंडूंत ५२ धावांची दिमाखदार खेळी साकारली आणि त्यामुळे भारतानं पॉवरप्लेमध्ये बिनबाद ९२ धावा उभारल्या. हीच अंतिम सामन्यात भारताची पायाभरणी ठरली.
निराकरण : संजू सॅमसनला सलामीला पाचारण.
विस्तार : सुरुवातीच्या टप्प्यात भारताचे दोन्ही सलामीवीर डावखुरे. अगदी तिसर्या क्रमांकावरचा तिलक वर्माही डावखुरा. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांचं ऑफस्पिनर हे अस्त्र निष्प्रभ करण्यासाठी उजव्या हाताचा फलंदाज हवा. त्यानुसार नामिबियाविरुद्ध संजूला सलामीवीर म्हणून जागा करून देण्यात आली. ईशानला तिसर्या क्रमांकावर मागे आणण्यात आलं. संधी मिळताच संजूनं नामिबिया आणि झिम्बाब्वेविरुद्ध अनुक्रमे २२ आणि २४ धावा काढल्या. पण वेस्ट इंडिजविरुद्ध विजय अनिवार्य ठरलेल्या सामन्यापासून संजूचा मैदानावरील आवेशच बदलला.

संघातील राखीव खेळाडूनं मग आखीव कामगिरीनं डोळ्यांचे पारणे फेडले. ईडन गार्डन्सवर विंडीजविरुद्ध नाबाद ९७, वानखेडेवर उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध ८९ धावा आणि नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामन्यात ८९ धावांची संस्मरणीय खेळी हे सारं अनपेक्षित असंच. त्यामुळे अभिषेक बाद झाला तरी संजू मैदानावर आहे… धावसंख्या वेगानं पुढे सरतेय आणि विजय आवाक्यात वाटतोय, हीच संजूची किमया.
२.समस्या : तिलक वर्माचं झगडणं!
विस्तार : ट्वेंटी-२० विश्वचषकाआधी तिलक वर्मालाही आजारपणानं अडचणीत आणलं. परिणामी तो विश्वचषकाआधी रंगीत तालीम म्हटल्या जाणार्या न्यूझीलंडविरुद्धच्या पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेलाही मुकला होता. पण तरीही त्याला विश्वचषकाच्या मुख्य योजनेत समाविष्ट केलं होतं. अभिषेक एकीकडे पहिल्या दोन षटकांत तंबूची वाट धरत असल्यानं तिलकला लवकर मैदानावर जावं लागे आणि तोही डावखुरा असल्यानं त्याचीही ऑफ-स्पिनरला सामोरे जाताना तारांबळ उडे. मोठी धावसंख्या आणि अपेक्षितच फटकेबाजी त्याच्याकडून होईना.
निराकरण : पहिल्या चारही सामन्यांत २५चा आकडा ओलांडणारा तिलक दक्षिण आफ्रि केविरुद्ध फक्त एक धाव काढून माघारी परतला. यानंतर भारतानं ‘ऑपरेशन : ऑफस्पिनर’ रचत संजूला सलामीला आणलं. त्यामुळेच ईशान तिसर्या क्रमांकावर मागे आला. परिणामी तिलकला थेट सहाव्या क्रमांकावर पाठवण्यात आलं.

ही संघरचना करताना आपली छाप पाडू न शकलेला रिंकू सिंह संघाबाहेर गेला. या नव्या भूमिकेत तिलक अधिक आत्मविश्वासानं खेळू लागला. त्यानं आणखी वेगानं नाबाद ४४, २७, २१ आणि नाबाद ८ धावा केल्या.
३.समस्या : वरुणला भेडसावायची धावांची बरसात!
विस्तार : ट्वेंटी-२० विश्वचषकाला प्रारंभ झाला, तेव्हा जागतिक क्रमवारीतील क्रमांक एकचा गोलंदाज हा वरुण चक्रवर्तीचा धाक होता. अपेक्षेप्रमाणे सुरुवातीला त्यानं छापही पाडली. पण गटसाखळीमधील कामगिरी आणि सुपर-८सह बाद फेरीतील कामगिरी यात कमालीची तफावत जाणवली. गटसाखळीमधील पहिल्या ४ सामन्यांत ६२ धावांत ९ बळी अशी त्याची प्रभावी कामगिरी. आणखी खोलात जायचं तर ५.२ची ईकॉनॉमी आणि आणि ११.६चा स्ट्राइक रेट. पण सुपर-८पासून प्रतिस्पर्धी फलंदाजांनी त्याच्या रहस्यमय गोलंदाजीवर बेधडक फटकेबाजी केली. सुपर-८सह बाद फेरीतील त्याची कामगिरी चिंताजनक. त्याने ५ सामन्यांत फक्त ५ बळी मिळवले आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांनी २२५ धावा चोपल्या. इंग्लंडनं तर तब्बल ६४ कुटल्या. त्यामुळे इकॉनॉमी ११.२५ आणि स्ट्राइक रेट २४पर्यंत ढासळलेला.
निराकरण : अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्याला एक प्रश्न विचारण्यात आला की वरुणची कामगिरी पाहता तो हा महत्त्वाचा सामना खेळेल का? सूर्यानं हसत-खेळत आपल्या आवडत्या सुपला फटक्याप्रमाणे उत्तर दिलं की, ‘चिंतेचं कोणतंच कारण नाही. संघात ११ जण असतात. प्रत्येकाचा दिवस चांगला नसतो. कामगिरीत चढ-उतार असतात. एखादा अपयशी ठरला, तर उरलेले आपल्या कामगिरीनं ते अंतर कमी करतात. वरुण जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. सामने कसे जिंकावेत, हे त्याला ठाऊक आहे.’

वरुणनं मागील ५ सामन्यांतील ५ बाद केलेल्यांची नावं पाहिली तरी त्याची उपयुक्तता सहज अधोरेखित होते. सुपर-८मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या, भारतानं हार पत्करलेल्या लढतीत डेव्हिड मिलरनं (६३) महत्त्वाची भूमिका बजावली. वरुणनं मिलरलाच बाद केलं. मग झिम्बाब्वेविरुद्ध डायन मायर्स (६) त्याचा बळी ठरला. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होपला (३२) धोक्याची पातळी ओलांडू दिली नाही. वानखेडेवरील उपांत्य सामन्यात जोस बटलर अनुरूप लयीत येत आवडत्या मैदानावर मोठी धावसंख्या उभारणार अशी चिन्हे दिसत होती. पण वरुणनं (२५) त्याला तंबूची वाट दाखवली. अंतिम सामन्यात फिन अॅलन आणि टिम सेफर्ट भारतीय गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणार असा धोका होता. पण सेफर्टचं अर्धशतक होताच त्याला ‘आता पुरे’ असं सांगत माघारी धाडण्याचं कार्य वरुणनं हिंमतीनं केलं. त्यामुळे वरुणचे हे पाच बळी आधीच्या नऊ बळींपेक्षा अधिक मौल्यवान ठरतात. या विश्वचषकाअंती सर्वाधिक १४ बळी जसे जसप्रीत बुमराच्या खात्यावर होते, तेवढेच वरुणनंही मिळवले आहेत.
४.समस्या : क्षेत्ररक्षकांकडून सुटलेले झेल!
विस्तार : भारतीय क्षेत्ररक्षकांकडून सुटलेले झेल हा सुपर८पर्यंतच्या टप्प्यातील आणखी एक कच्चा दुवा. या एकंदर विश्वचषकात भारतानं एक डझनहून अधिक झेल सोडले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तर सर्वाधिक चार झेल सुटले. झेल सोडणार्या क्षेत्ररक्षकांमध्ये तिलक आणि अभिषेक या दोघांची नावं पुढे आहेत. आफ्रिकेविरुद्ध बुमराच्या गोलंदाजीवर तिलकनं झेल सोडला. तसंच वेस्ट इंडिजविरुद्ध अभिषेकनं दोन आणि तिलकनं एक झेल सोडला.
निराकरण : झेल सामने जिंकवतात, तसंच काही झेल सामने गमावतात. २०२४च्या मागील विश्वविजेतेपदात सूर्याच्या संस्मरणीय झेलाने इतिहास घडवला. असे झेल पराक्रमाचा इतिहास लिहितात, तर काही झेल कलंकित करतात. सुपर-८पर्यंतच्या खराब कामगिरीनंतर उपांत्य आणि अंतिम सामन्यात क्षेत्ररक्षकांची कामगिरी सुधारलेली पाहायला मिळाली. उपांत्य सामन्यात अक्षर पटेलनं टिपलेले दोन झेल तर डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. बुमराच्या गोलंदाजीवर हॅरी ब्रुकचा झेल अक्षरने पॉइंटच्या क्षेत्रातून उलट्या दिशेनं सीमेकडे झेपावत घेतला. विल जॅक्सनचा झेल कागदोपत्री दुबेच्या नावे नोंदला गेला. जॅक्सनं डीप कव्हरला मारलेला फटका सीमारेषेच्या अगदी नजीक अक्षरनं थांबवला आणि ती ओलांडण्यापूर्वी समोर येऊन उभ्या ठाकलेल्या दुबेकडे तो खुबीनं सोपवला. अंतिम सामन्यात ईशान किशननं तीन आणि तिलकनं दोन झेल टिपले.

