• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

वॉर रुकवा दो पापा!

मर्मभेद

marmik by marmik
March 17, 2026
in मर्मभेद
0
वॉर रुकवा दो पापा!

पा पा झोपले आहेत की काय कळत नाही…नाहीतर एव्हाना त्यांनी ट्रम्प, नेतान्याहू आणि खामेनेई यांच्या राजकीय वारसदारांचे कान उपटले असते. सगळ्यांना हातांनी ढकलून बाजूला केलं असतं. (त्यांना खरंतर हे करायची गरज नाही, पापांनी बळे बळे गळ्यात पडून घट्ट मिठी मारली आणि हातात हात घट्ट दाबून आपल्या अगम्य भाषेत बोलून हा हा हा हा असं स्वत:शीच हसण्याचा हुकमी प्रयोग केला की भले भले राष्ट्रप्रमुख घाबरतात असेही.) युक्रेन-रशिया युद्ध (फक्त काही तासांसाठी- तसं ते अजूनही सुरूच आहे) थांबवून भारतीय युवकांची सुटका करणार्‍या भक्तगणांच्या पापांना अशक्य ते काय असणार?

पापांना त्यांची मुले (पापांचे विरोधक या अबोध लेकरांसाठी वेगवेगळे असभ्य शब्द वापरतात) विश्वगुरू म्हणतात. त्यातूनच ही पूर्ण शारीरिक वाढ झालेली लेकरं किती अबोध आणि निरागस आहेत हे कळून येतं. यांना विश्वाचा आकार माहिती नाही, त्यात धुळीच्या कणाइतकीही नसलेली आपली सूर्यमाला, तिच्यातलं पृथ्वीचं स्थान, त्यातलं मानवाचं स्थान आणि त्यात आपल्या देशाचं स्थान यातल्या कशाचंही आकलन असण्याची शक्यता नाही. प्रत्येक आईला आपलं मूल सुंदर वाटतं, तसा प्रत्येक अनुयायाला आपला नेता जगात भारी वाटतोच. आपण अतिशयोक्तीचे बादशहा असल्यामुळे विश्वात भारी म्हणालो प्रेमाने तर बिघडलं कुठे!

तर मूळ मुद्दा पापांनी एक वॉर थांबवलेलं होतं म्हटल्यावर सगळ्या विश्वाचे, हो अगदी अंतराळातल्या धुलिकणांचेही डोळे विश्वगुरूंकडे लागले होते. मुळात ते दोन दिवस आधी इस्रायलला गेले होते. आपल्या देशासह अनेक जग ज्या देशाच्या
पॅलेस्टाइनवरील हिंसक वंशविच्छेदी हल्ल्यांचा अधिकृतपणे विरोध करतात, त्या देशाच्या नेत्याला ते अगदी जत्रेत हरवलेल्या भावाला भेटावं, तसे आस्थेने, आपुलकीने भेटले होते. नेतान्याहू असो की ट्रम्प असो, विश्वगुरू त्यांना वरकरणी माझे प्रिय मित्र म्हणत असले तरी ते (पक्षी : ट्रम्प आणि नेतान्याहू) विश्वाच्या रचनेत त्यांचं नगण्य स्थान आणि विश्वगुरूंची महत्ता ओळखून आहेत. ते परमेश्वरी अवतार आहेत, याची त्यांनाही खात्री आहे. त्यामुळे नेतान्याहू यांनी इराणवर आपण दोन दिवसांत हल्ला करणार आहोत, त्यासाठी परवानगी द्या, अशी विनंती विश्वगुरूंना केलीच असणार. सगळ्या जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठीच ज्यांचा जन्म- नव्हे अवतार झाला आहे (हे त्यांच्या कारकीर्दीतल्या प्रमुख घटनांवरूनही दिसून येतेच) अशा विश्वगुरूंनी त्यांना अर्थातच असा अनाचार करायला सक्त मनाई केली असणार. इराण हा भारताचा मित्र देश. भारत-पाकिस्तान संघर्षात त्या देशाने दहशतवादाचा धिक्कार केला होता आणि संघर्षात सक्रिय मध्यस्थी केली होती. इराणमध्ये आपली सर्वात मोठी गुंतवणूक असलेलं चाबहार बंदर आहे. इस्रायलमध्ये विश्वमित्राची (आता हे कोण ते विचारू नका…विश्वगुरूंचे मित्र ते विश्वमित्र) गुंतवणूक असलेले हैफा बंदर आहे. अशावेळी इस्रायलने इराणवर हल्ला चढवला की उत्तर मिळणार आणि दोन्हीकडून आपलीच होरपळ होणार, याची कल्पना विश्वगुरूंना आलीच असणार. त्यांनी नेतान्याहूला दम भरलाच असणार. वर तिथून व्हाइट हाऊसला फोन करून ‘डोन्या, बास, बास. आजवर मैत्रीच्या अधिकारात तुला खूप ढील दिली. आता आपल्या मर्यादा ओलांडू नकोस. नाहीतर मला विश्वरूप दर्शन दाखवावं लागेल,’ असंही विश्वगुरूंनी ट्रम्पला ठणकावलं असणार, यातही काही शंका नाही. (आता ‘डोन्या’ ऑपरेशन सिंदूरपासून चेकाळून रोज मीच युद्ध थांबवलं, असे ढोल वाजवतो आहे, कधी टॅरिफ लादतो आहे, कधी कमी करतो आहे, कधी दम भरतो आहे, अमेरिकेतले भारतीय विद्यार्थी, नोकरदार यांच्या डोक्यावर हकालपट्टीची टांगती तलवार ठेवतो आहे, त्याबद्दल विश्वगुरूंच्या तोंडून चकार शब्द का निघत नाही, असा प्रश्न पाडून घेऊ नका. परमेश्वरी लीला जशी अगाध असते, तसेच विश्वगुरू पाय घसरून नाकावर आपटले तरी तो त्यांचा मास्टरस्ट्रोकच असतो.)

एकतर या दोघांनी विश्वगुरूंना हलक्यात घेतलेलं असणार किंवा त्यांनी विश्वगुरूंना विश्वासात घेतलेलं नसणार (हे विश्वगुरूंना अंतर्दृष्टीने आधीच कळलेलं असणार म्हणा)! कारण काहीही असो, या दोघांनी विश्वगुरूंची परवानगी न घेता युद्ध सुरू केलेलं आहे आणि इराणने त्यांचे सर्वोच्च नेते मारले गेल्यावर विश्वगुरूंची परवानगी न घेता इस्रायल आणि अमेरिका यांना सणसणीत उत्तरही द्यायला सुरुवात केली आहे. उलट हा डोन्या नावाचा टोण्या भारताला रशियाकडून महिनाभर तेल घेण्याची ‘परवानगी’ देतो? अरे तू आहेस कोण विश्वगुरूंपुढे? पाकिस्तानला विचार पापांनी लाल डोळे दाखवले की कशी भंबेरी उडते ते… चीनला नको विचारूस…तो जरा वेगळा विषय आहे…तिथे अजून तरी विश्वगुरूंनी गांभीर्याने लक्ष घातलेलं नाही…ना कोई आया था, न कोई गया है, असा सगळा उच्च कोटीचा आध्यात्मिक मामला आहे…जो उचित समझो वो समझो!

तर आता या तीन देशांनी आगळीक केलेली आहे, एकमेकांत लढाई सुरू केलेली आहे. इराणचे नेते खामेनेई यांना भारताने श्रद्धांजली वाहिली नाही, इराणच्या, भारतानेच युद्धसरावासाठी बोलावलेल्या युद्धनौकेचं संरक्षण केलं नाही, इस्रायलचा निषेध केला नाही (एवढ्या मिठ्या मारून झाल्यावर कसा करणार, बरं दिसतं का ते?), म्हणून इराणने होर्मुझच्या खाडीतून भारतीय जहाजांचीहाr वाट बंद केली आहे. अमेरिका दम भरतेच आहे. रशिया हा पूर्वापारपासूनचा मित्र. त्यानेही आता खनिज तेल वाढीव भावाने घ्यावं लागेल, असं सांगितलं आहे. हा इतका सगळा गोंधळ माजलेला असताना पापा शांत आहेत. त्यावरून त्यांच्या धैर्याची, धोरणांची आणि ईश्वरी शक्तीची चेष्टा करणार्‍या विरोधकांनी एवढंच लक्षात घ्यायला हवं की प्रत्येक गोष्टीला अंत आहे, म्हणून पापा शांत आहे.

पण आता जरा पापांनी जागं व्हायला हवं. वॉर रुकवा दो पापा, ही आपल्या अश्राप लेकरांची आर्त हाक ऐकायला हवी. आखाती प्रदेश सोडता बाकी सगळ्या जगात तशी शांतताच आहे. तरीही पापांचे भक्तगण भारत पापांमुळे शांत आहे हे सांगत होता. सिलिंडर पाच हजार रुपयांवर आणि पेट्रोल हजार रुपयांवर गेलं ती पापांनाच डोक्यावर घेणार, म्हणून गर्जना करणारी ही लेकरं, सिलिंडर ६० रुपयांनी महागल्यावर आक्रंदू लागली आहेत आणि पेट्रोलच्या दरात १० रुपयांची वाढ होण्याआधी पेट्रोल पंपावर रांगा लावू लागली आहेत…
…त्यांच्यासाठी तरी वॉर रुकवा दो पापा!

Previous Post

गोविंददेवांना न आकळली ऐश्वर्याची वचनाक्षरे!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.