पुष्कर जोग आणि अमृता खानविलकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘वेल डन बेबी’ हा सिनेमा 9 एप्रिलला अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शनासाठी सज्ज आहे. प्रदर्शनाला केवळ काही दिवस उरलेले असतानाच अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने या चित्रपटाच्या आणखी एका नवीन गाण्याचे अनावरण केले आहे. ‘हल्की हल्की’ असे बोल असलेले हे नवे गाणे या कथेत फीट बसते. याच्या लक्षवेधक व्हिडिओतील चमकदार सिनेमॅटोग्राफीसह या गाण्याचे बोल श्रोत्यांच्या हृदयाची अचूक तार छेडतात. ‘हल्की हल्की’ हा एक असा ट्रॅक आहे ज्याला प्रत्येक स्तरावरील श्रोते आपल्याशी जोडून घेऊ शकतील, असा निर्मात्यांचा दावा आहे. रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत रोहन प्रधान यांनी गायले असून वलय मुळगुंड यांनी लिहिले आहे. या सिनेमाची कहाणी आधुनिक काळातील एका जोडप्याभोवती फिरते, जे घटस्फोट घेणार आहेत, परंतु नशिबाने त्यांना एका वळणावर आणून उभे केले आहे. प्रियंका तन्वर दिग्दर्शित आणि मर्मबंधा गव्हाणे लिखित या चित्रपटात पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.