अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांकडे किती बारीक लक्ष होतं हे सार्यांनाच माहीत आहे. कारण मुंबईविषयी गुजरातला जितकं आकर्षण आहे त्याच्या कितीतरी पट अमेरिकेचे ट्रम्प, रशियाचे पुतीन आणि चीनचे जिनपिंग यांना आहे हे त्यांनी अनेकवेळा बोलूनही दाखवलं आहे. माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या हा भाजपच्या आतल्या गोटात वावरणारा पत्रकार. त्याच्या म्हणण्यानुसार यंदा या तिन्ही नेत्यांना महाराष्ट्रातील बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांविषयी विशेष आकर्षण होतं. तुमची निवडणूक यंत्रणा म्हणजे सगळा संशयास्पद कारभार असून जनतेला धाब्यावर बसवून निवडणुका जिंकण्यासाठी विश्वगुरू मोदींचा पक्ष कोणत्याही थराला कसा जातो हे आम्ही पाहिलं आहे, असं ते तिघंही ठामपणे सांगतात. त्यांच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असावं असा अंदाज पोक्याने माझ्याकडे व्यक्त केला, तेव्हा मीच त्याला तू त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची मतं जाणून घे असा सल्ला दिला. पोक्याने त्यांच्याशी बातचीत केली. तिचाच हा सारांश –
प्रथम तो विश्वशांतीदूत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलला.
– ट्रम्प साहेब, आमच्या महापालिका निवडणुकींविषयी तुम्ही खुलेपणाने बोला.
-मिस्टर पोकेमन, युवर इंडिया इज ग्रेट, युवर प्राईमिनिस्टर वर्ल्ड टीचर मोदी इज ग्रेट, युवर मुंबाय महाराष्ट्र इज ग्रेट अँड म्युनिसिपल कॉर्पोरेशन इलेक्शन आर अल्सो ग्रेट-
-तुम्ही मराठीत बोला ना. ते ट्रान्सलेट करण्याचं मशीन वापरून बोला बाबा.
-होय. तुमच्या महाराष्ट्रातल्या महापालिकांच्या निवडणुका पाहिल्या मी. आणि मला शॉकच बसला. असे गैरप्रकार करून निवडणुका जिंकतात तुमच्याकडे? आमच्या अमेरिकेत आम्ही नाही असे पैसे वाटप करून निवडणुका जिंकत. खरं लोकशाही स्वातंत्र्य आहे आमच्याकडे. आम्ही फक्त एकमेकांविरुद्ध प्रचार करतो. लोकशाही पद्धतीनुसार मतपत्रिकेवर मतदान होतं. लोक त्यांना योग्य वाटेल तो उमेदवार बहुमताने निवडतात. आता न्यूयॉर्कचा महापौर आमचा नव्हे तर विरोधी पक्षाचाच निवडून आला ना! आम्ही त्याला स्वीकारला. आमच्याकडे राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होते. त्यातून राष्ट्राध्यक्ष मंत्री निवडतो. पण तुमच्याकडे काय भलतंच चालतं. निवडून आलेला उमेदवार ताबडतोब दुसर्या पक्षात जातो ही तर मतदारांशी बेईमानीच आहे. तुमच्याकडे मतदारांना या ना त्या स्वरूपात रोख रकमा आणि भांडीकुंडी वाटतात म्हणे. ही तर लाचखोरी झाली. पैसे वाटून तुम्ही मतदारांना विकत घेता हे कितपत योग्य आहे? माझी विश्वगुरू मोदींच्या पक्षाकडून ही अपेक्षा कधीच नव्हती. तुम्ही दुसरे पक्ष फोडता, भ्रष्ट नेत्यांना पक्षात घेऊन पक्ष वाढवता, जे पक्षात येणार नाहीत त्यांना ईडीचा धाक दाखवता, नाही आले तर खोटे आरोप लावून त्यांना तुरुंगात टाकता. लोकशाहीची इतकी अधोगती आम्ही कधीच पाहिली नाही. त्याशिवाय खून, हाणामारी धाकदपटशा असतोच. आमच्याकडे वरिष्ठ न्यायालयाने राष्ट्राध्यक्षांविरुद्ध निकाल दिला तर त्याला खुर्ची सोडावी लागते. तुमच्याकडे खुर्चीसाठी लोकशाहीची तत्वं तुम्ही पायाखाली तुडवता. तुमची वरिष्ठ न्यायालयेही अनेकदा सरकारविरुद्ध न्याय देण्यास कचरतात. तुमच्याकडे आमदार-खासदार खरेदी होते. थूत् तुमच्या या असल्या प्रवृत्तीवर. मला तर वीट आलाय तुमच्या देशाच्या राजकारणाचा. ही तर एकपक्षीय हुकूमशाही! म्हणूनच मी विश्वगुरू मोदींचा राग राग करतो. एवढ्या मोठ्या बलाढ्य देशाची वाट लावलीय विश्वगुरूंनी. वेळीच सावध व्हा. विकासाच्या नावाखाली लुटताहेत तुमच्या देशाला.
-हे तुम्ही मला काय ऐकवता? आम्हाला सगळं माहिताय. अति तिथे कधीतरी माती होते या आशेवर आहोत आम्ही.
-मी रशियाचा पुतिन, नुकताच तुमच्या देशात येऊन गेलो, पण माझं मलमूत्रही तुमच्या देशात ठेवून गेलो नाही तर बरोबर घेऊन गेलो. मला मुंबई आणि महाराष्ट्र आवडतो. काय कल्चर आहे तुमचं. इंडियाशी आमचं पहिल्यापासून मैत्रीचं नातं आहे. त्यामुळे आमचं प्रेम आहे तुमच्या देशावर. खूप मदत केलीय आम्ही यापूर्वी तुम्हाला, आणि पुढेही करत राहू. यात तुमच्या विश्वगुरूंचा काहीच संबंध नाही. पण जनतेला फसवणारे नेते पटकन् कळतात आम्हाला. तुम्हाला खरं सांगतो. ज्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचता ना, ते तुमच्या देशाला विकासाकडे नव्हे तर अधोगतीकडे घेऊन चाललेत. त्यांच्यात एक हुकूमशहा दडलाय. जनतेला वेठीस धरण्यासाठी काय युत्तäया लढवायच्या हे पक्कं मनाशी ठरवून सत्तेवर आल्यापासून त्यांची तशीच वाटचाल चाललीय. निवडणुका म्हणजे खेळ वाटतो त्यांना पपेट शोसारखा. नुकताच तुमच्या मुंबई-महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीच्या नावाखाली झालेला तमाशा पाहिलाय सार्या जगाने. हे असले राज्यकर्ते देशाला, जनतेला अंधाराच्या खड्ड्याकडे घेऊन चाललेत, म्हणून सावध करतोय तुम्हाला.
-मी चीनचा अध्यक्ष जिन पिंग. आमच्याकडे निवडणुका होत नाहीत. मीच निवडतो कोणाला निवडायचे ते. आमच्याकडे हुकूमशाही असली तरी तिच्याशी प्रामाणिक राहून आम्ही देशाचा विकास करतो. पण तुमचे राज्यकर्ते लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाहीचे गलिच्छ प्रदर्शन करतात ते मात्र चुकीचं आहे. आमच्या चायनीज मेड वस्तूंचा खप तुमच्याकडे सर्वात जास्त आहे. तरीही तुमच्याकडे उल्हासनग्ारचा डुप्लिकेट माल खपवला जातो ही तुमची अधोगती आहे. आमच्या देशात या आणि बघा आम्ही केलेला विकास. आम्ही बालपणापासून मुलांना घडवतो. तुमचे नेतेच असे आहेत की त्यांच्यापासून मुलं काय शिकणार? भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच, तुमच्या महापालिका निवडणुकीबद्दल आम्ही काय बोलणार? जनतेला गंडवणारे नेते असले की काय वाटेल ते होऊ शकतं. इंडिया आमचं शत्रुराष्ट्र असलं तरी त्याची ताकद आम्ही ओळखून आहोत. सध्या एवढंच पुरे.

