• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

वयाच्या चौकटी मोडणारी सायकलयात्रा

प्रशांत सिनकर (निसर्गायन)

marmik by marmik
February 27, 2026
in इतर
0
वयाच्या चौकटी मोडणारी सायकलयात्रा

आजच्या युगात वय ही केवळ आकड्यांची बेरीज आहे, असे अनेकदा म्हटले जाते. मात्र प्रत्यक्ष आयुष्यात समाज अजूनही ठराविक वयानंतर माणसाकडून अपेक्षा कमी करतो. ‘आता वय झालं’, ‘हे तरुणांचं काम आहे’, ‘आराम करा’ अशा वाक्यांच्या चौकटीत ज्येष्ठ नागरिकांना अडकवले जाते. पण पुणे आणि मुंबईतील सहा ज्येष्ठ नागरिकांनी या सर्व समजुतींना छेद देत, सायकलच्या दोन चाकांवर बसून तब्बल चार देशांचा, ३ हजार ८३० किलोमीटरचा आणि ४१ दिवसांचा असा ऐतिहासिक प्रवास करत एक नवी प्रेरणादायी कथा लिहिली आहे.

ही केवळ सायकल मोहीम नव्हती, हा स्वतःशी, शरीराशी, निसर्गाशी आणि जगाशी संवाद होता. हा प्रवास होता थायलंड, लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनाम या आग्नेय आशियातील देशांमधून, पण त्याहून अधिक तो प्रवास होता माणसाच्या अंतर्मनाचा, धैर्याचा आणि अढळ इच्छाशक्तीचा.

संजय कट्टी, वर्षे ६८. निवृत्तीनंतरही स्वस्थ बसणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. आयुष्यभर काम, जबाबदार्‍या आणि कुटुंबासाठी झटणार्‍या या माणसाला एक प्रश्न सतावत होता. ‘आता उरलेलं आयुष्य आपण कसं जगायचं?’ याच प्रश्नाचं उत्तर शोधताना सायकलिंग हा केवळ छंद न राहता जगण्याचा मार्ग बनला. त्यांच्यासोबत रमाकांत महाडिक (७२), धनंजय मदन (६७), संजय कुमठेकर (६२), आनंद पाटील (५९) आणि मोनिश चक्रवर्ती (५५) हे सहा जण एकत्र आले. हे सगळे खूप वर्षे ट्रेकिंग, गिर्यारोहण व सायकलिंग करत आहेत. या क्षेत्रातील त्यांचा अनुभव व पल्ला मोठा आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील, पण एका विचाराने बांधलेले… ‘वय आपल्याला थांबवू शकत नाही.
आधी भारतातील अनेक लांब पल्ल्याच्या सायकल मोहिमा, नंतर आंतरराष्ट्रीय स्वप्न… आणि अखेर ठरलं आग्नेय आशियाची सायकल सफर करायची. या प्रवासाची ही आव्हानात्मक कल्पना होती ती धनंजय मदन याची. यासाठी अशी मोहीम आखणं म्हणजे केवळ तिकीट काढणं किंवा नकाशा पाहणं नाही. सहायक वाहनाशिवाय सायकलिंग म्हणजे प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वतःवर. अन्न, पाणी, दुरुस्ती, आरोग्य, हवामान, दिशा… दररोज सरासरी ८० ते १०० किलोमीटर सायकलिंग, तेही उष्णकटिबंधीय हवामानात. वैद्यकीय तपासण्या, सराव, मानसिक तयारी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांवर असलेला दृढ विश्वास.

****

६ डिसेंबर २०२५. थायलंडची राजधानी बँकॉक. गर्दी, वाहतूक, उष्णता आणि आर्द्रता सगळं काही अंगावर येणारं. पण त्या सकाळी सहा सायकली रस्त्यावर उतरल्या आणि एका रोमांचकारी इतिहासाला सुरुवात झाली. बँकॉकहून प्राचीन आयुथयाकडे जाताना थायलंडचा सांस्कृतिक वारसा, बुद्धमूर्ती, मंदिरे आणि नदीकाठची जीवनशैली जवळून अनुभवायला मिळाली. स्थानिक लोकांच्या आश्चर्यचकित नजरा, हात हलवणारी मुलं आणि कुतूहलाने विचारलेले प्रश्न- ‘एवढ्या वयात तुम्ही इतका लांब प्रवास करताय?’त्यावर आम्ही अनुत्तरित असायचो, असं ते सांगतात. थायलंडनंतर लाओसमध्ये प्रवेश करताना भौगोलिक परिस्थिती बदलू लागली. डोंगराळ रस्ते, कमी वस्ती, मर्यादित सुविधा. राजधानी व्हिएन्टियान गाठेपर्यंत शरीराला थकवा जाणवू लागला, पण मन अजून ताजं होतं. लाओसमधील प्रवासात मेकाँग नदी, हिरवीगार जंगले आणि साधी, समाधानी जीवनशैली मनाला भिडली. इथे भाषा मोठा अडसर ठरली, पण हावभाव, हसू आणि माणुसकी यांची भाषा सगळीकडे सारखीच असते, हे पुन्हा जाणवलं. दक्षिणेकडे जाताना पाक्से आणि पुढे नॉन्ग नोक खेईन सीमारेषा ओलांडणं हा मोठा टप्पा होता. कागदपत्रं, चौकशी, प्रतीक्षा- सायकलिंगपेक्षा जास्त मानसिक कसोटी इथे लागली. कंबोडियामध्ये प्रवेश करताच इतिहासाचा भार जाणवू लागला. युद्ध, संघर्ष आणि तरीही उभारी घेणारा देश.

सीएम रीपमधील अंगकोर वाट ही जगातील एक अद्वितीय वास्तू. त्या भव्य मंदिरासमोर उभं राहून सहा सायकलस्वार क्षणभर स्तब्ध झाले. हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आणि आजची सायकल मोहीम अशा, काळाच्या दोन टोकांवर उभं राहिल्यासारखं वाटलं त्यांना… हा क्षण केवळ पर्यटनाचा नव्हता, तर नम्रतेचा होता.

राजधानी फ्नॉम पेन्ह येथे भारतीय राजदूतांची सदिच्छा भेट हा सन्मानाचा क्षण होता. भारतातील ज्येष्ठ नागरिक आग्नेय आशियात भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत, ही भावना अभिमानाची होती. बावेथ मोक बाय सीमारेषा ओलांडून व्हिएतनाममध्ये प्रवेश करताच मोहिमेचा सर्वात कठीण टप्पा सुरू झाला. हो ची मिन्ह सिटीपासून हानोईपर्यंत सुमारे १,८०० किलोमीटर, ३० दिवस आणि सतत बदलणारं हवामान. न्हा ट्रांगचे समुद्रकिनारे, होई आनचं ऐतिहासिक शहर, दा नांगची आधुनिकता, फाँग न्हाच्या गुहा, निन्ह बिन्हचे डोंगर निसर्गाने इथे सगळे रंग दाखवले. कधी मुसळधार पाऊस, कधी प्रखर ऊन, कधी थकवा, तर कधी स्नायूंना आलेली वेदना. पण कुणीही थांबलं नाही.
या प्रवासात सर्वात मौल्यवान ठरले ते लोक. स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी, छोटे विक्रेते- कुणी पाणी दिलं, कुणी फळं, तर कुणी फक्त मनापासून शुभेच्छा. भाषा वेगळी होती, देश वेगळे होते, पण माणुसकी सार्वत्रिक होती. ४१ दिवसांचा प्रवास, हजारो किलोमीटर आणि तरीही एकही मोठा आजार नाही, अपघात नाही. हे केवळ नशीब नव्हे, तर काटेकोर नियोजन, शिस्त आणि अनुभवाचं फलित होतं.
व्हिएतनामची राजधानी हानोई गाठताना डोळ्यांत पाणी आणि मनात समाधान होतं. ही मोहीम संपली होती, पण तिचा संदेश सुरू झाला होता… ‘वय मर्यादा ठरत नाही; विचार ठरतो.’

सायकलपलीकडचा संदेश
ही मोहीम सायकलिंगची होती, पण ती जगण्याची शिकवण देऊन गेली. ज्येष्ठ नागरिक म्हणजे ओझं नव्हेत, तर अनुभवांचा खजिना असतो, हे या सहा जणांनी सिद्ध केलं. आज समाजाला गरज आहे अशाच प्रेरणांची, ज्या सांगतात की, स्वप्न पाहायला वय लागत नाही आणि ती पूर्ण करायला हिंमत लागते.

ऊर्जा देणारा प्रेमळ सायकलिस्ट!
डि नांग वरून प्लच्या दिशेने सकाळची सायकलिंग सुरू झाली तेव्हा दिवस नुकताच उजाडत होता. आकाशात कोवळं ऊन पसरलं होतं आणि उजव्या बाजूला अथांग समुद्र शांतपणे श्वास घेत होता. समुद्रकिनार्‍यालगत सुंदर पार्क, सायकलिंग ट्रॅक आणि रूंद पदपथ होते. कुठे ज्येष्ठ नागरिक चालत होते, कुठे तरुण धावत होते, तर कुठे कुटुंबीय निवांत फेरफटका मारत होते. सगळीकडे एक सकारात्मक, उत्साही वातावरण होतं.
मी माझ्या गतीने पुढे जात होतो. अचानक मागून रोड बाईकवर एक सायकलिस्ट माझ्याजवळ आला. त्याने थोड्या खुणा करत मला थांबवायचा प्रयत्न केला. क्षणभर वाटलं, ‘काही चूक झाली का? कुठे नियम मोडला का?’ परदेशात अशा वेळी मन थोडं सावध होतंच. मी सायकल थांबवली. तो सायकलिस्ट हसत होता. त्याच्या चेहर्‍यावर कसलीही शंका, तक्रार किंवा राग नव्हता फक्त आपुलकी. त्याने थेट त्याच्या जर्सीच्या मागच्या पॉकेटमध्ये हात घातला आणि मला दोन जेल चॉकलेट्स पुढे केली. थकलेल्या सायकलिस्टसाठी जेल
चॉकलेट म्हणजे जणू प्राणवायूच! त्यानंतर त्याने अजून दोन चॉकलेट बार देऊ केले. मी नम्रपणे हात जोडून नकार दिला, पण मन मात्र कृतज्ञतेने भरून आलं.
आम्हा दोघांनाही एकमेकांची भाषा माहीत नव्हती. शब्द नव्हते, संवाद नव्हता. पण त्याचे हावभाव, डोळ्यांतली चमक आणि ते सहज हसू खूप काही सांगून गेलं. ‘तू सायकलिस्ट आहेस, मीही सायकलिस्ट आहे. एवढंच पुरेसं आहे,’ असं जणू तो सांगत होता. त्या काही सेकंदांत मला जाणवलं—खरी मैत्री ओळखीवर नाही, ओळखीतून जन्मणार्‍या भावनेवर उभी असते. देश, भाषा, संस्कृती, पासपोर्ट…या सगळ्यांच्या पलीकडे एक नातं असतं, ते म्हणजे माणुसकीचं. तो पुढे निघून गेला. मीही सायकल सुरू केली. पण त्या सकाळी माझी ऊर्जा फक्त त्या चॉकलेट्समुळे वाढली नव्हती; ती वाढली होती एका अनोळखी मित्राच्या प्रेमळ कृतीमुळे.Friendship knows no borders… आज या वाक्याचा अर्थ मी फक्त वाचला नाही, मी तो जगलो. त्या प्रेमळ सायकलिस्टचं नाव होतं टुंग बाऊ. आणि त्याने मला आयुष्यभर लक्षात राहील अशी आठवण दिली.
धनंजय मदन (पनवेल)

Previous Post

भारत-पाक सामन्यांचा अट्टहास फक्त पैशांसाठी!

Next Post

भाषेचे गुन्हेगारीकरण लोकशाहीसाठी धोकादायक

Next Post
भाषेचे गुन्हेगारीकरण लोकशाहीसाठी धोकादायक

भाषेचे गुन्हेगारीकरण लोकशाहीसाठी धोकादायक

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.