
‘अर्ध्या आज नेहमीप्रमाणे गुरगुडे पुतळ्याजवळच्या बाकड्यावर येऊन बसला आहे. बसला आहे म्हणजे नेहमीच बसतो. पण सर म्हणले सारखं सारखं भूतकाळ आवळण्यापेक्षा वर्तमान कवटाळणं कव्हाही चांगलं. त्यानं प्रगती होती आणि बरंच काही ब्ला ब्ला ब्ला म्हणणं आहे त्यांचं. मग अर्ध्यानं आता वर्तमान कवटळायला घेतलाय. त्यात मॅडम भेटून गेल्यापासून अर्ध्या चेकाळल्यागत वागतोय. त्याला मधूनच आठवणीनं शहारून येतं. आताही तो इथं पुतळ्याजवळ इतर मित्रकंपनीची वाट बघत गाणेच चाळतोय, युट्युबवर.
‘हिरवा शालूऽऽऽ हिरवी चोऽळीऽऽ हिरवा चुडाऽ मी ल्याऽले….’ एकदम गाणं मोठ्यानं वाजू लागतं, तसं अर्ध्या घाईनं बटणं शोधून काहीबाही दाबून आवाज बंद करायची धडपड करू लागतो. पण त्यानं फक्त आवाज म्यूट झालाय, पण तेवढं का होईना, झालं ना, याचं अर्ध्याला समाधान जास्त. त्याचं कारणबी तसंच. मागं भैय्यासाहेब शाळेला हिरवा कलर का दिला, म्हणून तापू तापू भांडायला आले होते. त्यांनी नाराच दिला होता, ‘हिरवा हा शब्दबी कुणी वापरायचा नाही म्हणून.’ तसपासून गावात कुणी हिरवा शब्द उच्चारायची हिंमतबी करीना झालंय. त्यात त्यांना कळलं, त्यांच्या बापाच्या पुतळ्याखालीच अर्ध्या हिरवी गाणी वाजवतोय तर…
‘भगवा शालू’ अर्ध्या रंग बदलून गाणं
इमॅजिन करून बघतो…नकोच!
पुन्हा अर्ध्या युट्युब चाळतोय, प्लेलिस्ट चेक करतोय.
‘मुझे प्यार हुआ, प्यार हुआ अल्लाऽमियाऽऽ!’ दुसर्या प्लेलिस्टमधलं गाणं वाजू लागतं. तसा घाईनं अर्ध्या दोन्ही हातांनी स्पीकर दाबत कुठे ठेऊ आणि काय करू अश्या चिंतेनं उड्या हाणतोय. त्याला हे उमजत नाहीय, काय करावं? कारण इथं कुणी असलं गाणं पुतळ्याजवळ वाजतंय, हे गावात बोंबललं तर अख्खं गाव हाणायला येईल. भैय्यासाहेबाच्या कृपाशीर्वादाने गावात हल्ली दुसर्या कुठल्याही धर्माच्या गोष्टी रस्त्यावर आल्या/दिसल्या की गाव प्रक्षोभक झालाच समजा. असं वातावरण आहे. त्यामुळं निदान ह्या पुतळ्याखाली तर तसं वाटणं साहजिक आहे. अखेर स्विच ऑफचं बटण दाबलं गेल्यानं मोबाईलचं ओरडणं बंद झालंय.
मोबाईल तसाच खिशात सरकवून अर्ध्या आता पुतळा न्याहाळत बसलाय. जयंती मयंतीला ह्या पुतळ्यावर दूध ओतलं जातं, आज पाखरांनी काळा पुतळा सफेद केलाय. पण भैय्यासाहेब साधं देखभालीसाठी माणूस ठेविना! असो!
एकाएकी मागून गाडीचा हॉर्न वाजू राहिला म्हणून अर्ध्या वळून बघतोय तर भैरव बुलेटवर बशेल! आयला याच्या रिसेप्शनला जायला जमलंच नाही. आता हा बोंबलणार नक्की! अर्ध्या नजर चुकवू राहिलाय.
‘अर्ध्या तुला अख्ख्या गावात शोधलं, कुठंच सापडला नाही. इथं बसला काय? निदान फोन तर चालू ठेव!’ भैरव जरा गोडानं बोलतोय, म्हणजे नक्की काही काम अडेल असंल याचं! अर्ध्याचा न चुकणारा ठोकताळा.
‘फोन..?’ नुसत्या फोनच्या कल्पनेनं अर्ध्याला हादरायला होतंय. ‘नाही रे! काही चावट पोरांनी तसल्या लिंक पाठवल्या. त्याच्यामुळं फोन हँग मारतोय. म्हणून मीच स्विच ऑफ केलाय. बोल ना! काय काम काढलं?’ धीर करून अर्ध्या तोंडातल्या तोंडात गुणगुणतोय.
‘अरे जरा काम होतं रे! मदत करशील का?’ भैरव जरा गूळ लावत बोलतोय. नक्कीच याला काही अवघड काम करायचंय. अर्ध्याला सहज जाणवतं.
‘काय हनिमूनसाठी तिकिटं बुक करायचीत का?’ अर्ध्या सहज पाण्यात दगड टाकून खोलीचा अंदाज घेतो आहे.
‘तुला हनिमूनची तिकिटं बुक करायला लावायला यंटम वाटलो का मी? तुला काय कळतं हनिमूनमधलं?’ भैरवची दाबून धरलेली चीड आता निघतेय तर…
‘मग काय काम अडलंय, यंटम अर्ध्याकडं?’ अर्ध्याचीही मग जरा तिरकी भाषा. जश्याला तसं!
‘आयला तुला बघ, लगेच राग येतो. मी चेष्टेनं बोललो ना?’ भैरव अर्ध्याला काकवीत ढवळू पाहतोय.
‘रागाचं काय? तू जसं बोलशील तसंच मी उत्तर देईल ना?’ अर्ध्याचा राग एवढ्या तेव्हढ्यानं उतरतो होय?
‘बरं बाबा, माफी मागतो कान धरून! मग तर झालं? आता करशील ना काम?’ भैरव बसल्या बुलेटवरच कानाला हात लावीत माफी मागून घेतोय.
‘पण ह्या वेळेला मी गावाबाहेर जाणार नाही. आता थोड्या वेळात इथं पोरं जमतील, त्यांच्यात मला बसायचं आहे. तेव्हा…’ अर्ध्या अजून भाव खातोय.
‘तू इथंच का बसेना! फक्त माझं काम करून दे!’ भैरव अगदी घायकुतीला आलाय.
‘बोल!’ अर्ध्या आता डायरेक हरभर्याच्या शेंड्यावर.
‘हे रिसेप्शनचे खासमखास फोटो काढलेय ना माझ्या? त्याचा अल्बम बनवायचाय…’ आता कुठं भैरवचे शब्द बाहेर पडायला लागलेत… नाही का?
‘मग गावात बरे फोटोग्राफर आहे. त्यांच्याकडं जायचं आणि टाकायचा अल्बम बनवायला. त्याला काय गरजे माझी?’ अर्ध्या अजूनबी नांदंना!’
अरे फोटो काढेले रे! पण जरा छान समर्पक ओळी असल्या तर बघायला मजा येईल…’ भैरवचं अर्ध्या पुरं ऐकून घेतो कुठंय?
‘हा मंग टाकायच्या ना! ताल से ताल मिला, मेरा मन क्यू तुम्हें चाहे, दिल तो पागल हैं, रब ने बना दी जोडी, ये इश्क नहीं आसान! असल्या ओळी टाकत जायचं, फोटो पाहून! सोप्पंय!’ अर्ध्या फटाफट हिंदी गाणे आठवून ओळी सांगत जातोय. सोप्पंय म्हणत!
‘मला हिंदी नको रे! मराठी पाहिजे! त्या पण कुठं आईकेल, वाचेल नको! नव्या…’ भैरवच्या अटीवर अर्ध्याचं डोकं गरगरायला लागलंय.
‘भाऊ, मला काही गझल-बिझल येत नाही आणि कविता नाहीच नाही.’ अर्ध्याला नकोचे हे लचंड!
‘अरे म्हणजे गावात असंल ना आपल्या एखादा नवीन कवी-बिवी! तुझ्या ओळखीत…’ भैरव अर्ध्याला डोकं भिंगवायला लावतोय.
‘कवी? नाहीये कोणी! हां एक सर आहे. पण तो बालगीत लिहितो. त्याला भैय्यासाहेबानी बालसाहित्यवीर पुरस्कार दिला होता. दुसरं..? हां तिकडं नाही का? नवीन सोसायट्या व्हयेल? तिथं एक लेखक राहतो. मागं त्याचा जिल्हा लेव्हलचा साहित्य ठगादमी पुरस्कार हुकवला होता पहाय? काही पंचांनी? त्याच्यावरून दोन आमदार आणि एक खासदारात भांडण झालं होतं लाईव्ह? तो आहे ब्वॉ! पण तो लिहितो एव्हढं माहित्ये! कविता-बिविताचं सांगता नाही यायचं!’ ताण दिल्यासरशी अर्ध्याला काही आठवतंय!
‘मला नाही आठवत. कोणे तो! पण चाल जाऊ त्याच्याकडं!’ भैरव बोलता बोलता बुलेटला किक मारू लागतो आहे.
‘ये बाबा! तुझा तू जा! पाहिजे तर मी तुला पत्ता देतो. कारण काही लेखक मंडळींचे आटे ढिल्ले राहत्या. ते उलट आपल्या डोक्यात पान्हे घालायचे! काय?’ अर्ध्या संभाव्य धोका सांगून मन वळवायचा प्रयत्न करून बघतो आहे.
‘तू चाल रे! तो कविता रचित नसंल तर एखाद्या कविशी तर त्याची ओळख राहील ना? आपल्याला काय? कुणाकडून तरी चारोळ्या, कविता, गझल पाहिजे. बस्स! चाल झटकन!’ आता भैरवला टाळता येईना! अर्ध्या जीवर उठून गाडीवर बुड टेकवितो ना टेकवितो, तर बुलेट अर्ध्यानं सांगितलेल्या पत्त्याच्या दिशेनं निघालेले.
हा, हेच ते घर! इथंच तो लेखक राहतोय की! दिवाबत्तीनंतरची भुतं, प्रेताचे आशिक, अमंगळावरचे फकीर अशी काही त्याची पुस्तकं बाजारात येऊन गेल्याचं अर्ध्यानं कुठं ऐकलेलं, वाचलेलं! आता त्याला ह्या भैरवच्या अल्बमसाठी कविता लिहितो का? म्हणून विचारायला दोघं आलेले.
अर्ध्या दबकत दबकत दाराजवळ येतोय, हळूच फटीतून ऐकू येणारी वाक्यं कान टवकारून ऐकू लागतोय.
‘ह्या अजस्त्र बाहूत सूर्य सामावून घेण्याची क्षमता खचितच आहे. ह्या निधड्या छातीवर त्सुनामीच्या लाटा घेण्याची मग्रुरी अजून शाबूत आहे. पण आमच्या अविचल, अचेतन पार्थिवाचे ताबूत पुरले कुठे? त्या थडग्यांवर संजीवनी मंत्रांचे पुकारे करवून जागवायला हवीत ती थडगी..!’ मधून कुणीतरी काही पुटपुटतं आहे.
‘मी आत येऊ का?’ अर्ध्या मानेनं बगळासन करू जातो.
‘काय आहे?’ मधून आवाजाला प्रत्युत्तर!
‘हे धनपीठ उपउत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांचं घर ना?’ अर्ध्या जोडप्रश्न आत बागडायला सोडून देतो आहे.
‘हो, बोला!’ मधून आदरयुक्त प्रतिसाद येऊ लागतोय.
‘हे माझा मित्र भैरव आहे, त्याच्या रिसेप्शनच्या अल्बममधी छापायला छान कविता पाहिजे होत्या..!’ पुढं अर्ध्या काही बोलायच्या आत आतून आलेली केरसुणी जी अर्ध्यानं हुकवलीय, ती पाठमोर्या भैरवच्या ढुंगणावर बसतेय. मागून अर्ध्याही पळतोय. पळताना तो भैरवचं फक्त सांत्वन करू बघतो.
‘साला, ह्या साहित्यिकांच्याही भावना काकू फार नाजूक असतात ना? दिल्या असत्या चारदोन ओळी. बिघडलं असतं का?’

