
सायबरजगात एखाद्याला लैंगिक चित्रण उघड करण्याची धमकी देऊन, ब्लॅकमेल करून त्याच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रकार हा सायबर सेक्स्टॉर्शनच्या नावाने ओळखला जातो. ऑनलाइन खंडणीचाच हा एक प्रकार आहे. एखाद्याची लैंगिक प्रतिमा, व्हिडिओ किंवा इतर स्पष्ट सामग्री आपल्याकडे आहे असे सांगून पैसे उकळण्यासाठी किंवा त्याला ऑनलाइन लैंगिक कृत्यांमध्ये गुंतवण्यासाठी याचा वापर केला जातो. खंडणीखोराने केलेली मागणी पूर्ण केली गेली नाही तर मानसिक छळ केला जातो. यातलाच एक खळबळजनक प्रकार आहे रिव्हेंज पॉर्न.
कधी कधी अतिशय जवळिकीच्या नात्यांमधले वादविवाद विकोपाला गेले की काय भीषण टोक गाठले जाऊ शकते, याचे दर्शन घडवणारी ही कथा आहे. ती वाचण्याआधी हे लक्षात घ्यायला हवं की सोशल मीडियावर म्हणजे फेसबुक, एक्स अशा व्यासपीठावर वावरताना काटेकोर काळजी घ्यायला हवी, खासकरून इथे आपले फोटो टाकताना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
पुण्यात राहणार्या स्वाती नावाच्या तरुणीची ही गोष्ट. तिने अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण पूर्ण केले होते. संगणक या विषयात तिला चांगली गती होती. त्यामुळे त्याचे शिक्षण घेण्याचा निर्णय तिने घेतला होता. एका नामांकित संस्थेमध्ये तिने संगणकाच्या अॅडव्हान्स अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला, तेव्हा तिची मैत्री चिन्मयबरोबर झाली. तो देखील कॉम्पुटर प्रोग्रॅमिंगमध्ये हुशार होता. स्वातीला देखील त्यामध्ये विशेष स्वारस्य होते. त्यामुळे तिची काही दिवसातच चिन्मयबरोबर चांगली मैत्री झाली. अभ्यासाबरोबरच दोघेही एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडून गेले, तेही अवघ्या महिनाभराच्या कालावधीत. दोघांची मैत्री गहिरी होत चालली होती, शारीरिक जवळीकही वाढली होती. सुमारे दोन वर्ष त्यांचे हे प्रेम प्रकरण सुरू होते.
एक दिवस स्वातीच्या घरच्या मंडळींनी तिचे लग्न वेगळ्याच मुलाबरोबर निश्चित केले. तेव्हा आपले चिन्मय नावाच्या मुलावर प्रेम असून त्याच्याबरोबर विवाह करण्याची इच्छा असल्याचे तिने घरच्या मंडळींना सांगितले. पण, घरच्या मंडळींनी तिच्या मागणीला स्पष्ट शब्दांत नकार देत, तिचा प्रस्ताव धुडकावून लावला. स्वातीने चिन्मयची भेट घेऊन हा प्रकार त्याला सांगितला. आपण आईवडिलांच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही, अशी हतबलताही व्यक्त केली. साहजिकच चिन्मयच्या संतापाचा कडेलोट झाला. त्याने स्वातीबरोबरचे संबंध कायमचे तोडून टाकले…म्हणजे असं त्याने तिला भासवलं, पण प्रत्यक्षात तो सुडाने धुमसत होता. तिच्यावर नजर ठेवून होता.
एव्हाना स्वाती शिक्षण पूर्ण करून एका मोठ्या आयटी कंपनीमध्ये चांगल्या पदावर जॉइन झाली होती. घरच्यांनी पसंत केलेल्या मुलाबरोबरच स्वातीचे लग्न पक्के झाले होते. तिच्या लग्नाची तारीख जवळ येत चालली होती. चिन्मय या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून होता. स्वातीच्या कंपनीमध्ये काम करणार्या काही अधिकार्यांचे, स्वातीचा होणारा नवरा संतोष याच्यासह स्वातीच्या काही मित्र-मैत्रिणींचे मोबाईल नंबर त्याच्याकडे होते. लग्नाच्या धामधुमीतच चिन्मयने स्वातीला फोन केला आणि तिला म्हणाला, बघ स्वाती, अजून वेळ गेलेली नाही, तू माझ्याबरोबर लग्न कर, आपण पळून जाऊन लग्न करू, तुला मी राणीसारखी ठेवीन… त्यावर स्वातीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. ती त्याला म्हणाली, आपले लग्न हा विषय तू आता बंद कर, परत मला फोन करू नकोस. संतापलेला चिन्मय ‘ओके, बघ आता काय करतो ते’ असे म्हणाला आणि त्याने मोबाइल बंद केला.
काही तासांतच स्वातीच्या मोबाइलवर वेगवेगळ्या अनोळखी नंबरांवरून अश्लील फोटो आणि व्हिडिओ क्लिप पोहोचल्या. स्वाती आणि चिन्मय यांच्यातल्या जवळिकीच्या खासगी क्षणांचं चिन्मयने तिला कल्पनाही न देता चित्रिकरण केलेलं होतं. तिने त्याच्यावर केलेल्या प्रेमाचा आणि त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा त्याने गैरफायदा घेतला होता. ते सगळे मनाच्या कुपीत जपून ठेवायचे क्षण त्याने भविष्यात तिला ब्लॅकमेल करण्यासाठीच रेकॉर्ड करून ठेवले होते. सगळ्या फोटोंनंतर मेसेज लिहिला होता. फक्त २४ तास आहेत तुझ्याकडे. तोपर्यंत तुझा होकार आला नाही, तर हे सगळे फोटो, व्हिडिओ तुझे मित्र, नातेवाईक, ऑफिसातले सहकारी, तुझा भावी नवरा, या सगळ्यांच्या मोबाइलवर पाठवले जातील. तेव्हा आत्महत्या करण्यापेक्षा आज माझ्याशी लग्न कर. सुखात राहशील.
स्वातीचं धाबं दणाणलं. तिच्या मनातलं चिन्मयबद्दलचं सगळं प्रेम क्षणार्धात करपून गेलं होतं. ज्याने आपल्या प्रेमाचा असा बाजार मांडला, त्याच्याबरोबर आता ब्लॅकमेलच्या भीतीनेही लग्न करण्याची कल्पनाही तिला विषारी वाटत होती. जो हे करू शकतो, तो आपण नकार दिल्यावर आपल्या चारित्र्याचा चारचौघांत पंचनामा करणार याचीही खात्री तिला होती. हे सगळं होण्यापेक्षा आत्मघातच करून सगळ्यातून मुक्त व्हावं, असं तिला वाटत होतं. तिची अशी भिरभिरती अवस्था झालेली असताना तिला संतोष भेटला. लग्नासाठी काही खरेदी करण्याच्या मिषाने तिच्याबरोबर फिरायला जाण्याची संधी तो साधू पाहात होता. स्वातीचं काहीतरी बिनसलं आहे, हे त्याच्या लक्षात आलं. त्याने तिला विश्वासात घेतलं, धीर दिला आणि म्हणाला, आपल्याला सगळं आयुष्य सोबत काढायचं आहे. काय झालंय ते स्ाांग मला. स्वातीचा बांध फुटला, तिने संतोषला सगळा प्रकार सांगितला आणि मी तुझ्या आयुष्यातून बाजूला होते, मला माफ कर, असं म्हणून ती दूर जाऊ लागली. संतोषने तिला थांबवलं आणि आपल्या सायबर तज्ज्ञ मित्राला फोन लावला. त्याने सायबर गुन्हे शाखेतल्या मित्राशी जोड करून दिली. त्यांनी रातोरात चक्रे फिरवून चिन्मयला अटक केली आणि त्याच्याकडची हार्ड डिस्क ताब्यात घेऊन त्यातले सगळे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ नष्ट केले. अशी वेळ आली तर ब्लॅकमेल करण्यासाठी चिन्मयने एक कॉपी बनवून ठेवलेली होती. पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवल्यावर चिन्मयने तिचाही ठावठिकाणा सांगितला आणि तीही नष्ट करण्यात आली.
संतोषने स्वातीला सांगितलं की असं काही आयुष्यात घडलं होतं, हे आता विसरून जा. कुणालाही काहीही सांगू नकोस. तुझं प्रेम सांभाळण्याची चिन्मयची योग्यता नव्हती. तुझी हरकत नसेल, तर मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे.
अशी घ्या काळजी
- आपण कोणाही बरोबर मैत्री केल्यानंतर कोणतेही फोटो, व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी दोनदा विचार करा आणि संभाव्य परिणामांचा विचार करा.
- गोपनीयता राखा : तुमच्या ऑनलाइन गोपनीयतेच्या सेटिंग्जचे पुनरावलोकन करा आणि मजबूत करा आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण करा.
- एक सपोर्ट नेटवर्क तयार करा : एवढी खबरदारी घेऊनही असा प्रसंग ओढवलाच तर शांतपणे दुःख सहन करू नका- कठीण काळात मित्र आणि कुटुंबाचा आधार घ्या.
- घटनांची तक्रार करा: जर तुम्ही सायबर सेक्सटोर्शनचे बळी असाल तर, घटनेची माहिती ताबडतोब पोलिसांकडे नोंद करा.

