• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

यातला एक निवडायचा आहे…

कवी : अनाम

marmik by marmik
January 22, 2026
in इतर
0

आधीपासून असलेले
आज आलेले, काल आलेले,
परवा आलेले, मागच्या महिन्यात आलेले, मागील वर्षी आलेले
मागच्या निवडणुकीत आलेले
एकदा जाऊन परत आलेले
परत जाऊन परत आलेले
येऊन जाऊन असलेले
परत परत येऊन जाऊन असलेले
यातला एक निवडायचा आहे!!!

पक्षाशी निष्ठा असलेले जुने
पक्षाशी निष्ठा असलेले नवे
पक्षात राहून बाहेरख्याली असलेले
साहेबांशी निष्ठा असलेले जुने
साहेबांशी निष्ठा असलेले नवे
हृदयसम्राटाशी इमान असलेले जुने सैनिक
हृदयसम्राटाशी इमान आणलेले नवे सैनिक
गांधी नेहरूंचे मीठ खाल्लेले
गांधी नेहरूंचे मीठ खाण्यास आलेले
मोदींचे जुने भाट
मोदींचे नवे भाट
यातला एक निवडायचा आहे!!!

तुरुंगात गेलेले जाऊन आलेले
तुरुंगात वाटेवरचे आरोप झालेले
जामीनावर सुटलेले जामीन अर्ज केलेले पॅरोलवर सुटलेले
सुप्रीम कोर्टात सुटलेले
हायकोर्टात गेलेले
खालच्या कोर्टात अडकलेले
यातला एक निवडायचा आहे!!!

फुकट वीज
फुकट पाणी
कर्जमाफी
सबसिडी
फुकट राशन
फुकट बेकारभत्ता
फुकट यात्रा
फुकट रस्ते
बोलाची कढी
बोलाचा भात
यातील जास्तीत जास्त देऊ म्हणणारा
यातला एक निवडायचा आहे!!!

भाईचा माणूस, दादाचा माणूस,
बाबाचा माणूस, अण्णाचा माणूस,
काकांचा माणूस, अध्यक्षांचा माणूस, उपाध्यक्षाचा माणूस,
साहेबांचा माणूस, जातीचा माणूस
धर्माचा माणूस, गावाचा माणूस
गुरूचा शिष्य, गटाचा माणूस
संघाचा माणूस
यातला एक निवडायचा आहे!!!

पक्षाचा अधिकृत पक्षाचा अनधिकृत पक्षात आयात केलेला
पक्षाने निर्यात केलेला
फिक्स झालेला पाठिंबा दिलेला
छुपा पाठिंबा मिळालेला
आतून पाठिंबा दिलेला
बाहेरून पाठिंबा मिळालेला
आतून विरोध असलेला
बाहेरून विरोध असलेला
आपल्यातला त्यांचा
त्यांच्यातला आपला
यातला एक निवडायचा आहे!!!

शंभर कोटी जमवलेला
हजार कोटी बाळगून असलेला
गावोगावी जमिनी करणारा
बायकोला श्रीमंत करणारा
सासूच्या नावावर फ्लॅट घेणारा
मेव्हणीला जमीन घेऊन देणारा
मेव्हण्याला पीए करणारा
भाजीवाल्याला फ्लॅट घेऊन देणारा
ड्रायवरला कंपनी काढून देणारा
अंबानीशी पार्टनरशिप असलेला
लवासाचे शेअर असलेला
यातला एक निवडायचा आहे!!!

सहकारमहर्षी, शिक्षणसम्राट,
मद्यसम्राट, सहाराश्री,
वाळूसम्राट, जमीनसम्राट,
कोळसासम्राट, खाणसम्राट,
हृदयसम्राट, धर्मसम्राट,
धम्मसम्राट
यातला एक निवडायचा आहे!!!

छत्रपतींशी नाते असलेला
टिळकांशी नाते असलेला
ओबीसी असलेला रिझर्वेशन असलेला ओबीसी नसलेला
ओपन कॅटेगरीचा एससी असलेला
बीसी असलेला यातला एक निवडायचा आहे!!!

कॉमनवेल्थमध्ये गेम केलेला
कोळशात काळा झालेला
जलसंधारणात घोटाळा केलेला
महाराष्ट्र सदनात गफला केलेला
टोळधाडीत सामील असलेला
बँकेत घोटाळे केलेला
मनरेगात घोटाळा केलेला
टीडीआरचा घोटाळा केलेला
देवाच्या नावाने घोटाळा केलेला
गांधीच्या नावाने घोटाळा केलेला
ट्रस्टच्या नावाने घोटाळा केलेला
यातला एक निवडायचा आहे!!!

राडेबाजी करणारा
बस पेटवणारा ट्रेन जाळणारा
कारच्या काचा फोडणारा
लोकांना भडकवणारा
भाईचा पाठिराखा
झोपडपट्टीचा दादा
अतिक्रमण करणारा
सात बारा नावावर करणारा
अनधिकृत बांधकाम करणारा
यातला एक निवडायचा आहे!!!

कुणी अयोध्येच्या रामाच्या नावाने
कुणी मथुरेच्या कृष्णाच्या नावाने
कुणी काशीच्या विश्वेश्वराच्या नावाने कुणी अल्लाच्या नावाने
कुणी सत्यसाईच्या नावाने
कुणी आसरामाच्या नावाने
कुणी नारायणसाईच्या नावाने
कुणी आम आदमीच्या नावाने
उभा आहे
तुझ्यासाठी कोणी नसले तरी
यातला एक निवडायचा आहे!!!

मतदारा गड्या फार मोठ्ठा चॉइस आहे !
यादी फार मोठी आहे
मी फक्त सुरुवात केली
वाढव यादी तुझी तू
मतदार गड्या तुला वेळ तरी कुठे आहे!
चल उठ, कोणातरी एकावर ठप्पा मार
मग महागाईचा विचार कर
मग भ्रष्टाचारावर बोल
मग शिक्षणाच्या घसरणार्‍या दर्जावर बोलत रहा
मग बेकारीवर बोल
मग बलात्कारावर चर्चा कर
मग वाढणार्‍या विकासखर्चावर बोल
मग ढासळणार्‍या मूल्यांवर बोल
बोलत बस, बोलत बस आणि कोकलत बस

पुढची पाच वर्षे तुझीच आहेत
उगाच घाई करू नको
पहिले त्यांना निवडून दे
ती लोकशाहीची गरज आहे.
तुला तुझ्यावर शासन लागते,
तुला तुझ्यावर सरकार लागते,
तुला तुझ्यावर लोकसभा लागते,
तुला तुझ्यावर विधानसभा लागते
त्यांच्याशिवाय तुझे जीवन अधुरे आहे.
त्यांना पहिले निवडून दे
मग आहेच की!!
महागाई जिथल्या तिथे
भ्रष्टाचार जिथल्या तिथे
बेकारी जिथल्या तिथे
कर्जबुडवे जिथल्या तिथे
बलात्कार जिथल्या तिथे
बाकी सगळे जागच्या जागी जिथल्या तिथे!!!

आता फोडत नको बसू
आपल्या मित्राचंच डोकं…
तू फक्त यातला एक निवडून दे…
बेट्या तेव्हढाच तुझा हक्क…

Previous Post

गोवेकरणीची व्यथा

Next Post

शपथ घ्या! चुकणार नाही, मुकणार नाही!

Next Post
शपथ घ्या! चुकणार नाही, मुकणार नाही!

शपथ घ्या! चुकणार नाही, मुकणार नाही!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.